मुख्य सामग्रीवर वगळा

हॅलो, मी विठ्ठलपंत पंढरपूरकर...

उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

हॅलो, मी विठ्ठलपंत पंढरपूरकर... 

नमस्कार समस्त सज्जनहो. मी पंढरपूरहून बोलतोय. हो, हो मीच तो. तुम्ही मला अनेक नावांनी ओळखता. विठ्ठल, पांडुरंग, विठूमाऊली, विठुराया , कोणी सावळे परब्रह्म म्हणतं आणि आणखी खूप काही. आता आलं ना लक्षात मी कोण बोलतोय ते ! गमंत सांगू का ? यातलं एकही नाव माझं नाहीये. म्हणजे तशी सगळी नावं माझीच आहेत. पण ती तुम्ही मला प्रेमानं दिलेली. ज्याला जे नाव आवडेल, त्याने त्या नावानं मला हाक मारावी. कोणत्याही नावानं हाक मारली तरी मी उत्तर देतोच. कारण मी बांधलेला आहे हो. अहो, तुम्ही समजता तसा बांधलेला नाही म्हणजे कोणी मला बांधून ठेवले आहे असा जर तुमचा समज असेल, तर तो चुकीचा आहे. कारण काय आहे की मला कोणी बांधून ठेवू शकत नाही. हो, पण एका गोष्टीने मी बांधला जाऊ शकतो. ते माझ्या भक्तांचं माझ्यावर असलेलं प्रेम. त्यात मात्र मी बांधला जातो. कसा म्हणून विचारताय ? सांगतो, तुमच्या रोजच्या व्यवहारातील उदाहरणं देऊन सांगतो. हत्ती केवढा बलवान असतो, माहितीये ना..? पण एखाद्या छोट्याशा दोरखंडाने किंवा साखळदंडाने तो बांधला जातोच की नाही ! तसा मी नामाने आणि भक्तीने बांधला जातो बरं का..! नाम आणि भक्ती म्हणजे माझी साखळी. मग ती मलाही तोडता येत नाही. एखादा भ्रमर जसा कमलदलात अडकून पडावा, तसा मग मी भक्ताच्या प्रेमात अडकून पडतो. 

काय म्हणता विश्वास बसत नाही ? पुरावा हवा आहे ? कमाल करता राव..! अहो, पुंडलिकाच्या ओढीनं मी इथं आलो होतो. अठ्ठावीस युगं सरली . माझ्या भक्त पुंडलिकाने मला इथे उभे राहा देवा म्हणून सांगितले आणि माझ्याकडे फक्त एक वीट फेकली. तेव्हापासून मी इथे ' युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ' आहे. कुठेही गेलो नाही. काय पटतंय ना..? म्हणून तर मी विठ्ठल झालो. वीट +ठल ( उभा ठाकणे ) म्हणून तर विठ्ठल. अर्थात मी देहाने जरी इथं उभा असलो तरी माझा सगळा जीव तुमच्यात आहे. तुम्ही हाक मारलीत की मी धावून आलोच म्हणून समजा . अशा माझ्या अनेक भक्तांनी मारलेल्या हाकेला मी वेळोवेळी धावून गेलो आहे. जनाबाई म्हणायची ' दळिता कांडिता तुज गाईन अनंता ..'  ती जेव्हा माझं नाम गायची तेव्हा मी तिथेच असायचो. मग तिला कधी दळण दळू लाग, कधी इतर कामात मदत कर असं करायचो. कारण ती म्हणायची ' न विसंबे क्षणभरी, तुझे नाम गा मुरारी..' जो भक्त सतत माझी आठवण ठेवतो, मी तरी त्याच्यापासून कसा दूर राहणार ? पैठणला नाथांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने मी पाणी भरायचो. माझ्या भक्तांसाठी मी काय नाही करत ? चोखोबा, गोरोबा, सावता या सगळ्यांच्या बरोबर मी होतोच. त्यांच्या कामात सहभागी असायचो. काय करणार ? भक्ताची लाज तर मला राखावीच लागते ना..! ते माझ्या नामात दंग असायचे तेव्हा मलाच त्यांच्या कामात लक्ष द्यावे लागायचे. 

दामाजीपंत तर माझे निस्सीम भक्त. त्यांची कथा तुम्हा आजच्या पिढीला माहिती असण्याची शक्यता कमीच. मीच सांगतो. तर सोलापूरजवळचं मंगळवेढा गाव आहे ना तिथले हे दामाजीपंत. बादशहाच्या दरबारातले प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी. पण सदोदित माझ्या दर्शनाचा आणि नामाचा ध्यास लागलेला असायचा. पंधराव्या शतकाच्या सुमारास मंगळवेढा आणि परिसरात मोठा दुष्काळ पडला. सोलापूर, विजापूर, मंगळवेढा परिसरातील लोक अन्नाशिवाय उपाशी मरू लागले. लहान मुले, म्हातारी माणसे यांची अवस्था फारच वाईट झाली. माझ्या या भोळ्या दामाजीपंतांकडून लोकांचे हे हाल पाहवत नव्हते. दामाजीपंतांच्या ताब्यात बादशहाच्या मालकीचे धान्याचे कोठार होते. ते त्यांनी गोरगरीब जनतेसाठी खुले केले. मैलोनमैल लोक अन्नधान्यासाठी आणि जेवणासाठी मंगळवेढ्याला चालत येऊ लागले. दामाजीपंतांनी त्या सगळ्यांची व्यवस्था केली. कोठार बादशहाचे आहे, आपण करतो ती चूक आहे हे त्यांना माहिती होते. पण अशावेळी माणुसकी हाच परमेश्वर असतो, तीच ईश्वराची भक्ती असते हे दामाजीपंत जाणून होते. 

बादशहाला जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा त्याने दामाजीपंताला पकडून बेड्या घालून आणण्याची आज्ञा केली. आता मला माझ्या भक्ताची काळजी होती. मलाच काहीतरी करणे भाग होते. मग मी विठू महाराचे रूप घेतले. हातात काठी, खांद्यावर घोंगडी घेतली आणि विजापूरच्या दरबारात हजर झालो. बादशहाला म्हटले की मी मंगळवेढ्याच्या दामाजीपंतांचा नोकर आहे. त्यांनी मला पाठवले आहे. त्यांनी जे धान्य लोकांना वाटले त्याची ही रक्कम घ्या. असं म्हणून सोन्याच्या मोहरा बादशहासमोर ओतल्या. त्याची पावती करायला सांगितली. आणि परत माझ्या जागी आलो. जेव्हा बादशहाच्या सैनिकांनी दामाजीपंतांना त्याच्यासमोर हजर केले तेव्हा, बादशहाला त्यांचा आदरसत्कार करून मंगळवेढ्याला परत पाठवले. 

आज मी तुम्हाला हे सगळे का सांगतो आहे असं विचारताय  ? अहो, असं काय करताय ..! तशीच परिस्थिती नाही का आज ? कोरोनाची साथ सगळीकडे असताना सामान्य माणसाची, गोरगरिबांची, माझ्या बळीराजाची फार वाईट अवस्था आहे. अशावेळी सुद्धा माणुसकी हाच धर्म आहे. जशी दामाजीपंतांनी भुकेलेल्यांना मदत केली, तशी तुम्ही पण करू शकता. तुमच्या ऐपतीनुसार. पैसा , श्रम वेळ जमेल त्या स्वरूपात. बघा पटलं तर.. ! कारण आग्रह किंवा बळजबरी तर नाही करू शकत मी. 

काय म्हणता, मी आज तुमच्याशी बोलायला का आलोय असा प्रश्न पडलाय तुम्हाला ? तेही साहजिकच आहे म्हणा. दोन कारणांनी आलोय तुमच्याशी बोलायला. माझ्या भक्तांना आज कोरोनाच्या साथीमुळे पंढरपूरला माझ्या दर्शनाला येता येत नाही. मग मलाच यावं लागलं माझ्या भक्तांशी बोलायला. पण मी फक्त पंढरपुरात आहे असं समजू नका. जिथे जिथे माझं नाम आहे, त्या त्या हृदयात माझा वास आहेच. म्हणून तर बोलतोय ना तुमच्याशी. आणि दुसरं कारण काय म्हणून विचारता ..? ठीक आहे तेही सांगतो. दरवर्षी आषाढी कार्तिकीला लाखो भक्त इथे माझ्या दर्शनाला येतात. जणू महासागरच लोटतो या चंद्रभागेतीरी  ! पण सांगू का, गर्दीमुळे कधी कधी मलाही नकोसं होतं . धर्माचा, श्रद्धेचा बाजार मांडलेला मला नाही आवडत. माझ्या ज्ञानोबा, तुकोबांनी वारी सुरु केली, भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली, तेव्हा मला किती आनंद झाला होता म्हणून सांगू ? पण आज सगळं बदललंय . भक्तीची चंद्रभागा मलीन झालीय. पण आजही माझी निस्सीम, शुद्ध भावाने भक्ती करणारे भक्त करणारे भक्त मला तेवढेच प्रिय आहेत. मी त्यांच्याशी कधीच प्रतारणा करणार नाही. म्हणून तर त्यांना भेटायला म्हणजेच तुमच्याशी बोलायला मी आज स्वतःहून आलोय. 

मी आलोच आहे तर आणखीन एक रहस्य तुम्हाला सांगून ठेवतो. तुम्ही भक्तिभावाने मला निरनिराळ्या गोष्टी अर्पण करतात. मी काही म्हणत नाही. दिल्या तरी काही म्हणत नाही आणि नाही दिल्या तरी नाही. खरं तर मला काही नकोच असतं . मला तुमचा भोळा भक्तिभाव पाहिजे असतो. मी वर म्हटलं ना तसा मग मी प्रेमानं बांधला जातो. तुम्ही भक्तिभावानं साधं तुळशीपत्र जरी मला अर्पण केलंत ना, तरी ते मला पोहोचेल. पंढरपूरला आलंच पाहिजे किंवा मंदिरात गेलंच पाहिजे असं नाही. मी तुमच्याजवळच आहे. फक्त मनापासून हाक मारा. 

अच्छा, बरंय तर. निघतो मी आता. खूप बोललोय मी आज. काळजी करू नका. मी आहेच. येतो मी. 

©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
    ०१/०७/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२ 
( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 






















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...