मुख्य सामग्रीवर वगळा

रामकथा - भाग दोन

उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

रामकथा - भाग दोन 

श्रीरामाची पुण्यपावन कथा आपण सगळे लहानपणापासून ऐकत आलो आहोत. रामायण आणि राम या गोष्टी आपल्या जीवनाच्या एक भाग झाल्या आहेत. एखाद्या गोष्टीत काही अर्थ उरला नाही तर आपण त्यात काही राम राहिला नाही असे म्हणतो. एखाद्याला बरेच समजावूनही कळले नाही, तर एवढे रामायण झाले तरी तुला कळले नाही का असे आपण म्हणतो. सकाळच्या शांत, पवित्र वेळेला रामप्रहर असे आपण म्हणतो. शहरातली माणसे एकमेकांना भेटल्यावर नमस्कार म्हणत असली तरी आपल्या ग्रामीण भागातील मंडळी आजही राम राम म्हणून एकमेकांचं स्वागत करतात. राम हा प्रत्येकाच्या अंतर्यामी आहे. प्रत्येकाच्या मनात आहे. ' हे रोम रोम मे बसनेवाले राम ...' असं एक सुंदर गाणं एका हिंदी चित्रपटात आहे. असा हा राम आपल्या रोमरोमात वसत असताना रामायणात त्याने जे आदर्श आपल्यापुढे ठेवले त्याकडे मात्र आपले दुर्लक्ष होते. कसा आहे हा राम  ? 

रामायण लिहिण्यापूर्वी वाल्मिकींनी नारद मुनींना विचारले होते की भूतलावर अशी कोणती व्यक्ती आहे की जी शूरवीर आहे, धैर्यवान, चारित्र्यवान आहे, जिची शत्रूलाच काय पण कळिकाळाला सुद्धा भीती वाटते आणि सज्जनांना अभय वाटते ? या प्रश्नावर नारद मुनी उत्तरले, ' अशी एकच व्यक्ती आहे. ती म्हणजे अयोध्यापती श्रीराम. तो शूरवीर, चारित्र्यसंपन्न, सज्जनांचा त्राता आणि दुर्जनांचा संहारकर्ता आहे, केवळ शत्रूच नव्हे तर कळिकाळालाही त्याचे भय वाटते. आणखी एक महत्वाची गोष्ट नारदांनी सांगितली. ते म्हणाले राम धैर्यात हिमालयासारखा आहे आणि त्याचे गांभीर्य सागरासारखे आहे. येथे एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ती ही की रामाचे व्यक्तिमत्व जो भारत देश हिमालयापासून सागरापर्यन्त पसरलेला आहे, आसेतु हिमाचल आहे असे ते व्यक्तिमत्व आहे. बरं हा केवळ भौगोलिक संदर्भ नाही. श्रीराम हा भारताच्या संपूर्ण सांस्कृतिक जीवनाचे प्रतीक आहे. 

रामरक्षेत रामाचे फार सुंदर वर्णन आले आहे. कमळ हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. रामाचे नेत्र म्हणजे डोळे कसे आहेत ? ' नवकमलदलस्पर्धिनेत्रम प्रसन्नम ' म्हणजे नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीप्रमाणे ज्याचे नेत्र आहेत असा तो आहे. पुढे त्याचे वर्णन फार सुंदर केले आहे. 

रामं दुर्वादलश्यामं, पद्माक्षं पीतवाससं 

दुर्वादलाप्रमाणे श्यामल वर्णाचा, कमलनेत्र असलेला आणि पितांबर परिधान करणारा असा हा राम आहे.  अशा या रामाचे ध्यान करावे, स्मरण करावे आणि मुख्य म्हणजे त्याच्या गुणांचे चिंतन करावे. 

रामायणातील प्रत्येक पात्र आपणास काहीना काही तरी शिकवण देते. मग ते पात्र मंथरा असो वा कैकयी, वा रावण असो. द्वेष, असूया, मत्सर, काम, क्रोध यांचा अंतिम परिणाम काय असू शकतो ते या व्यक्तिरेखा आपल्याला सांगतात. 

कौसल्या , सुमित्रा आणि कैकेयी या तिन्ही दशरथाच्या राण्या. राम हा कौसल्यानंदन. तर लक्ष्मण हा सुमित्रेचा आणि भरत आणि शत्रुघ्न हे कैकयीचे सुपुत्र. दशरथ राजाच्या या तिन्ही राण्या अत्यंत गुणी, सुस्वभावी आणि प्रेमाने राहणाऱ्या. त्यांना प्रत्येकीला आपापली मुले असली तरी रामावर त्यांचे सर्वात जास्त प्रेम. राम सगळ्यांच्या गळ्यातील ताईत. कैकयी ही दशरथाची लाडकी राणी. भरत आणि शत्रुघ्नाची आई. आपल्या मुलांपेक्षा तिचे रामावर काकणभर प्रेम जास्तच. रामाला राज्याभिषेक होणार म्हणून तिला कोण आनंद झाला होता..! जोपर्यंत मंथरा येऊन तिच्या कानात विष कालवत नाही, तोपर्यंत ती अत्यंत प्रेमळ आणि रामाला राज्याभिषेक होणार म्हणून आनंदित होती. पण मंथरेच्या कावेबाज बोलण्यात ती फसली आणि दशरथाकडून दोन वर मागून घेतले. त्यातील एका वराने भरताला राजा करावे आणि दुसऱ्या वराने रामाला चौदा वर्षांच्या वनवासात पाठवावे असे तिने सांगितले. आतापर्यंत सगळीकडे आनंदी असणारे वातावरण क्षणार्धात बदलून गेले. संपूर्ण राजवाड्यावर दुःखाची छाया पसरली. 

खरं तर दशरथ हा राजा असण्याबरोबरच एक आदर्श पितासुद्धा होता. रामाला राज्याभिषेक होण्यापूर्वी त्याने रामाला जो उपदेश केला, तो त्याचे पिताधर्म आणि राजधर्म यांच्या आदर्शाचे प्रतीक आहे. त्याने रामाला जे सांगितले ते कोणत्याही पित्याने आपल्या मुलाला आणि राज्यकर्त्याने आपल्या वारसाला सांगावे असेच आहे. दशरथ त्याला म्हणतो, ' आता माझा वृद्धापकाळ झाला आहे. मला राज्यकारभाराची दगदग सोसणारी नाही. तू माझा ज्येष्ठ पुत्र असून राज्याचा वारस आहेस. तू गुणवान व विचारी असून बरे-वाईट, खरेखोटे सगळे तुला कळते. तू आपल्या प्रजेची चांगली माहिती करून घे आणि तिचे न्यायाने पालन कर. तिचे सुख तेच आपले सुख, तिचे दुःख तेच आपले दुःख असे समजून आपल्या कर्तव्यास जाग . नेहमी सावध राहा. स्वतः करता येणाऱ्या गोष्टींसाठी दुसऱ्यांवर विसंबू नकोस. सज्जनांचा आदर कर. दुःखितांचे समाधान कर. अनाथांचा सांभाळ कर. आपल्या अंतःकरणात सर्वांभूती दया बाळग. ' किती सुंदर हा उपदेश..! आपल्या वडिलांचे वचन म्हणून रामाने पुढे आयुष्यभर हा उपदेश पाळला . पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. रामाला लगेच राज्याभिषेक व्हायचा नव्हता. 

दशरथ राजा तर कैकयीला वचन देऊन बसला होता आणि आता कैकयीने ते वर मागितल्यानंतर त्याला ते द्यावे लागले. कारण होते रघुकुलाचे ब्रीद राखणे. रघुकुलाचे ब्रीद होते ' प्राण जाय पर वचन न जाय .' त्याप्रमाणे त्याने ते पूर्ण केले. या ठिकाणी दशरथ राजाची काय अवस्था झाली असेल, त्याचे वर्णन करणे कठीण आहे. दिलेले वचन पाळले नाही तर रघुकुलाच्या कीर्तीला, परंपरेला बाधा येते आणि वचन द्यावे तर प्राणप्रिय असा हो पुत्र त्याला वनवासात पाठवावे लागते. अशा कात्रीत तो सापडला होता. शिवाय अयोध्या नगरीचे प्रजाजन सुद्धा रामाला राज्याभिषेक होणार म्हणून आनंदित झाले होते. त्यांना काय उत्तर द्यावे हाही प्रश्न होता. रामाला वनवासात जा म्हणून सांगण्याची हिंमत त्याच्यात राहिली नव्हती.  रामाला वनवासात जावे लागणार या कल्पनेनेच तो प्रचंड शोकविव्हल झाला होता. 

अशा वेळी रामाने आदर्श पुत्र कसा असतो याचा आदर्श घालून दिला आहे. तो दशरथाला म्हणतो, ' तुम्ही काळजी करू नका. नाहीतरी मला ऋषीमुनींकडून अजून काही शिक्षण घ्यायचेच आहे. या निमित्ताने मला वनवास आणि एकांतवास अनुभवता येईल. माता कैकयीचे हे मोठे उपकारच आहेत माझ्यावर. असे करण्यात परमेश्वराचा काही वेगळाच आणि चांगला हेतू मला दिसतो आहे. भरताला राज्याभिषेक होणार असेल तर मला आनंदच आहे. ' केवढा हा त्याग आणि समजूतदारपणा..! आपल्या आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्यांचे वचन पाळण्यासाठी. 

राम वनवासात जाण्याची तयारी करतो आणि जेव्हा लक्ष्मणाला हे सगळे कळते, तेव्हा तो प्रचंड संतापतो. कैकयीला मारायला धावतो. तेव्हा राम त्याची समजूत घालतो. त्याला म्हणतो, ' अरे, जशी कौसल्या आणि सुमित्रा, तशीच कैकयीही आपली माता आहे. माता ही सदैव आदरणीय असते. तेव्हा शांत हो. थोडा विचार कर. ' रामाचे हे बोलणे ऐकल्यानंतर तो शांत होतो. पण लक्ष्मणाचे बंधुप्रेम इथे आपल्याला बघायला मिळते. वनवासात फक्त रामालाच जायचे असते. पण तरीही लक्ष्मणाचे रामावर किती प्रेम..! तो रामाची सावली आहे. रामाशिवाय राहू शकत नाही. म्हणून राम नाही म्हणत असताना सुद्धा तो त्याच्याबरोबर वनवासात जायला निघतो. या वेळी सीतेचे सुद्धा रामावरचे प्रेम आपल्याला पाहावयास मिळते. सीता ही भारतीय पतिव्रता स्त्रीचे प्रतीक आहे. ती आपल्या पतीला सोडून राहू शकत नाही. वनवासातील सगळे दुःख, कष्ट तिला मान्य आहेत आणि राजवाड्यातील सगळी सुखे त्याज्य आहेत. गीतरामायणाच्या ग दि माडगूळकरांनी फार सुंदर गाणं सीतेच्या तोंडी घातलं आहे. ती म्हणते, ' निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. ' आपल्या भावाची सावलीसारखी पाठराखण करणारा लक्ष्मण आणि पतिव्रता असलेली सीता सर्व सुखे त्यागून रामाबरोबर वनवासात जायला निघतात. राम नसेल तर महालही सुना आहे आणि राम असेल तर वनवासही सुखकर आहे.  ( भाग तीन - बुधवारी ) 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 
     १९/०७/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...