मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग कौशल्यासुत...

उगवतीचे रंग 
कौशल्यासुत... 
प्रसंग एक 
अनिल एका बँकेत अधिकारी म्हणून काम करीत होता. त्याची पत्नी शुभदा एका खाजगी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होती. अनिल तसा तब्येतीने सुदृढ होता. दोघांचीही पन्नाशी जवळ आली होती. मुले बाहेरगावी शिक्षणानिमित्त राहत होती. इकडॆ या दोघांचे दिवस तसे कामात आणि आनंदात जात होते. तो महिन्यातला दुसरा शनिवार होता. अनिलच्या बँकेला सुटी होती. अनिल मस्त जेवण करून लोळत पडला होता. शुभदा शाळेला गेली होती. दुपारी दोनच्या सुमाराला अचानक अनिलच्या छातीत कळा यायला सुरुवात झाली.  सुरुवातीला पोटातील गॅसेस आणि ऍसिडिटीमुळे असे होत असावे असे त्याला वाटले. पण नंतर जशा छातीतील कळा वाढू लागल्या तसा त्याने शुभदाला फोन केला. शुभदा ऑटो करून घरी आली .  घरी अनिलची स्थिती पाहून तिच्या पायाखालची जमीन हादरली. तिने ताबडतोब आपल्या फॅमिली डॉक्टरांना फोन लावला. ते आता क्लिनिकमधून घरी जाण्याच्या गडबडीत होते. तरी शुभदाचा फोन आल्यावर ते म्हणाले, ' वहिनी , अनिलला ताबडतोब गाडीत टाकून इकडे घेऊन या. मी बघतो काय करायचं ते..! ' शुभदा तयार झाली.  तिने अनिलला कसेबसे तयार केले. खाली पार्किंगमध्ये त्यांची कार उभी होती. पण शुभदाला गाडी चालवता येत नसल्यामुळे पंचाईत झाली. अशा वेळी ऑटोही लवकर मिळत नव्हती. टॅक्सीवाल्यांचा संप होता. ऑटो मिळून हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत पाऊण तास गेला. आणि केवळ दैव बलवत्तर म्हणून अनिल वाचला. 
प्रसंग दोन 
राहुलची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. राहुलचे आईवडील गावाकडे होते. तो नोकरीनिमित्त शहरात राहत होता. कोरोनाची साथ आल्याची बातमी पसरली आणि धडाधड गावातील दुकाने, हॉटेल्स आणि खानावळी बंद झाल्या. राहुलला आतापर्यंत कधीही हाताने स्वयंपाक करून खाण्याची वेळ आली नव्हती. पण आता मात्र सगळेच बंद असल्याने त्याची फार पंचाईत झाली. पोळ्या करणाऱ्या मावशी पण येणं बंद झाल्या. स्वयंपाक येत नसल्याने दोन दिवस राहुलने फक्त दूध आणि ब्रेडवर काढले. पण लवकरच त्याचाही उबग आल्याने त्याची उपासमार होऊ लागली. 
प्रसंग तीन 
एका नामांकित शाळेची सहल एका निसर्गरम्य ठिकाणी गेली होती. पावसाळा नुकताच संपलेला होता. नद्या, तलाव भरून वाहत होते. मुलींचा एक घोळका फिरत फिरत एका तळ्याकाठी आला होता. पावसाने जागा निसरडी झाल्याने एका विद्यार्थिनीचा पाय घसरला आणि ती तळ्यात पडली. त्या विद्यार्थिनीला किंवा त्यांच्या बरोबर आलेल्या शिक्षकांपैकी कोणालाही पोहता येत नव्हते. त्यामुळे सर्वांच्या डोळ्यादेखत त्या विद्यार्थिनीला जलसमाधी मिळाली. हळहळण्याशिवाय कोणीही काही करू शकले नाही. 

वरील तीनही प्रसंग केवळ उदाहरण म्हणून घेतलेले नाहीत. ते प्रत्यक्षात घडलेले आहेत. वरच्या तीनही प्रसंगात केवळ काही कौशल्यांचा अभाव त्या त्या व्यक्तींजवळ होता. आणि त्यामुळेच त्यांना जीवावरच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागले. पहिल्या प्रसंगात आपण पाहिले की शुभदा शाळेत शिक्षिका होती. ती एम ए झाली, बी एड झाली. सगळे शिकली पण गाडी चालवायला शिकली नाही. लग्न झाल्यावर नवरा तिला शाळेत सोडून देत होता किंवा ऑटो किंवा टॅक्सीने ती जात होती. पण ज्यावेळी गाडी चालवण्याची आणीबाणीची वेळ आली, तेव्हा ती हतबल झाली. दाराशी गाडी असूनही केवळ गाडी चालवता येत नाही म्हणून तिला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागली. दुसऱ्या प्रसंगात राहुलला चांगल्या पगाराची नोकरी होती. सगळे शिकला होता. पण कधीही स्वयंपाक केला नव्हता. म्हणून जेव्हा स्वतः करण्याची वेळ आली , तेव्हा त्याला उपाशी राहावे लागले. आणि तिसऱ्या प्रसंगात त्या विद्यार्थिनीला किंवा तिच्या शिक्षकांना पोहता येत नसल्यामुळे त्या विद्यार्थिनीला आपल्या प्राणांची किंमत द्यावी लागली. 

किती छोट्या छोट्या गोष्टी असतात. पण आपण त्या शिकण्याकडे दुर्लक्ष करतो. आजच्या काळात परिस्थिती अशी आहे की तुम्ही कितीही शिक्षण घेतले पण या साध्या साध्या गोष्टी जर तुम्हाला आल्या नाहीत, तर त्याची वर उदाहरणात दिल्याप्रमाणे फार मोठी किंमत मोजावी लागते. खरं म्हणजे या जीवनावश्यक गोष्टी आहेत. मुलांना पालकांनी आणि विद्यार्थ्यांना शाळांनी केवळ पुस्तकी शिक्षण देऊन उपयोग नाही. त्यांना अशी काही जीवनावश्यक कौशल्ये आलीच पाहिजेत. सायकल चालवणे, मोटरसायकल चालवणे, पोहणे, स्वयंपाक करणे यासारख्या गोष्टी आत्मसात करायलाच पाहिजेत. त्याचबरोबर जीवनात अन्य काही कौशल्यांची सुद्धा आवश्यकता असते. भाजी आणणे, ती निवडता येणे, घराला रंग लावता येणे, घराची साफसफाई, कपडे धुणे, फरशी पुसणे, घरातील एखादी छोटी मोठी वस्तू बिघडल्यास ती दुरुस्त करता येणे अशा एक ना दोन अनेक गोष्टी या मुलांना यायलाच हव्यात. श्रमाची, काम करण्याची लाज वाटता कामा नये. यालाच श्रमप्रतिष्ठा म्हणतात. जो जेवढा जास्त शिकेल, तेवढ्या या गोष्टी त्याला यायला हव्यात. पण आपल्याकडे नेमके उलट होते. एखादी व्यक्ती जेवढी जास्त शिकलेली, तेवढी श्रमाची कामे करण्याची लाज त्या व्यक्तीला वाटते. अनेक मोठ्या आणि यशस्वी व्यक्तींची चरित्रे जर आपण वाचली, तर आपल्याला असे दिसून येईल की या व्यक्तींनी श्रमाची किंवा कामाची कधी लाज बाळगली नव्हती. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन आपल्या बुटांना स्वतः पॉलीश करीत. महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्यासारख्यानी तर मैला साफ करण्याची कामे केली. केवळ पुस्तकी शिक्षणाला त्यांच्या लेखी कधीच महत्व नव्हते. कृतियुक्त शिक्षणावर त्यांचा भर होता. आपणही मुलांना ही कौशल्ये शिकवू शकतो. आपण त्यांच्यासमोर काम करावे आणि त्यांनाही आपल्यासोबत सहभागी करून घ्यावे हा सगळ्यात चांगला मार्ग. एखादे काम चांगले झाले, एखाद्या खोलीची साफसफाई चांगली करता आली , स्वयंपाक उत्तम झाला या गोष्टींचा होणारा आनंदही अवर्णनिय असतो. तो आनंद घ्यायला आणि द्यायला आपण मुलांना शिकवले पाहिजे. शीळ घालत घालत, गाणे गुणगुणत, गाणी ऐकत, गप्पा मारता मारता सहज अशी कामे करता येतात. त्यातून मनाला समाधानही मिळते. महात्मा गांधी म्हणायचे, ' कामात बदल म्हणजे विश्रांती. ' अभ्यासाचा कंटाळा आला की अशी कामे करायची. त्यातून आनंदही मिळतो आणि एक वेगळे कौशल्यही प्राप्त करता येते. अशा अंगी कौशल्ये असलेल्या व्यक्ती स्वावलंबी असतात. त्यांचे कोणावाचून काही काम अडून राहत नाही. म्हणून आपल्याला आणि आपल्या मुलांना ' कौशल्यासुत ' बनता आले पाहिजे. योग म्हणजे काय ? योग: कर्मसु कौशलम. आपल्या कामातलं कौशल्य हाही एक योगच आहे. 
©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
     १३/०६/२०२० 
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
 ( कृपया लेख नावासहित शेअर करावा. )











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...