उगवतीचे रंग
आनंदाच्या गावा जावे ...
मराठी आणि हिंदी चित्रपटातील काही गाणी रसिकांची हमखास आवडती असतात. कोणाला दर्दभरी गाणी आवडतात तर कोणाला आनंदी मूड असणारी. मी पण सगळ्या प्रकारची गाणी ऐकतो. पण माझी आवड म्हणजे मूड आनंदी करणारी गाणी. मग ती मराठी, हिंदी कोणतीही असो. अशी खूप आवडीची गाणी आहेत. काही गाण्यांबद्दल मी मागे लिहिलं आहे. जसं ' साथी ' चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायिलेले ' ये कौन आया रोशन हो गयी ..' या गाण्यातल्या सिमी गरेवालचा चेहरा पाहत राहावा इतका आनंदी आणि प्रसन्न आहे. तर ' लव्ह इन टोकियो ' मधलं लताजींनीच गायीलेलं ' मुझे तुम मिल गये हमदम ...' या गाण्याच्या वेळी आशा पारेखचा अभिनय बघत राहावा असा अप्रतिम. एकाच वेळी चेहऱ्यावर आनंद आणि अश्रू अशा दुहेरी भावना दाखवण्याची तिची किमया लाजवाब. तोडच नाही. या गाण्यांबद्दल माझ्या पहिल्या पुस्तकात म्हणजे ' कवडसे अंतरीचे..सोनेरी ' मध्ये मी एक खास लेख सविस्तर लिहिला आहे.
रसिकहो, आणखी काही गाण्यांचा उल्लेख मी थोडक्यात करणार आहे. पण लेख मात्र गाण्यांवर नाही बरं ..! आपल्याला जायचं आहे ते आनंदाच्या गावालाच. पण जाता जाता या काही मधुर गीतांची सफर घडवू या म्हणून तर हा प्रपंच...! नमनाला घडाभर तेल म्हणतात ते हेच..! पण काय करू ? राहवत नाही. तशी खूप गाणी आहे की जी तुम्हाला ठेका धरायला लावतात. तुमचा मूड प्रसन्न करतात. घर चित्रपटातली दोन गाणी तर अप्रतिमच. आजही अनेकांची आवडती असलेली रेखा या अभिनेत्रीचा या गाण्यातला अभिनय म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच. ऑडिओ ऐका . कान तृप्त होतील. आणि व्हिडीओ पाहिला तर कान आणि डोळे दोघांना मेजवानी. पहिलं गाणं आहे, ' आजकल पाँव जमीपर नही पडते मेरे..' आणि दुसरं गाणं आहे, 'आपकी आंखोमे कुछ..' या दुसऱ्या गाण्यातला रेखा आणि विनोद मेहरा यांच्या आनंदी चेहेऱ्यावरचे भाव तर पाहत राहावा असे. त्यांचा आनंद पाहून आपलाही आनंद द्विगुणित होतो. आणि या गाण्यात लताजी आणि किशोरकुमार यांची गाण्याची जुगलबंदी तर अप्रतिमच. आणि त्या जोडीला गीतकाराचे लाजवाब शब्द. गीतकार कोण म्हणून विचारताय ? गुलजार साहेब. दुसरं कोण असणार ? आणि संगीत आर डी बर्मन . त्या गाण्यात रेखाचं प्रसन्न हसणं आणि त्याला गुलजार यांनी दिलेली उपमा बघा. ' लब हिले तो मोगरे के फुल खिलते है कहीं ...' यासाठी हे गाणं प्रत्यक्षच बघावं. आणि आणखी तिसऱ्या गाण्याबद्दल थोडक्यात सांगून मी तुम्हाला पुढे आनंदाच्या गावाला नेणार आहे. तिकडे जाण्यासाठी टाळेबंदी नाही. गाड्या, बसेस सगळं सुरु आहे. फक्त तुम्ही बसायचा अवकाश.. !
आणखी एक असंच टवटवीत, आनंदी, फ्रेश गाणं आहे ' रखवाला ' या चित्रपटातलं. या गाण्यात पडद्यावर आपल्यासमोर नायक आणि नायिका म्हणून येतात धर्मेंद्र आणि लीना चंदावरकर. हेही गाणं लता दीदींनीच गायीलेलं . गाणं आहे ' मेरे दिल ने जो मांगा मिल गया..' या गाण्यात लता मंगेशकर यांनी जबरदस्त एनर्जी ओतलेली आहे. आणि तसाच जबरदस्त एनर्जी ओतलेला अभिनय आहे लीना चंदावरकरचा. आनंद आणि उत्साह इतका की जणू उतू जाणारं दूध. तिला इतका आनंद झाला आहे की ती म्हणते, ' मेरे दिल ने जो मांगा, मिल गया..' अशी अवस्था फार कमी वेळा येते, नाही का ? आणि त्या गाण्यातले पुढचे शब्दही किती छान आहेत बघा, ' मुह छुपाकर गया है अंधेरा, मेरे जीवन का आया सवेरा . ' अहो, आपण इतकं आनंदानं काठोकाठ भरलेलं असताना तो 'अंधेरा ' कशाला राहील ? त्याला तर तोंड लववून पळून जावंच लागणार आहे ना.. ! मला खात्री आहे की लेख वाचून संपवल्यावर आज तुम्ही ही गाणी पुन्हा एकदा यु ट्यूबवर पाहणार नाहीतर ऐकणार. आणि पाहिलीच पाहिजे. आनंद असा सगळ्यांनी वाटून घ्यायचा असतो यार. आणि खरं सांगू का ? मला कधी कधी असं वाटतं की हा जो आनंद आहे ना तो एखाद्या व्हायरस सारखाच आहे. एकाला झाला की दुसऱ्याला होतो. पण यात धोका नाही काही. हा आनंदाचा व्हायरस आहे. तर वाटा ना लेको ..!
तर मंडळी, या सगळ्या आनंदी गाण्यांवरून विचार आला की आनंद कसा आणि कुठे मिळेल ? तर आता आपण जाऊ तिकडेच. आपलं लास्ट डेस्टिनेशन कोणतं ? माहिती आहे ना ! अहो, असं काय करताय ? ' आनंदाचं गाव. ' तिकडे जायचंय. तिकीट घेतलंच असेल सगळ्यांनी. मी आता तुम्हाला जे सांगतो ते नीट ऐका . कोणाला सांगू नका. फक्त तुमच्यासाठी. मी शाळा शिकत होतो ना, तेव्हा मला असं वाटायचं की मी शिकून मोठा झालो की आनंदी होईन. मग शिकून मोठा झालो. मग वाटलं की चांगली नोकरी मिळाली की झालं. पण नंतर वाटलं की आता लग्न झालं की आपलं आयुष्य सुखात जाईल. मग पुढे मुलं झाली की काही प्रश्न नाही. मग चांगलं घर झालं की निवांत आणि आनंदी होऊ. घर झालं. पुढे वाटलं की नोकरीमुळे अजिबात कशाला वेळ मिळत नाही. निवृत्त झालो की आनंद आणि समाधान फक्त आपलंच.
असं करता करता सगळं आयुष्य संपत आलं. पण आनंद आणि समाधान काही गवसत नाहीत अशी स्थिती होते. खरी गोष्ट अशी असते की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आताच्या वेळेपेक्षा दुसरी कोणतीही वेळ योग्य नाही. आयुष्यात अडथळे, अडचणी तर असणारच आहेत. आणि खरं म्हणजे हे अडथळे आणि अडचणी म्हणजेच जीवन असतं . काही आश्वासन, कर्तव्य पूर्ण करायची असतात. Woods are lovely dark and deep and miles to go before I sleep .
मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारतो. बघा बरं त्याची उत्तरं येतात का ?
1.गेल्या दोन वर्षात विश्वसुंदरी कोण कोण झाले ?
2.ऑलिम्पिक मध्ये सर्वात जास्त पदकं कोणत्या देशाला मिळाली ?
3.अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री कोण ? 4.जगातील कोणत्या देशात सर्वात कमी लोकसंख्या आहे ?
तुम्ही म्हणाल, ' बस, अहो किती प्रश्न विचाराल ? आम्हाला नाही येत या प्रश्नांची उत्तरं . पण मग आता हे प्रश्न बघा बरं . त्यांची उत्तरं येतात का ?
1.तुमचे आवडते तीन शिक्षक कोण होते ? 2.तुमच्या काही जिवलग मित्रांची नावे सांगा.
3.तुम्हाला ज्यांच्यासोबत वेळ घालवणे आवडते अशा काही मित्रांची नावे सांगा. 4.तुमचे आवडते पुस्तक कोणते ?
मला माहिती आहे. तुम्हाला या दुसऱ्या यादीतील प्रश्न आपलेसे वाटतील. जिव्हाळ्याचे वाटतील. शेवटी काय असते मित्रांनो, बक्षिसं , पदकं, शिल्ड काही दिवसांनी धूळ खात पडतात. लोकही त्यांना विसरून जातात. पण लक्षात राहतात ती आपली माणसं .
एक छानशी गोष्ट आहे. एकदा काही अपंग मुलामुलींची धावण्याची शर्यत सुरु असते. त्यातील काही मुलं मानसिक दृष्ट्या तर काही शारीरिक दृष्ट्या अपंग असतात. शर्यत सुरु होते. पळता पळता एक मुलगा पडतो. त्याला उठता येत नाही. तो रडू लागतो. एवढ्यात एक अशीच दिव्यांग मुलगी त्याच्याजवळ जाते. त्याला गळ्याशी धरते. विचारते, ' खूप लागलं कारे ? ' तेवढ्यात बाकीची मुलं पण येतात. सगळी धरून त्याला उभं करतात आणि अंतिम रेषेपर्यंत सगळे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून सोबत जातात. हे दृश्य पाहून मैदानावर उपस्थित सारे उभे राहतात. टाळ्या वाजवून त्या सगळ्यांचं कौतुक करतात ? कोण जिंकलं असतं ? म्हटलं तर कोणीच नाही पण म्हटलं तर सगळे. आयुष्यात सगळ्यात मोठी गोष्ट असते ती म्हणजे दुसऱ्याला उभं राहण्यासाठी मदत करणे. स्वतः जिंकण्यापेक्षा सुद्धा ती कितीतरी मोठी असते. आणि अशा गोष्टींमध्ये, अशा क्षणांमध्ये आनंद असतो. जीवनात आनंद असतोच. तो फक्त शोधायला लागतो. आपली अवस्था कधी कधी समुद्रकाठी उभ्या असलेल्या मुलासारखी होते. ज्याला खडे आणि मोती यांच्यातील फरक कळत नाही. कदाचित त्या नादात आपण दुसरेच काहीतरी खडे हातात धरून ठेवतो आणि आपल्याच हाताशी असलेले सुखाचे मौल्यवान मोती आपण समुद्रात टाकून देतो.
© *विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१४/०५/२०२०
भ्रमणध्वनी ९४०३७४९९३२
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा