मुख्य सामग्रीवर वगळा

समृद्धीचे महावृक्ष - भाग दोन

उगवतीचे रंग 

समृद्धीचे महावृक्ष - भाग दोन 


माझ्या सुदैवाने मला अशी अनेक समृद्ध झाडं पाहण्याचं भाग्य लाभलं आहे. त्यांच्या सोबतीत मी काही काळ घालवला आहे. जो जो मी त्यांच्या सावलीत बसायचोतो तो मला वाटायचंकी अरे आपण फारच कमी वेळ देतोय यांना . समुद्र किनाऱ्यावर बसावं आणि खेळण्यासाठी हातात वाळू घ्यावीपण ती वाळू आपल्या हातातून निसटून जातेतसे अनेक मौल्यवान क्षण माझ्या हातून निसटून गेले. कदाचित वाळूच्या ऐवजी रत्न माझ्या हाती लागली असती. पण बऱ्याच वेळेला मी ती संधी गमावली. 

आमचे एक फॅमिली डॉक्टर होते. डॉ श्यामकांत देव. नावाप्रमाणेच देवमाणूस. मध्यम उंचीचेहऱ्यावर विलक्षण तेज. आणि काही शब्दातच समोरच्याचं मन जिंकून घेण्याची शक्ती असं लाघवी बोलणं. कोणालाही त्यांचा सहवास हवाहवासा वाटे असं त्यांचं लोभस व्यक्तिमत्व होतं. उतारवयात त्यांची अर्धांगिनी त्यांना सोडून गेली. त्यांच्या सौ. या मराठीच्या नामवंत प्राध्यापिका. त्यांच्याबद्दल बोलणे हा ही एक स्वतंत्र लेखाचा विषय.  तर या डॉ देवांना पत्नीचे निधन झाल्याने आणि मुले बाहेरगावी असल्याने त्यांनी बांधलेला टुमदार बंगला विकावा लागला. कारण आता ते एकटेच राहणार होते. आणि एवढ्या बंगल्याची देखभाल करण्यापेक्षा एक छोटीशी सदनिका घेणे त्यांनी पसंत केले. 

योगायोगाने माझ्या शेजारी एका छोट्याश्या सदनिकेत ते राहायला आले. त्यांचे वाचन अफाट होते. इंग्रजी आणि मराठी सुद्धा. महाविद्यालयातील प्राध्यापकांना सुद्धा लाजवील असा त्यांचा व्यासंग होता. बोलता बोलता अनेक संदर्भ सहज त्यांच्या बोलण्यातून मोरपिसाऱ्यासारखे सहज उलगडत. जणू एक अजब एन्सायक्लोपीडिया. अनेक आठवणींचा आणि अनुभवाचा खजिना ते रिता करीत. सहज. बोलता बोलता. मला जेवढे टिपून घेता येतील तेवढे अमृतकण मी टिपून घ्यायचो. ती देव वाणी म्हणजे अमृतवाणीच असायची जणू..! अनेक वर्षे ते येथील वाचनालयाचे अध्यक्ष होते. आणि वाचनालयासारख्या संस्थेत अध्यक्षपदी अशीच माणसे असली पाहिजेतनाही का ?

त्यांच्या आठवणींना आणि अनुभवाला मायेचामाणुसकीचा परिसस्पर्श असायचा. नुसत्या कोरड्या शब्दांना काही अर्थ नसतो. अर्थ असला तरी ते हृदयापर्यंत पोहोचत नाहीत. मनाच्या आतील गाभाऱ्यात मायेचा जो ओलावा असतो नात्यात भिजून ते शब्द आले म्हणजे समोरच्याच्या मनाचा ठाव घेतात. असेच त्यांचे शब्द असायचे. खरं तर त्यांच्याबद्दल लिहिणं हा एका स्वतंत्र लेखाचा किंवा पुस्तकाचा विषय होऊ शकतो. पण त्यांच्याबद्दल पुन्हा कधीतरी बोलेन. तर या महावृक्षाने मला वेळोवेळी भरभरून दिलं. त्यांच्या बोलण्यातून पु ल देशपांडे, ग दि माडगूळकर यांच्यासारखे अनेक साहित्यिक जिवंत व्हायचे. तसा  त्यांना बऱ्याच साहित्यिकांचा  सहवासही लाभला होता. बाबा आमटे यांच्या आनंदवनात ते वर्षातून काही काळ सेवा करण्यासाठी सुद्धा जात असत . पूरभूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीत ते आपली वैद्यकीय सेवा देण्यासाठी धावून जायचे.  त्यांची ही अमृतवाणी साठवून घेताना खरं म्हणजे माझीच ओंजळ अपुरी पडायची.

असा आणखी एक महावृक्ष भेटला तो आमच्या वकील काकांच्या रूपाने. अँड मु चिं देशपांडे यांच्या रूपात. या काकांजवळ अनुभवाचा समृद्ध खजिना होता. त्यांनाही काकू अर्ध्या वाटेवर सोडून गेल्या होत्या. आणि नंतर ते काही वर्ष एकटेच राहत होते. रोज संध्याकाळी ते माझ्या घरी बाबांना भेटायला यायचे. पण ते निमित्त असायचं. आले की मला हाक मारायचे. आणि मग माझ्या जवळ आपला अमूल्य खजिना भरभरून खुला करायचे. या खजिन्यातून जीवन आनंदी कसं जगावंजगताना कोणती खबरदारी घ्यावीजीवनातले धोके कोणते याचं  सार  नकळत गप्पांमधून उलगडायचं. या सगळ्या त्यांच्या समृद्ध अनुभवांना त्यांच्या वकिली व्यवसायातील विविध भलेबुरे अनुभव आणि किस्से यांची खुमासदार जोड असायची. त्यांनी आपल्या आयुष्यात जीवनाचा खरा आनंद घेण्याचा प्रयत्न केला. जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारत ते सहलींच्या निमित्ताने फिरले. म्हणून त्यांचे मलाही सांगणे असायचे की दार महिन्याच्या आपल्या पगारातून थोडी थोडी शिल्लक टाकत जा. आणि निरनिराळ्या ठिकाणी सहकुटुंब सहलींना जा. जीवनाचा आनंद घे. मी रोज भरपूर वाचन करायचो, ते म्हणायचे वाचनासोबत रोज  थोडे थोडे काहीतरी लिहीत जा. तू छान लिहितोस. आणि समर्थ रामदासांची उक्ती नेहमी त्यांच्या ओठावंर असायची. दिसामाजी काहीतरी ते लिहावेप्रसंगी अखंडीत वाचीत जावे. '

मला भेटलेलं आणखी एक व्यक्तिमत्व म्हणजे शरदकाका अडावदकर. ते व्यवसायानं एक उत्तम वास्तुविशारद होते. देशविदेशात जाऊन आलेले. अनेक ठिकाणचे अनुभव घेऊन समृद्ध झालेले. ते आहेत अजून. वेळ मिळाला की मी या वृक्षाच्या सहवासात जाऊन बसतो. त्यांच्याकडून कितीतरी गोष्टी मी शिकलो आहे. त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी खूप माणसे जोडली. आणि प्रत्येकाशी अगदी जिव्हाळ्याचे नाते . त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला कधी मुलाचं तर कधी भावाचं नातं लावायचे. मुलींना सूनमुलगी असे हक्काने म्हणायचे. त्यामुळे अशा रक्तापलीकडची नाते असलेल्या  नातलगांची त्यांच्याकडे नेहमीच वर्दळ असायची. त्यांना आणि सौ अडावदकर काकूंना माणसाचा, आल्यागेल्याचा कधीच कंटाळा नव्हता. अशा रीतीने सगळी मंडळी त्यांची जवळची नातेवाईक झाली होती. त्यांच्याकडे कोणी आले तर माझ्याबद्दल ते सरळ सांगतकी हा माझा पुतण्या आहे. माणसांना आपलंस कसं करून घ्यावं हे त्यांनी उदाहरणातून शिकवलं. माणसं कशी जोडावी, हे मी त्यांच्याकडून शिकलो. त्यांच्या या स्वभावामुळे  ते कधी कोणत्या डॉक्टरांकडे गेले तरी डॉक्टर त्यांच्याकडून फी घेत नसत. अत्यंत उमदं असं हे व्यक्तिमत्व. त्यांचंही वाचन उत्तम. आणि आठवणींचा खजिना तर समृद्धच. त्यांच्या गप्पागोष्टी ऐकताना वेळ कसा निघून जायचा हे कळत नसे.

मला अशा अनेक महावृक्षांनी आपल्याजवळील अनुभवाची पक्व फळे देऊन भरविले आहे. पण ते घेण्यात कदाचित मीच कमी पडलो असेन . असे म्हणतात की माणूस शेवटपर्यंत शिकतच असतो. ज्याला आपण शिकलो असे वाटते त्याची प्रगती संपते. म्हणून विद्यार्थी होऊन राहण्यात मजा आहे. असे अनेक महावृक्ष आपल्या अवतीभवती सुद्धा असतील. त्यांचा जरूर शोध घ्या. त्या महावृक्षांपुढे थोडे झुका. एका कवितेत म्हटले आहे

वृक्ष लावणारे निघोनिया जातीतळी विसावती सानथोर.
तेव्हा हे वृक्ष आहेत तोपर्यंतच त्यांच्या तळाशी बसून घ्यावं.

                       ©️विश्वास देशपांडेचाळीसगाव.
                         ३/५/२०२०
                       भ्रमणध्वनी ९४०३७४९९३२





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...