मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग निसर्गायन - भाग एक

उगवतीचे रंग

 निसर्गायन  - भाग एक 

प्रिय रसिक वाचक मित्रांनो ,
आज बऱ्याच दिवसांनी तुमच्याशी पुन्हा संवाद साधतो आहे. काही कारणाने मी काही दिवस ब्रेक घेतला होता. पण तसा आपला संपर्क अबाधित होताच. या काळात काही वाचक माझ्याशी नव्याने जोडले गेले. त्यांना माझे आधीचे लेख हवे होते. आणि नियमाने माझे वाचन करणाऱ्या माझ्या काही प्रिय वाचकांना लेखांमध्ये खंड पडायला नको होता. त्यांचीही मागणी होती की रोज आधीचा का होईना, पण लेख पाठवा. म्हणून त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी काही निवडक लेख पुन्हा दररोज टाकत गेलो. पण आज पुन्हा नव्याने नवीन लेख घेऊन तुमच्या सेवेत हजर होताना मला आनंद होत आहे. या कालावधीत एक चांगली गोष्ट घडली. ती म्हणजे रेडिओ विश्वास 90.8, नासिकने माझ्या लेखांचे दर मंगळवारी प्रसारण करण्याचे मान्य केले. आता येत्या मंगळवारी आपल्या सगळ्यांना आवडलेला होरेगल्लू ह्या लेखाचे प्रसारण होईल. तेव्हा सकाळी बरोबर 8 वा ते ऐकायला विसरू नका.  आज पर्यावरण दिवस आहे. आणि चंद्रग्रहण आणि वटपौर्णिमा देखील आहे. असा आजचा हा दिवस अनेक अर्थानी निसर्गाशी संबंधित आहे. म्हणून दोनतीन दिवस निसर्गाबद्दलच काहीतरी तुमच्याशी बोलावं म्हणून हे निसर्गायन. 

निसर्ग हा माझा वीकपॉइंट. तुमचाही असणार. निसर्गाच्या सहवासात जायला मिळावं म्हणून किती आसुसलेले असतो आपण नाही..! संधी मिळाली की सोडत नाही. दिवाळी, उन्हाळ्याच्या सुटीत गाड्यांची आरक्षणे फुल्ल होतात. सगळ्यांनाच कुठल्या तरी निसर्गरम्य ठिकाणी जायची ओढ लागलेली असते. यंदा मात्र कोरोनामुळे आपल्या सगळ्यांचा नाईलाज झाला. उन्हाळ्यातील सुटी घरी बसण्यातच गेली. खिडकीतून जेवढा निसर्ग दिसेल तेवढाच आपण अनुभवला . आणि मग आलं निसर्ग चक्रीवादळ. तेही बेटं सुखासुखी गेलं नाही. त्याच्या तडाख्यात ज्या काही गोष्टी सापडतील, तेवढ्यांचा विध्वंस करून गेलं. एका बाजूला कोरोनाची हानी आणि दुसऱ्या बाजूला हे नुकसान. पण कोरोना काय किंवा निसर्ग वादळाने केलेली हानी काय, या दोन्ही गोष्टी हे दाखवून देतात की निसर्गाच्या शक्तीपुढे मानव दुबळा आहे. आणि जगायचे असेल तर आपल्याला निसर्गाला गृहीत धरून चालणार नाही. त्याला जपावं लागणार आहे. आणि त्याच्यासोबत जगावं लागणार आहे. खरं तर माणूस नसला तर निसर्गाचं काही अडणार नाही. उलट त्याचे आपोआप संरक्षणच होईल. पण निसर्ग नसला तर माणूस जगू शकणार नाही. म्हणून पर्यावरणाला जपायचं . निसर्गाला जपायचं . म्हणून हे निसर्गायन . 

आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी निसर्ग आणि निसर्गातील प्राण्यांना किती जपले होते, याचे दाखले अगदी वेद उपनिषदांपासून मिळतात.  अनेक ऋषीमुनिंची साधना ही अरण्यातच झाली होती. त्यांना त्या कालावधीत जे काही साक्षात्कार झाले, ते या निसर्गाच्या सान्निध्यातच. म्हणूनच आपल्या ग्रंथातून , ओव्यांतून, पुराणातून त्यांनी निसर्गाला अत्युच्च स्थान दिले.  अरण्यातले वृक्षवल्ली तुकारामांसारख्या संतांचे सोयरे झाले. ज्ञानदेवांच्या रचनांमधून ' पैल तो गे काऊ कोकताहे..' , अवचिता परिमळू झुळकला अळुमाळू,  आज सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनु, मोगरा फुलला यासारख्या निसर्गातील प्रतिकांचे मनमोहक रूप आपल्याला बघायला मिळते. समर्थ रामदासांच्या अनेक समासातून निसर्ग जागोजागी डोकावताना दिसतो. ज्ञानेश्वरांच्या समकालीन असलेले योगी चांगदेव ज्ञानेश्वरांच्या भेटीला वाघावर स्वार होऊन हातात सर्पाचा चाबूक घेऊन ज्ञानदेवांच्या भेटीला आल्याचा उल्लेख आहे. अनेक साधुसंत आणि वन्य प्राणी यांची मैत्री असल्याचे दाखले आपल्याला संत चरित्रात मिळतात. 

सुमारे शंभर वर्षांपूर्वी आपल्या या खंडप्राय देशात प्रचंड जंगले होती. यात्रेकरू, व्यापारी, प्रवासी इ ना जंगलातूनच प्रवास करावा लागत असे. पण त्यांनी निसर्ग त्यातील प्राण्यांसह स्वीकारला होता. त्यांच्यासह जगण्याची जीवनपद्धती अंगिकारली होती. इंग्रजांच्या काळात मात्र हळूहळू जंगलांना ओहोटी लागण्यास सुरुवात झाली. भौतिक प्रगती आणि औद्योगिक क्रांतीच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. शिवाय शिकारीच्या नावाखाली सरदार, राजेरजवाडे आणि इंग्रज अधिकाऱ्यांनी अनेक वन्य प्राण्यांना नामशेष केले. शिकार हा प्रकार कोणाला आवडत असेल, तर आवडो. पण मला मात्र त्या बद्दल घृणा वाटते. तुमच्याजवळ शिकारीची सगळी अत्याधुनिक साधने असताना, असहाय अशा वन्य जीवांना घेरून त्यांची शिकार करण्यात कसला आला आहे पुरुषार्थ ? एके काळी जे सिंह, वाघ, हत्ती, हरणे, अस्वले यासारखे प्राणी भारतातील जंगलात सर्वत्र आढळत होते. त्यांची संख्या आता काही मोजक्या ठिकाणीच मर्यादित झाली. त्यांना पाहायला आपल्याला एक तर त्यांच्यासाठी राखीव असलेल्या अभयारण्ये किंवा प्राणिसंग्रहालयात जावे लागते. 

आतापर्यंत हत्तींना हस्तिदंतासाठी मारले जायचे. कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याने अनेक हत्तींना ठार मारले. तरी हत्तींना पकडण्याचे आणि मारण्याचे तंत्र काहीतरी बरे होते असे नुकतेच केरळमध्ये घडलेल्या हत्तीणीच्या हत्येवरून म्हणायला हरकत नाही. पूर्वी हत्ती पकडण्यासाठी दोन प्रकारची तंत्रे वापरली जात. एक म्हणजे अरण्यातून त्यांना हाकलत एका ठराविक ठिकाणी आणायचे आणि तेथील लोखंडी पिंजऱ्यात अडकवायचे. आणि दुसरे म्हणजे त्यांना पकडण्यासाठी जंगलातच खड्डे किंवा खंदक खणायचे. त्यावर बांबू पसरावयाचे . त्यावर कापड, माती इ टाकून झाडाच्या फांद्या, गवत इ ने ते झाकून टाकायचे. हत्तींचा कळप जेव्हा जंगलातून या मार्गाने जात असे, तेव्हा त्या कळपातील तीनचार हत्ती तरी अशा मोठ्या खड्ड्यांमध्ये पडत. मग त्यांना मोठ्या युक्तीने बाहेर काढण्यात येई. 

पण केरळमधील पलक्कड जिल्ह्यात जी गर्भार हत्तीणीची हत्या झाली, ती माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या दिवशी माणूस आणि माणुसकी यांची मान शरमेने खाली झुकली. मुळात तुम्ही हत्तींसाठी असलेली जंगले नामशेष केली. त्यांना निवारा उरला नाही. मग ते शेतात येऊन नुकसान करतात म्हणून आपणच ओरड करायची आणि पुन्हा त्यांना मारण्यासाठी नवनवे घृणास्पद आणि क्रूर मार्ग शोधून काढायचे. पण या घटनेने एक गोष्ट मात्र अधोरेखित झाली. ती ही की अशा गोष्टी आपल्यापैकी कोणालाच आवडत नाहीत. प्राणी असले म्हणून काय झाले ? त्यांनाही जीव आहे. त्यांनाही दुःख, वेदना आहेत. त्या हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला घालून मारण्यात आले. हत्तींना आपले, परके असे काही नसते. एखादी वस्तू त्यांना खायला देणारी व्यक्ती त्यांना आपली वाटते. त्यांना त्याबाबत काही शंका येत नाही. शिवाय भुकेचा प्रश्न मोठा असतो. त्यात ती पडली गर्भार असलेली हत्तीण. मुळात अशा पद्धतीने तेथे रानडुकरांना मारले जाते असे समजले. रानडुकरं सुद्धा प्राणीच आहेत. त्यांचा अशा पद्धतीनं जीव घेण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला ? या घटनेची चौकशी व्हावी आणि दोषींना त्यांच्या कर्माचे प्रायश्चित्त मिळावे अशी सगळ्यांच्या मनातली भावना आहे. पण त्या निरपराध माऊलीचा जीव गेला तो गेलाच..! तिच्या पोटातील पिलासह. 

बऱ्याच वर्षांपूर्वी राजेश खन्नाचा हाथी मेरे साठी हा चित्रपट आला होता. आणि त्यातील हत्तीने केलेल्या अप्रतिम कामासाठी तो गाजला होता. हत्ती हा मुळात संवेदनाशील आणि बुद्धिमान प्राणी. खरे तर तो जंगलात राहणारा . पण तो मानवाच्या सहवासात आला आणि मानवाबरोबर जगण्याचे त्याने स्वीकारले. ती जीवनपद्धती स्वीकारली. प्रचंड शक्ती असणाऱ्या गजराजाला आपण साखळदंडाने बांधून ठेवतो. त्याच्यावर अंकुश ठेवून त्याच्याकडून हवी ती कामं करून घेतो. पण तरीही वेळ आली की त्याला मारायला मागेपुढे पाहत नाही. त्या हाथी मेरे साथी या चित्रपटात त्या चित्रपटातील खलनायक गोळी घालून मारतो. तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. त्या प्रसंगी मो. रफी या गायकाने गायलेले गाणं खूपच भावपूर्ण आणि अर्थपूर्ण आहे. पडद्यावर राजेश खन्ना ते गाणं गाताना दाखवला आहे. त्या गाण्यात तो त्या हत्तीला म्हणतो, ही नफरत म्हणजेच तुझा तिरस्कार करणाऱ्या दुनियेला सोडून आता तू वेगळ्या प्रेमाच्या जगात जातो आहेस. तिकडे तू खूश राहा. तुझे अमच्यावरचे प्रेम अमर राहील. त्या गाण्यातल्या या काही ओळी - 

नफरत की दुनिया को छोड के प्यार की दुनिया मे 
खुश रहना मेरे यार 
इक जानवर की जान आज इंसांनो ने ली है 
चूप क्यू है संसार ? 

केरळमधील ती हत्तीण तीन दिवस पाण्यात आपली सोंड बुडवून वेदना सोसत होती. अखेर पाण्यातच तिने आपल्या जीवनाची इतिश्री केली. खरंच हे सारं शब्दापलीकडचं आहे. आज आम्ही पर्यावरण दिन साजरा करतो आहोत. पण पर्यावरणाचाच एक घटक असलेल्या तुला आम्ही अपार वेदना दिल्या. बाई, क्षमा कर आम्हाला. त्या वेदना सोसत आपले प्राण सोडणाऱ्या अनामिक मातेला  प्रणाम. 

© *विश्वास देशपांडे,चाळीसगाव.*
 ५ जून २०२० 
 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२ 
 ( कृपया लेख नावासहित शेअर करावा. )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...