उगवतीचे रंग
कहानी घर घर की...
कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे घराघरात वेगळी कहाणी दडलेली आहे. या प्रत्येक कहाणीला एक हळवा कोपरा आहे. प्रत्येकाचे दुःख आणि समस्या वेगळ्या आहेत. पण सूर निराशेचे आणि दुःखाचेच आहेत. माणसे हतबल झालेली आहेत. काही मनाने मोडून पडली आहेत. त्यांना मदतीचा आणि माणुसकीचा हात पुढे करण्याची गरज आहे. कोकणात झालेल्या वादळाने शेतकऱ्यांचे आणि गरीब माणसांचे अपरिमित नुकसान केले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. तर बऱ्याच लोकांच्या डोक्यावरील निवारा हरवला आहे. त्यांना राहायला घर नाही. अशा काही कुटुंबांनी एस टी स्टॅण्डवर तात्पुरता निवारा शोधला आहे. ते दिवसरात्र तिथे राहत आहेत. खाण्यापिण्याचे, झोपण्याचे हाल वेगळेच आहेत. काही ठिकाणी बळीराजाचा माल कोरोनामुळे विक्रीसाठी जाऊ शकला नाही. शेतात, घरात माल आहे पण मालाला गिऱ्हाईक नाही. हाती पैसा नाही अशी स्थिती आहे.
परवा बातम्यांमध्ये मुंबईतली काही घरं दाखवली होती.. एका घरात एक आजी वय सत्तर वर्षांच्या पुढे. त्यांचे मिस्टर साधारण ७४/७५ च्या आसपास वय असणारे. दोघेही हृदयविकाराचा त्रास असलेले. शिवाय वृद्धापकाळामुळे आलेले शारीरिक त्रास आणि आजार वेगळेच. त्यातच भरीत भर काय तर त्या आजोबांचे मोठे भाऊ ज्यांचे वय ७८ वर्षांचे आहे, ते अंथरुणावरच झोपून असतात. काही करू शकत नाहीत. तेही त्यांच्या घरातच आहेत. ते ज्या सोसायटीत राहतात त्या सोसायटीची दारे तीन महिन्यांपासून कामवाली, भांडीधुणी करणाऱ्या बायका यांच्यासाठी कोरोनामुळे बंद आहेत. या आजींची अवस्था आता काम करण्याची नाही. त्यांना नाईलाजाने उठत बसत घरातील कामे करावी लागत आहेत. दुसऱ्या एका घरातील आजीबाईंचे गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांच्या हाताखाली मदतीला कोणी नाही. तशीच रडत कढत त्या घरातील कामे करीत आहेत. एका घरात एक आजोबा एकटेच आहेत. त्यांचेही आता काही करण्याचे वय नाही. या सगळ्या व्यक्तींची आयुष्याची ही संध्याकाळ आहे. कधी काय होईल सांगता येत नाही.
अशा वेळी ही माणसे समाजाकडे आशेने पाहत आहेत. एके काळी ज्यांनी इतरांना सावली दिली, आधार दिला त्यांना आज सावलीची आणि आधाराची गरज आहे. त्यांच्या सोसायट्या नियमांवर बोट ठेवत आहेत. कोरोनाच्या भीतीने कोणाला प्रवेश करू देत नाहीत. पोलीस किंवा प्रशासनाला त्यांनी विचारले तर ते सांगतात की भांडेधुणी करणाऱ्या, स्वयंपाक काम करणाऱ्या आणि इतर साफसफाईवाल्याना आम्ही येण्यास मनाई केली नाही. पण सोसायटीतले पदाधिकारी हे ऐकायला तयार नाहीत. ज्यांच्या घरी कामे करण्यासाठी घरात माणसे आहेत, त्यांचे फारसे अडत नाही. पण अनेक घरात असे वृद्ध आजी आजोबा आहेत. निरनिराळ्या आजारांनी ग्रासलेले लोक आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. अशा वेळी सोसायटींनी आपल्या नियमांना थोडी मानवतेची जोड देऊन अशा लोकांना मदतीचा हात द्यावा. सोसायटीत राहणारे लोक म्हणजे एक मोठे कुटुंब असे मानले तर ही वृद्ध, आजारी माणसे त्यांच्या कुटुंबाचा एक भाग नाहीत का ?
जशी या वृद्ध आणि आजारी लोकांना मदतीची गरज आहे, तशीच दुसऱ्या बाजूने त्यांच्याकडे काम करायला जी मंडळी येत होती त्यांनाही ती आहे. त्यांच्याही घरातली कहाणी वेगळी आहे. आज सुमारे तीन महिन्यांपासून ही मंडळी घरी बसलेली आहेत. कोरोनामुळे कुठेच जाता येत नाही. हातावर पोट असलेली ही माणसे. तीन महिन्यांपासून काम नाही, काम नाही म्हणून पगार नाही. घरातला किराणा, अन्नधान्य कधीच संपले आहे. दुकाने उघडी आहेत, पण सामान आणायला पैसे नाहीत. मुलांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. त्यांच्या शाळा फीची मागणी करताहेत. वह्यापुस्तके घ्यायची आहेत. या सगळ्यांसाठी पैसे कुठून आणायचे हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. आलेला एक एक दिवस ते कसाबसा ढकलत आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी व्हायचे नाव घेत नाही. काही ठिकाणी काही लोकांनी पुन्हा कामाला जायला सुरुवात केली आहे. पण घरातील समस्या, उपासमार, पैशाची चणचण कमी व्हायला बराच काळ जावा लागणार आहे. ही उदाहरणे मुंबईतील दिली असली तरी, गावोगावची परिस्थिती यापेक्षा फार वेगळी नाही. ज्यांचे पोट हातावर आहे असे छोटे उद्योगधंदे करणारे लोक, मोलमजुरी करणारे लोक अशाच हालअपेष्टांना तोंड देत आहेत.
ज्या घरांमध्ये कोरोनाचे रुग्ण निघाले, त्यांची कहाणी वेगळीच आहे. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कुठे मुलांची आईवडिलांपासून ताटातूट झाली आहे तर कुठे आईवडील एकाकी पडले आहेत. ज्या घरात कोरोनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्यांचे पुढचे विधी करायला माणसे नाहीत. कारण त्यांना पण विलगीकरणात ठेवलेले असते. या सगळ्यात माणसे मनाने पिचून जात आहेत. जी लोक या सगळ्या परिस्थितीत आपले मनोधैर्य टिकवून ठेवून वर्क फ्रॉम होम करताहेत, त्यांना सकाळपासून रात्रीपर्यंत लॅपटॉप किंवा संगणकासमोर बसून काम करावे लागत आहे. त्यांचे काम दिवसभर सुरु असते. घरे छोटी छोटी. ऑफिसचे कॉल्स सारखे चाललेले. लहान मुले घरातच, ज्येष्ठ माणसे घरातच. त्यांचे कॉल्स सुरु म्हणून त्यांच्याशी बोलायचे नाही. टीव्ही लावायचा नाही, किंवा लावला तर हळू आवाजात त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने लावायचा. अशी सगळी तारेवरची कसरत सुरु आहे. मनातील भावनांचा कोंडमारा होतो पण कोणालाच काही बोलता येत नाही. कोणाला दोष देता येत नाही. त्यात ऑनलाईन शाळांनी पालक आणि विद्यार्थ्यांसमोर वेगळीच आव्हाने उभी केली आहेत.
भारत चीन सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आहे. परवा झालेल्या चकमकीत आपल्या देशाचे वीस जवान शहीद झालेत. कालच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या घरातील कहाणी वेगळीच आहे. घरातला तरुण मुलगा देशासाठी शहीद झाल्याने एका बाजूला कुठेतरी देशसेवेत आपल्या घरातील पण आहुती पडली याचा अभिमान आणि अश्रू एका डोळ्यात आणि दुसऱ्या डोळ्यात घरातला कर्ता पुरुष गेल्याचे दुःख यांचे अश्रू आहेत. घर घर की कहानी काही वेगळीच असते. अशा परिस्थितीत ज्यांना शक्य आहे त्यांनी, इतरांना मदतीचा हात दिला पाहिजे. केवळ पंधरा ऑगस्ट आणि २६ जानेवारी साजरी करून देशभक्ती सिद्ध होत नाही. जेव्हा आपले हात आपल्या लोकांसाठी पुढे येतील, तेव्हा ती खऱ्या अर्थाने देशसेवा होईल. तीच पंढरीची वारी असेल. प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी किनार असते. त्याप्रमाणे या सगळ्या निराशाजनक वाटणाऱ्या परिस्थितीत सुद्धा सुधारणा होईल, ती जास्त दिवस राहणार नाही.
छायेत जग जरी संकटाच्या, धीर धर तू भारती
अंतरातील ज्योत जागव, विश्व गाईल आरती.
या अर्थाच्या एक सुंदर आशावादी गीताचा एक व्हिडीओ धरमपेठ एज्युकेशन सोसायटी, नागपूर यांनी तयार केला आहे. त्यात व्यक्त केलेल्या आशावादाप्रमाणे आपण अंतरातील ज्योत जागवू या आणि या संकटातून लवकरच बाहेर पडू या.
©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१९/०६/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा