उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
घरगाणी मनातली...
लहानपणची एक आठवण आहे. आमच्या शेताला लागून एक दुसरे शेत होते. त्या शेतात एक पडकी विहीर होती. तिच्या भोवती दाट झाडेझुडपे वाढल्याने आम्हाला त्या विहिरीजवळ जायला भीती वाटायची. पण कधी काळी त्या विहिरीजवळ गेलोच तर त्या विहिरीच्या काठाला एका झाडाला सुगरण पक्ष्यांची घरटी होती. ती घरटी अशी काही कौशल्याने बांधली होती की कोणीही त्या घरट्यांजवळ जाऊ शकत नसे. त्या झाडाची एक फांदी विहिरीवर झुकलेली होती आणि त्या फांदीला बरीच घरटी दाटीवाटीने बांधलेली होती. त्या घरट्यात त्या पाखरांची पिल्लं सुरक्षित राहत होती. निसर्ग प्राण्यांना सुद्धा आपल्या घरट्याची बांधणी आणि संरक्षण करायची बुद्धी देतो. अशा वेळी बहिणाबाईंच्या कवितेच्या ओळी आठवतात.
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिल्लासाठी तिनंझोका झाडाले टांगला
पिल्लं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला
बहिणाबाई एक अशिक्षित कवयित्री. पण प्रतिभेची झेप केवढी. दुसरं कडवं बघा. त्या झाडावर अधांतरी असलेल्या खोप्याला तिने झुलता बंगला म्हटले आहे. किती सुंदर कल्पना आहे नाही.! आपल्याला झुलते मनोरे, झुलता पूल माहित असतो. पण झुलता बंगला..! तिचा पिलांमध्ये असलेला जीव. पिलं झाडावर घरट्यात. म्हणून जीव झाडाले टांगला. घर पक्ष्यांचं असो की मानवाचं ...! किती प्रिय असतं सगळ्यांनाच...! मग ती झोपडी असली तरी तुकडोजी महाराज म्हणतात
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या.
एक खूप जुनं गाणं आहे. पूर्वी रेडिओवर लागायचं. अण्णा जोशी यांचं हे गीत प्रसिद्ध संगीतकार सी रामचंद्र यांनी गायिलेले आहे.
बघा तरी हो कशी बांधली जमवून काडी काडी
असेल का हो अशी कुणाची मजेदार झोपडी...
एकंदरीत ' घर ' हा आपल्या सगळ्यांचा वीकपॉइंट असतो . किती इच्छा, आकांक्षा, स्वप्नं घराशी निगडित असतात. माणूस आपलं हक्काचं घर व्हावं म्हणून किती प्रयत्नशील असतो. एकदा घर झालं की असतो एक ऊब देणारा निवारा. एक सुरक्षित घरटं. जसं पक्ष्यांचं आकाशातील उडणं पाहून मानवाला सुद्धा उडावंसं वाटलं. तशी पक्ष्यांची घरटी पाहून आपल्या नवीन संसाराचं स्वप्नं पाहणाऱ्या प्रेमी जीवांना आपल्या घराची आठवण होते. आणि मग तशीच स्वप्नं ते आपल्या मनामध्ये पाहू लागतात. १९७६ मध्ये परीक्षित सहानी आणि राखी यांनी अभिनय केलेला ' तपस्या ' हा एक सुंदर चित्रपट आला होता. त्या चित्रपटात एक गाणं आहे. खूप गोड आहे. किशोरकुमार आणि आरती मुखर्जी यांनी गायिलेले.
दो पंछी दो तिनके कहो लेके चले है कहाँ
ये बनायेंगे एक आशिया.
हे ते गाणं आहे. राखी आणि परीक्षित सहानी यांच्या नितांतसुंदर अभिनयानं नटलेलं . आणि कधीही ऐकलं तरी ताजं वाटणारं . मन प्रसन्न करणारं . जुन्या गाण्यांची लज्जतच काही और..!
घर ही गोष्ट मनाला प्रिय. गाणीही प्रिय. इथे तर त्या दोघांचा संगम. ' घरगाणी . ' आपल्या सगळ्यांच्या मनातलं घरकुल असतं असंच हसतं खेळतं.
घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती
आत असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती.
घरासंबंधी वाचलेली काही सुंदर इंग्रजी वाक्यं आठवली. साधारणपणे इंग्रजीत आपण ' home ' आणि ' house ' हे शब्द समानार्थी समजतो. पण त्यातला मोठा सुंदर फरक या वाक्यांमध्ये सांगितला आहे.
The word ' home ' means more than the word ' house '. A house is a place to live LIVE. A home is a place to LOVE. Government can build houses, but only people can make them homes. And the strength of our nation lies in the character of our people who want their houses to be homes.
थोडक्यात घर म्हणजे फक्त राहण्याची जागा नव्हे, ती एकमेकांवर प्रेम करण्याची जागा आहे असे वरील इंग्रजी वाक्य आपल्याला सांगते. आपलं मन, हृदय हे सुद्धा एक घर आहे अशी कल्पना केली तर, या घरात आपल्याला प्रिय असलेली माणसं राहतात. एखाद्याच्या मनात आपल्याला जागा मिळणं ही किती आनंदाची आणि भाग्याची गोष्ट.
काही गाणी ही द्व्यर्थी असतात. त्यांचा अर्थ एकाच वेळी प्रेयसीला आणि ईश्वराला उद्देशून असा होऊ शकतो. ' नववधू प्रिया मी बावरते ', ' लागा चुनरी मे दाग ' ही अशी काही गाणी. असंच एक गाणं वरदक्षिणा चित्रपटात आहे. हे गाणं सुधीर फडकेंनी फार भावपूर्ण म्हटलं आहे. वरवर पाहता हे गाणं परमेश्वराला उद्देशून आहे असं वाटतं . तसं ते आहेच. पण त्या चित्रपटातल्या नायिकेला सुद्धा ते उद्देशून आहे हे फार क्वचित आपल्या लक्षात येतं . असो. ते गाणं आहे
एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात.
आपणही ही सुंदर गीते मनात साठवू या. आणि वरील गाण्याप्रमाणेच परमेश्वराला प्रार्थना करू या की एकवार आमच्याही पंखावरुनी फिरो तुझा हात. या धरेवर म्हणजे पृथ्वीवर, तुझ्याच अंगणात बांधलेल्या आमच्या घरट्याला तुझा आशीर्वाद राहू दे.
©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२५/०६/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा