मुख्य सामग्रीवर वगळा

ध्येय निश्चितीच्या मार्गावर - भाग तीन

उगवतीचे रंग

  ध्येयनिश्चितीच्या मार्गावर - भाग तीन

ध्येयनिश्चितीच्या मार्गावर या लेखमालेचे भाग एक आणि भाग दोन आपण पाहिले . आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे तीन स्तरावर परीक्षण कसे करायचे हे आपण पहिल्या भागात पाहिले. दुसऱ्या भागात आपली एकाग्रता कशी वाढवता येईल आणि तिचा उपयोग आपल्या आवडीच्या कला किंवा छंद जोपासण्यासाठी कसा करता येईल हे पाहिले . ती कला किंवा तो छंद आपल्या जीवनाला आकार देऊ  शकतो असा असावा. हळूहळू त्यात सरावाने परिपूर्णतेकडे वाटचाल होऊ लागते.

आपल्याला आपले ध्येय ठरवण्याच्या दृष्टीने काही गोष्टी आज जाणून घ्यायच्या आहेत. खरं म्हणजे त्यासाठी स्वतःला वेळ द्यायला हवा. या दृष्टीने कोरोना ही इष्टापत्ती म्हटली पाहिजे. कारण आपण सगळे घरी निवांत आहोत आणि आपल्याजवळ स्वतःला देण्यासाठी भरपूर वेळ आहे. मागच्या एका लेखात मी श्रेयस आणि प्रेयस म्हणजे काय हे सांगितले होते. ज्यांनी ते वाचले नसेल त्यांच्यासाठी थोडक्यात पुन्हा सांगतो. श्रेयस म्हणजे ज्या गोष्टी अंतिमतः आपल्या हिताच्या आहेत अशा गोष्टी. आणि प्रेयस म्हणजे आपल्याला प्रिय असणाऱ्या किंवा आवडणाऱ्या गोष्टी. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी या आपल्या आयुष्यातील यशाच्या दृष्टीने हितकारक असतीलच असे नाही. आणि श्रेयस म्हणजे हितकारक गोष्टी आपल्याला प्रिय असतील असेही नाही. पण आपले अंतिम हित लक्षात घेऊन श्रेयस्कर गोष्टी करणे आपल्या हिताचे ठरते. त्यामुळे आता आपल्या जवळ वेळ असल्याने आपण त्यांचा विचार करू शकतो. उदाहरणार्थ, आपले आरोग्य सुधारण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी रोज काहीतरी व्यायाम करणे. आपल्याला भविष्यात जे काही करिअर करायचे आहे, त्यासाठी आवश्यक ती कौशल्ये प्राप्त करणे, त्यासाठी वाचन करणे अशा अनेक गोष्टी श्रेयस या सदरात येऊ शकतील. श्रेयस आणि प्रेयस यांचा समतोलही आपल्याला साधता येईल.

ध्येय ठरवताना दोन प्रकारची उद्दिष्टे आपण आपल्या समोर ठेवू शकतो. एक म्हणजे आपल्या संपूर्ण आयुष्याच्या दृष्टीने आपले ध्येय ठरवणे. आपल्याला पुढील आयुष्यात नेमके काय करायचे आहे ते मनाशी निश्चित करणे. ही आपल्या भावी आयुष्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक म्हणू या हवं तर ! आणि दुसरं म्हणजे तात्कालिक छोटी छोटी उद्दिष्टे ठरवणे. जसे की आपले आरोग्य सुधारणे, वजन कमी करणे किंवा वाढवणे, एखादी कला शिकणे, स्वतःचे एखाद्या विषयातील ज्ञान वाढवत जाणे इ. तुमचे ध्येय तात्कालिक असो किंवा संपूर्ण आयुष्यासाठीचे असो, त्याच्या यशासाठी पद्धतशीर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

जी गोष्ट तुम्ही पाहू शकत नाही, त्या गोष्टीवर तुम्हाला लक्ष केंद्रित करणे शक्य नाही. म्हणून जे काही आपल्याला करायचे त्याचे स्वप्न आधी पहा. ती गोष्ट डोळ्यांसमोर आणा . अर्जुनाला फक्त पक्ष्याचा डोळा दिसत होता, हे आपल्याला माहिती आहे. पण पक्ष्याचा डोळा तेव्हाच दिसेल, जेव्हा पक्षी समोर असेल. म्हणून आपल्यालाही आपले ध्येय सतत डोळ्यांसमोर दिसले पाहिजे. समजा, तुम्हाला एक यशस्वी वक्ता व्हायचे आहे, तर त्यासाठी तुम्ही आपण एक चांगला, उत्तम  वक्ता झालो आहोत अशी  प्रतिमा डोळ्यांसमोर आणा . एखाद्या डायरीमध्ये हे आपले उद्दिष्ट लिहून ठेवा की मला उत्तम वक्ता व्हायचे आहे. त्या दृष्टीने काही चांगले आणि तुम्हाला आवडणारे वक्ते डोळ्यांसमोर आणा . त्यांची चित्रे मिळाल्यास ती आपल्या डायरीत किंवा वहीत लावून ठेवा. कदाचित आपल्याला असे वाटेल की लिहून ठेवण्याची काय आवश्यकता आहे ? पण लिहून ठेवले म्हणजे त्यानिमित्ताने तुमचे ध्येय तुमच्या डोळ्यांसमोर राहील. दुसरी गोष्ट म्हणजे त्या दृष्टीने कोणकोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे, याचाही मनाशी विचार करा. मग त्यादृष्टीने वाचन करणे असेल, आरशासमोर उभे राहून बोलण्याचा सराव करणे असेल, ते करा. चांगल्या वक्त्यांची भाषणे ऐका . अशा भाषणांचे ऑडिओ व्हिडीओ यु ट्यूबवर किंवा अन्यत्रही उपलब्ध आहेत. त्या संदर्भात काही पुस्तकेही आहेत. समजा तुम्हाला व्यायामाने आपले शरीर पिळदार करायचे आहे, तर स्वतःचे तसे चित्र डोळ्यांसमोर आणा . आणि त्यासाठी वरीलप्रमाणेच सर्व गोष्टी करा.

पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे काही ठरवले आहे, ते आपल्या घरात किंवा आपल्या मित्रांसमोर जाहीर करा. याचा उद्देश असा की त्यांनाही माहिती होऊ द्या की तुम्ही काय ठरवले आहे. ही गोष्ट तुम्हाला कदाचित विचित्र वाटेल. पण ती तुमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी तुमच्यावर सकारात्मक दबाव आणेल. आपल्यावर कुठलातरी सकारात्मक दबाव असला, तर आपल्याला काम करण्यासाठी तो प्रेरित करतो, भाग पाडतो. म्हणून हे आपल्याला करायचे आहे. मी जेव्हा उगवतीचे रंग ही लेखमाला लिहायचे ठरवले, तेव्हा माझ्या वाचकांना मी जाहीर केले की मी रोज सकाळी ' उगवतीचे रंग ' या लेखमालेतून  आपल्याला भेटायला येणार आहे. मी साधारणपणे १२/१३ फेब्रुवारीला ही घोषणा केली होती. साधारणपणे एक दीड महिना तरी लिहावे असे मी मनाशी ठरवले होते. पण आज सुमारे अडीच महिन्यानंतर सुद्धा मी लिहिणे थांबवलेले नाही. अशा रीतीने  साहजिकच वाचकांबरोबर त्या वेळी केलेल्या कमिटमेंटचा फायदा मला झाला असे मी मानतो. आता माझ्या वाचकांचा माझ्यावर हा सकारात्मक दबाव आहे. म्हणून मग मी लिहित राहिलो आहे.  मला कंटाळा किंवा आळस करून चालणार नाही. अशी कमिटमेंट आधी आपल्या स्वतःबरोबर करा आणि आपल्या नातेवाईक किंवा मित्रमंडळींना सुद्धा ते सांगा. आणि मुख्य म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहा. कारण तसे नाही केले तर आपण आपल्या स्वतःलाच फसवू.

आणि आणखी एक महत्वाची गोष्ट. आपल्या या अशा प्रकारच्या तात्कालिक ध्येयासाठी स्वतःच एक कालमर्यादा आखून घ्या. जशी मी आखलेली होती. कारण तो सुद्धा एक सकारात्मक दबावाचाच प्रकार आहे. कुठलीही नवीन गोष्ट करण्याचा आपण निश्चय केला असेल, तर त्यासाठी महिना दीड  महिन्याची कालमर्यादा स्वतःच ठरवून घ्या. .मग ते व्यायाम करणे असेल, ध्यान किंवा योग करणे असेल, आपले वजन कमी करणे किंवा वाढवणे असेल, काहीही असू द्या. असे करण्याचे कारण म्हणजे  त्या दिवसात तुम्हाला ती सवय लागेल. आणि एकदा सवय लागली की मग ती गोष्ट आपल्या दिनक्रमाचा एक भाग भाग होऊन जाते.  ( क्रमश : )

©️  विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
      ६/५/२०२०
  भ्रमणध्वनी ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...