मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग - पाया...

उगवतीचे रंग 

पाया... 

 ' पाया ' हा दोन अक्षरांचा शब्द..! पण अर्थ केवढा व्यापक ! कुठलीही गोष्ट उभी करायची असेल तर, पहिल्यांदा पायाचा विचार करावा लागतो. ' पाय ' शब्दापासूनच पाया शब्द आला असावा. आपणही पायावरच उभे असतो. जोपर्यंत पाय भक्कम असतात, तोपर्यंत आधार लागत नाही. पण पाय नाजूक असतात तेव्हा लहानपणी पांगुळगाडी आणि पाय थरथरू लागतात तेव्हा, म्हातारपणी काठीची किंवा आधाराची गरज भासते. एखादी इमारत बांधायच्या आधी  इंजिनिअर तिच्या पायाचा विचार करतो. इमारत जेवढी मोठी, तेवढा पाया मजबूत आणि खोल घ्यावा लागतो. ज्या इमारतींचा पाया कच्चा असतो, भुसभुशीत असतो, त्या थोड्याशा आघातानेही डळमळतात. भूकंपासारखा मोठा आघात झाला तर पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळतात. म्हणून भविष्यकाळात टिकणारी मजबूत इमारत बांधायची असेल तर, तिचा पाया भक्कमच असायला हवा. 

हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे सध्या सुरु असलेली विष्णू पुराण ही मालिका. त्यातील एक प्रसंग मनात घर करून गेला. धार्मिक मालिका कोणाला आवडो वा ना आवडो, मी मात्र आवडीने बघतो. त्याची दोन कारणे . एक म्हणजे या मालिकांची निर्मिती करताना त्या दिग्दर्शकाने बऱ्याच ग्रंथांचा अभ्यास करून ती तयार केलेली असते. रामायण, महाभारत, श्रीकृष्ण कोणतीही मालिका घ्या. त्यात सुरुवातीला किंवा शेवटी ती कोणत्या ग्रंथांवर आधारित आहे, ते दिलेले असते. ते बघूनही आपल्याला लेखकाने, दिग्दर्शकाने घेतलेले श्रम सहज लक्षात येतात. आपल्याला एवढे ग्रंथ वाचणे शक्य होईलच असे नाही. दुसरे कारण या मालिकांमधून प्राचीन काळातील लोकांची जीवनशैली, पेहेराव, वागण्याबोलण्याची पद्धत इ गोष्टी कळतात. लहान मुलांना तर या संस्कारक्षम मालिका अवश्य दाखवायला हव्यात. मूल्यशिक्षणाचे ते एक सहज सोपे साधन आहे. 

थोडे विषयांतर झाले. मी पुन्हा मूळ विषयाकडे येतो. तर विष्णू पुराण मालिकेत एक प्रसंग आहे.  भक्त प्रल्हादाची आई कयाधू आणि प्रल्हाद यांच्यातील हा संवाद आहे. हा प्रसंग सांगण्याआधी मी थोडी पार्श्वभूमी स्पष्ट करतो. असुर सम्राट हिरण्यकश्यपू हा राजा ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानामुळे अवध्य आणि अजेय झालेला असतो. भगवान विष्णूने त्याच्या भावाला मारले म्हणून तो विष्णूचा अत्यंत द्वेष करणारा असतो. त्याच्या राज्यात जो कोणी विष्णूचे नाव घेईल, त्यालाही तो प्राणदंडाची शिक्षा देतो आणि स्वतःला भगवान म्हणून घोषित करतो. पण त्याचे दुर्दैव म्हणजे त्याला जो मुलगा होतो, तो विष्णूचा परमभक्त असतो. त्याचे नाव प्रल्हाद. हा प्रल्हाद विष्णूचा परमभक्त होतो त्याचे कारण म्हणजे त्याची आई कयाधू ही तिला दिवस असताना, महर्षी नारदांच्या आश्रमात राहते. त्या परम पवित्र वातावरणाचे आणि महर्षी नारदांच्या शिकवणुकीचे अत्यंत चांगले संस्कार प्रल्हादावर तो गर्भात असताना आणि जन्मल्यानंतर काही काळ तो लहान असताना त्याच्यावर होतात. त्या संस्कारांचा परिणाम दूरगामी होतो. 

प्रसंग असा आहे. हिरण्यकश्यपू प्रल्हादाला विष्णुभक्त म्हणून ठार मारण्याचे बरेच प्रयत्न करतो. साहजिकच आई म्हणून कयाधूला प्रल्हादाची खूप काळजी वाटते. ती एकदा प्रल्हादाला सांगते की तू तुझ्या वडिलांना बरे वाटावे म्हणून तोंडावर तरी त्यांना भगवान म्हण . यावर प्रल्हादाने दिलेले उत्तर फार सुंदर आहे. तो म्हणतो, ' आई,  माझ्या मनात मी फक्त विष्णूलाच परमेश्वर मानतो. केवळ कोणाला तरी बरे वाटावे म्हणून मी खोटे कसे बोलू ? मनात वेगळं आणि बाहेर वेगळं असं तुला तरी आवडेल का ? तुझा मुलगा खोटं बोलणारा आहे हे तुला आवडेल का ? ' या प्रल्हादाच्या बोलांनी मी अंतर्मुख झालो. लहानपणी त्याच्यावर झालेले संस्कार किती प्रभावी होते ! एकदा झालेले संस्कार जणू वज्रलेप झाले. मग कोणी कितीही चुकीची गोष्ट सांगितली तरी तो आपला सत्याचा मार्ग सोडत नाही. 

या पार्श्वभूमीवर मी आपला स्वतःचा आणि आजच्या परिस्थितीचा विचार करू लागलो. प्रल्हादासारखं वागू शकतो का आपण ? आपल्याला  जीवनात कितीतरी वेळा असं खोटं बोलण्याचा प्रसंग येतो. जसं प्रल्हादाने ओठात एक आणि पोटात एक असं बोलणं नाकारलं, तसं नाही करता येत आपल्याला. याचं कारण म्हणजे आपण सामान्य माणूस आहोत. आपण जिथे काम करतो, त्या कार्यालयात आपला प्रमुख अधिकारी आपल्याशी वागताना भेदभाव करतो ही गोष्ट आपल्याला कळते. पण वरकरणी आपल्याला त्याला चांगले म्हणावेच लागते. कारण तसे नाही केले तर आपल्याला आणखी त्रास होईल हे आपल्याला माहित असते. एखाद्या शासकीय कार्यालयात आपले काही काम असले तर संबंधित अधिकारी भ्रष्ट आहे हे कळूनही आपल्याला आपले काम अडलेले असल्यामुळे त्याला चांगले म्हणावेच लागते. एखादा आमदार, खासदार अगर मंत्री भ्रष्ट आहे हे आपल्याला माहित असते, पण जेव्हा त्या मंत्र्याच्या हस्ते एखादा सार्वजनिक कार्यक्रम होतो, तेव्हा त्या कार्यक्रमात जे जे वक्ते बोलतात, ते ते त्या मंत्र्याची तोंड फाटेपर्यंत स्तुती करताना आपण पाहतो. या सगळ्या गोष्टींचा आपण अनुभव घेतो. ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही. 

एखादाच अधिकारी असा असतो की तो आपल्या बदलीची पर्वा करत नाही, कामावरून काढून टाकण्याची पर्वा करत नाही. मग तो त्याच्या पद्धतीने काम करतो. त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांचे, मंत्र्यांचे अयोग्य आदेश मानण्यास नकार देतो. पण अशा अधिकाऱ्यांना जो काही त्रास होतो, तो सोसण्याची त्यांची तयारी असते. पण असे अधिकारी अपवादात्मक. पण जेव्हा अशा अपवादात्मक अधिकाऱ्यांची संख्या वाढेल, तेव्हाच या देशाचं भाग्य खऱ्या अर्थाने बदलेल. पण हे तेव्हाच होईल की जेव्हा आपण स्वतःपुरते पाहण्याची वृत्ती सोडू. शिवाजी जन्माला यावा, पण तो शेजारच्या घरात. आपल्या घरात नको.  ही चमडीबचाव वृत्ती आपण जेव्हा टाकून देऊ, तेव्हाच हे शक्य होईल. त्यासाठी जिजाऊंच्या भूमिकेतून बाल शिवाजीला घडवावे लागेल. म्हणूनच लहानपणीच्या संस्कारांचा पाया पक्का झाला पाहिजे. जसा प्रल्हादाचा झाला होता. अभिमन्यूने आईच्या पोटात असताना चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा हे ऐकले होते. मूल गर्भात असताना आणि लहान असताना त्याच्यावर होणारे संस्कार किती प्रभावी असतात, हेच ही उदाहरणे दाखवतात. आजचे वातावरण कसेही असो, कितीही बिघडलेले असो, जेव्हा पालक आणि शिक्षक अशा प्रकारचे संस्कार मुलांवर करण्याचे मनापासून ठरवतील, तेव्हाच भारताच्या भावी नागरिकांचा पाया भक्कम घडेल. हे राष्ट्रनिर्माणाचे काम आहे. सोपे नाही. त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. मुले सांगून ऐकत नाहीत. ते पाहतात आणि अनुकरण करतात. ही गोष्ट आधी आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. आणि मुलांपुढे आदर्श ठेवावा लागेल. ' फुलाला सुगंध मातीचा. ' 

©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
      १२/०६/२०२० 
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा. ) 













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...