उगवतीचे रंग 

निसर्गायन - भाग दोन
माझं गाव जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव. तुम्ही चाळीसगावला आलात की जवळच साधारण १८ किमी वर गौताळा अभयारण्य आहे. हे अभयारण्य, पाटणादेवी इ रम्य स्थळांचं दर्शन घेण्यासाठी आपण चाळीसगावहून बसने किंवा आपल्या खाजगी वाहनाने पण तिथे जाऊ शकतो. खरं तर अर्ध्या पाऊण तासाचा रस्ता आहे. पण मधून मधून खराब रस्त्यांमुळे आपल्याला थोडा अधिक वेळ लागू शकतो. अर्थात आपण रमतगमत आणि निसर्गाची शोभा पाहत जाऊ या. आपल्याला घाई नाही. गौताळा अरण्यातील एक भाग म्हणजे पाटणादेवीचं मंदिर. अर्थात चंडिकादेवी असंही म्हटलं जातं. तिथे आपण जाणार आहोत आणि तिथून आपल्याला साधारण एक ते दीड किमी चा ट्रेक करायचाय. निसर्गभ्रमंती. आहात ना तयार ? तसं आज मी तुम्हाला फक्त धवलतीर्थ धबधब्यावर घेऊन जाणार आहे. पितळखोरा लेणी, उभा गणपती, गौरी कुंड इ ठिकाणे बघायला तुम्हाला दोनतीन दिवस वेळ काढून यायला लागेल. चला तर मग. आपल्याला जास्त सामान सोबत घेण्याची आवश्यकता नाही. आपण असं करू आपल्या घरून तयार केलेल्या मस्त दशम्या, पोळ्या, सोबत लोणचं, थोडंसं दही तुम्हाला आवडत असेल तर घेऊया. जोडीला चटणी, कांदा इ गोष्टी आहेतच. आणि हो, पुरेसं पाणी पण असू द्या जवळ. वा, छान..! तयार झालात लगेच. बसा गाडीत.
आता निघालोय आपण. चाळीसगावच्या बाहेर आलो. आता समोर हा बायपास किंवा हायवे दिसतो ना, तो क्रॉस करायचाय आपल्याला. तो क्रॉस केला की लागलो आपण पाटणादेवी रस्त्याला. नुकताच पाऊस पडून गेलेला आहे. त्यामुळे हवेत छान गारवा जाणवतोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतं आहेत. शेतकऱ्यांनी मशागत करून तयार ठेवलेली दिसताहेत. अजून पुरेसा पाऊस झालेला नाही. पण लवकरच ते योग्य वातावरण पेरणीसाठी तयार झालं की पेरणी करतील, आणि आणखी एकदोन महिन्यांनी जेव्हा पुन्हा आपण इकडून जाऊ, तेव्हा ही शेतं हिरवीगार पाचूची बेटं भासतील आपल्याला. आपण चाळीसगावापासून चारपाच किमी वर आलो आहोत आता. तुमच्या डाव्या बाजूला खिडकीतून बाहेर बघा. एक कमान दिसतेय का ? त्यातुन मध्ये गेलं की वालझिरी म्हणून एक छोटंसं तीर्थक्षेत्र बघायला मिळेल आपल्याला. त्या ठिकाणी वाल्मिक ऋषी, भगवान शंकर, विठ्ठल रुख्माई , राम सीता, मारुती, आणि नवनाथांची मंदिरं आहेत. या ठिकाणी महाशिवरात्रीला यात्रा असते आणि भाविक लोक मोठ्या संख्येने महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येतात. पण आज आपल्याला तिकडे जायचं नाहीये. वेळ कमी पडेल. म्हणून मी दुरूनच दाखवतो आहे.
जरा पुढे गेल्यावर मध्येच एकदोन ठिकाणी ओढे लागतात. बाजूला वृक्षराजी आणि शेतं सोबतीला आहेतच. आता आपण थोडं पुढे आलो. समोर सह्याद्रीच्या भव्य डोंगररांगा आपल्याला दर्शन देताहेत. आपलं लक्ष आता तिकडेच जातंय. हे बघा पुढे दोन रस्ते लागतात. दोन्ही पाटणादेवी मंदिराकडे जातात. त्यातला एक रस्ता आपल्याला पाटणा गावातून घेऊन जातो आणि दुसरा चंडिकावाडी म्हणून एक छोटासा तांडा आहे तिथून जातो. आपण असं करू या दुसऱ्या रस्त्यानेच जाऊ. कारण शेतांमधून नागमोडी वळणे घेत जाणारा रस्ता आणि समोर दिसणारे डोंगर एवढेच आपल्याला या वाटेने दिसते. गाडी मात्र सावकाश आणि सांभाळून चालवायला हवी. कारण वळणं काही ठिकाणी अगदी नागमोडी आहेत. जरा अंदाज चुकला की प्राणांशीच गाठ.
मधेच आपल्याला एक नदी लागते. नदीच्या आजूबाजूचे दृश्य झाडी असल्याने फार सुंदर भासते. आता आपण पुढे जाऊ या. या इथे वनखात्याने प्रवेशद्वार म्हणून एक कमान केली आहे. तिथे आपल्या गाडीची नोंदणी करून आपण पुढे जाऊ या. आता आपण अगदी जवळ आलोय बरं का ..! रस्त्याने दोन्ही बाजूला जंगल आहे. ती समोर तुमच्या डाव्या हाताला झाडावर काही माकडे बसलेली दिसली का ? इकडे पुढे पण खूप दिसतील. या जंगलात केवळ माकडे नाही तर हरीण,चितळ, वाघ, भेकर, अस्वल आणि विविध प्रकारचे विषारी आणि बिनविषारी सर्प आहेत. आपल्या डाव्या बाजूने नदी वाहतेय. तिच्या काठावरची झाडं पाहिली का ? कशी वेगवेगळ्या आकारात वाढलीत आणि स्वतःला सूर्यप्रकाश मिळण्यासाठी भोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेतलं त्यांनी. त्यांची खोडं आणि मुळं बघा. किती विविध आकार दिसतात त्यांच्यात. बरीचशी झाडं बालकवींच्या कवितेतल्या औदुंबरासारखी पाण्यात पाय सोडून बसलेली दिसतात. इकडे उजव्या बाजूला थोडं वर जाणारा हा रस्ता दिसतोय का ? या रस्त्यानं थोडंसं पुढे गेलं तर आपल्याला अगदी प्राचीन हेमाडपंथी महादेवाचं मंदिर बघायला मिळेल.
आलोय आपण आता मंदिराजवळ. गाडी पार्क करू या. इथे आजूबाजूला पर्यटकांना राहण्यासाठी विश्रामगृहे आहेत. जवळच काही विक्रेत्यांनी दुकाने लावली आहेत. देवीसाठी हार, नारळ, प्रसाद इ गोष्टी येथे मिळतील. शिवाय चहा आणि गरम भजी सुद्धा मिळतील. पण आपण आधी मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. हा बघा मंदिराकडे जाताना नदीवर छोटा पूल बांधला आहे. पण त्याच्यावरून जाण्याआधी पायऱ्या सावकाश उतरा. आता मंदिराच्या पायथ्याशी आलो आपण. मंदिर मोठे सुंदर आहे. दोन्ही बाजूला दगडी दीपमाळ बांधली आहे. देवीची मूर्ती तर मन प्रसन्न करणारी आहे. मनोभावे दर्शन घेतल्यावर प्रदक्षिणेसाठी आपण मागच्या बाजूस आलो आहोत. आपल्या तिन्ही बाजूला उंचच उंच डोंगर आहेत. आणि येथूनच समोर तो धबधबा दिसतोय. त्याला धवलतीर्थ म्हणतात. आपल्याला आता तिकडेच जायचं आहे.
त्यासाठी मंदिरातून खाली उतरल्यावर नदीतून आपल्याला समोर दिसणाऱ्या पायवाटेनं जायचं आहे. आणि चालता चालता जंगल अनुभवायचं आहे. थोडं पुढे आल्यावर छत्रीसारखी व्यवस्था केली आहे बसण्यासाठी. इथे जेवणही करू शकतो आपण. इथे थोडं अगदी शांत बसलो तर आपल्याला मोर, लांडोर बघायला मिळतील. भारद्वाज, पोपट, मैना, साळुंकी इ विविध प्रकारचे पक्षी सुद्धा दिसतील. आता आपण चालतोय तेव्हाही दिसतीलच. फक्त सावध राहा आणि आवाज करू नका. धवल तीर्थाकडे जाताना आपल्याला सगळ्या प्रकारची झाडं दिसतील. प्राणी , पक्षी दिसतील. जैव विविधतेनं हे जंगल समृद्ध आहे. अर्जुन, साल, साग, निंब, करंज, उंबर, कवठ इ विविध प्रकारची झाडं आपल्याला आता बघायला मिळताहेत. आणि हवेतला शुद्ध प्राणवायू आणि गारवा मनाला उत्साहित करतो आहे.
धवलतीर्थाकडे जाताना मध्येच दोन वेळा आपल्याला नदी ओलांडावी लागेल. नदीतून चालताना पायात बूट असले तर काढून घ्या. थंड पाण्यात पाय बुडू द्या. सगळे श्रम हरण होऊन ताजेतवाने वाटेल. नदीचे पाणी बघा किती स्वच्छ आणि खळाळत वाहणारे आहे. पाण्यातील दगडगोटे स्वच्छ दिसतात. मध्येच आपल्याला एकदोन चढण चढायच्या आहेत. चढताना अगदी छोटी पायवाट आहे. सांभाळून चालावे लागेल. आपल्या या पायवाटेवर बघा सुकलेल्या पानांचा कसा सडा पडला आहे. आणि बाजूच्या झाडांना हिरवीकंच पालवी फुटली आहे. नुकताच पाऊस पडून गेल्याने एक वेगळाच रानफुलांचा आणि पानांचा एक अनामिक गंध हवेत मिसळला आहे. हा गंध आपल्याला अगदी दाट जंगलातच अनुभवायला मिळतो बरं का ! ही ताजी शुद्ध हवा फुफ्फुसात किती भरून घेऊ आणि किती नको असं होऊन जातं . या सुंदर वातावरणातून आपण चालतोय. मन कसं हलकं झालंय . पाय जमिनीवर पण मन आकाशात. ' आजकल पाँव जमीपर नही पडते मेरे...' अशी अवस्था होतेय ना...!
समोर बघितलं का ? उंचच उंच पर्वतशिखरावरून कोसळणारा धबधबा दर्शन देतोय आपल्याला. केवढा हा आवाज त्याचा...! आजूबाजूच्या शांत वातावरणात घुमतोय. शुभ्र धवल धारा उंचावरून कोसळताहेत. जणू शंकराच्या जटेतून कोसळणारी गंगेची धारा. आणि हे सगळं वातावरणच एवढं भव्य दिव्य आहे की मनाचा क्षुद्रपणा या निसर्गाच्या सहवासात कुठल्या कुठे पळून जातो. धवलतीर्थांच्या या धारा आपल्या मनालाही पावन करतात. हे नयनरम्य दृश्य डोळ्यात किती साठवू आणि किती नाही असं होऊन जातं . त्या धबधब्याच्या खाली मोठं तळं साचलंय थंडगार पाण्याचं . पण धबधब्याखाली अंघोळ करण्याचं किंवा या तळ्यात उतरण्याचं साहस मात्र करू नका. ते अत्यंत धोकादायक ठरू शकतं . आजूबाजूला छान उंच आणि स्वच्छ खडक आहेत. आपण आता आपल्याबरोबर आणलेली शिदोरी सोडू या. फिरण्यामुळे आणि पायी चालल्याने भूकही लागलीय. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ इथेच बसून आराम करू या आणि मग आपल्या परतीच्या प्रवासाला निघूया. काय, चालेल ना..? मग सांगा मला तुमची ट्रीप कशी झाली ?
विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
६/६/२०२०
मो 9403749932
( कृपया लेख नावासहित शेअर करावा. )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा