मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग - आरोग्याची सप्तपदी चालताना...

उगवतीचे रंग 

आरोग्याची सप्तपदी चालताना... 

एकदा अकबराने बिरबलाला तीन प्रश्न विचारले होते. घोडा का अडला ? भाकरी का करपली ? पान का सडले  ? आणि अकबराने बिरबलाला या तिन्ही प्रश्नांचं उत्तर फक्त  तीन शब्दात द्यायला सांगितले. चतुर बिरबलाने पटकन सांगितले, ' वेळेवर न फिरवल्यामुळे. ' किती सुदंर उत्तर आहे नाही ..! आपण ही लहान मुलांची गोष्ट म्हणून बऱ्याच वेळेला सोडून देतो. पण त्यात किती मतितार्थ भरला आहे ! प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करायला हवी. भाकरी वेळीच फिरवली नाही, तर ती करपेल. पान सडेल आणि घोडा अडून राहील. हा न्याय आपल्या जीवनाला सुद्धा लागू होतो. आज आपले आरोग्य बिघडले आहे. दवाखान्यांमध्ये गर्दी वाढते आहे, इतकी की नवीन पेशंटसाठी जागा नाही. अनेक आजार वाढले आहेत. कोणालाही विचार की आज असे का होत आहे ? तो लहान मुलगा असला तरी आपल्याला सांगेल की, ' अहो काका, टेन्शन किती वाढलंय हल्ली ! शिवाय प्रदूषण केवढं वाढलंय ..! मग होणारच ना आजार. ' खरे आहे. हे सांगायला काही कोणा फार मोठ्या तज्ज्ञाची जरुरी नाही. मग पुन्हा अकबरासारखाच प्रश्न मनात येतो. कोणी वाढवले हे ताणतणाव, कोणी वाढवलं प्रदूषण ? याही प्रश्नाचं उत्तर द्यायला तज्ज्ञाची गरज नाही. कारण ते आपल्याला माहिती आहे. जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो, तेव्हा चार बोटं आपल्याकडे आपसूक वळालेली असतात. 

प्रदूषणाचा त्रास आपल्याबरोबरच निसर्गातील सर्व घटक, पशुपक्षी इ ना सुद्धा होतो. पण ते आपल्यापेक्षा निसर्गाच्या अधिक जवळ असतात. नैसर्गिक पद्धतीने जीवन जगतात. मुख्य म्हणजे आपल्याप्रमाणे मनावर ताणतणाव घेत नाहीत. त्यामुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडुनही ते बऱ्याच प्रमाणात आरोग्यदायी जीवन जगतात. आपण मात्र रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कर्करोग इ विकारांनी त्रस्त झालो आहोत. दवाखान्याच्या पायऱ्या झिजवत आहोत. डॉ च्या सांगण्यावरून निरनिराळ्या तपासण्या करून त्यांच्या फाईल्स छानपैकी सांभाळून ठेवतो आहोत. आरोग्य, मनाची शांतता मात्र हरवली आहे. हरवले ते गवसेल का ? प्रयत्न केला तर मिळू शकते. अवघड आहे पण अशक्य नाही. पण कोणतीही गोष्ट प्राप्त करायची असेल तर काहीतरी योगदान तर द्यावेच लागणार ना ? त्याची तयारी आपल्याला ठेवावी लागेल. 

आपण लहान असतानाचं जीवन आठवा . आपण शाळेत जात होतो तेव्हा आपल्याला ताणतणाव नव्हते का ? परीक्षेचा तणाव असायचा. मित्रांच्या मारामाऱ्या, भांडणं व्हायची, शाळेत शिक्षक शिक्षा करायचे, कधी प्रचंड गृहपाठ तर कधी नावडत्या विषयांच्या अभ्यासात नाईलाजाने डोके खुपसावे लागायचे. पण घरी आलो की ते सगळं विसरून जायचो. मस्त खायचो, प्यायचो, उड्या मारायचो, गाणी गायचो. खेळ खेळायचो, पाऊस आला तर त्यात भिजायचो. एकूण काय तर आपण त्या सगळ्या ताणतणावात असताना सुद्धा जीवनाचा आनंद घ्यायचो. पण कुठे ते दिवस आणि कुठे आजचे दिवस ? आम्हाला आज ऑफिसमध्ये बॉसचे टेन्शन, सुनेला सासूचे, तर सासूला सून ऐकत नाही म्हणून, आईवडिलांना मुलं ऐकत नाही म्हणून. पण या सगळ्या ताणतणावातून सुटका व्हावी म्हणून आपण काही व्यायाम, योगासने, एरोबिक्स इ करतो का ? हल्ली  आजारापासून दूर राहायचे असेल तर सगळे इम्युनिटी वाढवा म्हणून उद्घोष करताहेत ती इम्युनिटी या व्यायाम, योग, प्राणायामामुळे वाढतेच. मग त्यासाठी उन्हाळ्यात च्यवनप्राश नाही खाल्ले तरी चालेल. जाहिरातींना बळी पडण्याचे कारण नाही. अनेक योगासने अशी आहेत की या त्यामुळे आपली पाठदुखी, कंबरदुखी काही दिवसात नाहीशी होते. पचनक्रिया सुधारते, रक्ताभिसरण वाढते. प्राणायामामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. मेंदूला सुद्धा अधिक प्राणवायू मिळून आपल्याला उत्साह वाटतो. हृदयाची कार्यक्षमता वाढते. 

योगगुरू रामदेव बाबांना लहानपणी असा आजार झाला होता की डॉ  नी त्यांच्या आईवडिलांना सांगून टाकले होते की हा मुलगा पुढे आधाराशिवाय चालू शकणार नाही. पण त्यांनी योगासने, प्राणायाम, ध्यान इ च्या साहाय्याने आणि आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर या सगळ्यावर मात केली आणि आज ते योगगुरू म्हणून सगळ्या जगापुढे उभे आहेत. आज व्हाट्सअँप, फेसबुक इ सारख्या समाजमाध्यमांवर योग करणाऱ्यांची अनेक उदाहरणे पाहतो. कुठल्या तरी व्हिडिओत नव्वद ब्याण्णव वर्षांच्या आजी कठीण योगासने करताना दिसतात. कुठे तरी एखादे वयोवृद्ध आजोबा योगाच्या साहाय्याने आपले आरोग्य योगाच्या साहाय्याने उत्तम राखताना दिसतात. अशी खूप उदाहरणे आपल्या आजूबाजूला पाहिले तरी सापडतील. पण आपण ते फक्त पाहतो आणि पाहून सोडून देतो. खरी समस्या ही आहे. तुम्ही लहान असा की वयस्कर, स्त्री असा की पुरुष, तुम्हाला आजार असो की नसो, पण कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम हा प्रत्येकासाठी आवश्यक झाला आहे. आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ही सप्तपदी जर प्रत्येकाने अवलंबली तर बरेचसे आजार आटोक्यात राहून निरामय जीवन जगता येईल. त्यातील पहिलं पाऊल म्हणजे सकस आणि ताजा आहार, दुसरं पाऊल म्हणजे पुरेशा प्रमाणात घेतलेली झोप अत्यंत महत्वाची आहे. कारण ती आपल्या शरीर आणि मनाला ताजतवानं ठेवते. तिसरं पाऊल म्हणजे व्यायाम मग त्यात योग , प्राणायाम, एरोबिक्स, सूर्यनमस्कार, प्राणायाम, सकाळी किंवा संध्याकाळी फिरणं हे आपल्या सोयीनुसार आणि क्षमतेनुसार करावं. जास्त काही करायला नाही जमलं तरी रोज नियमित बारा सूर्यनमस्कार जरी आपण घातले तरी त्यामुळे चांगल्या आरोग्याचा लाभ होईल. सूर्य हा शक्तिदाता, चैतन्यदाता आहे.  ऊर्जा प्रदान करणारा आहे. त्याला आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी. रोज थोडा वेळ तरी कोवळ्या उन्हात फिरावं. चौथं पाऊल मनाला ताजतवानं ठेवण्यासाठी संगीत ऐकणं, एखादा छंद जोपासणं, चांगल्या पुस्तकांचं वाचन या गोष्टी आपल्याला मनाची आणि विचारांची समृद्धीही देतील. त्यासोबतच मित्र जोडणे, लहान मुलांमध्ये वेळ घालवणे, मुलात मूल होऊन खेळणे या गोष्टी पण आपल्याला वाढत्या वयाची जाणीव होऊ देणार नाहीत. 

पाचवं पाऊल आहे रोज थोडा वेळ तरी ध्यान करणे. ध्यान अनेक प्रकारांनी केले जाते. त्यातील कोणताही एखाद्या प्रकारची माहिती करून रोज थोडा वेळ तरी ध्यान करा. त्यामुळे तणाव कमी होऊन मनःशांती मिळेल. सहावं पाऊल आहे सकारात्मक विचारांचं. जेव्हा आपण योग, प्राणायाम, ध्यान इ करायला लागू तेव्हा नकारात्मक विचार हळूहळू कमी व्हायला लागतील. आणि निराशेचा पेला उत्साहाने, सकारात्मक विचारांनी भरायला सुरुवात होईल. सातवं पाऊल आहे प्रार्थनेचं . प्रार्थनेने मन शांत आणि एकाग्र व्हायला मदत होते. ज्या परमेश्वराने आपल्याला हे सुंदर जग, आणि आयुष्य दिलं त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे प्रार्थना. स्वतःसह सर्वांच्या कल्याणाची इच्छा व्यक्त करणं म्हणजे प्रार्थना.  सर्वांच्या कल्याणाची इच्छा व्यक्त करणाऱ्या या प्रार्थनेने लेखाचा शेवट करू या. 

सर्वे ऽपि सुखिनः सन्तु ! सर्वे सन्तु निरामय: ! 
सर्वे भद्राणी पश्यन्तु ! माकश्चित दुःख भागभवेत !!

हे ईश्वरा, सर्वांना सुखी ठेव. सर्वांचं कल्याण होऊ दे. सर्वांना निरोगी राहू दे. सर्वांची मने शुद्ध आणि पवित्र राहू देत. कोणीही दुःखी असू नये. इतरांकडे केवळ देहभावातून न पाहता अंतःकरणातून, चैतन्यभावाने पाहण्याची दृष्टी दे. दुःखात असलेल्याला मदत करून, ज्ञान देऊन त्याची दुःखातून सुटका करण्याची प्रेरणा आम्हाला होऊ दे. 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
  २३/०६/२०२० 
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२ 
( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...