मुख्य सामग्रीवर वगळा

रामकथा - भाग एक

उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

रामकथा - भाग एक 

परवा कोणीतरी मला व्हाट्सअँपवर एक व्हिडीओ पाठवला होता. रामायण मालिकेच्या उत्तर रामायणातील लव कुश म्हणतात ' हम कथा सुनाते राम सकल गुणधाम की ' त्या गाण्याचा हा व्हिडीओ होता. त्याचे विशेष असे की अमेरिकेतील मुलांनी ते गीत गायिलेले दाखवले होते. त्या व्हिडिओवर कोणी असं म्हटलं की हा फेक व्हिडीओ आहे. मला त्याविषयी काही बोलायचे नाही. तो खरा असेल किंवा खोटा. क्षणभर असे मानू या की तो व्हिडीओ खोटा आहे. पण आमची रामकथा त्यांना आपण सादर करावीअसं वाटणं हे सुद्धा खूप अभिमानास्पद आहे. 

गीत रामायणातील ' स्वये श्री रामप्रभू ऐकती ' हे गदिमांचं गीत असो की रामायण मालिकेतील ' हम कथा सुनाते है ' गीत असो, ते  ऐकताना माझे डोळे नकळत प्रेमभराने ओले होतात. मूळ रामायणच अतिशय गोड, त्यात या लहान बालकांच्या तोंडून ही रामकथा ऐकताना तर रामायणातील सगळा गोडवा या गाण्यात एकत्र आणून हे गाणे तयार केले की काय असे वाटावे. 

या लेखात आणि पुढच्या भागात मला काही सगळी रामकथा सविस्तरपणे सांगायची नाही. रामायणावर मी काही लिहावं एवढा माझा अभ्यासही नाही. पण रामकथेतला जो भाग माझ्या मनाला भावला तो तुमच्यासमोर ठेवावा एवढाच माझा उद्देश. रामायणात विविध नात्यांची मनोहर गुंफण आहे. मग ते पिता पुत्राचे नाते, पती पत्नीचे नाते, भावाभावांचे नाते, गुरु शिष्यांचे नाते, स्वामी सेवकाचे नाते असो वा राजा आणि प्रजेचे नाते असो. ही नाती आदर्शवत आहेत. या नात्यांनी तयार झालेल्या गोष्टींनी युगानुयुगे आमच्या पिढयांना प्रेरणा दिली आहे. शिवाजी महाराजांसारखे अनेक महापुरुष या रामायणरुपी अमृताचे पान करून घडले आहेत. युगानुयुगे रामायणाने आमच्या मनावर मोहिनी टाकली आहे. 

वाल्मिकींनी रामायण लिहिल्यानंतर अनेक श्रेष्ठ संत, लेखक आणि कवी यांना रामायणावर लिहिण्याचा मोह आवरला नाही. विविध भाषेत, विविध देशात रामायण आपापल्या परीने लिहिले गेले. वाल्मिकी रामायणानंतर उत्तर भारतात आणि देशाच्या विविध भागात तुलसीदासांचे रामायण लोकप्रिय आहे. संत एकनाथांनी सुद्धा भावार्थ रामायण लिहिले. तामिळ भाषेत कंबन रामायण तर केरळमध्ये अध्यात्म रामायण प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की वेगवेगळी अशी तीनशे रामायणे उपलब्ध आहेत. अर्थात असे असले तरी मूळ गाभा एकच आहे. 

अशी कथा आहे की वाल्मिकींनी रामायण लिहिण्याआधी मारुतीने रामायण लिहिले होते. वाल्मिकी आपण लिहिलेले रामायण दाखवण्यासाठी हनुमानाकडे घेऊन गेले. त्यावेळी हनुमानाने स्वतः लिहिलेले रामायण त्यांना दाखवले. हनुमानाने रामचरित्रातल्या सगळ्या घटना यथार्थपणे आणि भावपूर्ण भाषेत कथन केल्या होत्या. आपल्यापेक्षा श्रेष्ठ अशा पद्धतीने लिहिलेली रामकथा पाहून वाल्मिकी नाराज झाले. त्यांनी हनुमानाला विचारले की असं का झालं  ? हनुमानाने मोठे सुंदर उत्तर दिले की मी रामकथा माझ्या आनंदासाठी लिहिली. तुम्ही जगाला सांगण्यासाठी लिहिली. मी लिहिलेली रामकथा माझ्या हृदयात सदैव राहील. तुम्ही लिहिलेली रामकथा जगाला कळणे आवश्यक आहे. असे म्हणून हनुमानाने स्वतः लिहिलेले रामायण स्वतःच्या हाताने नष्ट करून टाकले. 

इथे आपण हे लक्षात घेतले पाहिजे की रामकथा ही कोणी सांगितली ते महत्वाची नाही. तिचे तात्पर्य महत्वाचे आहे. वाल्मिकींनी सांगितलेली रामकथा ही महत्वाची आहे ती याकरिता की त्यांचा आणि श्रीरामाचा जीवनकाल एकच होता. मारुतीने लिहिलेल्या रामकथेत जशी त्याची रामप्रती भक्ती होती, तशीच वाल्मिकींची भक्ती आणि तपश्चर्या यांचे पाठबळ या रामायणामागे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे युगानुयुगे ही रामकथा अमर राहिलेली आहे. तिची गोडी, तिचे महत्व यत्किंचितही कमी झालेले नाही. आजच्या काळात तर नैतिक मूल्यांचा झपाट्याने ह्रास होत असताना, रामकथेची पारायणे होणे जरुरीचे आहे. अर्थात पारायण हा शब्द मी या ठिकाणी रूढ अर्थाने वापरला नाही. तर रामकथा आपल्या जीवनात उतरण्यासाठी वारंवार तिचे श्रवण, मनन आणि चिंतन झाले पाहिजे. 

रामकथेचा आपल्याला कधीही कंटाळा येत नाही. रामायण मालिका दूरदर्शनवर काही वर्षांपूर्वी सादर झाली होती. ती या लॉकडाऊनच्या काळात पुन्हा प्रसारित करण्यात आली, तरीही लक्षावधी लोकांनी तिच्या पुनर्प्रत्ययाचा आनंद घेतला. एवढेच नव्हे तर, ही मालिका पुन्हा पाहताना त्यावेळी न कळलेल्या, लक्षात न आलेल्या काही गोष्टी नव्याने कळल्या. रामायण असो की महाभारत, ज्ञानेश्वरी असो की गीता या अशा गोष्टी आहेत, की जेवढ्या वेळा वाचू, तेवढ्या वेळा आपल्याला नवनवीन गोष्टी कळत जातात. या गोष्टी म्हणजे जणू एखाद्या समुद्रासारख्या आहेत. ज्या ज्या वेळी आपण त्यात उडी मारू, त्या त्या वेळी नवनवीन रत्ने आपल्या हाताला लागतील. समुद्राला या अर्थाने रत्नाकर  म्हणतात. तसेच हे ग्रंथही रत्नाकर आहेत. ( भाग दोन - रविवारी ) 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 
      १७/०७/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )














टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...