मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग ऑनलाईन शाळा...

उगवतीचे रंग 

ऑनलाईन शाळा... 

या वर्षी कोरोनामुळे सगळीच गडबड झाली आहे. उन्हाळ्याची सुटी संपली पण नेहमीप्रमाणे शाळेची घंटा वाजली नाही. नवीन वह्या पुस्तके घेऊन मुले शाळेत आली नाहीत की मुलांना सोडायला पालक. किती वेगळा आनंद आणि उत्साह असतो पहिल्या दिवशी. मुलांचे, पालकांचे आणि शिक्षकांचे चेहरे बोलके असतात. मुलांच्या चेहेऱ्यावर पहिल्या दिवशी शाळेत येताना संमिश्र भाव असतात. कुतूहल, आश्चर्य, मनात असलेली भीती सुद्धा चेहेऱ्यावर प्रतिबिंबित झालेली असते. पालक आपल्या मुलांना शाळेत प्रवेश मिळाला म्हणून आनंदी आणि निश्चिन्त असतात. आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावर नवीन वर्षाला आणि त्याच्या येणाऱ्या जबाबदाऱ्यांना सामोरे जाण्याची भावना दिसत असते. काही काही शाळा गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे स्वागत करीत असतात. पण या वर्षी या सगळ्यांनाच फाटा मिळालाय. 

गेल्या काही वर्षांपासून आपण डिजिटल वर्ग, ऑनलाईन क्लासरूम इ गोष्टी ऐकत आलो आहोत. खूप दिवसांपासून त्याचे आकर्षणही वाटत होते. आतापर्यंत ऑफिसेस मधल्या मिटींग्स पर्यंत मर्यादित असलेले हे ऑनलाईनचे लोण बालगोपाळांपर्यंत येऊन पोहोचले आहे. कोणतीही गोष्ट सुरुवातीला छान आणि आकर्षक वाटते. हळूहळू तिचे फायदेतोटे लक्षात यायला लागतात. कोणतीही गोष्ट पूर्णपणे निर्दोष नसते आणि पूर्णपणे त्याज्य ही नसते. वेळ आणि परिस्थितीनुसार काही गोष्टींचा स्वीकार करणे भाग पडते. पण ज्या पद्धतीने आणि ज्या उद्देशाने एखाद्या गोष्टीचा वापर होतो, तो लक्षात घेणे महत्वाचे असते. आता या ऑनलाईन शाळांचा उद्देश प्रथमदर्शनी तरी विद्यार्थ्यांना घरीच गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे. कारण पारंपरिक पद्धतीने शाळा भरवण्यावर आता मर्यादा आल्या आहेत. 

जेव्हा शाळेला तिचे इन्फ्रास्ट्रक्चर वापरावे लागत नाही, अन्य खर्चात आपोआप कपात होते आणि जिथे दहा शिक्षकांची गरज असते, तिथे चारपाच शिक्षकांत काम भागू शकते. अशा वेळी मुंबई, पुणे इ शहरातल्या आणि ग्रामीण भागातील तालुका व जिल्हास्तरीय शाळांनी आपल्या फीमध्ये कपात करायला हवी. विशेषतः इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी. ती त्यांनी थोडीफार केलीही आहे. पण तरी सर्वसामान्य पालकांचा खर्च वाढलाच आहे. कारण आपल्या मुलांना स्मार्ट फोन, लॅपटॉप किंवा संगणक उपलब्ध करून देण्यात त्यांचा खर्च वाढला आहे. शिवाय ऑनलाईन शिक्षण घ्यायचे म्हणजे इंटरनेट हवेच. त्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत. कुठे इंटरनेटचं नेटवर्क नाही, कुठे स्पीड नाही. त्यामुळे काही ठिकाणी येणारा आवाज, चित्र स्पष्ट नाही.  मुख्य म्हणजे ग्रामीण भागातील बऱ्याच पालकांची आर्थिक परिस्थिती हा सगळा खर्च परवडावा अशी नाही. कोरोनामुळे आधीच सगळ्यांनाच आर्थिक परिस्थितीशी झगडावे लागत आहे. 

ऑनलाईन शिक्षण कदाचित चांगले असलेही. पण किती पालकांना ते घेणे परवडू शकते हा प्रश्न आहे. जवळपास ४५% मुलांकडे स्मार्टफोन घेण्याची आर्थिक कुवत नाही. तीस ते पस्तीस टक्के मुलांना टीव्ही वरचे कार्यक्रम सुद्धा बघायला मिळत नाहीत. शिवाय ज्या पालकांना ते परवडणार आहे, त्यांना आपल्या पाल्यासाठी द्यायला किती वेळ आहे ? कारण मुले ऑनलाईन अभ्यास नीट करतात का हे सुद्धा पालकांनाच पाहावे लागणार आहे. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत या गोष्टीकडे लक्ष द्यावेच लागणार आहे. सुरुवातीला एक ते तीन तास असणारे हे वर्ग पुढे अधिक तासांचे होतील. या कालावधीत मुलांना मोबाईल किंवा कॉम्पुटर समोर बसून राहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या डोळे, कान यासारख्या नाजूक अवयवांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहेच. आधीच लहान मुलांमध्ये दृष्टिदोषाचे आणि लहानपणीच चष्मा लागण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यात वाढ होईल. 

ऑनलाईन शिक्षणाचे काही फायदेही सांगता येतील. जेव्हा शिक्षक शिकवत असतील तेव्हा, ते मुलांना चांगली चित्रे किंवा व्हिडिओच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आपले म्हणणे मांडू शकतील. विद्यार्थ्यांना त्यामुळे विषय आकलनाला मदत होईल. ते छान गाणी ऐकू शकतील, शिकू शकतील, छानशी व्हिडीओ क्लिप पाहू शकतील.  पण तरीही शाळेतल्या पारंपरिक शिक्षणापेक्षा अनेक बाबतीत ते डावेच ठरण्याची शक्यता आहे. शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असतात. नजरेचा संपर्क म्हणजेच आय कॉन्टॅक्ट हा शिक्षण प्रक्रियेत महत्वाचा असतो.  वर्गात बसलेल्या विद्यार्थ्याला समजले की नाही हे शिक्षकाला लगेच त्याच्या चेहऱ्यावरून कळू शकते. तो नाही समजले तर हात वर करून शंका विचारू शकतो. ऑनलाईन शाळेत या सगळ्या गोष्टींवर मर्यादा येणार आहेत. यावर शाळा त्यांच्या बाजूने उत्तर देतील की आम्ही विद्यार्थ्यांना शंका विचारायला खास वेळ देतो वगैरे. पण शेवटी ज्या गोष्टी वर्गात होऊ शकतात, त्या ऑनलाईन वर्गात तेवढ्या प्रभावीपणे नाही होऊ शकणार. त्याशिवाय वर्गात शिकताना मित्रांशी जवळीक, गप्पागोष्टी, आपल्या भावभावना, विचारांची देवाणघेवाण करणे या सगळ्या गोष्टीतला जो आनंद असतो, त्या आनंदाला सुद्धा ही मुले पारखी होणार. 

माझा नातू आता पहिलीत आहे. त्याची ऑनलाईन शाळा सुरु झाली आहे. काल माझ्या मुलीने त्याचा एक किस्सा मला सांगितला. ऑनलाईन वर्गात शिक्षकांनी एक गोष्ट सांगितली. मुलांना म्हटले की या गोष्टीला तुम्ही शीर्षक सुचवा. माझ्या त्या नातवाला लगेच शीर्षक सांगण्याची उत्सुकता होती. पण जोपर्यंत त्या शिक्षकांचे शिकवणे संपत नाही, तोपर्यंत मुलांनी काही बोलायचे नाही असा नियम. म्हणून त्याच्या आईने त्याला थोडे थांब असे म्हणून शेवटपर्यंत थांबवून ठेवले. शेवटी आपला तास संपवताना त्या शिक्षकांनी मुलांना न विचारता स्वतःच शीर्षक सांगून टाकले. नातू कमालीचा हिरमुसला झाला. एकतर या छोट्या मुलांना दीड तास असे मोबाईल किंवा कॉम्पुटर समोर बसवून ठेवणे आणि त्यांचे शेवटपर्यंत अवधान टिकवून ठेवणे हीच खूप मोठी गोष्ट असते. मला तर असे वाटते की इतक्या छोट्या मुलांना सध्या कशाला हवी आहे ऑनलाईन शाळा ? ते तीनचार महिने शाळेत नाही गेले किंवा त्यांची शाळा बंद राहिली तरी असं कोणतं मोठं आकाश कोसळणार आहे ? त्या कालावधीत पालक त्यांचा वाचन, लेखन, काही प्राथमिक गणिती क्रिया इ अभ्यास घेऊ शकतील. ऑनलाईन शाळा या पारंपरिक शाळेची जागा कितपत घेऊ शकतील ही शंका आहे.  पण पारंपरिक शाळा आणि ऑनलाईन शाळा यांचा सुवर्णमध्य सुद्धा साधता येणे शक्य आहे आणि तो सगळ्यांच्या फायद्याचा राहील असं मला वाटतं . पण असो. कारण यातील प्रत्येक गोष्टीत काहीना काही पण, परंतु असणार आहे. प्रत्येकाची वेगळी मतं असू शकतील. प्रत्येक गोष्टीत दोष शोधून सुरुवातीलाच नावे ठेवण्यात अर्थ नाही. शिक्षणाची ही प्रक्रिया सुरु झाली आहे, ती चांगल्या प्रकारे सुरु राहावी अशी अशा व्यक्त करून थांबतो. 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
   १७/०६/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा. )














टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...