मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग ध्येय निश्चितीच्या मार्गावर - भाग पाच

उगवतीचे रंग 

ध्येय निश्चितीच्या मार्गावर  - भाग पाच 

कालच्या लेखात स्वतःसाठी वेळ देणे आणि संयम, शक्ती,  ऊर्जा , उत्साह याबरोबरच मनाचा कणखरपणा आणि साहस हे गुण अंगी बाणवणे आणि त्या गुणांनी आपले व्यक्तिमत्व समृद्ध करण्याबद्दल आपण वाचले. हे गुण म्हणजे पुढील आयुष्याची शिदोरी असते. आयुष्यभर पुरणारी ऊर्जा असते. आपल्या ध्येयपूर्तीसाठी हे गुण सहाय्यकारक ठरतात. त्या गुणांनी मंडित झालेली व्यक्तिमत्वे स्वामी विवेकानंद, मेरी कोम आणि शिवाजी महाराज यांची उदाहरणेही आपण पाहिली . 

आता मी जे सांगणार आहे, ते थोडेसे धक्कादायक आहे. विचित्र वाटेल, पण खरे आहे. आपल्या ध्येयपूर्तीच्या आड कोणती गोष्ट येते माहिती आहे ? तर आपण स्वतःच्या व्यक्तिमत्वाला घालून घेतलेली मर्यादा, स्वतःच घालून घेतलेलं कुंपण. आपण सारखे असं म्हणत असतो, की ते माझे काम नाही. मला जमणार नाही. आणि त्यासाठी विविध कारणे सुद्धा पुढे करत असतो. मी गरीब आहे. म्हणून मला अमुक एक गोष्ट जमणार नाही. पण गरिबीतूनच पुढे आलेली आणि यशस्वी झालेली अनेक व्यक्तिमत्वे समाजात आपल्या अवतीभवती असतात. पण आपल्याला फक्त त्यांचे यश दिसते. ते ज्या परिस्थितीतून वर आले, ती आपण लक्षात घेत नाही. कोणी म्हणते की माझ्या पाठीशी कोणी नाही, माझ्यात तेवढी शक्ती नाही. आता माझे वय ती गोष्ट करण्याचे राहिले नाही. एक ना दोन अनेक गोष्टी. आणि मुख्य म्हणजे माझी ते करण्याची क्षमता नाही. या सगळ्या मर्यादा आपण स्वतःच स्वतःला घालून घेतलेल्या असतात. प्रत्येकाला काही मर्यादा निश्चितच असतात. यासाठीच तर स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे निरीक्षण आणि परीक्षण करता यायला हवे. त्याबद्दल मी पहिल्या भागात सांगितले होते. पण प्रत्येकाजवळ काही विशिष्ट क्षमता देखील असतात. आणि त्या क्षमतांमध्ये आपल्याला वाढ करता येते. पण आपल्याच क्षमतांची आपल्यालाच पुरेशी माहिती नसते. 

काही वर्षांपूर्वी आमचा एक ग्रुप हिमालयात ट्रेकिंगसाठी गेला होता. आठ दिवसांसाठी आम्ही गेलो होतो. बेस कॅम्पपासून रोज ठराविक अंतर चढत जायचे आणि हिमालयात भटकंती करायची आणि रोज वेगवेगळ्या ठिकाणी तंबू टाकून मुक्काम करायचा असं आमचं त्या ट्रेकिंगचं स्वरूप होतं . चालताना साधारण तीस किलो ओझं असणारी सॅक पाठीवर बाळगावी लगे. त्यात आमचेच कपडे आणि नित्याच्या लागणाऱ्या गोष्टी असत. रोज साधारण आठ ते दहा किमी अंतर आम्ही चालत असू. पण एके दिवशी आम्ही आमच्या ट्रेकिंगसाठी नेहमीपेक्षा लवकर सुरुवात केली. चालताना आमच्या गाईडने आम्हाला सांगितले की आज आपल्याला बावीस किमी चालायचे आहे. ते ऐकल्यावर आम्ही हबकलोच. पाठीवर तीस किलो सामानाचे ओझे घेऊन एवढे चढायचे म्हणजे काही खरे नाही. बऱ्याच जणांनी एकदम एवढे अंतर नको म्हणून सांगितले. पण प्रोग्रॅम ठरलेला होता. मध्ये थोडे उठबसत आम्ही ते अंतर पूर्ण केले. त्यावेळी आमचा गाईड जे म्हणाला ते वाक्य माझ्या आजही लक्षात आहे. आमचे गाईड म्हणून जे गृहस्थ होते त्यांचे वय सुमारे पासष्ट वर्षे असावे. पण त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. ते सतत आमच्या पुढे असायचे. त्यांनी त्यावेळी म्हटलेलं एक वाक्य आजही माझ्या लक्षात आहे. ते म्हणाले होते, ' आपल्या बॉडीमध्ये इमेन्स पॉवर असते. पण आपण ती पूर्णपणे कधीच वापरत नाही. ' मी मुद्दाम इंग्रजी शब्द दिले. कारण ते त्यांचे मूळ शब्द होते. ही बॉडीतली इमेन्स पॉवर म्हणजे आपली शारीरिक आणि मानसिक सुद्धा क्षमता. ही क्षमता नसती तर आम्ही ते अशक्य वाटणारे बावीस किमी अंतर कसे चाललो असतो ?  ही आपली क्षमता आपण पूर्णपणे कधीच वापरत नाही. एवढेच नाही तर रोजच्या सरावाने आपण त्या क्षमतेत वाढ करू शकतो. मी जर रोज चार सूर्यनमस्कार घालू शकत असेन तर सहासात सुद्धा मी नक्कीच घालू शकतो. आणि काही दिवसांनी मी बारा सूर्यनमस्कार निश्चितपणे घालू शकेन. रोज चालताना मी दोन किमी मी चालत असेन , तर तीनचार किमी मी निश्चित चालू शकतो. पण स्वतःला मला हे शक्य नाही असे म्हणून मर्यादा घालून घेत असतो. आपल्याकडे दरवर्षी पंढरपूरच्या वारीला चालत जाणाऱ्या वारकऱ्यांचे उदाहरण आपल्यासमोर आहे. ते शेकडो किमी केवळ पांडुरंगाच्या ओढीने चालत जातात. कारण पांडुरंग हे त्यांचे ध्येय आहे. आणि ते ध्येय ते गाठतातच. आपले ध्येय गाठणे आणि आपली क्षमता आणि सहनशक्ती वाढवणे याचे वारकरी हे आदर्श उदाहरण आहे असे मला वाटते. 

काही वेळा आपल्या मनात एखाद्या गोष्टीची भीती सुद्धा ठाण मांडून बसलेली असते. मला अमुक एक गोष्ट जमणारच नाही असा ठाम निश्चय आपण केलेला असतो. आपल्याला आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना ही भीती मोठा अडसर ठरते. भीती ही एक प्रकारची नकारात्मक भावना आहे. ती आपणच निर्माण केलेली असते. अशा अनेक गोष्टी असतील, की ज्या करायला आपण भीत असतो. तो आपल्या मनाचा दुबळेपणा असतो. अशा कोणकोणत्या गोष्टींची आपल्याला भीती वाटते ते सुद्धा एकदा डायरीत लिहून काढा. जसे आपण आपले ध्येय त्यात लिहिले तसे. आणि मग ठरवून त्या गोष्टी करा की ज्यांची तुम्हाला भीती वाटते. आणि तुम्हाला आश्चर्यकारक अनुभव येईल. तुम्हाला लक्षात येईल की इतके दिवस ज्या गोष्टीला आपण घाबरत होतो, ती आपण करू शकतोय. त्या भीतीच्या भावनेतून तुम्ही मुक्त व्हाल. आणि एक वेगळा आनंद उपभोगाल. तुम्हाला एक अनुभव आला असेल की कधी कधी वाहनावर जाताना रस्त्यावरची कुत्री आपल्या मागे लागतात.  भीतीने आपण जेवढे वेगात वाहन चालवू किंवा पळू, तेवढी ती आपल्या मागे येतात. पण त्यांना न भिता तुम्ही थांबलात, तर ती निघून जातात. ' भित्यापाठी ब्रह्मराक्षस ' हे आपल्याला माहित आहेच. 

एक व्यापारी आपले उंट घेऊन वाळवंटातून प्रवास करत होता. दिवसा तो प्रवास करीत असे. आणि रात्र झाली की कुठेतरी मुक्काम करायचा. आपल्या उंटांना सुद्धा बांधून ठेवायचा. सकाळी पुन्हा आपला प्रवास सुरु करायचा. एके दिवशी मुक्कामाच्या ठिकाणी त्याच्या लक्षात आले की आपण उंटांना ज्या दोराने बांधतो, तो दोरच कुठेतरी राहिला आहे. त्याला मोठी चिंता पडते. रात्रीतून आपले उंट कुठे निघून जातील ही भीती त्याच्या मनात असते. त्याचा नोकर हुशार असतो. तो म्हणतो की मालक, तुम्ही काही काळजी करू नका. तो फक्त त्या उंटांना बांधण्याच्या जागेवर घेऊन जाऊन बांधल्याचे फक्त नाटक करतो. आणि काय आश्चर्य...! सकाळी सगळे उंट जागेवरच असतात. हे  का घडते ? त्या उंटांनी मनाशी हे समजून घेतलेले असते की आपल्याला बांधलेलंच आहे. अशीच अदृश्य, न दिसणारी बंधने आपण स्वतःवर घालून घेतलेली असतात. ती दुसरे कोणी तोडू शकत नाही. म्हणून मला या गोष्टी जमणार नाहीत, अमुक एक गोष्टींची मला भीती वाटते, माझी ती पात्रताच नाही यासारखी कितीतरी बंधने आपल्या ध्येयपूर्तीच्या आड येत असतात. ती तुम्हालाच तोडावी लागतील. नाहीतर त्या उंटांसारखे दोराने बांधलेले नसताना सुद्धा आपणही बांधलेलंच राहू. आणि बांधलेलं कोणाला आवडतं ..? ( क्रमशः )

विश्वास देशपांडे , चाळीसगाव 
८/५/२०२०
भ्रमणध्वनी ९४०३७४९९३२











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...