मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग सुंदरता आणि कुरूपता

उगवतीचे रंग 

सुंदरता आणि कुरूपता  

बालकवी म्हणतात 

सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे 
चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे. 

परवा श्रीकृष्ण मालिका पाहत असतानाचा एक प्रसंग आठवला. कंसाच्या आमंत्रणावरून श्रीकृष्ण मथुरा नगरीत येतो. मथुरेत फेरफटका करीत असताना, श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या दृष्टीस एक  कुबड असलेली आणि त्यामुळे अत्यंत वाकून चाललेली स्त्री दृष्टीस पडते. ती कंसासाठी तयार केलेला एक सुगंधी लेप घेऊन जात असते. श्रीकृष्ण तिला थांबवून म्हणतो, ' हे सुंदरी, तुझ्याजवळ सुगंधी अशी कोणती वस्तू आहे आणि तू ती घेऊन कुठे जात आहेस ? ' तेव्हा ती म्हणते, ' मी कुब्जा आहे. मी कुरूप असल्यामुळे सगळे लोक मला कुब्जा म्हणतात. एक वेळ मला कुब्जा म्हटले असतेस, तर चालले असते. पण तू मला सुंदरी म्हणून माझा उपहास केला आहेस. त्यामुळे मी व्यथित झाले आहे. " त्यावेळेस श्रीकुष्ण तिला जे सांगतो, ते मला खूप आवडले. तो म्हणतो, ' कुरूपता ही शरीराची असू शकते. पण तुझ्याजवळ मनाचे सौंदर्य आहे. आत्म्याचे सौंदर्य आहे. म्हणूनच मी तुला सुंदरी असे म्हटले. ' 

आपण सर्वसामान्य माणसे.  वरवरचे सौंदर्य पाहण्याची सवय आपल्याला लागलेली असते. पण वरवर दिसणाऱ्या सौंदर्यापलीकडे किंवा कुरुपतेपलीकडे सुद्धा सौंदर्य असू शकते, याचा अंदाज आपल्याला येत नाही. कधी कधी मला असे वाटते की सौंदर्य आणि कुरूपता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या सापेक्ष गोष्टी आहेत. असं म्हणतात की वस्तूत, व्यक्तीत सौंदर्य नसते. सौंदर्य हे  पाहणाऱ्याच्या नजरेत असते. जी गोष्ट एखाद्या व्यक्तीला सुंदर वाटेल, तीच गोष्ट दुसऱ्याला तितकी आकर्षक वाटणार नाही. एखाद्या व्यक्तीला अगदी साधारण वाटणाऱ्या गोष्टीतही सौंदर्याचा साक्षात्कार होतो. गवतफुलासारखी सामान्य गोष्ट. पण एखाद्या कवीला त्यातही सौंदर्य दिसते आणि तो सहज म्हणून जातो 

रंगरंगुल्या, सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला 
असा कसा रे सांग लागला, सांग तुझा रे तुझा लळा. 

कुरुपतेतूनही सौंदर्य जन्म घेते. काट्यांवर गुलाब फुलतात. चिखलात कमळ उगवते. ओबडधोबड अशा दगडातून सुंदर मूर्ती तयार होते. सुंदर घरांची निर्मिती होते. आंतरिक ओढ कशाची आहे ते महत्वाचे. कमळाला आतूनच फुलण्याची ओढ असते. काट्यांवर असला तरी खेद न मानता गुलाबाला फुलायचे असते. आणि ज्याला फुलायचे असते, आपले सौंदर्य जगापुढे आणायचे असते, त्याला कोणी रोखू शकत नाही. कारण ती तुमची आंतरिक ओढ असते. मग परिस्थिती कशीही असो. चिखल असो वा काटे. चिखलात फुलणारे कमळ , काट्यांवर फुलणारा गुलाब जणू आपल्याला संदेश देतात, की बघ, मी कसा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा पूर्णांशाने फ़ुललो आहे. माझे सौंदर्य जराही कमी होऊ दिले नाही. ओबडधोबड दगडातून सुंदर मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारात सुद्धा अंतरात सौंदर्याची ओढ असते. म्हणूनच अशी सुंदर कलाकृती जन्म घेते. 

फुलपाखरांचा जन्म कसा होतो माहितीये ? कुरूप अशा दिसणाऱ्या अळ्यांमधून फुलपाखरे जन्म घेतात. इतक्या कुरूप अळ्यांमधून इतकी सुंदर मन मोहून टाकणारी फुलपाखरे जन्माची हा निसर्गाचा एक चमत्कारच नाही का ? 
मग त्यांना जन्म देणाऱ्या अळ्यांना कुरूप तरी कसे म्हणावे ? आकाशात दिसणारे पांढरे मेघ छान दिसतात. पण त्यांचा काहीच उपयोग नसतो. काळे ढग कदाचित दिसायला सुंदर नसतील, पण आपल्या जलवर्षावाने ते अवघ्या सृष्टीला नवसंजीवनी देतात, म्हणून त्यांचे बाह्य रूप न विचारात घेता, आंतरिक सौंदर्य विचारात घ्यायला हवे. जे सौंदर्य इतरांना आनंद देते, इतरांच्या उपयोगी पडते, ते खरे सौंदर्य. इतरांसाठी जे स्वतःचं सर्वस्व झोकून देऊन काम करतात, त्यांच्या कार्याचा कीर्तिसुंगंध आपोआपच पसरतो. नुसते सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणे महत्वाचे आहे. ही सुंदरता विचारांची आहे. कृतीची आहे. 

आपल्या देवादिकांचे फोटो पाहिले तर त्यांच्या पाठीमागे एक तेजोवलय आपल्याला दिसते. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज, एक प्रकारची आभा दिसते. ते जे सौंदर्य आहे ते सत्याचे प्रतीक आहे. तेच शिव आहे आणि तेच सुंदर आहे.   इंग्रजी कवी किट्स म्हणतो, ' Truth is beauty and beauty is truth . ' त्याचा अर्थ हाच आहे. आणि त्याचे आणखी एक वाक्य प्रसिद्ध आहे ' A thing of beauty is joy forever .' जी गोष्ट सुंदर असते, ती नेहमीच आनंद देते. कृत्रिम सौंदर्य फार काळ आनंद देऊ शकत नाही. सौंदर्य प्रसाधने, पोशाख इ च्या साहाय्याने आपण आपले सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करतो. पण जी गोष्ट मुळचीच सुंदर असते, तिला दिखाव्याची गरज असत नाही. चेहऱ्यावरचे निर्मळ आणि नैसर्गिक हास्य, आपले काम करताना भाळावर येणारे घामाचे मोती या गोष्टी सुंदरच दिसतात. आपले आरोग्य चांगले असेल, विचार चांगले असतील आणि मन प्रसन्न असेल, तर सौंदर्य तुमच्या व्यक्तिमत्त्वातून आपोआपच प्रकट होईल. त्यासाठी मेकअप किंवा दिखाव्याची गरज भासणार नाही. 

' एका तळ्यात होती बदके पिले सुरेख ...' हे गाणं आपल्या सगळ्यांना माहिती असेल. त्या तळ्यात बदकांसमवेत एक राजहंस वाढत असतो. त्याला आपल्या सौंदर्याची जाणीव नसते. बदकांची पिले तो वेगळा असल्याने त्याला कुरूप समजतात. म्हणून तोही दुःखी असतो. पण एके दिवशी त्याला उमजते की आपण बदक नसून राजहंस आहोत, तेव्हा त्याचे भय, वेड सगळे पळून जाते. कारण त्याने त्याच्यातील ' स्व ' ला ओळखले असते. असाच आपल्या प्रत्येकामध्ये सुद्धा राजहंस दडलेला असतो. फक्त आपल्याला त्याला ओळखता आले पाहिजे, जागे करता आले पाहिजे. 

©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
   ११/०६/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा. ) 

















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...