मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग - शिक्षित, सुशिक्षित आणि अशिक्षित

उगवतीचे रंग  

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

अशिक्षित कोण...? 

काल मी ' घरगाणी ...मनातली ' हा लेख लिहिला होता. त्या लेखात सुरुवातीला बहिणाबाईंच्या ' खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला..' या कवितेचा उल्लेख केला होता. नंतर बहिणाबाईंबद्दल लिहिताना असेही म्हटले होते की बहिणाबाई या अशिक्षित होत्या पण त्यांच्या प्रतिभेची झेप प्रचंड होती. वाचक म्हणून तुमचं नी  माझं विश्वासाचं नातं आहे. त्याच नात्यातून तुमच्याशी बोलतोय. तुम्हाला सांगू , बहिणाबाईंबद्दल अशिक्षित शब्द वापरताना माझा हात क्षणभर थरथरला होता. आणि नंतर काल आणि आज दिवसभर त्या शब्दानं माझा पिच्छा पुरवला. बहिणाबाईंच्या एक एक कविता आठवू लागल्या. त्या कवितांमधलं शहाणपण, त्यांचं तत्वज्ञान, एखादा विषय उदाहरण देऊन समजावून सांगण्याची पद्धत या गोष्टी मला पुन्हा जाणवल्या. मग माझं मनच मला म्हणालं की त्या केवळ शाळा कॉलेजात  गेल्या नाहीत, चार अक्षरे लिहावाचायाला शिकल्या नाहीत, म्हणून तू त्यांना लागलीच अशिक्षित ठरवून मोकळा होतोस ? माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. अशा काही अवघड प्रश्नांची उत्तरं नाही देता येत मला. 

नाहीतरी अशिक्षितांची व्याख्या आम्ही अशीच करतो ना, की जो शाळा कॉलेजात गेला नाही, लिहावाचायाला शिकला नाही तो अशिक्षित. मग या अशा अशिक्षित माणसांची तुलना माझं मन नकळत सुशिक्षित माणसांशी करू लागलं. मग आणखी लक्षात आलं की अशिक्षित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणून सुशिक्षित वापरता येणार नाही. त्यासाठी ' शिक्षित ' हा शब्द वापरावा लागेल. जो शाळेत गेला आहे, ज्याने चार पुस्तकं वाचली आहेत, ज्याला आपलं म्हणणं लिहून मांडता येतं तो शिक्षित. सुशिक्षित ही  त्याच्या पुढची पायरी आहे. सुशिक्षित माणसाला आपण जे काही शिकलो त्याचा वापर व्यवहारात कसा करावा याचे ज्ञान असणे, बऱ्यावाईटाची पारख करता येणे अपेक्षित असते. त्याची सद्सद्विवेकबुद्धी सांगेल त्याप्रमाणे त्याने वागणे अपेक्षित असते. सुशिक्षित शब्दाच्या आधी जो ' सु ' हा प्रत्यय लागला आहे, त्याचा अर्थच तो ! पण प्रत्यक्ष व्यवहारात बऱ्याच वेळा आपल्याला विपरीत परिस्थिती आढळते. आजपर्यंत जेवढे काही घोटाळे, भ्रष्टाचार झाले आहेत, तेवढे सगळे सुशिक्षित माणसांकडूनच झाले आहेत. एकाही अशिक्षित माणसाने असे घोटाळे केले नाहीत.अन्याय, अत्याचार, फसवाफसवी, लबाडी  करणारी मंडळी बऱ्यापैकी शिकलेली  असतात. मानवी मूल्ये पायदळी तुडवण्यात ही मंडळी बहुधा आघाडीवर असतात. 

माझ्या प्रिय वाचक मित्रांनो, कृपया असा गैरसमज करून घेऊ नका की सगळी सुशिक्षित माणसे वाईट आहेत. आणि सगळी अशिक्षित माणसे म्हणजे गुणांची खाण आहेत. या ठिकाणी मला सांगायचे एवढेच आहे की शिक्षणाने जे गुण, जी मूल्यं माणसात यायला हवी, ती शिक्षणाच्या माध्यमातून देण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. म्हणून त्यासाठी केवळ शिक्षण देऊन उपयोगी नाही. ज्या शिक्षणाला सुसंस्कारांची जोड असेल, तेच खरे शिक्षण. जे शिक्षण आम्हाला केवळ स्वार्थ न पाहता, इतरांसाठी मदतीचा संस्कार करत असेल, ते खरे शिक्षण. म्हणून तर बहिणाबाईंना म्हणावे लागले ना ' माणसा माणसा कधी होशील माणूस ? ' शिक्षणाचे काम माणूस घडवणे आहे. 

असं म्हटलं जातं की शिक्षण हे दिलं जातं आणि संस्कार हा टिपला जातो, ग्रहण केला जातो. म्हणून संस्कार ग्रहण करण्यासाठी माणसाचं मन टिपकागदासारखं असावं लागतं. तो टिपकागद सुद्धा कोरा असावा लागतो. तरच संस्कार नावाची गोष्ट त्यानं टिपली जाईल. तो जर ओला असेल, तर संस्कार शोषून घेऊ शकणार नाही. आपल्याला शिक्षणातून मुलांची मनं अशी टिपकागदासारखी तयार करता आली पाहिजेत, जेणेकरून ती पटकन चांगले संस्कार ग्रहण करू शकतील. खरं म्हणजे ती असतातच मुळात संस्कारक्षम. पण आपणच नको त्या गोष्टींचा त्यांच्यावर मारा करून तो टिपकागद ओला करून टाकतो. त्यासाठी पालकांना श्यामची आई व्हावी लागेल आणि शिक्षकांना साने गुरुजी. ' श्यामच्या आई ' मधला तो प्रसंग आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल. श्याम अंघोळ करून येतो. आणि आईला म्हणतो, ' पायाला घाण लागेल. ' त्यावेळी आई म्हणते, ' श्याम, पायाला माती लागू नये म्हणून जसा जपतोस , तसेच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. ' आईवडिलांनी ठरवलं तर बोलता बोलता किती सहज संस्कार दिले जाऊ शकतात याचं हे उत्तम उदाहरण. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षण, पदव्या, प्रमाणपत्र नाही. त्या शिक्षणातून नम्रतेचा, सेवेचा संस्कार देखील आला पाहिजे. 

वपु काळेंच्या पुस्तकात वाचलेली एक गोष्ट आठवते. खूप छान आहे. गझनीच्या महंमदाच्या दरबारात एक पंडित होता. त्या पंडिताचा मुलगा शिकून मोठा झाला. तो त्या मुलाला घेऊन दरबारात आला आणि म्हणाला, ' खाविंद, हा माझा मुलगा सगळं शिकला आहे. त्याला आपण आपल्या सेवेत दाखल करून घ्यावं. महमंद मानसुद्धा वर न करता म्हणाला, ' एका वर्षाने त्याला घेऊन ये. ' एक वर्ष झाल्यावर पंडित पुन्हा आपल्या मुलाला दरबारात घेऊन जातो. तो म्हणतो, ' आता या मुलाने सर्व धर्मांचा अभ्यास केला आहे. गीता, कुराण, बायबल सगळं काही वाचलं आहे. आता शिकावं असं त्याच्या दृष्टीने काही राहिलं नाही. ' आता महंमदाने मान वर केली आणि त्या पंडिताला म्हणाला, ' तुझ्या मुलाचा शिष्य म्हणून स्वीकार करेल असा गुरु शोध. त्याच्याकडे त्याला पाठव. मग एका वर्षाने येऊन भेट. ' त्याप्रमाणे त्या पंडिताने बऱ्याच गुरूंकडे जाऊन पाहिले . पण कोणी त्याला शिष्य म्हणून ठेवून घ्यायला तयार होईना. कारण एवढ्या शिकलेल्या मुलाला कोण आणि काय शिकवेल ? 

शेवटी एका गुरूंनी त्याला शिष्य म्हणून स्वीकाराची तयारी दर्शवली. त्यांच्याकडे मुलाला ठेवून तो पंडित घरी आला. एका वर्षाने त्या पंडिताने त्या गुरूंकडे जाऊन पाहिले , तेव्हा त्याला आढळले की तो मुलगा गुरुची सेवा करीत होता, त्यांचे पाय चेपत होता. त्याने आपल्या वडिलांकडे पाहिले सुद्धा नाही. पंडित पुन्हा महंमदाकडे गेला. त्याला सर्व हकीगत सांगितली. महमंद म्हणाला, ' आता त्याला माझ्याकडे यायची जरूर नाही. मलाच त्याच्याकडे गेले पाहिजे. ' स्वतः महंमद आणि पंडित दोघेही त्या गुरुकडे गेले. मग त्या गुरूंनीच त्या शिष्याचा हात महंमदाच्या हातात दिला आणि म्हणाले, ' आता याला घेऊन जाऊ शकता. ' तेव्हा तो मुलगा म्हणाला, ' आता मला दरबारात जायची गरज नाही. दरबारात किंवा आपल्या सेवेत राहून मला जे मिळणार होते, ते सगळे इथेच मिळाले आहे. ' ही गोष्ट पुरेशी बोलकी आहे. तिच्यावर मी काही स्पष्टीकरण द्यावं असं नाही. पण गोष्ट हे सांगते की पदव्या मिळवल्या, पुस्तके वाचली म्हणजे शिक्षण झालेच असे नाही. त्या शिक्षणाने मूल्ये कितपत अंगी रुजली, मानवतेची, सेवेची, प्रामाणिकपणाची, श्रमप्रतिष्ठेची हे त्याहूनही महत्वाचे आहे. 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
२९/०६/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख आवडल्यास नावासहित पुढे पाठवावा )












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...