उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
ऋण मैत्रीचे.. न कधीही फिटायचे...
सोनं शुद्ध आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याला अग्निपरीक्षा द्यावी लागते. शुद्ध सोनं असलं तर अग्निपरीक्षेतून ते उजळून निघते. मैत्रीचंही तसंच आहे. मैत्री शुद्ध आणि निरपेक्ष असेल तर ती खरी मैत्री. जसं खऱ्या सोन्यात हिणकस असं काही नसतं. तसंच खऱ्या मैत्रीत कोणतेही अपेक्षा, कोणताही स्वार्थ नसतो. मैत्रीला देणं माहिती असतं. कुठलीही अपेक्षा न करता. अशी मैत्री अनेक कसोट्यातून उजळून निघते आणि झळाळून उठते. मैत्रीचं नातं हे सगळ्या नात्यांपेक्षा श्रेष्ठ. रक्ताच्या नात्यापलीकडे असणारं . मैत्रीला जातपात, उच्चनीच, लहानमोठा, स्त्रीपुरुष असं काही म्हणजे काही बंधन नसतं. जी मैत्री अशी निरपेक्ष असते, ती चिरकाल टिकते. तो मित्र असताना तर ती असतेच असते पण जेव्हा काही कारणाने त्याचा वियोग होतो, तेव्हाही ही टिकून असते. एखाद्या फुलाचे निर्माल्य झाले तरी त्याचा सुगंध कायमच दरवळत राहावा तसेच अशा मैत्रीचे असते.
आज मी तुम्हाला अशाच एका मैत्रीची कथा सांगणार आहे. या कथेची सुरुवात होते विदर्भातल्या खामगाव इथे. संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचं शेगाव इथून जवळच. खामगावमध्ये राहणारे राजाभाऊ उर्फ हेमंत देशमुख आणि सतीश दिंडोकार ही दोन सामान्य घरातील मुलं . परिस्थिती बेताचीच. पण आईवडिलांनी दोघांना उत्तम संस्कार दिलेले. आणि गजानन महाराजांवर अपार श्रद्धा असणारे हे दोघं शालेय जीवनापासून एकमेकांच्या जवळ आले आणि एकमेकांचे घनिष्ठ मित्र झाले. जणू एका घरातील दोन भाऊच. राजाभाऊंकडे काही कार्य असले की सतीश तिथे हजर असणार आणि सतीशकडे काहीही कार्यक्रम असला तर तो राजाभाऊंशिवाय पार पडणार नाही. एकमेकांच्या घरातील सुखदुःखाच्या लहानमोठ्या सर्व प्रसंगात त्यांची हजेरी असायची. राजाभाऊंचे नाव हेमंत जरी असले तरी सगळ्या मित्रमंडळीत तो राजा म्हणूनच परिचित. त्याचे व्यक्तिमत्वही होते तसेच राजबिंडे. गोरा वर्ण, भक्कम, बांधेसूद शरीरयष्टी, सरळ तरतरीत नाक आणि पाणीदार डोळे. पाहिल्याक्षणी समोरच्या व्यक्तीवर छाप पडावी असे व्यक्तिमत्व.
या निसर्गदत्त व्यक्तिमत्वासॊबत राजाभाऊ काही दैवी गुण सुद्धा आपल्यासोबत घेऊन आला होता. इतरांना मदत करण्याची अंतःप्रेरणा त्याच्याजवळ मुळातच होती. त्याच्या घरची परिस्थिती सामान्य असताना सुद्धा आपल्या वर्गातील, परिसरातील गरीब मुलांना शाळेची वह्यापुस्तके तो घेऊन देत असे. कोणी उपाशी भिकारी दिसला की त्याला तो हॉटेलात घेऊन जाऊन खाऊपिऊ घालायचा. या सगळ्यामध्ये सतीश पण त्याच्यासोबत असायचा. आपल्याला पॉकेटमनी म्हणून मिळालेले पैसे हे दोघं अशा गरजू व्यक्तींसाठी खर्च करायचे. पुढे शिक्षणाच्या निमित्ताने या दोघा मित्रांना एकमेकांपासून दूर राहावे लागले तरी त्यांच्यातील मैत्रीचा बंध घट्ट होता.
सतीश पुढे सी ए करण्यासाठी म्हणून पुण्यात आला. काम करता करता शिक्षण घेऊ लागला. सी ए होण्याचे स्वप्न होते, अभ्यासाची जिद्द होती. त्या जिद्दीच्या जोरावर त्याने सी ए च्या परीक्षेत यश मिळवले याच दरम्यान त्याच्यासोबत शिक्षण घेणाऱ्या सारिकाची आणि त्याची गाठ पडली आणि त्या दोघांनी पुढे विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. विवाहानंतर ही दोघेही पुण्यामध्ये स्थायिक झाली. राजाभाऊला मात्र अजून कुठे स्थिरस्थावर होता आलं नव्हतं. तो कुठेतरी छोटीमोठी कामं करीत होता. कधी कधी तो पुण्यात यायचा आणि सतीशकडे राहायचा. सतीशच्या मेव्हणे हे पुण्यातच एक छोटे उद्योजक होते. त्यांनी राजाभाऊंमधले गुण हेरले आणि राजाभाऊंना त्यांनी आपल्या मदतीसाठी बोलावून घेतले.
पुण्यात काही दिवस काम केल्यानंतर त्यांच्या व्यवसायाचे एक युनिट कर्नाटकात बंगलोर जवळ होते, त्या ठिकाणी राजाभाऊंना पाठवण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान राजाभाऊंचे सुद्धा लग्न होऊन त्यांच्या जीवनात एक सुस्वभावी, गोड मुलगी सहचारिणी म्हणून आली होती. आता दोघेही कर्नाटकात राहत होते. अशातच सतीशच्या लहान भावाचे लग्न ठरले. लग्न अमरावतीला होते. सतीशकडचे लग्न म्हणजे जणू राजाभाऊंच्या घरचेच कार्य . अशावेळी राजाभाऊ आठ दिवस रजा घेऊन खामगावला हजर झाले आणि त्यांचे सगळे कुटुंब या लग्नाच्या तयारीत आणि सोहोळ्यात सहभागी झाले. लग्नाच्या प्रसंगी कोणाला कोणतीही अडचण असो, काहीही काम असो, सगळ्यांच्या तोंडातून फक्त राजाभाऊंचे नाव निघत असे. एखादी गोष्ट राजाभाऊंना सांगितली की ती झालीच म्हणून समजायचं. अशा रीतीने रवीच्या लग्नात राजाभाऊने प्रचंड मेहनत घेतली आणि ते मंगल कार्य सुखरूप पार पडले.
राजाभाऊ पुन्हा बंगलोरकडे रवाना झाले. पुढे उन्हाळयाच्या सुटीत राजाभाऊंनी आपल्या मोठ्या भावाला आपल्याकडे बोलावून घेतले. त्यांचे मोठे बंधू, वहिनी आणि दोन गोजिरवाणी मुले असे सगळे सुटी असल्याने मग तिकडे गेले. आपल्या भावाला, वहिनींना देवदर्शन घडावे आणि कर्नाटकातील प्रेक्षणीय स्थळे पाहता यावीत म्हणून राजाभाऊंनी एक गाडी ठरवली आणि त्यांचे भाऊ, वहिनी , दोन्ही मुले आणि स्वतः राजाभाऊ आणि त्यांच्या पत्नी असे सहाजण प्रवासासाठी निघाले. असं सगळं सुंदर, सुरळीत सुरु असताना, या कुटुंबावर नियतीने क्रूर घाला घातला. एका रस्ते अपघातात राजाभाऊंचे वाहन अपघातग्रस्त झाले आणि गाडीतील या सहाही जणांना जागीच देवाज्ञा झाली. नियतीच्या एका फटक्यात अख्खे कुटुंब संपले.
खामगावमध्ये, पुण्यात जेव्हा ही बातमी आली तेव्हा कोणाचाही विश्वास बसत नव्हता. पण दुर्दैवाने हे सत्य सर्वांना स्वीकारावेच लागले. खामगाव तर शोकसागरात बुडाले होते. राजाभाऊंचा प्रचंड मोठा मित्रपरिवार होता. त्या सगळ्यांवरच हा मोठा आघात होता. सतीश आणि त्याच्या घरची मंडळी यांच्या डोळ्यातील अश्रुधारा थांबत नव्हत्या. सतीश आणि त्याचे बाबा लगेच विमानाने बंगलोरला रवाना झाले आणि मग ते सगळे तेथील औपचारिकता पूर्ण करून त्या सहाही जणांचे मृतदेह खामगावला घेऊन आले. त्याठिकाणी प्रचंड जनसमुदाय जमलं होता. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजाभाऊंच्या मागे आता त्यांचे आईवडील, लहान भाऊ, त्याची पत्नीआणि दोन विवाहित बहिणी आहेत.
त्या दिवसापासून असा एकही दिवस गेला नाही की ज्या दिवशी सतीश आणि त्याच्या कुटुंबातील लोकांना राजाभाऊंची आठवण आली नाही. राजाभाऊंना जाऊन आता एक वर्ष झाले. परवा २६ तारखेला त्यांचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने काहीतरी करावं असं सतीश आणि सारिका आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना वाटत होतं . राजाभाऊ जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या कधीही न पुसल्या जाणाऱ्या स्मृती होत्या. सतीश आणि राजाभाऊ यांच्यातील मैत्रीचं नातं तुटणार नव्हतं. सतीश आणि सारिकाने यावेळी काही गरजू संस्थांचा आणि व्यक्तींचा शोध घेतला. त्यामध्ये बीड जिल्ह्यात गेवराई या ठिकाणी अनाथ मुलांसाठी सहारा अनाथालय चालवणारे संतोष गर्जे आणि मुंबईत मतिमंद मुलांसाठी ' घरकुल ' सुरु करणारे अविनाश बर्वे या दोघांशी त्यांनी संपर्क साधला. मा संतोष गर्जे आणि मा अविनाशजी बर्वे यांच्याबद्दल मी पूर्वी उगवतीचे रंग या सदरात सविस्तर लिहिले आहेच. राजाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी मदत करून सतीशने राजाभाऊंना अनोखी श्रद्धांजली वाहिली. खरं तर हे मैत्रीचं ऋण कधी फिरायचं नाही. ( सारिका ही माझी मुलगी आणि सतीश हे माझे जावई आहेत )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२९/०६/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा