उगवतीचे रंग
स्वा. सावरकर आणि येसूवहिनी ( भाग दोन )
परवाच्या लेखात सावरकरांच्या कार्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता. सावरकरांची त्रिखंडात गाजलेली उडी यानिमित्ताने हा लेखन प्रपंच घडला. सावरकरांवर लिहिताना त्यांच्या मातेसमान असलेल्या येसूवहिनींच्या कार्यावर लिहावं असं वाटलं. आणि त्यातून हा आजचा लेख आपल्यासमोर ठेवतो आहे.
आपली भारतीय संस्कृती थोर. आपल्याकडे मोठ्या वहिनीला आईचा मान दिला जातो. तसाच मान सावरकरांनी आपल्या मोठ्या वहिनींना दिला. सावरकरांची आई तर ते लहान असतानाच त्यांना सोडून देवाघरी गेली होती. आईचे प्रेम फारसे लाभले नाही. ती उणीव भरून काढली येसूवहिनींनी. ' जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी ' असे म्हटले जाते. म्हणजे जननी आणि जन्मभूमी या स्वर्गापेक्षाही महान आहेत. सावरकरांच्या बाबतीत यात आणखी त्यांच्या वहिनींची भर घालावी लागेल.
१९०९ मध्ये बाबाराव सावरकर म्हणजे सावरकरांच्या मोठ्या बंधूंवर खटला होऊन त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यावेळी येसूवहिनींवर जणू आभाळच कोसळले. खरं तर ' सुख ' या शब्दाशी येसूवहिनींची भेट कधी झालीच नाही. जसे सावरकरांनी देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले, तसेच आपले सगळे जीवन येसूवहिनींनी सावरकर कुटुंबियांसासाठी अर्पण केले आणि जमेल तेवढी देशसेवाही केली. त्या माउलीचे जीवन म्हणजे एक यज्ञच होता. बाबारावांना अटक होऊन जन्मठेपेची शिक्षा झाली, तेव्हा या प्रसंगी आपल्या वहिनींचे सांत्वन करणारी एक अप्रतिम कविता सावरकरांनी लिहिली. त्यात त्यांचा आपल्या वहिनींबद्दलचा आदर प्रकट होतो. ते म्हणतात
जयासी तुवा प्रतिपाळिले, मातेचे स्मरण होऊ न दिधले
श्रीमती वाहिनी वत्सले , बंधू तुझा तो तुज नमी .
तिला ते म्हणतात
तू धैर्याची असशी मूर्ती, माझे वहिनी माझे स्फूर्ती.
अशी ही मातेसमान असलेली, धैर्याची मूर्ती आणि स्वातंत्र्यवीरांची स्फूर्ती असलेली ही माउली अत्यंत साधी होती. त्र्यंबकेश्वरच्या फडके घराण्यातील ही कन्या सून म्हणून सावरकर गृही आली . त्यावेळी सावरकर कुटुंब सधन होते. फडक्यांची यशोदा बाबारावांची पत्नी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे धाकटे बंधू बाळाराव उर्फ नारायणराव यांची येसूवहिनी बनून आली . त्यावेळी लवकर लग्ने होत असत. लग्न झाले तेव्हा येसूवहिनी केवळ दहा बारा वर्षांच्या असतील. पण समज खूप आलेली होती. त्यांना लिहिता वाचताही येत नव्हते. सावरकरांनी आपल्या वहिनीला लिहावाचायाला शिकवले. पुढे बाबाराव शिकण्यासाठी नासिकला गेले. तेथे त्यांनी योगशास्त्राचा अभ्यास केला. त्यातून त्यांचे मन विरक्त होऊन संन्यास घेण्याचे त्यांनी ठरवले होते. त्याच सुमारास नासिकला प्लेगची साथ आली. त्यामुळे बाबाराव पुन्हा भगूरला आले. भगूरलाही प्लेगची साथ आली आणि त्या साथीत येसूबाईंचे सासरे आणि चुलतसासरे यांचा मृत्यू झाला. सावरकरांचे धाकटे बंधू नारायणराव यांनाही प्लेगची लागण झाली आणि त्यांची स्थिती अत्यंत गंभीर झाली. त्यावेळी बाबाराव आणि येसूवहिनी यांनी त्यांची शुश्रूषा करून त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. पण सावरकर कुटुंबीयांची आर्थिक स्थिती आता खालावली होती. आता दोन्ही भावांचे शिक्षण नासिकला करण्याचे ठरवून सावरकर कुटुंबीय नासिकला आले. या ठिकाणी त्यांना अत्यंत हलाखीत दिवस काढावे लागले.
याच दरम्यान बाबाराव सावरकरांनी मित्रमेळा या ' अभिनव भारत ' क्रांतिकारी संघटनेशी संबंधित संस्थेचे संघटन केले. स्वातंत्र्य प्रचाराच्या कार्याच्या दृष्टीने त्यांनी नऊ पुस्तिकांचे प्रकाशन केले. त्यात स्वातंत्र्यकवी गोविंद यांच्याही कविता होत्या. या पुस्तिकांच्या प्रकाशनासाठी आणि घर चालवण्यासाठी येसूवहिनींनी आपले सौभाग्यालंकार विकून वेळोवेळी पैसे उभे केले. पुढे याच पुस्तिकांच्या प्रकाशनावरून बाबारावांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. याच दरम्यान सावरकर शिक्षणासाठी इंग्लंडला गेलेले होते आणि तेथून ' इंडिया हाऊस ' मधून स्वातंत्र्य चळवळीची सूत्रे ते हलवत होते. त्यांना जेव्हा ही बातमी कळली, तेव्हा त्यांनी आपल्या वहिनींच्या सांत्वन करण्याच्या उद्देशाने अप्रतिम अशी ' सांत्वन ' ही कविता लिहिली. या कवितेतल्या काही ओळी मी वर दिल्या आहेत. त्यातील पुढील काही ओळी बघा
अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोनी जाती
कोणी त्यांची महती गणती, ठेवली असे ?
परी जे गजेंद्र शुंडेने उपटिले, श्री हरी साठी मेले
कमल फुल ते अमर ठेले, मोक्ष दाते पावन.
या ओळींचा अर्थ आपण समजून घेऊया. अनेक फुलं फुलतात आणि सुकून जातात. त्यांचे निर्माल्य होते. त्यांची मोजदाद, गणती कोणी ठेवत नाही. परंतु ज्यावेळी गजेंद्र नावाचा हत्ती पाण्यात अडकला, मगरीने त्याचा पाय पकडला आणि त्याच्या प्राणांवर संकट आले, तेव्हा त्याने विष्णूचा धावा केला. आणि विष्णूला अर्पण करायचे म्हणून त्या तळ्यातील एक कमलपुष्प उपटून श्रीहरी साठी अर्पण केले. ते कमलपुष्प अमर झाले कारण ते श्रीहरीच्या चरणी विराजमान झाले. तसेच अनेक लोक जन्मतात आणि मरतात परंतु भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी जे आपले जीवनपुष्प समर्पित करतात, त्यांचे जीवन धन्य होय. म्हणून बाबारावांना जरी शिक्षा झाली, तरी मातृभूमीसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे हे लक्षात घेऊन हे वहिनी शोक करू नकोस असे त्यांना सांगायचे आहे.
सावरकरांच्या या येसूवहिनींचा त्याग केवढा मोठा आहे..! या मानिनीला प्रचंड उपेक्षेला तोंड द्यावे लागले. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्याची पत्नी म्हणून लोकांनी त्यांच्याशी संपर्क तोडला. माहेर त्यांच्यासाठी बंद झाले. त्यांना सणसमारंभाला, हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला बोलावणे लोकांनी बंद केले. उपजीविकेसाठी काही काम करू म्हटले तरी कोणी काम देईना. दोन मुली अल्पजीवी झाल्या होत्या. घरावर अनेकदा जप्ती आली होती. पण तरीही सावरकरांनी म्हटले तसे ही खरोखर ' धैर्याची मूर्ती ' होती.
सावरकरांच्या कार्यात हातभार लागावा म्हणून त्यांनी ' आत्मनिष्ठ युवती संघाची ' स्थापना केली. ज्यांच्या पतींनी स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला, त्यांना एकत्र करून त्यांना मार्गदर्शन आणि मदत करण्याचे कार्य त्या करीत. त्यांच्यामुळेच सावरकरांचे आणि पर्यायाने स्वातंत्र्यचळवळीचे कार्य घराघरात चुलीपर्यंत पोहचले. विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन त्यांनी बायकांना केले. त्याची सुरुवात स्वतःपासून केली. खरं तर बांगडी ही स्त्रीचा सौभाग्यालंकार. पण काचेच्या बांगड्या विलायतेतून यायच्या म्हणून काचेच्या बांगड्या वापरणे त्यांनी सोडले. त्यावेळी साखरसुद्धा इंग्लंडमधून येत होती. म्हणून साखर खाणे सोडले. आजारपणात हात सुजले म्हणून त्यांच्या हातातील धातूच्या बांगड्या कापून काढाव्या लागल्या. पण बांगडीशिवाय राहणे चांगले दिसत नाही म्हणून त्यांनी काळे मणी दोऱ्यात ओवून ते मनगटात बांधले.
पुढे सावरकरांनाही अटक झाली. जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यावेळी ते लंडनच्या ब्रिक्स्टन तुरुंगात होते. त्यावेळी आपल्याला झालेली ही शिक्षा आपल्या वहिनीला कळवण्यासाठी त्यांनी एक पत्र लिहिले. ते पत्र ' माझे मृत्युपत्र ' म्हणून प्रसिद्ध आहे. या पत्रात ते म्हणतात
हे मातृभूमी तुजला मन वाहियेले, वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले, - १
तुतेंची अर्पिली नवी कविता रसाला, लेखप्रती विषय तुंचि अनन्य झाला . - २
त्वत्स्थंडिली ढकलिले प्रिय मित्रसंघा, केले स्वयें दहन यौवन-देह्-भोगा - ३
त्वर्य नैतिक सुसंगत सर्व देवा, तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा. - ४
त्वत्स्थंडिलीं ढकलिलीं गृहवित्तमत्ता, दावानलांत वहिनी नवपुत्रकांता - ५
त्वत्स्थंडिली अतुल्-धैर्य वरिष्ठ बंधू, केला हवी परमकारुण पुण्यसिंधू - ६
त्वत्स्थंडिलावरी बळी प्रिय 'बाळ' झाला, त्वत्स्थंडिली बघ आता मम देह ठेला - ७
हें काय! असतो बंधु जरी सात आम्ही, त्वत्स्थंडिलींच असते दिधलें बळी मी - ८
या ओळी संस्कृतप्रचुर आहेत. पण त्यातील अर्थ खूप सुंदर आणि उदात्त आहे. सावरकर म्हणतात ' हे मातृभूमी मी तुला माझे सर्वस्व अर्पण केले आहे. माझे मन, माझी कविता, माझे मित्र, माझे तारुण्य, माझे शरीर, माझे भोग असे सर्व काही. माझे घरदार, संपत्ती, माझी वहिनी , माझी पत्नी माझे बंधू हे सगळे काही मी तुझ्या स्वातंत्र्यासाठी सुरु असलेल्या यज्ञात समिधा म्हणून अर्पण केले आहे. आम्ही तीनच भाऊ आहोत, पण सात जरी असतो, तरी आम्ही सगळ्यांनी तुझ्यासाठी आपले जीवन अर्पण केले असते. केवढा उदात्त विचार. तरुण वयात हा केवढा त्याग ! जो काळ हौसमौज करण्याचा, आनंदाचा, तो त्यांनी देशसेवेसाठी अर्पण केला. या त्यागाला तुलना नाही. याच पत्रात ते पुढं म्हणतात
की घेतले व्रत न हें अम्हि अंधतेने, लब्ध-प्रकाश इतीहास्-निसर्ग-मानें
आम्ही हे निखाऱ्यांवर चालण्याचे, काटेरी मार्गावर चालण्याचे व्रत जाणीवपूर्वक घेतले आहे. आमच्या देशाच्या इतिहासाला
आणि कीर्तीला शोभून दिसावे असेच ते आहे.
या सगळी दरम्यान येसूबाई आजारी झाल्या. आपल्या कुटुंबासाठी आणि देशासाठी प्रचंड त्याग करणारी ही माउली आपल्या पतीचे एकदा तरी दर्शन व्हावे म्हणून आसुसली होती. त्यासाठी इंग्रज सरकारकडे त्यांनी अनेक अर्ज केले होते. परंतु ते अर्ज फेटाळण्यात आले. त्यांना बाबाराव तुरुंगातून सुटून आल्याचा सारखा भास होऊ लागला. आपल्या धाकट्या जावेला त्या म्हणायच्या, ' ते बघ बाबाराव आलेत, त्यांना ओवाळण्यासाठी आरतीचे ताट तयार ठेव. ' शेवटी पाच फेब्रुवारी १९१९ ला येसूवहिनींनी या जगाचा निरोप घेतला. नंतर ८ फेब्रुवारीला इंग्रज सरकारचे भेटीची परवान्गी दिल्याचे पत्र आले. पण आता काही उपयोग नव्हता. हे जीवनपुष्प ईश्वरचरणी समर्पित झाले होते. उणेपुरे ३४ वर्षांच्या आयुष्यात या माउलीने जे कष्ट सोसले, जो त्याग केला त्याला तुलना नाही. सावरकर परिवारातील सगळ्या सदस्यांचेच देशासाठी प्रचंड योगदान, त्याग आहे. त्यात सावरकरांचे बंधू, त्यांची पत्नी यांचेही योगदान आहे. या त्यांच्या त्याग, समर्पणाच्या बदल्यात आम्ही त्यांना काय दिले ? स्वातंत्र्यानंतर प्रचंड उपेक्षा, अवहेलना. 1950 मध्ये त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली, ती 1966 ला परत मिळाली. गांधीजींच्या हत्येशी त्यांचा संबंध जोडला गेला, की जो सिद्ध होऊ शकला नाही. त्यांच्या घरावर हल्ले झाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले, त्यांना आम्ही ' हेचि फळ काय मम तपाला ' असे म्हणण्याची वेळ आणली. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बॅरिस्टरच्या पदवीवर लाथ मारली, त्यांच्यावर आम्ही इंग्रजांची माफी मागितली या सारखे क्षुद्र आरोप केले. अंदमानात त्यांचे राष्ट्रीय स्मारक व्हायला स्वातंत्र्यानंतर बावीस वर्षे जावी लागली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशाप्रती समर्पण, त्यांची अलौकिक काव्य प्रतिभा, येसूवहिनींचा त्याग, समर्पण आणि प्रेरणादायी जीवन यथाशक्ती आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सावरकरांची वहिनीला लिहिलेले सांत्वनपर पत्र,आणि माझे मृत्युपत्र ही दोन मराठी साहित्यातील अजरामर म्हणावीत अशी काव्यरूप पत्रे आहेत. तरुणांनी पाठ करावीत अशी ही आदर्श, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी पत्रे आहेत.
१२/०७/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा