मुख्य सामग्रीवर वगळा

अचपळ मन माझे...

उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

अचपळ मन माझे... 

असं म्हटलं जातं की एकवेळ जग जिंकणं सोपं आहे पण मनाला जिंकणं ही गोष्ट सगळ्यात कठीण.  मन स्थिर राहत नाही. सारखं मन  विचारांच्या मागे धावत राहतं .  सारखं इथून तिथे, तिथून आणखी कुठेतरी. बहिणाबाई म्हणतात 


मन पाखरू पाखरू 
काय सांगू याची मात 
आता होतं भुईवर 
गेलं गेलं आभाळात. 

वाऱ्यापेक्षाही वेगवान कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे आपलं मन. अशा या मनाला समजावणं किती कठीण..! म्हणून तर एखाद्या कवीला म्हणावं लागतं ' माझिया मना, जरा थांबना , तुझे धावणे अन मला वेदना..' गेले काही दिवस माझंही मन असंच काहीसं होतंय. समर्थ रामदास म्हणतात, ' मना सज्जना भक्तिपंथेचि जावे.' हे त्यांचं म्हणणं पटतंय. बुद्धीला पटतंय. मनाला मात्र खूप समजवावं लागतंय. मग अशा वेळी समर्थ रामदासांची करुणाष्टकं आठवत राहतात. त्यात सुरुवातीलाच ते म्हणतात 

अनुदिन अनुतापें तापलो रामराया 
परमदिनदयाळा निरसी मोहमाया 
अचपळ मन माझे नावरे आवरिता 
तुजविण सिण होतो धावरे धाव आता 

समर्थ रामदास. त्यांच्या नावातच समर्थ. त्यांनी तपश्चर्या केली, पुरश्चरण केलं. अशा समर्थ असलेल्या रामदासांची अशी अवस्था व्हावी ? मग आपली काय कथा ? ते म्हणतात अनुदिन अनुतापें म्हणजे दररोजच्या होणाऱ्या तापामुळे, म्हणजे मनाला होणाऱ्या त्रासामुळे मी त्रासलो आहे. रोज आपल्या मनावर हजारो प्रकारचा ताण पडत असतो. जीवनातील या त्रासाला आपण कंटाळतो, वैतागतो. आपलं ठीक आहे, कारण आपण सामान्य माणसं. पण समर्थांचंही असं व्हावं  ? की कदाचित जगाला गीता सांगण्यासाठी जसं कृष्णानं अर्जुनाला निमित्त केलं , तसं मला वाटतं की समर्थानाही त्यांचं स्वतःच निमित्त करून आपल्याला तर हे सांगायचं नसावं ? कदाचित तसंही असू शकेल कारण समर्थांचा मानवी मनाचा अभ्यास फार मोठा होता. 

दुसऱ्या ओळीत ते म्हणतात ' परमदिनदयाळा, निरसी मोहमाया. ' आता रोजच्या त्रासांनी , कटकटींनी वैतागलो आहे. त्यातून सुटका कोण करणार  ? कोणाला सांगावं  ? तो जो परम दयाळू आहे. दीनांचा ज्याला कळवळा आहे, अशा श्रीरामाला. त्याला ते विनवणी करतात. कोणती , तर निरसी मोहमाया. कारण आपल्याला त्रास जो होतो आहे, तो या मोहमायेत अडकल्यामुळे. या मोहमायेचं निवारण कोण करील ? तर ज्याने ती निर्माण केली तोच करू शकेल. हे मन अचपळ आहे, म्हणजे सारखं धावतं आहे, स्थिर राहत नाही. माझ्याकडून तर ते आवरता आवरलं जात नाही. हे सगळं केवळ तू नसल्यामुळे घडतंय. म्हणून आता तू त्वरित धाव घे आणि मला या त्रासातून सोडव. 

आम्हाला संतांनी आपलं कर्म करीत असताना मुखानं परमेश्वराचं नाव घ्या म्हणून सांगितलं. गोंदवलेकर महाराजांनी तर फक्त रामनाम घ्या म्हणून सांगितलं. त्यांच्या रोजच्या प्रवचनात फक्त रामनाम घ्या हाच संदेश त्यांनी वेगवेगळी उदाहरणे देऊन आपल्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं ते प्रवचन वाचलं किंवा ऐकलं की वाटतं की महाराजांनी किती सोपी गोष्ट सांगितली आहे. आपण आता उद्यापासून नक्की रामनाम घ्यायला सुरुवात करायची. दिवसभरात काम करता करता मनातल्या मनात रामनामाचा जप करायचा. पण उठल्यापासून निरनिराळ्या कामात आणि निरनिराळ्या विषयात मन जे गुंतून जातं ते पुन्हा जेव्हा कधी प्रवचन वाचू तेव्हाच लक्षात येतं आणि मग वाटतं की आपण तर ठरवलं होतं नाम घ्यायचं पण विसरलो. कारण आमच्या मनाची अवस्था अशी होते की 

 ‘चपळपण मनाचें मोडिता मोडवेना।

सकळस्वजनमाया तोडितां तोडवेना।

घडिघडि विघडे हा निश्चयो अंतरीचा।

म्हणउनि करुणा हे बोलतो दीनवाचा।

आचार्य रजनीश म्हणतात की, आम्हाला सुख हवं असतं पण सुख देणारी वस्तू नको असते. आम्हाला दुःख नको असतं पण दुःख देणारी वस्तू आम्हाला हवी असते. मलाही हे वाक्य सुरुवातीला कळलं नाही. त्याच्यात विरोधाभास आहे. सुख तर हवं आहे पण सुख देणारी वस्तू नको आणि दुःख नको आहे पण दुःख देणारी वस्तू हवी आहे. म्हणजे बघा सुख हवं आहे, आम्हाला आरोग्य हवं असतं, पण आरोग्य देणारा व्यायाम,सकाळी उठणं या गोष्टी आम्हाला नकोशा वाटतात. सुख देणारी वस्तू म्हणजे नाम, किंवा त्याची भक्ती आम्हाला नकोशी वाटते. आणि दुःख नको आहे, पण दुःख देणाऱ्या वस्तू तर आपण गोळा करत असतो ना..! गाडी, बंगला, पैसाअडका, नोकरचाकर, मालमत्ता, सत्ता इ गोष्टी आम्हाला हव्या असतात. पण त्यांच्यात सुख नाही. त्यांच्यामागे आयुष्यभर धावून धावून मनुष्य थकतो आणि आयुष्याच्या शेवटी त्याची विफलता लक्षात येते. वाळवंटात प्रवास करणाऱ्याला जसा मृगजळाचा भास व्हावा, तसा आपल्याला सुखाचा भास या सगळ्या गोष्टींमुळे होतो. म्हणून समर्थ म्हणतात, ' निरसी मोहमाया. ' मोहमायेच्या तावडीतून सुटणं फार कठीण. पण भगवंताचं नाम घेतल्यानं मोहमायेची जी तीव्रता असते , प्रभाव असतो तो कमी व्हायला मदत होते. 

समर्थांच्या या करुणाष्टकांमध्ये एक प्रकारची आर्तता आहे. ही आर्तता आंतरिक तळमळीतून आलेली आहे. करुणाष्टकांत रामाची करुणा त्यांनी भाकली आहे. आपण परमेश्वराची प्रार्थना जेव्हा करतो, तेव्हा त्यात प्रेम, आर्तता असणं आवश्यक असतं. तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगांमध्ये ही आर्तता, ही करुणा आपल्याला अनुभवायला मिळते. समर्थानी पहिल्या ओळीत जे ' तापलो ' म्हटलं आहे, तो ताप जीवनाच्या संकटांनी ते कंटाळले होते, म्हणून आलेला नाही. आजकाल बऱ्याच लोकांना निराशेमुळे जे काहीही करावंसं वाटत नाही, ते उदास राहतात, जीवन त्यांच्या दृष्टीने निरस होते, त्याला  इंग्रजीत ' डिप्रेशन ' म्हणतात,. समर्थांची करुणा किंवा प्रार्थना तसल्या निराशेतून आलेली नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. तर ती करुणा भाकणे म्हणजे परमेश्वराला केलेली प्रार्थनाच आहे. तिचा हेतू उदात्त आहे. सर्वांच्या कल्याणासाठी आहे. ही करुणा  किंवा प्रार्थना म्हणजेच एक प्रकारचा स्वसंवादही आहे. म्हणूनच आपलं अचपळ मन आवरण्यासाठी आपण त्याचा धावा करू या, त्याला प्रार्थना करू या. 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
   २८/०६/२०२० 
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२ 
( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 

















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...