उगवतीचे रंग
ध्येय निश्चितीकडे वाटचाल - भाग सात ( शेवटचा भाग )
कालच्या लेखात आपण ध्येयनिश्चितीकडे वाटचाल ही एक प्रकारची साधनाच आहे हे पाहिले होते. कालच्या लेखात आपण लता मंगेशकर, एकलव्य आणि आशा भोसले यांची ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करतानाची उदाहरणे पाहिली. ही साधना करताना आपल्या ध्येयाचा ध्रुवतारा अखंड डोळ्यासमोर ठेवून छोट्यामोठ्या सुखांकडे दुर्लक्ष करायचे असते, तरच ध्येय साध्य होऊ शकते हे पाहिले. तसेच कायम आनंदी आणि उत्साही असण्यासाठी काही वाक्ये देखील स्वतःशी अनेकवेळा म्हणायला सांगितली होती. आजच्या या ' ध्येयनिश्चितीकडे वाटचाल ' या मालेतील शेवटच्या भागात मी आपल्याला असे काही नियम सांगणार आहे, की जे आपल्याला आपले ध्येय गाठून देण्यास मदत तर करतीलच, पण आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्यही उत्तम ठेवतील. आणखी एक गोष्ट. ही लेखमाला मी कोणताही विशिष्ट वयोगट डोळ्यापुढे ठेवून लिहिली नाही. ती सर्वांसाठी आहे. पण ज्यांना आपल्या जीवनाची सुरुवात करायची आहे, त्यांच्यासाठी ती विशेष उपयुक्त ठरेल असे वाटते.
माणसाचं जीवन हा एक प्रवास मानला, तर तो आनंदी आणि सुखाचा व्हावा असं कोणालाही वाटेल. ते चुकीचं नाही.फक्त तो प्रवास सुखी आणि आनंदी होण्यासाठी आपण काय करतो, त्यावर ते अवलंबून आहे. वर्तमानकाळ आपल्या हातात असतो, त्या वर्तमानात आपण जी जी चांगली कर्मे करू, ती ती भविष्यात आपल्याला फलदायी ठरतील. कारण आज जे पेराल, तेच उद्या उगवेल. यासाठी आजचा वेळ आपल्या हातात आहे. आणि वेळेचे महत्व मी तुम्हाला वेगळे सांगण्याचे कारण नाही. आपण सगळे ते जाणताच . एक वेळ गेलेला पैसा , आरोग्य या गोष्टी परत मिळू शकतील. पण गेलेली वेळ कधीही परत येत नाही. म्हणून आज जो वेळ तुमच्याकडे आहे, ती तुमच्याजवळ असलेली सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. म्हणून आपल्या ध्येय निश्चितीकडे वाटचाल करताना, वेळेचे अचूक आणि काटेकोर नियोजन करा. तुम्ही वेळेची कदर केलीत, तर वेळ तुमची कदर करील. आता मी काही महत्वाच्या गोष्टी थोडक्यात सांगणार आहे. त्या तुम्ही रोज करावयाच्या आहेत. त्यांचे आपल्या सोयीने आणि हवे तसे नियोजन करा. पण त्यातली एकही गोष्ट सोडू नका. प्रत्येक गोष्ट खूप महत्वाची आहे.
ध्येयमार्गावर वाटचाल करत असताना, रोज थोडा वेळ स्वतःसाठी द्या. स्वतःसाठी द्या म्हणजे नेमके काय करायचे ते समजून घ्या. एखाद्या शांत जागी बसा . काही करू नका. फक्त शांत, ताठ बसा . आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. काही विचार मनात येतील. त्यांच्याकडे लक्ष न देता त्रयस्थपणे त्यांच्याकडे पहा. ते हळूहळू कमी होतील. पुन्हा श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. ही वेळ पाच मी पासून सुरुवात करून रोज किमान पंधरा मी. पर्यंत वाढवा . हे एक प्रकारचे ध्यान करणे आहे. स्वतःशी संवाद साधणे आहे. त्याच्यासाठी वेळ द्याच. ' तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाची वाद आपणाशी. ' तुम्हाला असं वाटेल की हा वेळ वाया तर जाणार नाही ? माझ्याकडे तर आधीच वेळ नाही. पण काळजी करू नका. तुम्ही स्वतःसाठी हा वेळ दिलात, तर तो तुम्हाला अनेक पटीने त्याचे फळ देईल. एकांतात बसल्याने तुमच्या कल्पना शक्तीला, प्रतिभा शक्तीला चालना मिळेल. मनाचे रिचार्जिंग होईल. नवनवीन कल्पना सुचतील. आणि मुख्य म्हणजे सतत ध्येयमार्गावर वाटचाल करत असताना, तुमचं शरीर आणि मन काही वेळा थकतं, त्याला यामुळे भरपूर विश्रांती मिळून तुम्हाला ताजेतवाने वाटेल. स्वामी विवेकानंद म्हणतात, ' दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा. तसे केले नाही तर तुम्ही या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल. ' ही जगातली चांगली व्यक्ती म्हणजे आपण आहोत हे लक्षात असू द्या.
रोज थोडा तरी वेळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवा . तो कसा आणि कुठल्या प्रकारे घालवायचा ते तुम्ही ठरवा. अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बागेत जा, शेतात जा. फुलं , पक्षी झाडं यांचं निरीक्षण करा. त्यांच्याशी मूक संवाद साधा. ते तुम्हाला सवयीने जमेल. सूर्योदय, सूर्यास्त बघा. रोज सकाळची सूर्यकिरणे थोडा वेळ तरी अंगावर घ्या. सकाळची मोकळी , स्वच्छ हवा आपल्या श्वासात भरून घ्या. अजून तरी या सगळ्या गोष्टी आपल्याला मोफत मिळताहेत ही निसर्गाची केवढी कृपा ! श्वास तर आपण प्रत्येक जण जन्मल्यापासून घेतो, पण दीर्घ श्वसन शिकून घ्या. ती श्वास घेण्याची सर्वात चांगली पद्धत आहे. ती तुम्हाला आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करेल. रोज ताजे आणि शुद्ध जेवण घ्या. शुद्ध म्हणजे नैसर्गिकरित्या बनवलेले शाकाहारी जेवण. त्यात फळे, भाजीपाला, दूध इ चा समावेश असू द्या. मोड आलेले पदार्थ घ्या. पॅक केलेले डबाबंद पदार्थ, ज्यावर तारीख टाकलेली असते असे प दार्थ, तसेच बेकरी प्रॉडक्ट्स शक्य तो खाण्याचे टाळा. शाकाहारी आणि ताजे अन्न तुम्हाला दीर्घायु प्रदान करेल. जगातील अनेक दीर्घायु असलेले लोक शाकाहारी आहेत. हे झाले शरीराच्या पोषणाबद्दल. मनाच्या पोषणासाठी चांगली पुस्तके वाचा. थोर व्यक्तींची चरित्रे, आत्मचरित्रे जरूर वाचा. ती आपल्याला प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा प्रेरणा देतील. इतरही काही चांगली पुस्तके आहेत. त्यांचे वाचन करा. त्यातले आवडलेले मुद्दे, महत्वाची माहिती लिहून ठेवा. पुढील आयुष्यात ती नक्की उपयोगी पडेल.
रोज दिवसातून थोडा तरी वेळ व्यायामासाठी अवश्य द्या. आपल्या सोयीनुसार कोणताही व्यायाम प्रकार करा. पण त्याला प्राणायाम आणि योगासनांची जोड देता आली तर ती अवश्य द्या. जसे काम आणि व्यायाम आवश्यक असतो, तशीच विश्रांतीही. त्यामुळे रोज किमान सहा तास विश्रांती मिळेल अशी झोप अवश्य घ्या. झोप पूर्ण झाल्यानंतर आपले शरीर आणि मेंदू ताजातवाना होतो. रोज निःस्वार्थीपणे एखादे तरी काम करा. त्यात कोणतीही परतीची अपेक्षा ठेवू नका. निरपेक्ष मदत करा. मग ती कोणा गरजूला असेल किंवा आपल्या ओळखीतल्या, नात्यातल्या व्यक्तीला. ती आर्थिकच असली पाहिजे असे नाही. ती वेळ, श्रम, वस्तू या सारख्या स्वरूपात सुद्धा देता येईल. आपले राहणीमान साधे ठेवता आले तर अवश्य ठेवा. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. मला सुधा मूर्तींचे उदाहरण येथे आठवते. त्या इन्फोसिस फ़ंड च्या अध्यक्षा आहेत. करोडो रुपयांच्या फंडाच्या मालक असलेल्या या सुधा मूर्ती कमालीच्या साधेपणाने राहतात. आणि इतरांना निःस्वार्थपणे मदत करतात. मी साधे राहायला सांगतो याचा अर्थ जीवनाचा आनंद घेऊ नका असा नाही. पण साधे राहून आणि आपल्या गरजा कमी करून सुद्धा जीवनाचा आनंद आपल्याला घेता येतो आणि दुसऱ्यालाही देता येतो. शेवटी साधेपणात त्याचे एक वेगळे सौंदर्य आहे. आणखी दोन गोष्टी सांगून मी थांबणार आहे. आपलं मन प्रसन्न ठेवा. त्यासाठी आपलं आवडतं संगीत ऐका .दिवसातून रोज थोडा वेळ तरी हसा. रोज परमेश्वराजवळ त्याचे आभार मानण्यासाठी आणि आपल्याला बळ देण्यासाठी मनापासून प्रार्थना करा. ती तुम्हाला मानसिक बळ देईल. आणि शेवटची गोष्ट जी माझी आई मला नेहमी सांगत असे आणि मी ती आजही पाळायचा प्रयत्न करतो. ती म्हणजे ' राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे .' आपणा सर्वांना ध्येयमार्गावर वाटचाल करण्यासाठी आणि ध्येय पूर्तीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१०/०५/२०२०

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा