मुख्य सामग्रीवर वगळा

मला आवडणारी त्रिमूर्ती ...

उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

मला आवडणारी त्रिमूर्ती ... 

महाराष्ट्र ही जशी संतांची भूमी तशीच या महाराष्ट्राला थोर लेखक आणि आणि वक्त्यांची परंपरा आहे. आचार्य अत्रे, पुल देशपांडे यांच्यासारखी मंडळी उत्तम लेखक तर होतीच पण ती अष्टपैलू व्यक्तिमत्वे होती. ख्यातनाम वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्याशिवाय प्रा शिवाजीराव भोसले , प्राचार्य राम शेवाळकर यासारखे दिग्गज वक्ते आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले. त्यापैकी पुल देशपांडे, राम शेवाळकर यांना प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य मला लाभलेले आहे. तशी आमची चाळीसगावची भूमी सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न. लहानपणापासून आमच्या चाळीसगावच्या सरस्वती व्याख्यानमालेत मी ग दि माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, कविवर्य कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, शंकर पाटील,डॉ यु म पठाण, डॉ यशवंत पाठक, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आदी नामवंत लेखक, वक्ते आणि कवींना जवळून पाहण्याचा आणि ऐकण्याचा योग्य आला हे माझे केवढे भाग्य..! 

पण आज मी सांगणार आहे ते वेगळ्या तीन व्यक्तिमत्वांबद्दल. ही तीन व्यक्तिमत्वे म्हणजे आजच्या घडीचे तीन उत्कृष्ट वक्ते. त्यातील पहिले व्यक्तिमत्व आहे प्रसिद्ध कवी, गीतकार आणि लेखक प्रा प्रवीण दवणे. सुरुवातीला मी दवणे सरांना टीव्ही वर कुठल्या तरी सांस्कृतिक कार्यक्रमाचं संचलन करताना पाहिलं. त्यांच्या त्या मधुर बोलण्यानं जणू मला मोहिनी घातली आणि मग प्रत्यक्ष त्यांच्या भेटीचा किंवा त्यांचं भाषण ऐकण्याचा योग कधी येतो, त्याची मी वाट पाहू लागलो. त्या आधी मी दवणे सरांची पुस्तके वाचली होती आणि त्यांच्या लेखनाचा चाहता झालो होतो. मग आमच्या शाळेत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याचा योग आला. त्यानिमित्ताने त्यांचा माझा जवळून परिचय झाला. माझ्याशी त्यांनी चक्क मित्राचं नातं जोडलं आणि मी जेव्हा केव्हा त्यांना फोन करत असे तेव्हा बोला विश्वासराव म्हणून ते सुरुवात करीत असतात. अजूनही आमचे कधीतरी काहीतरी निमित्ताने संभाषण होते. पुढे आमच्या गावातील शेट ना बं वाचनालयाच्या सरस्वती व्याख्यानमालेसाठी आम्ही त्यांना आमंत्रित केले. नंतरही पुढे एकदोन वेळा त्यांचे कार्यक्रम झाले. एकदा ते चाळीसगावला आले असताना दिवसभरच्या प्रवासाने थकले होते. मला त्यांच्याशी बोलायचे होते. तेव्हा ते थकलेले असताना, रात्री आम्ही बराच वेळ बोलत बसलो. त्या सुमाराला माझं पहिलं पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावर होतं. सरांना मी सहज म्हटलं, ' सर, मी तुमच्या पुस्तकांचा, तुमच्या भाषणांचा चाहता आहे. मला असं वाटतं की माझ्या या पहिल्या पुस्तकाला तुमची प्रस्तावना असावी. द्याल का सर लिहून ? ' सरांनी एका सेकंदात होकार दिला. एवढेच नाही तर, माझं हस्तलिखित त्यांच्याकडे पाठवल्यावर, स्वतःहून सुंदर प्रस्तावना लिहून पाठवली. त्यावेळेस माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही. दवणे सर आजही माझे आवडते वक्ते आहेत, लेखक आहेत. त्यांच्या लेखणीला आणि जिव्हेला सरस्वतीचा स्पर्श झाला आहे. आणि प्रत्यक्ष लतादीदींच्या हस्ते अशा या सरस्वतीपुत्राचा गौरव झाला आहे. अनेक भावगीते, भक्तिगीते आणि चित्रपटातील गीते त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झाली आहेत. 

आज ज्या दुसऱ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे, ते म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत वक्ते प्रा प्रकाश पाठक . ते व्यवसायाने चार्टर्ड अकौंटंट आहेत. प्राध्यापक आहेत. नासिक येथील भोसला मिलिटरी स्कुलचे संचालक आहेत आणि अनेक संस्थांच्या कार्यकारिणीवर विविध पदे भूषवित आहेत. पण प्रामुख्याने मी त्यांना ओळखतो तो एक पट्टीचा वक्ता म्हणून. हेही सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले व्यक्तिमत्व. एकदा त्यांचे भाषण मी खूप वर्षांपूर्वी ऐकले होते आणि तेव्हापासून त्यांच्या व्याख्यानांचा मी निस्सीम चाहता बनलो. चाळीसगावला कधीही कुठेही त्यांचे व्याख्यान असले की मी तिथे गेलो नाही असं झालं नाही. सर विविध विषयावर अधिकारवाणीने बोलतात. बोलताना हातात कागद वगैरे काही नसतो. एकदा का त्यांच्या वाकगंगेचा ओघ सुरु झाला की ती धो धो वाहत राहते आणि श्रोत्यांना चिंब भिजवते. जणू सर्वांगाचेच कान होतात आणि हे बोलणे संपूच नये असे वाटत राहते. जसा वेळ असेल त्याप्रमाणे सर तास, दोनतास सलग बोलत राहतात. त्यांच्या बोलण्याचं वैशिष्टय हे की जो विषय त्यांना श्रोत्यांसमोर मांडायचा असेल, त्यासंबंधी सुरुवातीला एखादे विधान ते करतात. मग त्या विषयाचा आपल्या वक्तृत्वात चारही बाजूनी समाचार घेऊन पुन्हा समारोपाच्या वेळी आपल्या त्या सुरुवातीच्या विधानावर परत येतात. जणू ते विधान आपल्या वक्तृत्वाने त्यांनी सिद्ध करून दाखवलेले असते. बोलताना तर विविध संदर्भ सहज उलगडतात. आपणही त्यांचे ते वाचन, ते पाठ असलेले संदर्भ, तारीखवार केलेली मांडणी आणि जोडीला अमोघ वक्तृत्व हे सगळे पाहून स्तिमित होतो. त्यांचं वक्तृत्व ही सांगण्याची गोष्ट नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे. सरांचं ज्या ज्या वेळेला व्याख्यान होत असे, तेव्हा व्याख्यानानंतर थांबणाऱ्या श्रोत्यांमध्ये मी असायचोच. भारावून गेलेल्या अवस्थेत त्यांना भेटायचो. आपल्या हातात ते माझा हात घ्यायचे आणि सुहास्य वदनाने कसे आहात म्हणून विचारायचे. याच त्यांच्या ओळखीतून मी सरांना माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून बोलावलं होतं . सरांचा मोठेपणा इतका, की माझ्यासारख्या एका सामान्य माणसाच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून येण्याचे त्यांनी ताबडतोब मान्य केले शिवाय मला सोयीची असणारी तारीख त्यांनी निवडली आणि आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून ते कार्यक्रमाला आले. मी भरून पावलो. 

तिसरे व्यक्तिमत्व ज्यांच्याबद्दल मी बोलणार आहे ते आहेत प्रा यजुर्वेंद्र महाजन. सर जळगावच्या दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक आहेत. ग्रामीण भागातील गरीब, गरजू आणि होतकरू मुलांना योग्य मार्गदर्शन मिळून स्पर्धा परीक्षांत त्यांनी यशस्वी व्हावे म्हणून तळमळीने प्रयत्न करणारे हे व्यक्तिमत्व. अत्यंत प्रसन्न आणि हसतमुख. त्यांच्या या दीपस्तंभ मधून अनेक आदिवासी, ग्रामीण भागातले विद्यार्थी यशस्वी होऊन राज्य आणि केंद्र सरकारमध्ये मोठमोठी मानाची पदे भूषवित आहेत. पण तेवढेच त्यांचे कार्य नाही. अंध, अपंग आणि अनाथांना खरोखरीच दीपस्तंभ होऊन त्यांनी त्यांच्या जीवनात प्रकाश आणला आहे. जेवढं सरांचं व्यक्तिमत्व प्रसन्न, तेवढंच त्यांचं बोलणंही समोरच्याचं मन जिंकून घेणारं . त्यांचं बोलणं, भाषण ऐकलं की आपली मरगळ कुठल्या कुठे पळून गेलीच म्हणून समजा . कारण त्यात असतं मनापासूनचे बोलणे, त्यात असते तळमळ, त्यात असते प्रेम आणि जिव्हाळा. मग सरांचंही बोलणं ऐकताना आपण देहभान हरपून जातो आणि त्यांनी बोलतच राहावं असं वाटतं . सरांच्या भाषणाचे व्हिडीओ यु ट्यूबवर उपलब्ध आहेत. अशी ही व्यक्ती माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला यावी आणि त्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन व्हावे ही माझी तीव्र इच्छा होती. त्यासाठी मी सरांना फोन केला. त्यांना विचारलं की सर मी आमंत्रण देण्यासाठी जळगावला येऊ का ? सर म्हणाले, ' तेवढ्यासाठी येणार असाल तर अजिबात येऊ नका. मी तुमच्या कार्यक्रमाला येऊन जाईन . ' किती हा मनाचा मोठेपणा. खरोखरच सर त्यांच्या अत्यंत व्यस्त असलेल्या दिनक्रमातून वेळ काढून माझ्या कार्यक्रमाला आले. त्याअगोदर चाळीसगाव तालुक्यात असणाऱ्या त्यांच्या विद्यार्थ्यांकडे या निमित्ताने जाऊन भेटून आले. 

अशी ही थोर व्यक्तिमत्वे. मला त्यांचा सहवास लाभला हे माझे भाग्य..! ही व्यक्तिमत्वे म्हणजे दीपस्तंभच..!!! 

 ©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
        २७/०६/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 

















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...