उगवतीचे रंग
ध्येयनिश्चितीच्या मार्गावर... भाग एक
आपल्याला आयुष्यात काही करायचे असेल, तर डोळ्यापुढे काहीतरी निश्चित ध्येय असणे आवश्यक असते. ध्येयहीन माणूस म्हणजे दिशाहीन प्रवाशासारखा. एखादा माणूस प्रवासाला निघाला आहे, आणि कुठे जायचे हेच माहिती नाही, तर तो भरकटणार, त्याची फरफट होणार. म्हणून आपल्या डोळ्यांसमोर ध्येय तर असलेच पाहिजे. पण ध्येय कोणी ठरवायचे आणि ते ठरवण्याची योग्य वेळ कोणती ?
आपला साधारणपणे असा समज असतो, की लहान मुले, विद्यार्थी, युवक यांनी लहानपणीच आपले ध्येय ठरवून त्या मार्गावर वाटचाल केली पाहिजे. पण ध्येयाचा हा फार मर्यादित अर्थ झाला . ज्याला असे वाटते की मला माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन करायचे आहे, चांगले करायचे आहे, अशी कोणीही व्यक्ती आपले ध्येय निश्चित करू शकते. त्यासाठी वयाची अट नाही. आणि योग्य वेळ कोणती असे विचाराल तर ती आताची, या क्षणापासूनची. असं म्हणतात की ' It is never too late . '
ही ध्येयनिश्चिती कारण्याआधीची एक छोटीशी पायरी आपण समजून घेऊ या. ती म्हणजे स्वतःला ओळखण्याची . मी एका ठिकाणी वाचले होते की चिनी माणसे स्वतःच्या प्रतिमेचा तीन स्तरावर विचार करतात. पहिलं म्हणजे मला स्वतःला माझ्याबद्दल काय वाटतं किंवा मी स्वतःला काय समजतो ? दुसरं म्हणजे लोक मला काय समजतात किंवा माझ्याबद्दल काय बोलतात ? आणि तिसरं म्हणजे आरसा . म्हणजे सत्य काय आहे ? आरसा तुम्हाला तुमची सत्य प्रतिमा दाखवतो. जशी असेल तशी. तो खोटं बोलत नाही. म्हणून तर एखादी एखादी गोष्ट स्पष्ट असेल तर आपण म्हणतो, की ते आरशासारखं स्पष्ट आहे, स्वच्छ आहे.
आता यातली पहिली पायरी खूप महत्वाची आहे. ती म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटते किंवा तुम्ही स्वतःला काय समजता ? कारण तुम्ही स्वतःला जे काही समजता , तसे तुमचे व्यक्तिमत्व घडत जाते. स्वामी विवेकानंद म्हणतात, ' तुम्ही स्वतःला बलवान समजाल तर बलवान व्हाल, आणि दुर्बल समजाल तर दुर्बल व्हाल. सारी शक्ती तुमच्यात दडलेली आहे. तुम्ही सारे काही करू शकता. ' म्हणून स्वतःला कमी समजू नका. आत्मविश्वास असू द्या.
आता दुसरी पायरी बघू या. दुसरी पायरी आहे ती म्हणजे लोक तुमच्याबद्दल काय बोलतात, किंवा तुम्हाला काय समजतात ? हे समजून घेण्याआधी मुळात हे लक्षात घ्या की लोकांच्या म्हणण्याला किती महत्व आपण देणार आहोत ? कारण त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष दिले तर आपल्याला काम करणे कठीण होऊन जाईल. अर्थात जेव्हा आपण स्वतःचे इतरांच्या नजरेतून मूल्यमापन करतो, त्यावेळी त्यांचे मत विचारात घ्यायला हरकत नाही. लोक तुमच्याबद्दल चांगलेही बोलणारे असतात आणि कदाचित वाईटही. पण आपण जर आपल्या भूमिकेशी प्रामाणिक असलो, तर लोकांच्या बोलण्याचा फार विचार करण्याची आवश्यकता नाही.
' जो राह चुनी तुने उस राह पे राही चलते जाना रे..' फिर वो कितनी भी लंबी क्यों न हो..!
आपण जर असे त्या मार्गावर चालत राहिलो , तर आपल्या विरोधात बोलणारी लोकं एक दिवस आपलं गुणगान सुद्धा नक्कीच करतील.
आणि तिसरा स्तर म्हणजे आरसा. तो तुम्हाला तुमची सत्य प्रतिमा दाखवतो. तुम्ही असाल तसे. तुमचा चेहरा स्वच्छ असेल तर तो स्वच्छ दाखवील, आणि चेहऱ्यावर काही असेल तर तेही स्पष्टपणे दाखवील . लोकांसारखं तो फसवत नाही. म्हणजे स्तुतीही करत नाही आणि वाईटही बोलत नाही. इथे आरसा या शब्दाचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. आपणच आपल्या प्रतिमेचा आपल्या मनाशी विचार करायचा. आपलं मन हाच आरसा. त्यात थोडं तारतम्यानं डोकावलं की आपल्यालाच आपण कुठे आहोत, कसे आहोत आणि नेमकं आपल्याला काय करायचं आहे, याचं प्रतिबिंब उमटलेलं दिसेल. एकदा हे लक्षात घेतलं की पुढची ध्येयनिश्चिती आणि त्या मार्गावरची वाटचाल करणं सुलभ होईल. ( क्रमशः )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
४/५/२०२०
भ्रमणध्वनी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा. )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा