मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग ध्येय निश्चितीच्या मार्गावर : भाग चार

उगवतीचे रंग 

ध्येय निश्चितीच्या मार्गावर : भाग चार 

कालच्या लेखात आपण छोटी किंवा मोठी उद्दिष्टे कशी ठरवायची आणि ती साध्य करण्यासाठी काय काय करायचे हे पाहिले . तरी थोडक्यात त्याची उजळणी करू. आपले ध्येय सतत डोळ्यांसमोर ठेवणे, ते एखाद्या वहीत किंवा डायरीत लिहून ठेवणे, त्यासंबंधी आवश्यक ती माहिती किंवा चित्रे त्या वहीत लावणे, आपण साध्य करणार असलेल्या ध्येयाबाबत आपल्या संबंधितांना माहिती देणे आणि त्यासंबंधी एक कालमर्यादा ठरवून घेणे या त्या गोष्टी होत्या. 

 एकदा का आपण  हे ध्येय मनाशी ठरवले, तर त्या दृष्टीने प्रयत्नांचे सातत्य ठेवावे लागणार आहे. आपल्या व्यक्तिमत्वाचा सततचा विकास किंवा स्वतःमध्ये सतत सुधारणा करीत राहणे हे आपल्या ध्येयपूर्तीच्या दृष्टीने आवश्यक ठरते. ही  वैयक्तिक सुधारणा आहे आणि ती करण्यासाठी आपल्याला स्वतःसाठी काही वेळ द्यावा लागणार आहे. एक महत्वाची गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे आपल्याला जर बाह्य जगात यश मिळवायचे असेल तर, आधी आपल्याला आपले अंतरंग सुधारले  पाहिजे. कारण आपण स्वतः जर स्वतःमध्ये सुधारणा करू शकलो नाही, तर मग बाह्य जगतात आपल्याला हवी असलेली गोष्ट आपण कशी मिळवू शकू ? जो आधी स्वतःला सुधारू शकतो, सांभाळू शकतो, तोच आपले कुटुंब, आपला समाज, आपली संस्था आणि आपला देश सांभाळू शकतो. म्हणून आधी स्वतःचे मन, शरीर आणि आत्मा यांचे पोषण करता यायला हवे. स्वामी विवेकानंदानी पाश्चिमात्य जगतात हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याआधी आपले व्यक्तिमत्व संयम, उत्साह, शक्ती आणि ऊर्जा या गुणांनी समृद्ध केले होते. अशा या समृद्ध व्यक्तिमत्वाची छाप मग तेथील पाश्चात्य जगतावर सहज पडली त्यात नवल ते काय ? म्हणून आपल्यालाही आपले अंतरंग संयम, उत्साह, शक्ती आणि ऊर्जा या गुणांनी समृद्ध करायला हवे. असे आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी स्वतःला वेळ द्यावा लागेल हे उघड आहे. पण जो काही वेळ तुम्ही स्वतःसाठी द्याल, त्याचा फायदा पुढे तुम्हाला तुमच्या आयुष्यात झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा का या गुणांनी तुमच्या अंतरंगात, व्यक्तिमत्वात शिरकाव केला, की मग बाह्य जगात जे यश तुम्ही मिळवू इच्छिता , ते सहज मिळेल. 

जी व्यक्ती आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात सुधारणा करण्यासाठी वेळ देते, तीच व्यक्ती इतरांच्या जीवनातही सुधारणा घडवून आणू शकते. लोकमान्य टिळकांना जेव्हा आपली प्रकृती अशक्त आहे, असे लक्षात आले, तेव्हा त्यांनी स्वतःच्या विकासासाठी एक वर्ष दिले. या कालावधीत व्यायाम, वाचन इ गोष्टी करून स्वतःला समृद्ध केले. याचा उपयोग त्यांना आपल्या पुढील आयुष्यात देशसेवेसाठी करून घेता आला. आपणही असं काही करू शकतो. आपल्या विकासासाठी काय करायचं हे आता तुम्हाला आता ठरवता आलं पाहिजे. श्रेयस आणि प्रेयस मधला फरक कळला पाहिजे. आपण निश्चयपूर्वक दररोज ध्यान, योग, व्यायाम, वाचन आणि आपल्या आवडत्या छंदासाठी किंवा कलेसाठी वेळ द्यावा. त्याच्यातून आपल्याला एक आंतरिक ऊर्जा प्राप्त होईल. ही अधिकची ऊर्जा तुम्हाला रोजच्या कार्यासाठी बळ देईल. 

आपल्या व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होण्यासाठी  संयम, उत्साह, शक्ती  या गुणांसोबतच मानसिक कणखरपणा आणि साहस या गोष्टी देखील आवश्यक आहेत. कारण जीवनातील कठीण प्रसंगांना, संकटाना तोंड द्यायची वेळ जेव्हा येते, तेव्हा भले भले लोक हतबल होतात. परिस्थितीला शरण जातात. पण ज्यांच्याजवळ मानसिक धैर्य, कणखरपणा असतो, ते अशा प्रसंगांना धैर्याने सामोरे जातात. संकंटांचे  रूपांतर अशा व्यक्ती संधीमध्ये करतात. साहस हा तर फार मोठा गुण आहे. तो तुम्हाला अनोळखी क्षेत्रात काम करण्यासाठी, जोखमीचे निर्णय घेण्यासाठी आणि आव्हानात्मक परिस्थितीत टिकून राहण्यासाठी मदत करतो. मेरी कोम ही बॉक्सिंग चॅम्पियन अपल्याला माहिती आहे. ती वर्ल्ड चॅम्पियन आहे. घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. पण सगळी गोष्टींवर तिने आपल्या जिद्दीने मात केली. कारण एकच . सतत तिच्या डोळ्यांपुढे आपले ध्येय होते. ते म्हणजे बॉक्सिंग चॅम्पियन बनण्याचा ध्यास. हाच ध्यास तिचा श्वास झाला होता. आणि या जोडीला तिच्याजवळ होते,आपल्या ध्येयावर अढळ निष्ठा, संयम, शक्ती, ऊर्जा, साहस आणि मनाचा कणखरपणा हे गुण . त्यांच्या आधारावर तिने प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आणि जग जिंकले. पुढे ती तीन मुलांची आई झाली आणि आता तिचं करिअर संपुष्टात येईल असा विचार करणाऱ्या लोकांना तिने पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन बनून धक्का दिला. त्याआधी तिला नावं ठेवणारे आणि तिच्या ध्येयापासून परावृत्त करणारे भरपूर लोक होते. स्वामी विवेकानंद म्हणतात, ' स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील. ' आणि मेरी कोमच्या बाबतीत हे विधान अक्षरशः खरं ठरलं. 

शिवाजी महाराजांचे उदाहरण आठवा . मोगल सत्ता केवढी प्रबळ होती..! आणि शिवरायांच्या जवळ होते मूठभर मावळे. पण त्याही परिस्थितीत स्वराज्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. अशा आव्हानात्मक परिस्थितीत दुसऱ्या कोणी मराठी साम्राज्य स्थापन करण्याचे स्वप्न देखील पाहिले नसते. पण ते मराठी साम्राज्य स्थापन करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. स्वप्न नुसते पाहून चालत नाही. त्याचा पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठी मनाचा कणखरपणा, संयम, साहस, आणि प्रसंगावधान हे गुण त्यांनी अंगी बाणलेले होते. प्रसंगी दोन पावले माघार घ्यायची तयारी ठेवली होती. ती फक्त आपल्या ध्येयपूर्तीसाठी. या गुणांच्या जोरावरच त्यांनी औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला आव्हान दिले आणि मराठी स्वराज्य स्थापन करून दाखवले. कोणत्याही यशस्वी पुरुषांचे उदाहरण घ्या. त्यांनी या गुणांची जोपासना केली म्हणूनच ते यश मिळवू शकले. ( क्रमशः )

विश्वास  देशपांडे, चाळीसगाव. 
६/५/२०२०
भ्रमणध्वनी ९४०३७४९९३२








 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...