मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग शिक्षण बिक्षण ...

उगवतीचे रंग  

शिक्षण बिक्षण ...
एक काळ होता की मुलांना बळजबरीने शाळेत पाठवलं जायचं. एक काळ आता आहे की कोरोना महामारीमुळे मुलांना बळजबरीने घरी बसवले जातंय. शाळेत बळजबरी जाण्याचा, शाळेतून पळून येण्याचा किंवा शाळा सुटल्यावर हुर्यो करत, उड्या मारत घरी जाण्याची मजा काही और होती. काही दुर्दैवी मुलांच्या वाट्याला हे भाग्य, हा आनंद आला नाही ही खरंच वाईट गोष्ट..! अशा काही काही गोष्टीत जो आनंद होता त्या आनंदाला आजची पिढी मुकली आहे.  शाळेतून मधल्या सुटीत पळून जाणे याची काय वेगवेगळी आणि धमाल कारणं असायची. एखादे कडक शिस्तीचे शिक्षक किंवा बाई आदल्या दिवशी गृहपाठ द्यायच्या. दुसऱ्या दिवशी तो शाळेत दाखवणे बंधनकारक असायचे. वर्गातील एखादा मुलगा वर्गाचा कार्यवाह किंवा मॉनिटर असायचा. आमच्यातलाच असायचा बेटा, पण कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ म्हणतात ना तसा . त्याचे आणि आमचे मागच्या जन्मीचे वैर असल्यासारखा सूड उगवायचा आमच्यावर. पळून जाणाऱ्या काही मुलांचे नाव सुटायचे त्याच्या वहीतून पण आमचं मात्र लिहायला विसरायचा नाही. मधल्या सुटीनंतर नेमका त्या मारकुट्या की कडक शिस्तीचे वगैरे त्यांचा तास असायचा. आणि आम्ही नेमके त्या दिवशी गृहपाठ करायला विसरलेलो असायचो किंवा केला असला तर वही आणायला विसरायचो.  इतर मुलं मग मुद्दामून आमच्यासमोर त्या गृहपाठाचा विषय काढायची. मग छाती धडधडणे, तोंडाला कोरड पडणे अशा गोष्टी व्हायच्या. अशा वेळी दोनच मार्ग आमच्यासमोर असायचे. एक म्हणजे जी काही शिक्षा होईल किंवा मार बसेल तो मुकाट्याने खाणे आणि दुसरा मार्ग म्हणजे पळून जाणे. पण पळून जाणे जरा जास्तच महाग पडायचे कारण पुढच्या दिवशी त्या शिक्षकांचा मार शिवाय वर्गशिक्षकांचा मार अशी दुहेरी शिक्षा सहन करण्याची तयारी ठेवावी लागायची. ' गेले ते दिन गेले. ' 

अब जमाना बदल चुका है भाइयों और बहनों . ' छडी लागे छम छम .. ' चे दिवस गेले. इंग्रजीतही अशी म्हण आहे, ' Spare the rod and spoil the child .' आता आनंददायी शिक्षण या नावाखाली मुलांना शिक्षा करायची नाही. आनंददायी शिक्षण म्हणून काही येत नसले तरी नापास करायचं नाही. खरंच केवढं आनंददायी शिक्षण..! आता शिक्षा मुलांना नसल्यामुळे ती शिक्षकांना भोगावी लागते. म्हणजे त्यांनी काही केलं तरी आपण शांतपणे सहन करायचं. इंग्रजीत एक अशीही म्हण आहे ' Child is the father of man . ' आणि ती खरी ठरते आहे. आजकाल मुलं शिकवतात पालकांना आणि शिक्षकांना. पुलंच्या एका कथेत कापड दुकानात कापड दाखवणाऱ्या सेल्समनला पुलंनी तो केवढा सहनशील असल्याचे सांगितले आहे. ज्यांना संयम आणि सहनशक्ती यांचे धडे घ्यायचे असतील त्यांनी काही दिवस कापड दुकानात सेल्समन म्हणून नोकरी करावी असं ते म्हणतात. कपड्यांचे, साड्यांचे गठ्ठे समोर टाकले तरी एकही पसंत पडत नाही. पण तो सेल्समन नाराज होत नाही. आनंदी चेहेऱ्याने पुन्हा दुसरे दाखवू का असे विचारतो. तसा आमचा शिक्षक शाळेत संयम आणि सहनशीलता यांचे धडे देतो सॉरी घेतो. 

पूर्वी शिक्षक आणि पालक यांची एक अलिखित युती असायची. म्हणजे कधी चुकून शिक्षक आणि पालक यांची भेट झाली तर दोन्ही बाजूनी आमच्याबद्दल तक्रारींचा पाढा वाचला जायचा. शिक्षक म्हणायचे, ' हा सांगितलेला गृहपाठ करत नाही. वर्गात शिस्त पाळत नाही. मधल्या सुटीत पळून जातो. ' तर पालक शिक्षकांना सांगायचे, '  अहो, घरी अजिबात अभ्यास करत नाही. खेळण्यात लक्ष असतं. ' आणि मग त्या दोघांचं एका बाबतीत एकमत व्हायचं. ते म्हणजे ' अजिबात लाड करू नका. चांगलं फोडून काढा. ' पालक म्हणायचे, ' तुम्ही चांगली शिक्षा करा, धाक दाखवा त्याला शाळेत. आम्ही अजिबात येणार नाही तक्रार करायला. ' कधी कधी अशा वेळी आम्ही चुकून पालकांसोबत असलो तर पालकांच्या मागे दडायचो. पण त्यांचं हे बोलणं ऐकलं की थरकाप व्हायचा आणि असं वाटायचं की हे कोणत्या जन्माच्या वैराचा बदला घेताहेत आपल्याकडून ? 

पूर्वी आपण नापास होऊ म्हणून किंवा शिक्षक किंवा पालक आपल्याला शिक्षा करतील म्हणून विद्यार्थी अभ्यास करायचा. आता या दोन्ही गोष्टी राहिल्या नाहीत. म्हणजे नापास करायचे नाही आणि शिक्षा करायची नाही. मग अभ्यासासाठी जी एक प्रकारची प्रेरणा आणि थोडेसे सकारात्मक दडपण असायचे तेच नाहीसे झाले आहे. त्यामुळे मुलांना धाक राहिला नाही. अभ्यासाची प्रेरणा नाही. वर्गात लक्ष देण्याची इच्छा राहिली नाही. नुसते सावलीतले झाड चांगले वाढत नाही. त्याला ऊनही आवश्यक असते. आपण अभ्यास नाही केला तर नापास होऊ किंवा आपल्याला शिक्षा होईल, या गोष्टींची जाणीव मुलाला होणे  आवश्यक असते. पण त्या गोष्टी या नवीन शिक्षणपद्धतीने हिरावून घेतल्या आहेत. 

 आता कधी कधी पालक येतात शाळेत. ते आमच्या मुलाला शिक्षा करा म्हणून सांगायला नाही. तर चुकून जर शिक्षकांनी त्याला शिक्षा केलीच असेल तर त्याचा विरोध करायला येतात. त्यांचं म्हणणं आता असं असतं, ' हे पहा सर. आम्हाला एवढा एकच मुलगा आहे. आम्ही तर घरी चार बोटं लावत नाही त्याला. त्याच्यावर हात उचलू नका. त्याला समजून सांगा. नाहीतर त्याच्या मनावर परिणाम होईल. वगैरे वगैरे. ' आणि हेही त्या पाल्याच्या समोर शिक्षकाला सांगितले जाते. काही पालक तर सरळ हेडमास्तरकडे जाऊन तक्रार करतात. हेडमास्तर आणि संस्थाचालकांना शाळा चालवायची असते. मुलं टिकवायची असतात. म्हणून तेही त्या शिक्षकाला दोन शब्द सांगतात. अशा रीतीने शिक्षकाला शाळेत खूप गोष्टी शिकायला मिळतात. खूप गोष्टी ऐकायला मिळतात. 

मग मुलांना आनंददायी शिक्षण देताना त्यांना कृतियुक्त शिक्षण द्या. त्यांच्या क्षमतांची नोंद ठेवा. त्या सगळ्या नोंदी वर्षभर जपून ठेवा. आणि वर्षाच्या शेवटी मुलांच्या प्रगतिपुस्तकात त्यांनी कोणत्या क्षमता प्राप्त केल्या वगैरे लिहा. अशी सगळी दिव्यं त्या शिक्षकांना करावी लागतात. वेळोवेळी शासनाने मागवलेली ऑनलाईन माहिती पाठवावी लागते. शिवाय सुट्यांमध्ये जनगणना, निवडणुकीची कामे इ गोष्टी करायला सांगितली जातात. या सगळ्या गोष्टी करताना त्या शिक्षकांची दमछाक होऊन त्यांच्या क्षमता संपण्याची वेळ येते.  शिवाय त्यांच्या ज्ञानात आणि कौशल्यात भर टाकण्यासाठी निरनिराळ्या प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात येते. या सगळ्या गोष्टी करू नयेत असे माझे म्हणणे नाही. अशैक्षणिक कामे तर शिक्षकांना देऊच नयेत. मात्र त्यांचे ज्ञान  आणि कौशल्य वाढेल याची जरूर काळजी घ्यावी. शिक्षक हा शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा नेहमी फ्रेश असला, सजग असला पाहिजे तरच तो मुलांना चांगले शिक्षण देऊ शकेल. त्यासाठी ही काळजी शासनाने आणि समाजाने सुद्धा घ्यायला हवी असे माझे मत आहे. आता सध्या कोरोना महामारीमुळे ऑनलाईन शिक्षणाचे पेव फुटले आहे. त्यासंबंधी काही मी उद्याच्या लेखात लिहीन. 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
        १६/०६/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२ 
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...