उगवतीचे रंग
थेंबातला सागर...
हे विश्व ज्यात आपण राहतो, ते खरोखर अद्भुत आहे. थेंबाथेंबानी सागर बनतो आणि थेंबाथेंबात सागरही असतो. आपले डोळे हा एक अनोखा चमत्कार आहे. या छोट्याशा दोन डोळ्यात सारे विश्व सामावते. अदृश्य असणारे मन सगळ्या विश्वाला व्यापूनही दशांगुळे उरते. जेव्हा मी आकाशाकडे पाहतो, तेव्हा तो विस्तीर्ण पट माझ्या डोळ्यात सामावते. रात्रीचे आकाश पाहताना, नभातले चन्द्र, तारे दृष्टी जाईल तेथपर्यंत डोळ्यात सामावतात . खरे तर आपल्याला दिसते त्यापलीकडे देखील हे विश्व असते. पण आपल्याला जे दिसते ते सुद्धा थोडे नसते. आपण समुद्रावर गेलो तर, क्षितिजापर्यंत अफाट पसरलेला आणि आपल्या विशालकाय लाटांची गर्जना करणारा सागर आपल्या डोळ्यात भरतो. पण हा विशाल सागर थेंबानीच बनलेला असतो. एवढा मोठा सागर पाहून खरं म्हणजे यावर विश्वास ठेवणं कठीण जातं . कारण थेंब तो केवढासा ! पण निसर्गाची किमया बघा. अशाच थेंबाथेंबानी तो बनलेला असतो. नदी बनलेली असते. एवढेच काय पण आपल्या घरातला साधा नळ सुरु राहिला, आणि रात्री जर त्याच्याखाली एखादी बादली आपण ठेवलेली असेल, तर ती सकाळपर्यंत भरून जाते. आपल्याला भरलेली बादली दिसते, समुद्र दिसतो, नदी दिसते. पण थेंबाकडे आपले क्वचितच लक्ष जाते. आणि गेले तरी दुर्लक्ष करतो आपण. कारण एका थेंबाची किंमत ती काय असे आपल्याला वाटते. पण आज याच थेंबातला सागर तुमच्यापुढे ठेवायचा प्रयत्न करणार आहे. अर्थात, प्रतीकात्मक आणि थोड्या वेगळ्या अर्थाने.
आज जे माझे मित्र पन्नाशी साठीचे असतील, त्यांना आठवत असेल की आपल्या लहानपणी किती छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला आनंद वाटायचं. आणि आपल्याला हवी असणारी एखादी छोटीशी गोष्ट जरी मिळाली ना, तरी केवढे खुश असायचो आपण ! माझं लहानपण एका अगदी छोट्या खेड्यात गेलं की जिथे आधी फक्त चौथीपर्यंत शाळा होती आणि मग ती पुढे वाढून सातवीपर्यंत झाली. त्यावेळी आमच्या गावात साधी चक्की सुद्धा नव्हती. दळण आणायला शेजारच्या गावी जावं लागायचं. असं आमचं गाव. या गावात जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत आम्ही शिकलो. आमचे शिक्षक पण गावात राहत नव्हते. ते सकाळी लवकर निघून बरोबर सकाळी सातला आमच्या गावी यायचे आणि शाळा उघडायचे. शाळेमध्ये सगळी मिळून ३०/४० मुले असतील. सकाळी सकाळी गुरुजींचे लेखी काम होईपर्यंत मुलांना बाहेरच्या मैदानात कोवळ्या उन्हात बसवले जाई. बहुतेक सगळी मुले शेतकरी किंवा शेतमजुरांची. त्यामुळे दप्तर, पाटीपुस्तक इ गोष्टींची वानवाच असायची.
शाळा सुरु झाली की पहिला तास गोष्टींचा असायचा. आणि गुरुजींचं लेखी काम सुरु असायचं. अशावेळी ते मला मुलांपुढे गोष्टी सांगायला उभे करायचे. आमच्या शाळेत एक छोटीशी लायब्ररी होती. एक मोठे कपाट गोष्टींच्या पुस्तकांनी भरलेलं असायचं. मी रोज त्यातील पुस्तके वाचायचो. आणि दुसऱ्या दिवशी त्या पुस्तकातील गोष्ट सांगायचं काम माझ्याकडे असायचं. तेव्हापासून मुलांसमोर उभं राहायची, गोष्ट सांगायची सवय लागली. वाचनाची तर लागलीच होती. त्या कपाटातली बहुतेक सगळी पुस्तके मी वाचून संपवली होती. आणि गुरुजी मला पुस्तकं देऊन कंटाळले होते. पण ती त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट सुद्धा होती. कधीतरी माझ्या निबंधात त्या वाचनाचं प्रतिबिंब गुरुजींना दिसायचं. आणि ते माझ्या आईला म्हणायचे हा मुलगा मराठीचा प्राध्यापक होईल. पण गुरुजींचं ते म्हणणं काही कारणाने खरं ठरलं नाही. आणि मी इंग्रजीचा शिक्षक झालो. पण ते फारसे महत्वाचे नाही. मला सांगायचं हे आहे की माझ्या रोज गोष्ट सांगण्याच्या कामाची गुरुजींनी दखल घेतली. आणि वार्षिक बक्षीस समारंभाच्या वेळी मला एक बक्षीस दिले. काय बक्षीस होते ते ? तर एक पेन्सिल आणि खोडरबर. हे मला मिळालेलं पहिलं बक्षीस. पण ते मिळाल्याचा कोण आनंद झाला मला. ते घेऊन घरी दाखवण्यासाठी मी धावत सुटलो. खोडरबर आणि पेन्सिलीची ती किंमत काय असेल ! पण तेही त्याकाळी आमच्यासाठी मोठं बक्षीस होत. हा थेंबातला सागर होता !
गावात एक वाणसामानाचं छोटंसं दुकान होत. त्या दुकानावर चणेफुटाणे, बिस्किटे एवढाच काय तो खाऊ मिळायचा. पण त्यातही मोठा आनंद होता. वडील आठवड्याच्या बाजारासाठी तालुक्याला येत असत. तेव्हा येताना ते आमच्यासाठी भेळ भत्ता म्हणजेच शेव चुरमुरे, गोड शेव इ खाऊ आणायचे. पण त्याची सुद्धा आम्ही किती वाट पाहायचो. ते आले की सगळे मिळून एकत्र खाण्यात केवढी मजा असायची. तसंच आई घरी थालीपीठ, सातूचं पीठ इ खाण्यासाठी करायची. पण त्यालाही अमृताची गोडी असायची. आम्ही खूप आनंदी आणि समाधानी असायचो. खरंच आपल्या गरजा आपण ठरवलं तर किती थोडक्यात पूर्ण होऊ शकतात ! थेंबातही आभाळ मिळाल्याचा भास होतो. माझ्या लहानपणी आमच्या शाळेतली काही मुलं वह्यापुस्तकं ठेवण्यासाठी एक छोटीशी पत्र्याची पेटी किंवा ट्रंक वापरत असत. मला ती हवी होती. पण ती मिळण्यासाठी खूप दिवस वडिलांच्या मागे लागावे लागले. एकदा तालुक्याच्या गावी गेल्यावर येताना ते ती घेऊन आले. मग मला कोण आनंद ! सारखी अभ्यासाला ती पेटी घेऊन बसायचा . झोपतानाही अगदी ती जवळ घेऊन झोपायचो. जणू अगदी मौल्यवान गोष्ट !
पण या छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद आता जणू हरवला आहे असे वाटते. आजच्या मुलांना सगळं लगेच मागितलं ते मिळतं. तरी ते आनंदी नसतात. काय बरं कारण असावं ? तर मला वाटतं आपण पालक लोक मुलांना हवी ती वस्तू लगेच आणून देतो. किंवा त्यांना ती आणण्यासाठी पैसे देतो. त्यामुळे त्यांना त्याचं महत्व कळत नाही. पूर्वी ती वस्तू मिळणं दुर्मिळ होतं . ती थेंबाथेंबानीच मिळत होती. त्यामुळे थेंबाचं महत्व होतं . आज सागर मिळाला तरी तो आनंद नाही. असंच जीवनातील सुखदुःखांचं सुद्धा आहे. जो कष्टातून शिकला, पुढे गेला त्याला पैशाची किंमत माहिती असते. ज्याने दुःखाचा अनुभव घेतला, त्याला सुखाची किंमत कळते. उन्हातून चालणाऱ्यांना सावलीची किंमत कळते. ज्याच्याकडे कायमच दिवाळी असते, त्यांना वर्षातून एकदा मिळणारा दिवाळीतला आनंद कसा मिळणार ? तात्पर्य हे की मुलांना मागितली ती गोष्ट लगेच देऊ नका. थोडे थांबण्याची त्यांना सवय लावा. नकार ऐकण्याची सवय लावा. मागितलेली गोष्ट देऊ नका असे नाही. पण तिची किंमत त्यांना कळू द्या. जेव्हा जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींचे मोल त्यांना कळेल, तेव्हा आपल्या आयुष्याचे मोल देखील त्यांना कळेल. एवढ्यातेवढ्यावरून ती निराश, नाराज होणार नाहीत. झाडांना जशी सावली आवश्यक असते, तसाच सूर्यप्रकाशही आवश्यक असतो. सूर्यप्रकाशापासून फार जपलं तर त्यांची वाढ नीट होणार नाही. थेंबातही सागर आहे. थेंबाचं मोल तर त्यांना कळू द्या.
- विश्वास देशपांडे, चाळीसगाव
११/५/२०२०

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा