उगवतीचे रंग
तीर्थ, तीर्थरूप आणि तीर्थक्षेत्र...
कालचा दिवस तसा अनेक अर्थांनी स्मरणीय होता. कालची तारीख होती २१ जून. हा दिवस सगळ्यात मोठा दिवस. २१ जून हा दिवस योगदिन सुद्धा. कालचाच दिवस ' फादर्स डे ' सुद्धा होता आणि कालच या वर्षातील पहिले सूर्यग्रहण सुद्धा होते. कालपासूनच सूर्याचे दक्षिणायनाही सुरु झाले. इतके सगळे योग या योगदिनाच्या दिवशी योगायोगाने एकत्र आले. तर काल होते सूर्यग्रहण. सूर्यग्रहणाची पर्वणी साधून अनेकांनी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केले आणि परमेश्वराचे दर्शन घेतले. अर्थात अशा लोकांची संख्या यंदा कोरोनामुळे खूपच कमी होती हा भाग वेगळा. तसेच कालच फादर्स डे सुद्धा होता. म्हणून काल ' तीर्थ ' आणि ' तीर्थरूप ' यांचा दिवस होता असे म्हणायला हरकत नसावी. या निमित्ताने बातम्यांमध्ये नासिकच्या गोदावरीत रामकुंडावर स्नानासाठी बऱ्याच लोकांनी गर्दी केल्याचे दाखवले. कोणी त्या पाण्यात स्नान करत होते, तर कोणी तेथे बसून जपजाप्य. ग्रहणकाळात असे तीर्थक्षेत्री स्नान आणि जपतप करणे पुण्यप्रद मानले जाते. पण तरीही कोरोना सारख्या महामारीच्या साथीत लोकांनी ही हिंमत केलेली पाहून नवल वाटले आणि त्यांच्या श्रद्धेचे कौतुकही.
आपण देवाच्या मूर्तीला पूजा करताना पाण्याचा अभिषेक करतो. ते पाणी असते साधेच. पण जेव्हा तेच पाणी मंत्रोच्चाराने संस्कारित होते, तेव्हा त्या पाण्याला तीर्थाचे स्वरूप प्राप्त होते. मंदिरात गेल्यावर परमेश्वराचे दर्शन घेतले की तेथील पुजाऱ्याकडून आपण हातावर तीर्थ घेतो. ते खरे तर असते साधे पाणीच. पण पूजा करताना त्यात कपूर, चंदन, अष्टगंध, पंचामृत आदी द्रव्ये मिसळून भगवंतावर अभिषेक केला जातो. त्याच्या जोडीला विशिष्ट असे मंत्र म्हटले जातात. त्यामुळे आधी साधेच असलेले हे पाणी आता अभिमंत्रित होऊन त्याला तीर्थाचे रूप प्राप्त होते. असे तीर्थ मग अत्यंत पवित्र, जणू परमेश्वराचा प्रसाद असे समजून आपण ग्रहण करतो. वडिलांना सुद्धा आपण तीर्थरूप म्हणतो. आईवडील हे तीर्थरूप असतात. आपल्या भारतीय संस्कृतीत जन्माला आल्यानंतर जी तीन ऋण आपल्याला फेडायची असतात, त्यामध्ये मातृऋण , पितृऋण आणि आचार्यऋण यांचा समावेश असतो. आईवडील हे तीर्थाइतकेच पवित्र असतात. म्हणून आपण त्यांना तीर्थरूप म्हणतो. पत्र लिहिण्याची प्रथा आता मोडली आहे. पूर्वी आईवडिलांना पत्र लिहिताना ' तीर्थरूप ' म्हणूनच सुरुवात करावी लागे . तीर्थरूप या शब्दात प्रेम तर होतेच पण आदराचीही भावना होती. आता आम्ही यासारखे शब्द हद्दपार करून इंग्रजाळलेले ' डिअर ' सारखे शब्द वापरतो. डिअर शब्दात प्रेम नाही असे नाही पण ' तीर्थरूप ' या शब्दातून मात्यापित्यांबद्दल जो आदर व्यक्त होत होता तो मात्र त्यात नाही. आपल्या संस्कृतीत आईवडील, गुरुजन हे कायमच आदरणीय होते आणि आहेत. त्यासाठी खरे तर मदर्स डे , फादर्स डे यासारखे दिवस साजरे करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. पण आपण असे समजू या की निदान या निमित्ताने तरी मुलांना आपल्या आईवडिलांची आठवण येते, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते, हेही नसे थोडके.. !
जसे तीर्थ म्हणजे पवित्र, अभिमंत्रित जल, तसेच क्षेत्र याचा अर्थ ठिकाण, जागा किंवा परिसर. अशी पवित्र ठिकाणे आणि ज्या ठिकाणचे जलाशय गुरूंच्या किंवा परमेश्वराच्या पदस्पर्शाने किंवा वास्तव्याने पुनीत झाले आहेत, ते ठिकाण तीर्थक्षेत्र होते. श्रीकृष्णाने गीतेच्या तेराव्या अध्यायात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याबद्दल सांगितले आहे. ते अध्यात्मिक किंवा पारमार्थिक अर्थाने. आपले शरीर म्हणजे क्षेत्र आणि त्याला जाणणारा आणि त्यात निवास करणारा तो क्षेत्रज्ञ म्हणजेच आत्मा हा परमेश्वरस्वरूप आहे असा त्याचा अर्थ आहे. हे जो जाणेल, त्याचे शरीर आणि मन तीर्थक्षेत्रासमान पवित्रच असेल असा त्याचा अर्थ. काशी क्षेत्री गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्यांचा त्रिवेणी संगम असल्याने आणि भगवान शंकराचा निवास असल्याने ते असे तीर्थक्षेत्र झाले आहे. तसेच नासिक हे तीर्थक्षेत्र राम , लक्ष्मण आणि सीता यांच्या पावन पदस्पर्शाने आणि गोदावरीच्या पवित्र जलाने पावन झाले आहे. अशी अनेक परम पवित्र तीर्थक्षेत्रे भारतात जागोजागी आहेत. पूर्वी आणि आताही यात्रेकरू या पवित्र तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेण्यासाठी तीर्थयात्रा करतात. या सगळ्या तीर्थक्षेत्रांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती निसर्गरम्य ठिकाणी आहेत. त्यातील काही क्षेत्रे आता त्या ठिकाणी दाट मानवी वस्ती झाल्याने पूर्वीसारखी निसर्गरम्य राहिली नाहीत हा भाग वेगळा. तीर्थक्षेत्री ज्या ज्या वेळी यात्रा भरते किंवा एखादा पवित्र दिवस असतो, त्या दिवशी आणि सुट्यांच्या दिवसात प्रचंड गर्दी अलीकडे होऊ लागली आहे. अशा गर्दीच्या वेळी तेथे जाणे कितपत योग्य हे ज्याचे त्याने ठरवावे. मात्र गर्दीच्या वेळा टाळून जर आपण तेथे गेलो तर दर्शन तर निवांत होतेच पण तेथील परिसरही छानपैकी न्याहाळता येतो.
या तीर्थयात्रेच्या निमित्ताने महाभारतातील एक कथा आठवली. महाभारतातील युद्ध नुकतेच संपलेले असते. युद्ध संपले असले तरी भीम, अर्जुन आपण युद्धात कसा पराक्रम केला त्याच्याच गोष्टी करीत असतात. अर्जुन जयद्रथाला, कर्णाला आपण कसे मारले तर भीम हा दुर्योधन आणि दुःशासनाला आपण गदायुद्धात कसे ठार मारले याचे रसभरीत वर्णन करीत असतात. हे सगळे ऐकताना श्रीकृष्ण तेथे उपस्थित असतो आणि त्याला हे सगळे ऐकताना गालातल्या गालात हसू येते. युद्धात झालेल्या नरसंहारामुळे धर्मराज युधिष्ठिर अस्वस्थ झालेला असतो. त्याच्या मनात मनःशांतीसाठी तीर्थयात्रेला जायचे असते. तो तीर्थयात्रेचा विषय काढताच भीम आणि अर्जुनही तीर्थयात्रेला जाण्यासाठी तयार होतात. नकुल सहदेव तर तयारच असतात. कृष्ण त्यांना म्हणतो, ' आपण नुकतेच युद्ध जिंकले आहे. युधिष्ठिर हस्तिनापूरचा राजा झाला आहे. अशा परिस्थितीत सगळ्यांनीच राज्याची जबाबदारी सोडून तीर्थयात्रेला जाणे योग्य होणार नाही. राज्यकर्त्यांना हे भान ठेवले पाहिजे. पण सर्वांचा आग्रह पाहून तो त्यांना परवानगी देतो. तो म्हणतो की तुम्ही तीर्थयात्रेहून परत येईपर्यंत मी द्वारकेला जात नाही. फक्त माझे एक काम करा. मी तुम्हाला एक लिंबाची काडी देतो. तुम्ही ज्या ज्या तीर्थक्षेत्री जाल, त्या त्या ठिकाणी त्या काडीलाही तुमच्याबरोबरच स्नान घाला आणि लवकरात लवकर परत या.
पांडव मग हरिद्वार, ऋषिकेश इ ठिकाणी तीर्थयात्रा करून परत येतात. येतानाही त्यांच्या युद्धातील पराक्रमाच्याच गोष्टी चाललेल्या असतात. आल्यावर श्रीकृष्ण त्यांना काही दिवस विश्रांती घेण्यास सांगतो. तरीही त्यांच्या युद्धातील पराक्रमाच्या फुशारक्या मारणे सुरूच असते. कृष्ण मग भीमाला म्हणतो की मी तुला ती लिंबाची काडी दिली होती, ती परत आणलीस का, तिला स्नान घालत होतात ना ? मग भीम ती काडी घेऊन येतो. कृष्ण त्याला म्हणतो, ' आता या काडीला तुम्ही सगळ्या तीर्थक्षेत्री स्नान घातल्यामुळे ती पवित्र आणि गोड झाली असेल. तेव्हा तू ती खाऊन टाक . ' त्यावर भीम म्हणतो, ' केशवा, आमची चेष्टा करतोस का ? कितीही स्नान घातले तरी लिंबाची काडी गोड कशी होईल ? '
तेव्हा कृष्ण ते निमित्त करून त्यांना समजावून सांगतो की आपल्या मनाचेही तसेच आहे. नुसती तीर्थयात्रा केल्याने आपण पवित्र आणि मन शांत होत नाही. त्या ठिकाणी शरीरशुद्धी बरोबरच मनातील पापे, वाईट वासना सुद्धा नष्ट झाल्या पाहिजेत. आपले मन जर पवित्र आणि शुद्ध असेल तर तीर्थाला जाण्याची सुद्धा गरज नाही. प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन केले पाहिजे. धर्म म्हणजे कर्तव्य. जसे विद्यार्थ्यांचे कर्तव्य अभ्यास करणे, गुरुचे कार्य अध्यापन करणे, राज्यकर्त्यांचे कर्तव्य आपल्या राज्याकडे आणि प्रजेच्या कल्याणकडे लक्ष देणे. असे सांगून पांडवांना तो आपल्या कर्तव्याची जाणीव करून देतो.
मंगेश पाडगावकर आपल्या एका गीतात म्हणतात, ' कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी , हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी..' त्याचा अर्थ हाच आहे. तर संत तुकाराम म्हणतात, ' तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनीं..' म्हणजे सज्जन माणसांचे आचार विचार आणि वर्तन एकसमान असते. म्हणून जो बोलतो तसा चालतो त्याला वंदन केले पाहिजे. समाजातील अशा सज्जन व्यक्ती म्हणजे देवाचेच रूप असतात. त्यांच्या पाठीमागे जावे, त्यांचे अनुसरण करावे हे त्यांचे सांगणे आहे. सगळी तीर्थे आणि तीर्थक्षेत्रे माणसाच्या मनातच वसलेली आहेत. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव दोघेही विठ्ठलाचे निस्सीम भक्त. पण तरीही ज्ञानेश्वर महाराज जेव्हा तीर्थयात्रेला निघाले, तेव्हा त्यांनी नामदेवांना आपल्याबरोबर तीर्थयात्रेसाठी येण्याची विनंती केली. पण नामदेव महाराज विठ्ठलाला सोडून कुठेही जायला तयार नव्हते. तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलानेच नामदेवांना दृष्टांत देऊन ज्ञानेश्वरांबरोबर जा असे सांगितले. असे करण्यात त्यांचा उद्देश हा होता की नामदेव महाराजांना विठ्ठल मंदिराव्यतिरिक्त बाहेरही सर्वत्र विराजमान आहे ही जाणीव व्हावी . आपणही तीर्थयात्रेचा हा मतितार्थ लक्षात घेऊन ती केली तर फलदायी होईल. पांडव तीर्थयात्रेला गेले पण त्यांचा अभिमान गळाला नाही. ते श्रीकृष्णाने दिलेल्या लिंबाच्या काडीसारखे कोरडेच राहिले. आपणही तीर्थयात्रा जरूर करावी, रम्य ठिकाणे पाहावीत. पण सगळ्या वाईट वासना, अहंकार त्या तीर्थयात्रेतून गाळून आपले मन शुद्ध झाले पाहिजे. नाहीतर आपलीही गत त्या लिंबाच्या काडीसारखीच व्हायची.
©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२२/०६/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा