मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग - शिकण्याची प्रक्रिया...

उगवतीचे रंग 

शिकण्याची प्रक्रिया... 

शिकवणं किंवा शिकणं हे कसं असतं ते सांगताना प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर त्यांच्या शिक्षकांचं उदाहरण दिलं होतं . त्यांची शाळा साधी मराठी माध्यमाची होती. पण त्यांना जे विज्ञानाचे शिक्षक, भूगोलाचे शिक्षक मिळाले होते, त्या शिक्षकांनी त्यांना केवळ वर्गाच्या चार भिंतीत शिकवलं नाही. भूगोलाचे शिक्षक त्यांना पर्यावरण, समुद्र इ शिकवताना सहलीला म्हणून बाहेर घेऊन जात. तेथे पर्यावरणाच्या, समुद्राच्या निरीक्षणातून त्यांचे शिक्षण घडत होते. भूगोल शिकता शिकता पक्षी जगत, वनस्पती इ बद्दल सुद्धा शिकायला मिळत असे. खरा शिक्षक तोच असतो जो विषयांची एकमेकात सांगड घालतो. मी फक्त भूगोलाचा शिक्षक आहे असे म्हणून त्याला चालणार नाही. त्यांचे विज्ञानाचे शिक्षक त्यांना साबण बनवण्याची प्रक्रिया समजावून देताना साबणाच्या कारखान्यात घेऊन गेले. तिथे मुलांनी ती सगळी प्रक्रिया आपल्या डोळ्यांनी अनुभवली. बहिर्गोल भिंगातून प्रकाशकिरण एकत्र केले की त्यांची शक्ती वाढते. ते एकवटले की कागद सुद्धा जाळू शकतात. हे त्यांच्या शिक्षकांनी त्यांना वर्गाच्या बाहेर नेऊन सांगितले. मुलांना तो प्रयोग करून दाखवला. त्यांनाही अनुभव घ्यायला लावला. दुसऱ्या एखाद्या शिक्षकाने या गोष्टी वर्गातही शिकवल्या असत्या. पण मग ती झाली असती केवळ माहिती. मुलांनी घेतला तो प्रत्यक्ष अनुभव. आणि जे ज्ञान अनुभवातून येते, ते जणू वज्रलेप होते. मग परीक्षेची भीती बाळगण्याची गरज नसते. 

शिकणं ही प्रक्रिया आहे. कोणतीही प्रक्रिया म्हटलं की त्याला अनुसरून काही गोष्टी येतातच. तसं शिकणं ही प्रक्रिया जेव्हा घडते तेव्हा जो शिकतो आहे त्याला काही तरी अनुभव देणं किंवा त्याला स्वतःला काही अनुभव येणं, त्यामधून त्याला जी काही जाणीव प्राप्त होते, ती म्हणजे ज्ञान किंवा शिकण्याची प्रक्रिया म्हणता येईल. खरं तर शिकणं म्हणजे अनुभवातून शहाणं होत जाणं . हे अनुभवांती शिकणं वेगळं आणि शाळा कॉलेजात जाऊन जे आपण शिकतो ते वेगळं. प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईनने असं म्हटलं होत की ' Experience is learning and rest is just an information . ' हे विधान खरं म्हणजे आज धाडसी वाटण्याची शक्यता आहे. पण आईन्स्टाईनने हे आपल्याला शंभर वर्षांपूर्वी सांगितलं होतं. म्हणजे आईन्स्टाईन असं म्हणतो की आपण अनुभवातून जे शिकतो तेच खरं शिकणं किंवा ज्ञान आणि बाकीचं सगळं म्हणजे माहितीचं भांडार. 


काही दिवसांपूर्वी मी अमरावतीच्या शाश्वत स्कुलमध्ये गेलो होतो. तिथले संचालक अतुल गायगोले हे आपल्या विद्यार्थ्यांना शिकण्याचा प्रत्यक्ष अनुभव देण्याबद्दल आग्रही असतात. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी फार्म टू प्लेट हा उपक्रम राबवला होता. ती शाळा शेतातच वसलेली आहे. मुलांनी झाडांची, फळभाज्यांची देखरेख करायची. ती वाढवायची. ती कशी वाढतात याचे निरीक्षण करायचे. नंतर प्रत्यक्ष या भाज्या शिजवायच्या आणि त्या शिजवण्याच्या म्हणजेच स्वयंपाकाच्या प्रक्रियेचे ज्ञान मिळवायचे. स्वयंपाकात सुद्धा शास्त्र आहे, विज्ञान लपलेलं आहे. ते मुलांना अशा अनुभवातूनच कळते. यातून मुले काय शिकत नाहीत ? ते वनस्पतींची वाढ शिकतात, स्वयंपाक करताना जे विविध पदार्थ आपण वापरतो, त्यांची माहिती मिळवतात. त्यातली कला आणि त्यातले शास्त्र सुद्धा त्यांना कळते. वनस्पतीची वाढ होताना त्यांना अन्न , हवा, प्रकाश इ गोष्टींचे काय महत्व आहे हे त्यांच्या लक्षात येते. एकूणच विद्यार्थी अनुभवाने समृद्ध होत जातात. 

या उन्हाळयाच्या सुटीत सगळीकडे लॉकडाउन आणि ऑनलाईन शिक्षणाची चर्चा असताना, त्यांनी आपल्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गृहपाठाचा एक वेगळाच प्रयोग राबवला. तो मधुमेहाच्या रुग्णांचा अभ्यास करण्यासंदर्भात होता. त्या मुलांना त्यांनी आधी सांगितलं की आज जगात गन पावडर ( दहशतवाद ) यामुळे साधारण २५००० लोकांचा मृत्यू होतो, तर शुगर पावडर ( साखर ) मुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या सुमारे पस्तीस लाख आहे. आणि २०३० पर्यंत या संख्येत दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे आज जे विद्यार्थी दहावीत शिकत आहेत, उद्या त्यांनाही या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. त्या विद्यार्थ्यांना ही जाणीव झाली की आपलाही समावेश त्या लोकांमध्ये असणार आहे. मग त्या मुलांना त्यांनीआपल्या घरातील, आपल्या आजूबाजूला असलेल्या मधुमेही लोकांच्या मुलाखती घ्यायला सांगितल्या. एकदोन दिवस त्या मुलांनी मग बिनसाखरेचा चहा, दूध आणि जेवण घेऊन पाहिले . मग त्यांना स्वतःच लक्षात आले की मधुमेही रुग्णांची अवस्था कशी असते, त्यांना खाण्याच्या बाबतीत कशा तडजोडी कराव्या लागतात, कसा संयम ठेवावा लागतो. या मुलांनी मग या संदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांची मुलाखतही घेतली. ती मुलं यातून त्यांना असलेल्या जीवशास्त्रातील बरेचसे धडे आपोआप शिकले. शिवाय आपल्या घरातील कोणाला मधुमेह असेल तर त्यांना नियमित व्यायाम करा, व्यायाम टाळू नका असा प्रेमाचा सल्ला देऊ लागले. हे असते खरे शिक्षण. शिवाय जे काही आपण शिकतो, त्याचा वापर करणं किंवा करता येणं हे जेव्हा शक्य होतं, तेव्हा ते शिक्षण खऱ्या अर्थाने अंगात मुरले असे म्हणता येईल. ज्या शिक्षणाचा व्यवहारात वापर मुले करत नाहीत, ते शिक्षण म्हणजे नुसती पोपटपंची म्हणावी लागेल. 

व पु काळेंच्या पुस्तकात एक गोष्ट वाचली होती. एका शाळेत असेच आदर्श आणि ध्येयवादी शिक्षक असतात. ते मुलांना नागरिकशास्त्र शिकवतात. त्यात उत्तम नागरिक म्हणून वागताना आपण कसे वागावे,  केवळ आपल्या घरचीच नव्हे तर आपल्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता ठेवणे हे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे हे त्यांनी शिकवले. नंतर त्या मुलांची परीक्षा घेताना त्यांचे त्यांनी निरीक्षण केले. एका दिवशी दोन पेपर होते. एक पेपर संपल्यानंतर मध्ये थोडा वेळ होता. काही वेळाने दुसरा पेपर होता. या मधल्या वेळात काही मुले शाळेच्या बाहेर जाऊन आली . त्या वेळेस त्यांनी काही खाद्यपदार्थ विकत घेतले. काही मुलांनी त्याचे कागद शाळेच्या मैदानातच इतरत्र टाकले. काही विद्यार्थ्यांनी मात्र कचरापेटी शोधून त्यात ते कागद टाकले. ते शिक्षक त्या मुलांचं काळजीपूर्वक निरीक्षण करीत होते. ज्या विद्यार्थ्यांनी ते कागद मैदानात टाकले, ते फक्त नागरिकशास्रातला धडा शिकले होते. पण ज्या मुलांनी ते कागद डस्टबिनमध्ये टाकले त्यांनी ते शिकलेलं अमलात आणलं होतं. अर्थात त्या शिक्षकांनी मैदानात कागद फेकणाऱ्या मुलांना त्यांची उत्तरे बरोबर असूनही नागरिकशास्त्रात गुण दिले नाहीत. अर्थात त्या शिक्षकाला पुढे पालक आणि मुख्याध्यापकांच्या रोषाला तोंड द्यावे लागले आणि त्याचे पर्यवसान त्यांनी राजीनामा देण्यात झाले हा भाग वेगळा. पण खरे शिक्षण आणि शिक्षक कसे असतात हे सगळे सांगण्यासाठीच आजच्या या लेखाचा प्रपंच..! 


©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
१८/०६/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...