मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग निसर्गायन - भाग चार

उगवतीचे रंग 

निसर्गायन - भाग चार 

निसर्गामध्ये  प्रत्येक प्राण्याचे स्थान महत्वाचे आहे. वाघ, सिंह, हरीण इ प्रत्येक वन्य जीव या निसर्गाच्या साखळीचा एक भाग आहे. यामध्ये पशु पक्ष्यांबरोबरच कीटकांनाही महत्वाचे स्थान आहे. त्याचे कारण म्हणजे निसर्ग साखळीच अशी आहे की एकाच्या जीवावर दुसरा जीव अवलंबून असतो. जेव्हा वाघ, सिंह यांच्यासारख्या प्राण्यांची शिकार होते, तेव्हा जंगलात माकडे, हरीण, चितळ इ प्राण्यांची संख्या आपसूक वाढते. तर दुसऱ्या बाजूला हरीण, माकडे इ प्राण्यांची बेसुमार शिकार केली गेली तर वाघ, सिंह इ सारख्या प्राण्यानं जंगलात भक्ष्य न मिळाल्यामुळे ते मानवी वस्तीत शिकारीच्या शोधात आल्याची उदाहरणे आहेत. आणि आजही ते घडताना आपण पाहत आहोत. 

वाघ आणि सिंह या प्राण्यांना निसर्गाने अप्रतिम सौंदर्य प्रदान केले आहे. त्यांची चपळाई, भक्ष्य पकडण्याचे कौशल्य, त्यांच्या पंजाच्या फटकाऱ्यात असणारी शक्ती या गोष्टी म्हणजे त्यांना निसर्गाने दिलेली देणगी आहे. पण त्यांच्या या गुणांवर भाळून मानव प्राचीन काळापासून त्यांची शिकार करण्यात शौर्य आणि धन्यता मानत आला आहे. राजे महाराजे, सरदार, धनिक लोक, हौशी शिकारी यांनी वाघांच्या अनेक शिकारी केल्या आहेत. काही वर्षांपूर्वी भारतात जिम कॉर्बेट नावाचा प्रसिद्ध शिकारी होऊन गेला. त्याचा जंगल आणि वन्य प्राण्यांचा अभ्यास खूपच दांडगा होता. त्यांनी आपल्या अनुभवावर आधारित अनेक पुस्तकेही लिहिली. त्या पुस्तकांची अनेक भाषांमध्ये  भाषांतरे झाली आहेत. 

जिम कॉर्बेट यांनी आपल्या आयुष्यात एकूण एकोणीस वाघ आणि चौदा बिबटे यांची शिकार केली. पण त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी एकाही निरपराध वाघाची किंवा बिबट्याची शिकार केली नाही. जे वाघ किंवा बिबट नरभक्षक झाले होते, ज्यांनी अनेक नरबळी घेतले होते, अशाच वाघ आणि बिबट यांच्या शिकारी नाईलाज आणि गरज म्हणून त्यांनी केल्या. जंगलातील वाघांची संख्या कमी होत चालली आहे हे त्यांनी आपल्या दूरदृष्टीने ओळखले होते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि वन्य जीवांच्या प्रेमामुळे भारतात प्राण्यांसाठीची अभयारण्ये अस्तिस्त्वात आली. आता अनेक ठिकाणच्या जंगलात वाघांची संख्या वाढते आहे ही समाधानाची बाब आहे. 

पूर्वी आपले ऋषी मुनी,  साधू संत जंगलात वास्तव्य करून असत. त्यांनी या प्राण्यांना प्रेम लावले. त्यांच्या प्रेमाची शक्ती अशी काही विलक्षण होती की त्यांच्या सहवासात हे हिंस्त्र जीव आपली हिंस्रता विसरून गेले. अगदी आजच्या काळात देखील या वन्य जीवांना प्रेम देऊन वाढवणारे लोक आहेत. आमच्याच चाळीसगावचे डॉ पूर्णपात्रे यांनी एक सिंहीणीचे पिल्लू पाळले होते. तिचा त्यांना आणि त्यांना तिचा फार लळा लागला होता. त्यांनी मोठ्या प्रेमाने तिचे नाव सोनाली ठेवले होते. त्यांची नात दीपाली, त्यांनी पाळलेली रुपाली नावाची एक छोटी कुत्री आणि ही सोनाली सिंहीण लहानपणी एकत्र खेळत असत. त्यांनी कधीही एकमेकांना इजा केली नाही. या तिघांना एकत्र पाहण्याचे आणि डॉ पूर्णपात्रे यांच्या सहवासाचे भाग्य सुदैवाने मला लाभले आहे. पुढे डॉ. नी ही सोनाली सिंहीण पुण्याच्या पेशवे पार्कला भेट म्हणून दिली. पण तिचा आणि डॉ चा एकमेकांवर इतका जीव जडला होता,  की ती त्यांच्या विरहामुळे जास्त दिवस जगली नाही. 

प्रख्यात वन्यजीव अभ्यासक, ज्यांनी जंगलातच आपले सारे आयुष्य घालवले आणि जंगलांची आणि प्राण्यांची अनेक रहस्ये ज्यांना त्यामुळे हस्तगत झाली असे मारुती चितमपल्ल्ली यांनी आपल्या एका पुस्तकात वाघाविषयी एक विलक्षण लोककथा सांगितली आहे. चंद्रपूर-मूल रस्त्यावर एक फकीर एनाक्षीमिया आणि एका वाघिणीची कबर आहे. ही बरीच प्राचीन कथा आहे. पण ही कबर आजही अस्तित्वात आहे. त्या चंद्रपूरजवळच्या जंगलात एनाक्षीमिया नावाचा एक फकीर राहत होता. त्या जंगलात राहणारी एक वाघीण रोज रात्री एनाक्षीमियाजवळ येऊन बसत असे. तो फकीर धुनी पेटवायचा. त्या धुनीजवळ ती वाघीण येऊन बसत असे. दोघांनाही एकमेकांचा सहवास प्रिय झाला होता. एकदा पावसाळ्याचे दिवस होते. त्या भागातला एक आदिवासी जो जंगलात फिरत होता, तो पावसात भिजला.  अंधार पडायला लागला, त्याला तहान, भूक लागली होती. तशात त्याला एनाक्षीमियाची झोपडी आणि पेटलेली धुनी दिसली. ती बघून मोठ्या आशेने तो तिथे आला. 

आता त्या माणसाला अवेळी आलेला पाहून एनाक्षीमिया संकटात सापडले कारण आता वाघीण यायची वेळ झाली होती. तो अनोळखी माणूस पाहून वाघिणीने त्याला फाडून खाल्ले असते. बरं त्याला परत जा असे सांगणेही धोक्याचे होते कारण रस्त्यात वाघिणीने त्याच्यावर हल्ला करण्याची शक्यता होती. मियांवर हे धर्मसंकट होते. त्यांनी एक युक्ती केली. त्याचे कपडे त्यांनी स्वतः परिधान केले. आपली कफनी त्याला दिली. त्याच्या अंगाला राख फासली. आणि त्याला तिथे सुरक्षित बसवून मिया वाघाणीच्या दिशेने निघाले. रस्त्यात त्या वाघिणीची आणि त्यांची गाठ पडली. पण वाघिणीने त्यांना वेष बदलला असल्याने सुरुवातीला ओळखले नाही आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एनाक्षीमिया गतप्राण झाले. त्या वाघिणीच्या लक्षात जेव्हा ही गोष्ट आली, तेव्हा तिला प्रचंड धक्का बसला. आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू आपल्या हातून झाला हे तिच्या लक्षात आले. तिने दुःखाने एक मोठी डरकाळी फोडली. आणि आपली शेपूट आपटून त्याच जागेवर तिने प्राण सोडले. हा आदिवासी जो तिथे थांबला होता, तो तिथे आला. त्याच्या लक्षात ही सगळी गोष्ट आली. तो गावात गेला आणि सगळ्या गावकऱ्यांच्या कानावर ही घटना घातली. गावकऱ्यांनी नंतर एनाक्षीमिया आणि ती वाघीण यांची कबर बांधली. 

वाघ हा हिंस्त्र प्राणी जरी असला, तरी आदिवासींना त्याच्याबद्दल आदर आहे. वाघांमुळे जंगलाचे रक्षण होते, आणि जंगलांमुळे वाघ अस्तित्वात आहेत ही गोष्ट त्यांना माहिती आहे. त्यामुळे आजही एखादा वाघ मेलेला दिसला तर आदिवासी त्याला नमस्कार करतात. पाय लावत नाहीत. 

©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
     ८/६/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२ 
( कृपया लेख नावासहित शेअर करावा. ) 






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...