मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग - राहिले दूर घर माझे.

उगवतीचे रंग 

राहिले दूर घर माझे... 

कोरोनाची मगरमिठी दिवसेंदिवस घट्ट होत चालली आहे. जवळपास दोन महिन्यांपासून घरातच अडकून पडलेल्या आपणा सर्वांना आज ना उद्या चांगली बातमी मिळेल आणि लॉक डाऊन उठेल आणि काही दिवसात पुन्हा सगळे पूर्ववत होईल ही आशा आहे. पण पेपरमधील किंवा टीव्हीवरील बातम्या पाहिल्या की रोजची ही आशा निराशेत बदलते. आणि मग आपण म्हणतो, की वाचन करून किती करणार, टीव्ही किती पाहणार, मोबाईलचा सुद्धा कंटाळा येतो. सगळ्या गोष्टी करून झाल्या. आता तरी लवकरात लवकर आपले जीवन पूर्वीसारखे व्हावे. माझा एक मित्र आहे. तो पुण्यात राहतो. तो आज माझ्याशी फोनवर बोलताना तक्रार करत होता. त्याला गेली चाळीस वर्षे झाली स्विमिंगची सवय. दररोज सायकलिंग करत स्विमिंगला जायचा. म्हणाला, '' घरात बसून अंगात खूप आळस आला आहे. माझी बँकांची कामं होत नाहीत. बाहेर पडता येत नाही. गाड्या दाराशी तशाच पडून आहेत. त्यांच्या टायर मधली हवा संपली आहे. काय करावं काही सुचत नाही. ' त्याचं म्हणणं खरं आहे. सगळ्यांचीच ही अवस्था आहे. काही जणांची तर मानसिक अवस्था नाजूक झालीय. कोणाला आता मरणाची भीती जाणवते तर त्या भीतीने कोणी आपलं मृत्युपत्र म्हणजेच  ' विल ' तयार करून ठेवण्याच्या मनःस्थितीत आहे. हे मी माझ्या मनाचे सांगत नाही, तर ही वस्तुस्थिती आपल्यापुढे मांडतो आहे. प्रत्येकाची परिस्थिती आणि मानसिक स्थिती वेगळी असते आणि ज्याची त्याची समस्या आणि त्यातले गांभीर्य खरोखर त्या व्यक्तीलाच माहिती असते. पण जेव्हा आपण इतर लोकांच्या समस्या आणि त्यांचे हाल पाहू तेव्हा आपल्या समस्या त्यांच्यापुढे अगदी क्षुल्लक आहेत हे आपल्याला जाणवल्यावाचून राहणार नाही. 

पण मी जेव्हा टीव्हीवर, पेपरमध्ये स्थलांतर करणाऱ्या लोकांच्या बातम्या पाहतो, तेव्हा अक्षरशः गलबलून येते. काय करावे समजत नाही. लोकांचे तांडेच्या तांडे आता मार्गक्रमण करताहेत. महामार्गांवर त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात हे स्थलांतर आहे. देशाच्या फाळणीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात हे स्थलांतर होते आहे. फक्त कोरोनाची साथ आणि त्याची भीती एवढेच कारण नाही या स्थलांतराचे. तर सगळीकडे टाळेबंदीचं साम्राज्य आहे. हाताला काम नाही आणि पोटाला अन्न नाही. बाहेर पडायला संधी नाही. जवळ असणारी शिल्लक आणि घरातील अन्नधान्य किती दिवस पुरणार ! एक दिवस तर संपणारच. मुंबई, पुणे आणि इतर शहरं यामध्ये लाखो नागरिक आपलं पोट भरण्यासाठी आपलं गाव, आपला प्रदेश, आपले नातेगोते , आपलं राज्य सोडून आलेले. पण कोरोनाच्या महामारीने त्यांना पुन्हा बेघर केले. आणि नुकतेच कुठे स्थिरस्थावर होऊ पाहणारे जीव रस्त्यावर आले. ' चल उड जा रे पंछी के अब ये देस हुआ बेगाना. 'या बाहेर पडण्याला आणि राहते ठिकाण सोडण्याला पर्याय नव्हता. पण बाहेर पडलं तरी जीवन परीक्षाच घेत होतं .अभिमन्यू जसा चक्रव्यूहात अडकला, आणि बाहेर पडण्याचा मार्ग त्याला माहिती नव्हता. तशीच ही सगळी मंडळी जीवनाच्या या चक्रव्यूहात अडकली. आणि आता बाहेर पडावे तर सगळे मार्ग बंद. रेल्वे, एस टी बंद. घरी कसं जावं ?

आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी वेळ आली . शेवटी मनाचा निर्धार केला. असंही कोरोनाने नाहीतर भुकेने मरणार आहोत. त्यापॆक्षा आपल्या गावाला, आपल्या घरी, आपल्या नातेवाईकांत जाऊन मरु. आणि जवळ असलेलं किडूकमिडूक घेऊन आणि आपल्या मुलाबाळांना घेऊन ही माणसं अक्षरशः मजल दरमजल करीत पायी निघाली. माथ्यावर रणरणते ऊन, तहानेने कोरडा पडणारा घसा , प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही. लोकांनी काही दिलं तर खायचं, पाणी दिलं तर प्यायचं. पण तशाही परिस्थितीत ते जीव घराच्या ओढीनं निघाले. रेल्वे रुळांवरून चालत निघाले. 

पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे 
जिवलगा राहिले दूर घर माझे. 

अशी अवस्था झाली.  काळ तर मोठा कठीण आला. जगणं महाग झालं आणि मरण स्वस्त. असा नाहीतर तसा मृत्यू ठरलेला. मग दिवसभर उन्हात चालून थकलेले जीव रात्री विसाव्यासाठी त्याच रेल्वे रुळांवर आडवे झाले. त्यांना काय माहिती होतं की ही काळरात्र ठरणार आहे. एक गाडी आली आणि त्यांना चिरडून निघून गेली. कोणी रस्त्यावरच्या अपघातात गेले. कोणी भुकेनं कासावीस होऊन, तर कोणी श्रम सहन न झाल्याने गेले. आपल्याच देशात त्यांना ही वेळ आली. एक काळ असा होता की ज्यावेळी वाहतुकीची कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. लोकांना पायी मजल दरमजल करीत प्रवासाला जावे लागायचे. आज सगळी साधनं उपलब्ध आहेत. पण पुन्हा या सगळ्यांना पायी चालत जाण्याची वेळ आली . फरक एवढाच आहे की पूर्वीचा प्रवास जंगलातून व्हायचा. त्यावेळीही जंगलातून चोर, लुटारू आणि वन्य श्वापदांची भीती असायची. आज जंगलांच्या जागी रस्ते आहेत. पण मृत्यू कुठल्या ना कुठल्या रूपाने त्याकाळच्या वन्य श्वापदांसारखा दबा धरून बसलेलाच आहे. 

परवा एक बातमी वाचली. एक नातू आपल्या वृद्ध आजोबांना पायी पायी चक्क खांद्यावर घेऊन तीनशे बत्तीस किमी चालला. तो मुंबईहून निघाला आणि विदर्भात कुठेतरी त्यांचे गाव होते. तिथे तो त्यांना घेऊन जाणार होता. ही बातमी वाचून आपल्या आईवडिलांना तीर्थयात्रेला घेऊन जाणाऱ्या श्रावणबाळाची आठवण झाली. हा आधुनिक श्रावणबाळ. कौतुक तर वाटलेच. पण त्यापेक्षाही जास्त चीड आली ती आपल्या समाजव्यवस्थेची. उन्हातान्हात जिथे आपल्याला साधे चालणे देखील कठीण होते, अशा परिस्थितीत त्याला आपल्या आजोबाना खांद्यावर घेऊन मार्गक्रमण करावे लागते. किती अमानुष गोष्ट ! असेच एक दाम्पत्य. आणि त्यांची दोन लहान मुले. जवळ फक्त सायकल. बायकोची महिन्यापूर्वीच प्रसूती झालेली आणि ती देखील सीझर. आणि मोठा मुलगा दोन वर्षांचा. अशा रणरणत्या उन्हात हे कुटुंब आपल्या घराच्या ओढीने चालत निघाले. कधी सायकलवर तर कधी पायी. कोणी काही दिले तर खायचे नाहीतर तसेच चालत राहायचे. दैव आणखी किती कठोर परीक्षा घेणार ? अशीच एक माता जागतिक मातृदिनाच्या दिवशी चालता चालता रस्त्यावरच प्रसूत झाली. एक ट्र्क ड्रायव्हर. कुठेतरी अडकला असेल. पण आता आपला ट्र्क घेऊन निघालेला. शेकडो किमी प्रवास केला. पण रस्त्यात त्याला कुठे अन्न किंवा पाणी देखील मिळाले नाही. शेवटी एका गावात त्याने ट्र्क थांबवला. पोलिसांनी अडवले आणि पुढे जायला सांगितले. तो म्हणाला की मला हवे तर मारा, शिक्षा करा, पण मला पाणी द्या. मी उपाशी आणि तहानलेला आहे. शेवटी गावातल्या लोकांना त्याची दया येऊन त्यांनी त्याला जेवण आणि पाणी दिले. एक एक प्रसंग, एक एक बातमी हृदय पिळवटून टाकणारी. 

कुठेतरी या स्थलांतरासाठी रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आली . ' श्रमिक एक्स्प्रेस ' पण त्या स्थलांतरितांना मदत करण्यापेक्षा त्या प्रसंगी मिरवून घेण्यात, त्या गोष्टीचा इव्हेंट करण्यात काहींनी धन्यता मानली . तिथेही राजकारण आणि श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागलेली. कुठे श्रमिकांसाठी बस सोडणार असे जाहीर केले. पण लगेच निर्णय फिरवण्यात आला. पुन्हा त्या तयारीने आलेल्या सगळ्यांच्या पदरी प्रचंड निराशा आली. खरं तर आमच्या नेत्यांनी यावेळी सगळं राजकारण बाजूला ठेवून या लोकांसाठी व्यवस्था करायला हवी. पूर्वीच्या काळात पायी चालणाऱ्या वाटसरूंसाठी रस्त्यारस्त्यांवर अन्नछत्रे, पाणपोया उभारल्या जायच्या. तशी व्यवस्था या लोकांसाठी करून द्यायला हवी. आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सगळी काळजी घेऊन त्यांना गाड्या उपलब्ध करून द्यायला हव्यात. शतकातून एखादी अशी महामारी येतेच. या सगळ्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कदाचित आपल्याला काही वर्षेही लागू शकतील. पण या सगळ्या परिस्थितीत दर्शन घडायला हवे ते माणुसकीचे, सहृदयतेचे. काही लोक ते काम करताहेत. मदतीचा हात देताहेत. त्यांच्या हाताला बळ देण्याची गरज आहे. ' साथी हाथ बढाना , एक अकेला थक जायेगा.. ' आणि लॉकडाऊनमुळे घरातमध्ये अडकून पडल्याची तक्रार करणाऱ्यांनी जरा या वाटचाल करणाऱ्यांच्या हालअपेष्टांकडे पहावे . त्यांच्या जागी आपण असतो तर ? आपण किमान आपल्या घरात आहोत. सुरक्षित आहोत. यासाठी परमेश्वराचे आभार मानावे. आणि या लोकांना काही मदत करता आली तर ती करावी. त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
१२/०५/२०२० 
भ्रमणध्वनी ९४०३७४९९३२









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...