
मळभ...
मळभ दाटून येतं कधी कधी
केवळ आकाशातच नव्हे तर मनातल्या आकाशातही
आणि पादाक्रांत करतं सगळी मनोभूमी
बटू वामनाच्या पायाने विचार, भावना व्यापून
दशांगुळे उरतं.
मग ते मळभ आणि त्याचा काळा तवंग पसरतो मनावर
आणि लुप्त होतात सारी प्रकाशकिरणे .
कधी कधी हे मळभ असतं निराशेचं
ही निराशा येते जेव्हा विचारत नाहीत आपलीच माणसे
खूप वेगवेगळ्या प्रवृत्तींनी मारतात ती आपल्याला
कधी दुर्लक्ष करून, तरी कधी हेटाळणी करून
कधी कधी आपल्याच माणसांना पाहवत नाही आपलीच प्रगती
पण न बोलता, कौतुक न करता अनुल्लेखाने मारतात ती आपल्याला.
आपली अवस्था तोंड दाबून बुक्क्याचा मार
कधी कधी निराश करते परिस्थिती सुद्धा
सगळेच मार्ग असतात बंद
आणि सुचत नाही काहीही
दिसतो फक्त एकच मार्ग सुटकेचा
सोपं असतं त्या मार्गाने सुटका करून घेणं
पण आत्मघातकी असतो तो मार्ग .
कधी कधी लता दीदींचं गाणं आठवतं आणि म्हणावसं वाटतं
तुझसे नाराज नही जिंदगी, हैरान हू मै
तेरे मासूम सवालोंसे परेशान हू मै
पण मग त्यांचंच दुसरं गाणं मनाची समजूत घालत असतं , धीर देतं
आज फार जिने की तमन्ना है ...
आपली सुटका करून घेत निखळतो एखादा सुशांत तारा
त्याच्याकडे पाहून खचायचं नसतं
बुलंद करायचे असतात आपले इरादे
आठवायचं असतं शिवरायांना
मोठ्या कष्टानं कमावलेलं स्वराज्य तहात गमावताना
होती जिद्द ते परत मिळवण्याची
औरंगजेबाची सत्ता असतेच ठिकठिकाणी
जिंदादिल मनसुब्यांनी ती उधळून लावायची असते.
कधी गनिमी काव्याने तर कधी आमनेसामने.
आठवायचं असतं संत ज्ञानेश्वरांना
समाजाच्या टीकेचं हलाहल पिऊन अमृतवाणी प्रसवणारे
जगाच्या भल्यासाठी पसायदानाचा अमृतकुंभ मागणारे
मला तर कधी कधी शिवशंकरांपेक्षा ज्ञानदेव श्रेष्ठ वाटतात.
शिवशंकरानी हलाहल प्राशन करून कंठातच रोखून धरलं आणि ते नीलकंठ झाले.
माझ्या ज्ञानोबा माऊलीने मात्र ते पिऊन टाकलं आणि पचवलं
मुखातून मात्र बाहेर पडली ती अमृतवाणी अवघ्या जगासाठी
तिथे नव्हता थारा निराशेच्या, आत्मघातकी विचारांना .
त्या हृदयात तेवत होती ज्योत प्रकाशाची
शेवटी मनातलं मळभ म्हणजे अंध:कारच ना..
अंध:कार असा अस्तित्वात नसतोच मुळी
अंध:कार म्हणजे काय असतं ?
तो असतो प्रकाशाचा अभाव फक्त...!
जेव्हा तुम्ही आशेची ज्योत पेटवता
तेव्हा निराशेचा अंध:कार पसार होतो.
दाही दिशा अन मनाचा कानाकोपरा जातो लख्ख प्रकाशानं उजळून
एखादे पाडगावकर सांगत असतात
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
आणि असंही सांगतात ' अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. '
©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१५/०६/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा. )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा