उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
चालायला लागा....
एकदा एक तरुण वयातील रुग्ण एका डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर त्याच्या चांगल्या ओळखीचे होते. डॉक्टरांना त्याचा दिनक्रमही माहित होता. तो तरुण डॉक्टरांकडे आपल्या तक्रारीचा पाढा वाचू लागला. माझे हे दुखते, ते दुखते. हा त्रास होतो, तो त्रास होतो वगैरे. डॉक्टरांनी शांतपणे त्याच्या तक्रारी ऐकून घेतल्या. आणि ते त्याला म्हणाले, ' चालायला लाग आणि पुन्हा माझ्याकडे येऊ नकोस. ' आता आश्चर्यचकित होण्याची वेळ त्या तरुणाची होती. त्याला वाटले डॉ आपल्या तक्रारी ऐकून घेतील . आपल्याला काहीतरी गंभीर आजार नक्कीच असला पाहिजे असे त्या तक्रारींवरून त्यांना वाटेल. कदाचित ते आपल्याला काही तपासण्या करायला सांगतील. काही गोळ्या, औषधं, टॉनिक वगैरे लिहून देतील. पण झाले भलतेच. त्याला असे बुचकळ्यात पडलेले पाहून ते म्हणाले, ' माझ्या तरुण मित्रा, कसली चिंता करतोस एवढी. काही झालेलं नाहीये तुला. मी काही औषधे वगैरे सांगत नाही. तू आता चालायला लाग. म्हणजे चालायला सुरुवात कर. दररोज सकाळी उठून फिरायला जा. दोन महिन्यांनी माझ्याकडे ये. त्यावेळी तुझ्या काही तक्रारी असल्या तर बघू. '
असं डॉ नी सांगायची वेळ कशाला आणायची आपण ? स्वतःहूनच का सुरुवात करू नये ? मोबाईल आहे ना तुमच्याकडे ? तुम्ही म्हणाल, काहीतरीच काय विचारता ? हा काय प्रश्न झाला ? आता मोबाईल एखाद्याकडे नसला तरच आश्चर्य..! मोबाईल म्हणजे काय ? मोबाईल म्हणजे चालता , फिरता, एका जागेवर स्थिर नसणारा. म्हणून तर त्याला मराठीत आपण भ्रमणध्वनी म्हणतो ना ! पण गंमत काय झालीय माहितीये ? तो मोबाईल आल्यापासून आपण मात्र नॉन मोबाईल झालोय. एखाद्या वेळेला मोबाईलला घरात रेंज नसते, नेटवर्क नसते. सगळे इंग्रजी शब्द ..! नाईलाज आहे. पण पटकन समजतात म्हणून तेच वापरतो. तर मोबाईलला घरात रेंज नसते, तेव्हा काय करतो आपण ? पटकन घराबाहेर येतो. मग आपल्याला रेंज किंवा नेटवर्क मिळते. आता हे काही आपल्याला कोणी शिकवलेले नसते की मोबाईलला रेंज नसेल तर बाहेर जा म्हणून. काही बाबतीत आपण कसे उत्साही आणि उत्स्फूर्त..! मला सांगायचं एवढंच आहे की मोबाईलला जशी घरात योग्य रेंज मिळत नाही, तशी आरोग्याला सुद्धा मिळत नाही. घराच्या बाहेर पडा आणि आरोग्याचे नेटवर्क अनुभवा . सतत घरात किंवा ऑफिसमध्ये बसून आपण कंटाळतो. त्या वातावरणात सतत राहिल्याने एक प्रकारचा मानसिक ताणही आपल्याला येतो. तुम्ही घराबाहेर पडा आणि चालायला सुरुवात करा. मोबाईलला जसे पटकन नेटवर्क मिळते, तसेच बाहेर पडल्यावर तुमच्या मनावरचा ताणसुद्धा लगेच कमी व्हायला सुरुवात होते.
कशासाठी पडायचं बाहेर सकाळी ? एवढी काय गरज आहे ? आणि सकाळची झोप .. ! वा, वा. काय सुख आहे राजेहो, सकाळच्या झोपेत. उगीच नाही तिला साखरझोप म्हणत ! तुमचं म्हणणं बरं आहे आणि थोडंस खरं आहे. पण, पण मित्रांनो, सकाळी जी जी माणसं फिरायला येतात, ती सगळी या साखरझोपेचा त्याग करून आलेली असतात. पण जेव्हा आपण सकाळी मस्तपैकी फिरून येतो, तेव्हा दिवसभरासाठी एक प्रकारचा, उत्साह, स्फूर्ती घेऊन येतो. दिवसभर कसे ताजेतवाने वाटते. ऑफिसला असताना सायंकाळी पाच वाजेपर्यंत काम करताना अगदी कंटाळून जात होतो. पाच केव्हा वाजतात आणि घरी कधी जातो असे होत होते. पण जेव्हा दररोज सकाळी फिरणे हा तुमच्या जीवनक्रमाचा नित्याचा एक भाग बनून जाईल, तेव्हा ऑफिसात पाच केव्हा वाजले हेही तुम्हाला कळणार नाही. म्हणजेच तुमचा काम करण्याचा उत्साह वाढेल, कार्यक्षमता वाढेल. तुम्ही जर म्हणाल की कामानिमित्त आमचे दिवसभर खूप चालणे होते, आम्हाला फिरण्याची गरज नाही. तर आपण चुकतो आहोत. असे असते तर दिवसभर कामासाठी फिरणारे पोस्टमन, कुरिअरवाले सगळे निरोगी राहिले असते. त्यांच्या आरोग्याच्या काही तक्रारी राहिल्या नसत्या. कामासाठी फिरणे वेगळे आणि व्यायाम म्हणून सकाळचे फिरणे वेगळे.
सकाळच्या फिरण्याचे काही फायदे बघू या. सकाळी फिरण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे शुद्ध हवा आणि भरपूर ऑक्सिजन आपल्याला मिळतो. तोपर्यंत प्रदूषणाला सुरुवात झालेली नसते. त्यामुळे शुद्ध प्राणवायू मिळून आपल्याला उत्साह वाटतो. हृदयाची, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. रक्ताभिसरण सुधारते. पाय दुखणे, गुढघे दुखणे इ सारख्या तक्रारी काही दिवसांच्या चालण्याने नाहीशा होतात. वाढते वजन, वाढणारे कोलेस्टेरॉल आटोक्यात राहते. शरीरातील सुस्ती, आळस जाऊन एक प्रकारची चपळता, तरलता येते. शरीरावरची जास्तीची चरबी हळूहळू कमी होऊन शरीर सुडौल दिसायला लागते. लहानापासून तर वृद्धांपर्यंत सर्वजण फिरण्याचा आनंद घेऊ शकतात. आपण सहकुटुंब सुद्धा फिरण्याचा आनंद घेऊ शकतो. आपल्याकडे लहान मुले असतील तर सकाळी तुमच्यासोबत येण्याने त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा खूप फायदा होईल. ते निसर्गाचे निरीक्षण करतील. लवकर उठून फिरण्याचा संस्कार आपोआपच त्यांच्या मनावर होईल. मोठेपणी त्यांना फिरायला जा म्हणून सांगावे लागणार नाही. शिवाय सकाळच्या वेळी होणारा सूर्योदय, पूर्व दिशेच्या पटलावर होणारी विविध रंगांची उधळण, पक्ष्यांचा किलबिलाट त्यांना आणि तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल. या सगळ्या अनुभवायच्या गोष्टी आहेत. टीव्हीत, सिनेमात या गोष्टी पाहण्यापेक्षा त्या प्रत्यक्ष अनुभवण्यात जास्त मजा आहे. सकाळी नाहीच जमलं तर आपण संध्याकाळी फिरू शकतो. पण सकाळच्या फिरण्याशी त्याची तुलना होऊ शकत नाही.
चालणे हा सगळ्यात सोपा व्यायामप्रकार आहे. रोज आपल्या क्षमतेप्रमाणे अर्धा एक तास फिरायला सुरुवात केलीत, तर अन्य व्यायाम करण्याची गरज राहत नाही. चालण्यासाठी आपल्याला पायात सुयोग्य बसणारे बूट, मोजे वापरा . हवामानानुसार योग्य कपडे वापरा . चालण्याला सुरुवात करण्यापूर्वी थोडे वार्म अप करा. सुरुवात हळू चालण्याने करा. हळूहळू वेग वाढावा. नंतर शेवटी पुन्हा वेग कमी करा. असे करण्याने आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढेल. हातांची नैसर्गिक हालचाल होऊ द्या. आपण मिलिटरीतल्या लोकांसारखी परेड करत नाही. त्यामुळे हात खूप वरखाली करण्याची आवश्यकता नाही. खूप जलद चालण्याची आवश्यकता नाही. एक नैसर्गिक गती चालताना राहू द्या. चालताना आपण आपल्या आवडीनुसार नामस्मरण करू शकतो, गाणी ऐकू शकतो. आजूबाजूच्या वातावरणाचे निरीक्षण करू शकतो. आपल्याला नवनवीन कल्पना सुचू शकतात. फिरण्याने होणाऱ्या आरोग्याच्या फायद्यासोबतच काही सामाजिक फायदे सुद्धा होतात. नवीन मित्र भेटतात. ओळखी होतात. फिरणाऱ्यांच्या काही संघटना असतात. ग्रुप असतात. त्यात आपण सामील होऊ शकतात. ते निरनिराळ्या कार्याक्रमांचे आयोजन करीत असतात. साफसफाईच्या कार्यक्रमापासून सहलीपर्यंतचे आयोजन अशा ग्रुप्सतर्फे केले जाते. तुमच्या अंगातील सुप्त गुणांना वाव मिळण्यास अशा ग्रुपमध्ये सामील होणे उपयुक्त ठरू शकते. आता या कोरोनाच्या महामारीत अशा अनेक ग्रुप्सनी गरजू लोकांनी मदत केली आहे.
ऋग्वेदात ' चरैवती चरैवती ..' म्हणजे चालत राहा असे सांगितले आहे. असे म्हणतात की चालणाऱ्याचे भाग्य चालते, बसणाऱ्याचे भाग्य बसलेले असते आणि झोपलेल्याचे भाग्य झोपलेले असते. आपण आपल्या आवडीनुसार हिरवळीवर चालू शकतो. वाळूवर चालू शकतो. अशा वेळी अनवाणी चाललेले चांगले असते. त्याचे वेगळे फायदे आहेत. नुसतं अनवाणी चालण्याचे सुद्धा वेगळे फायदे आहेत. जमिनीतली सकारात्मक ऊर्जा पायावाटे आपल्या शरीराला मिळते. शरीरातील नकारात्मक ऊर्जा भूमीत निघून जाते. आताच्या काळात निरनिराळे आजार येत आहेत. आपण आपले आरोग्य उत्तम ठेवले तरच जीवनाचा आनंद आपण घेऊ शकतो. त्यासाठी चालण्यासारखा साधा,सोपा बिनखर्चिक उपाय नाही. तेव्हा कोणतेही कारण न सांगता ' चालते होऊ या. '
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२४/०६/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा