उगवतीचे रंग
कथा एका शापित गंधर्वांची...
नंदिनी आणि अविनाश बर्वे या आगळ्यावेगळ्या दाम्पत्याची ही प्रेरणादायक कथा. ही कथा आहे त्यांनी नियतीशी दिलेल्या झुंजींची. हताश न होता, शस्त्र खाली टाकून न देता लढलेल्या लढाईची. अर्जुनासारखी गलितगात्र अवस्था त्यांचीही सुरुवातीला झाली होती. पण गीतेतील ' तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय: ' या वचनावर श्रद्धा ठेवून हे दोघेही पती पत्नी युद्धाला सज्ज झाले. असे काय वेगळे घडले होते त्यांच्या जीवनात ?
नंदिनी आणि अविनाश यांच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली. मोठा मुलगा मिलिंद आणि धाकटा त्याच्याहून नऊ वर्षांनी लहान कौस्तुभ. या दोघांमध्ये जमीन अस्मानाचा फरक. मोठा मिलिंद कुशाग्र बुद्धी असलेला. आणि हा लहान त्याच्या पाठीवर आलेला कौस्तुभ मतिमंद. दोघेही दोन टोकाचे. एकाच्या पंखात गरुडभरारी घेण्याचे सामर्थ्य तर दुसरा जन्मतःच उडण्यास असमर्थ. नंदिनी आणि अविनाश दोघेही अगदी सामान्य कुटुंबातून आलेले. परिस्थिती बेताचीच. दोघेही पेशाने शिक्षक. पण आता नियतीने त्यांची परीक्षा पाहायची ठरवली होती. पत्त्याच्या डावात आपल्या हाती जे पत्ते येतील, ते घेऊन खेळाला सुरुवात करावी लागते. सगळ्यांच्याच हाती हवे ते पत्ते येत नाहीत. पण न हरता, न कुरकुरता जिद्दीने खेळ खेळायचा असतो.
कौस्तुभचा जन्म झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसातच त्याच्या आईला हे मूल इतरांपेक्षा वेगळे आहे याची जाणीव होऊ लागली होती. सुरुवातीला तो कर्णबधिर असल्याची शंका होती. पण नंतर झालेल्या निरनिराळ्या वैद्यकीय चाचण्यांत तो केवळ कर्णबधिरच नव्हे तर मतिमंद असल्याचे शिक्कामोर्तब झाले. नंतर त्याला फिट्स यायला सुरुवात झाली. आणि त्यासाठीच्या औषधांचा तीव्र डोस त्याला अखेरपर्यंत घ्यावा लागला. लहानपणीच हर्नियाचे ऑपरेशन करावे लागले. जिभेच्या खाली मध्येच एक मोठा दात उगवला. त्याचेही ऑपेरेशन करावे लागले. त्याला स्वतःला संभाळता येत नसल्याने वारंवार पडत होता. त्यामुळे डोक्याला, हनुवटीला झालेल्या गंभीर जखमा. आणि नंतर वयाच्या १७/१८ व्या वर्षी झालेले मस्क्युलर डिस्ट्रॉफीचे झालेले निदान. म्हणजे एक संकट कमी होते की काय म्हणून दैवाने संकटांची मालिकाच उभी केली. पण नंदिनीताई आणि अविनाशराव निर्धाराने या लढाईला तोंड देण्यास सज्ज झाले होते.
कधी कधी अशा जगावेगळ्या असलेल्या मतिमंद मुलाचे आईवडील त्याचे करता करता मनाने कोलमडून पडतात. पण या दोघांनी हार मानली नाही. एका बाजूला मिलिंदचे शिक्षण आणि दुसऱ्या बाजूला कौस्तुभच्या वैद्यकीय चाचण्या आणि उपचार. दोघांचे उत्पन्न मर्यादित. पण दोघांकडेही लक्ष देणे भाग होते. कुठेही कमी करून किंवा भेदभाव करून चालणार नव्हते. मिलिंदसारखी कुशाग्र बुद्धीची मुले वाढवणे एक वेळ सोपे पण कौस्तुभ सारख्या मुलाला वाढवणे म्हणजे पालकांची कसोटी. पूर्वी एकत्र कुटुंबात असे एखादे मूल असले तर, घरातील सदस्यांमुळे त्याची देखरेख करणे सोयीचे होई. पण आता नोकरीव्यवसायानिमित्त कुटुंबे विभक्त आणि छोटी झाली आहेत. अशा कुटुंबात जर एखादे मतिमंद मूल असेल, तर त्याची देखभाल करता करता ते अख्खे कुटुंबच हतबल होऊन जाते. नंदिनी आणि अविनाश शिक्षक. शाळेत ते मुलांची परीक्षा घेणार. पण इथे नियतीने त्यांची परीक्षा घेतली होती. नियतीने पेपर कठीण घातला होता. परीक्षा देणाऱ्यांची कसोटी होती. पण ते केवळ परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले नाहीत, तर या नियतीने घेतलेल्या परीक्षेतून आलेल्या अनुभवातून सामाजिक भान ठेवत खूप मोठे प्रेरणादायी काम त्यांनी केले.
कौस्तुभ सारख्या मुलाला सांभाळणे सोपे नव्हते. या दोघांच्या नोकऱ्या. त्यातील कामांच्या जबाबदाऱ्या. मिलिंदचे शिक्षण. कौस्तुभासारखी मुले सांभाळायची म्हणजे एक माणूस त्यांच्या दिमतीला कायम लागतो. ते दिव्य या सगळ्यांनी मिळून पार पाडले . अविनाशरावांची सकाळची शाळा असायची तोवर नंदिनी त्याला सांभाळायच्या. ते आल्यावर त्या शाळेत जायच्या. जेव्हा ते दोघे नसतील तेव्हा मिलिंद त्याला सांभाळायचा. तसा मिलिंदही लहानच. पण घरातल्या परिस्थितीने त्याला शहाणे केले होते. आपल्या लहान भावाला सांभाळता सांभाळता अभ्यास करणे, त्याचे शी शू सारखे कार्यक्रम आवरणे इ गोष्टी तो न कंटाळता करत होता. तेही मोठ्या भावाच्या मायेने. त्या दोन्ही भावात जमीनअस्मानाचा फरक असला तरी मायेचा एक अकृत्रिम धागा होता. मिलिंदने सगळे शिक्षण आपल्या गुणवत्तेवर तर केलेच पण त्या दरम्यान तो हार्मोनियम वाजवायला, गाणे म्हणायला शिकला. हा छंद त्याच्या खूप कामी आला. त्याला आणि कौस्तुभला काही काळ विरंगुळा देणारा हा छंद खूपच उपयोगी ठरला. नाहीतरी संगीत हे मनावर हळुवार फुंकर घालून त्याला सामर्थ्य देणारे एक अनोखे औषध आहे. याचा तुम्ही आम्ही सुद्धा वेळोवेळी अनुभव घेतच असतो.
सुरुवातीला कौस्तुभला ठाणे येथील डॉ ताम्हाणे यांनी सुरु केलेल्या नेस्ट शाळेत दाखल केले. पण ती शाळा फार दिवस चालली नाही. मग त्याला डोंबिवलीच्या अस्तित्व शाळेत घालावे लागले. पण त्याला त्या शाळेत सोडणे आणि घरी परत आणणे हे सुद्धा एक दिव्य होते. घरातून बस स्टॉप पर्यंत पायी जाणे, बसने ठाणे स्टेशनपर्यंत जाणे, तेथून लोकलने डोंबिवली, पुन्हा चालत बसस्टॉप, तेथून शाळेच्या बसने शाळेत जाणे आणि पुन्हा शाळा सुटल्यावर संध्याकाळी उलट क्रमाने घरी आणणे या सगळ्या गोष्टी न थकता, न कंटाळता कराव्या लागायच्या. अशा शाळेत कौस्तुभची ८/१० वर्षे गेली. या शाळेत मेजर काळे आणि त्यांच्या पत्नी विनावेतन पूर्ण दिवसभर काम करत होत्या. त्या दोघांनी या कामासाठी वाहून घेतले होते.
दिव्यांग असलेली मुले आणि मतिमंद मुले यांच्यात आपण साधारणतः फारसा फरक करत नाही. पण त्यांच्यात फार मोठा फरक असतो. दिव्यांग किंवा दृष्टिहीन मुले यांना आपल्या व्यंगाची जाणीव असते. त्यांना काही व्यंग असले तरी बुद्धी दिलेली असते. अशा या दिव्यांगांमध्ये जर जिद्द असेल तर ते आपल्या जिद्दीने त्या व्यंगावर, अपंगत्वावर मात करू शकतात. अपंग आणि दृष्टिहीन लोकांनी जिद्दीने आपल्या अपंगत्वावर मात करून स्वतःसाठी आणि समाजासाठी सुद्धा मोठे काम केल्याची अनेक उदाहरणे आपल्याला माहिती आहेत. पण मतिमंद मुलांना मात्र अशी काही गोष्ट करणे शक्य नसते. कारण त्यांना कळतच नाही. मतिमंद मुलांची बुद्धी आणि मन समजून घेण्याचे संशोधन प्रकल्प जगभर चालू आहेत. पण त्यातून अजून फारसे काही हाती लागले नाही. त्यातून जेव्हा काहीतरी रहस्य उलगडेल, तेव्हा कदाचित या मतिमंद मुलांसाठी एक वेगळे प्रगतीचे दालन खुले होईल. पण तोपर्यंत पालक आणि समाज या दोघांनाही त्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यात दिव्यांग मुलांसाठी वेगळी व्यवस्था असणाऱ्या शाळा पुष्कळ आहेत. पण मतिमंद मुलांसाठी त्या मानाने फार कमी शाळा आहेत. अस्तित्व शाळेत अशा मुलांसाठी वाहून घेणारे मेजर काळे आणि नंदिनी आणि अविनाश बर्वे यांना ही जाणीव झाली होती. शिवाय त्यांच्यासाठी ज्या काही शासकीय अनुदानित शाळा आहेत, त्या शाळांमध्ये मुलांना वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंतच ठेवता येते. पुढे या मुलांना त्यांच्या आईवडिलांनाच सांभाळावे लागते.
या सगळ्या गोष्टींचे भान ठेवून मेजर काळे, त्यांच्या पत्नी, बर्वे दाम्पत्य आणि अन्य काही पालक एकत्र आले. त्यांनी दरमहा काही रक्कम शिल्लक टाकून एक संस्था उभारायचे ठरवले. यात काही अगदी सामान्य पालकही होते. त्यांनी बऱ्याच प्रयत्नातून डोंबिवलीजवळ खोणी येथे सव्वा एकर जागा घेतली. पण दुर्दैवाने मेजर काळे या सगळ्यांना मध्येच सोडून गेले. सगळी जबाबदारी आता अविनाश आणि नंदिनी या दाम्पत्याने शिरावर घेतली. ' अमेय पालक संघटना ' उभी राहिली. त्यातूनच पुढे ' घरकुल ' संस्थेच्या निर्मितीसाठी धडपड झाली. अविनाश बर्वे सरांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर आपले सर्वस्व या संस्थेसाठी अर्पण केले. त्यात केवळ कौस्तुभच्या शिक्षणाचा स्वार्थ नव्हता, तर कौस्तुभासारख्या अनेक मुलांना हक्काने आणि आनंदाने राहता यावे यासाठी हे ' घरकुल ' होते. सुरुवातीला या शाळेत कौस्तुभ आणि आणखी एक मुलगा अशी दोनच मुले होती. हळूहळू पालकांना या शाळेबद्दल विश्वास वाढू लागला. आज ही शाळा मुलामुलींनी फुललेली बाग आहे. या शाळेत लहान मुलांपासून तो पन्नास,साठ इ पर्यंत वय असलेले विद्यार्थी आहे. मतिमंद मूल हे वय कितीही वाढले तरी शेवटपर्यंत एक मुलंच असते. त्याला मुलासारखेच वाढवावे लागते. काळजी घ्यावी लागते. हे काम सोपे नाही. ही सुळावरची पोळी आहे.
ही घरकुल संस्था पाहण्यासारखीच आहे. अत्यंत निसर्गरम्य वातावरणात वसलेली. स्वच्छता तर जणू इथला प्राण. इथे जी मुले येतात त्यांना शिक्षणासोबतच मायाही लावली जाते. तुम्ही इथे कधीही जा. सांगून जा किंवा न सांगता जा. नेहमीच स्वच्छता आढळेल, प्रसन्न वातावरण आढळेल. मुलांना कोणी हिडीसफिडीस करताना दिसणार नाही. तुमचा येथून पाय निघणार नाही. इथे आलेली मुले घरी जायला देखील तयार नसतात. हीच या शाळेच्या कामाची पावती आहे. या शाळेला दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, मोहन जोशी आणि अन्य मान्यवर व्यक्तींनी भेट दिली आहे. दिलीप प्रभावळकर तर या शाळेशी निगडित आहेत. कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय आणि कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय ही संस्था सुरु आहे. या संस्थेला ज्यांची मुले आहेत अशा पालकांनी तर देणग्या दिल्याच पण ज्यांची मुले नाहीत, किंवा संस्थेशी काही एक संबंध नाही अशांनी पण देणग्या दिल्या आहेत. येथील देणगीला आयकरातून सूट आहे. पण अनेक जण म्हणतात आम्हाला सूट नाही मिळाली तरी चालेल, पण इथे देणगी दिल्याने मनाला हलके वाटते. मनावरचा ताण जातो. तीच मोठी सूट आहे. या संस्थेच्या कामाचा व्हिडीओ ' अमेय पालक संघटना ' आणि ' घरकुल ' या नावाने आपण यु ट्यूबवर पाहू शकता. आपल्याला या संस्थेसाठी काही करावेसे वाटले तर पुढे त्याचे डिटेल्स देत आहे.
Amey Palak Sanghatana
Bank of India , Dombivali East Branch
S / b Acc No ००९५१०१०००१४५३९
IFSC BKID ०००००९५
अविनाश बर्वे ८३५५८५६२८४
शापित गंधर्व जसे काळासाठी या पृथ्वीवर येतात, तसा कौस्तुभही आला होता. त्याचा इथला कार्यकाळ संपल्यावर तो निजधामी निघून गेला. पण या शापित गंधर्वाचा संभाळ नंदिनी आणि अविनाश यांनी २८ वर्षे केला. तो लळा लावून गेला. स्मृती ठेवून गेला. शापित गंधर्व काही रिकाम्या हाताने येत नसतो. तो जाताना काही तरी अदृश्य दान देऊन जातो. हा शापित गंधर्व म्हणजेच कौस्तुभ जाताना ' दृष्टी ' देऊन गेला. ती दोन अर्थाने. जाताना त्याने नेत्रदान केले आणि दोन अंधांना ' दृष्टी ' प्रदान केली. आई नंदिनी, वडील अविनाश आणि बंधू मिलिंद यांना आपल्या स्मृती देऊन गेला आणि समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देऊन गेला. ही त्याने दिलेली दिव्य ' दृष्टी .' आज घरकुल मध्ये असे अनेक कौस्तुभ आनंदाने राहत आहेत.
©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२१/०६/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा