उगवतीचे रंग
समृद्धीचे महावृक्ष - भाग एक
आपण जंगलात गेलो की विविध प्रकारची झाडं आपल्याला दिसतात. लहान, मोठी. काही उंचच उंच सरळ वाढलेली, तर काही विशाल, डेरेदार. अशा झाडांची सावली पण दाट पडते. उंचच उंच आणि सरळसोट वाढलेल्या झाडांच्या सावलीत कोणी बसत नाही. कारण ते फारशी सावली देऊ शकत नाही. काही तरी देण्यासाठी खाली वाकावंच लागतं ना ! आकाशातल्या मेघाला सुद्धा धरतीला जीवन देण्यासाठी खाली झुकावं लागतं. बालकवींची एक कविता आहे.
थबथबली, ओथंबून खाली आली
जलदाली, मज दिसली सायंकाळी.
जे खाली झुकत नाहीत, ते कसे देणार ? घेणारा आणि देणारा दोघांचंही नातं जमलं पाहिजे. म्हणून मेघ आणि धरणी यांचं नातं जमून येते. धरतीने आपली ओंजळ पसरलेली असते. आणि मेघराजा कृपावंत होऊन ती ओंजळ भरून देतो. देणारा भरभरून बरसतो आणि घेणारा तृप्त होतो. मग सर्वत्र नवचैतन्य फुलतं . नवीन बीजारोपण होतं . नवीन अंकुर फुटतात. जीवन चैतन्य आकाराला येतं .
या अंकुरलेल्या बीजांची मग हळूहळू वाढ होते. त्यांना जमीन, प्रकाश, खत, पाणी इ गोष्टी जशा मिळतील तशी त्यांची हळू किंवा जलद वाढ होते. वृक्ष वाढताना पहाणं ही किती आनंदाची गोष्ट असते ! बागेतला माळी असतो ना, तो बघत असतो काळजीपूर्वक. त्यांची चांगली वाढ व्हावी म्हणून तो कधी त्यांची छाटणी करतो, कधी कडक उन्हापासून संरक्षण पुरवतो, वेळेवर पाणी, खत देतो. मग ती मोठी होतात. त्यांना बहर येतो, ती फुलतात. फळंही देऊ लागतात. मग अनेक वर्ष त्या झाडाची सावली आपले ऊनपावसापासून रक्षण करते. मधुर फळं देते.झाडाचं आणि आपलं नातं निर्माण होतं .
आपलंही जीवन असंच असतं ना, वृक्षांसारखं ? आईवडील, आजीआजोबा हे जणू आपले माळी . ते आपल्याला वाढवतात. वाढीसाठी आवश्यक त्या गोष्टी पुरवतात. या जगातील ऊन, पाऊस अशा संकटांपासून आपलं रक्षण करतात. आपल्यावर मायेची छत्री धरतात. आपलं हे चिमुकलं रोप कोमेजून जाऊ नये याची किती काळजी घेतात. हे सगळं करत असताना त्यांना अपार कष्ट पडत असतात. त्यासाठी आपल्या सुखाचा, आरामाचा ते त्याग करतात. पण आपलं झाड वाढतंय हे बघून त्यांना कोण आनंद होतो. त्यांना त्यांचे कष्ट जाणवत नाहीत. मग पुढे ते झाडंही मोठं होतं . त्याला फळं , फुलं येऊ लागतात. मग तर या मातापित्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
हळहळू दिवस जाऊ लागतात. ज्या हातांनी हे बहरणारं झाड लावलेलं असतं , ते हात थकतात . आता त्यांना आधाराची आवश्यकता असते. आता ऊनपावसापासून त्यांना संरक्षण हवं असतं . आता ते सावली देऊ शकत नाहीत. फळं देऊ शकत नाहीत. जगाच्या दृष्टीने त्यांचा उपयोग संपलेला असतो. मला भा रा तांब्यांची रिकामे मधुघट ही कविता फार आवडते. ते जेव्हा थकले , आणि त्यांच्याकडून रसिकांना जी आणखी कवितांची भूक होती, ती ते पूर्ण करू शकत नव्हते. तेव्हा त्यांनी या कवितेतून आपले मनोगत मांडले. ते म्हणतात-
मधू मागसी माझ्या सख्या परी,
मधुघटची रिकामे पडती घरी.
आजवरी कमळाच्या द्रोणी
मधू पाजिला तुला भरोनि
सेवा ही पूर्वीची स्मरोनी
करी न रोष संख्या, दया करी.
किती सुंदर शब्दात त्यांनी आपले म्हणणे रसिकांसमोर मांडले आहे ! ते आपल्या रसिक वाचकांना म्हणतात की आता मी पूर्वीसारखी तुमची मागणी नाही पूर्ण करू शकत. तुम्हाला मधुघट पुरवणारे हात आता थकले आहेत. वृद्ध झालेत. त्यांच्यात आता पूर्वीसारखं बळ नाही राहिलं .
पण रसिकहो, खरंच हा मधुघट रिता झाला का ? हां , आता तो पूर्वी सारखा मधाने भरलेला नाही. मधुर मध नाही त्याच्याकडे द्यायला. पण तो घट अगदीच रिता झाला असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. तो आता अधिकाधिक भरत जातोय. समृद्ध होतोय. आठवणींनी आणि अनुभवांनी. ही अशी मोठी शिदोरी आहे की जे अनुभवाचं मूल्य चुकतं केल्यावरच मिळते. ते अनुभवाचं मूल्य त्यांनी चुकतं केलेलं असतं . पण तुम्हाला मात्र ते ही शिदोरी विनामूल्य द्यायला तयार असतात.
विज्ञानामध्ये आम्ही हे शिकलो की झाडाचं वय कसं काढतात. झाडाच्या खोडाचा आडवा छेद घेतात. त्यावरील वलये पाहिली जातात. ही वलये जितकी जास्त, तितके झाड जुने. झाडावरील ही वलये काही उगाच आलेली नसतात. वर्षानुवर्षे ऊनपाऊस , वादळवारा आपल्या अंगावर घेत ही झाडं उभी असतात. ती आलेली वलयं म्हणजे जणू वयानुसार त्यांना पडलेल्या सुरकुत्या. या सुरकुत्या म्हणजे अनुभवाची समृद्धी असते.
हे वृक्ष आता फळं देऊ शकत नसले तरी, ते आतून समृद्ध असतात. ते झाड कदाचित आपल्या आजोबांनी , पणजोबांनी लावलं असेल, ते त्याच्या सावलीत बसले असतील, त्याची फळे त्यांनी चाखली असतील. आणि तो आजी आजोबांचा समृद्ध वारसा, त्या आठवणी ते झाड आपल्या उरात बाळगून असतं . तुमची इच्छा असेल तर ते सांगेलही तुम्हाला त्या आठवणी. पण त्यासाठी तुम्हाला त्याच्याजवळ थोडं बसावं लागेल, त्याला समजून घ्यावं लागेल. मग अनुभवांचा नि आठवणींचा खजिना ते झाड तुमच्यासमोर रिता करेल. भूतकाळ त्यांच्या रूपाने जिवंत असतो. तुमच्या वर्तमानाशी तो आधार लिंक होतो. आणि त्यामुळे पुढे भविष्याची वाटचाल सुकर होते.
अशी झाडं घराघरातून असतील. असतातच. तो अनुभवांचा समृद्ध खजिना आहे. जपा त्यांना. एके काळी त्यांनी तुम्हाला सावली दिली असेल. आज तुम्ही व्हा त्यांची सावली. पण अंध व्यक्तीला समोर असलेला खजिना दिसत नाही, तशी आपली स्थिती होते. आणि एक दिवस असा येतो की तो खजिना परत जातो. मग पुन्हा नाही मिळत. एखाद्या संस्थेला निधी मिळावा, आणि त्या संस्थेनं त्याचा वापर केला नाही तर तो परत जावा अशासारखी ही स्थिती होते.
Khup Chan mahiti purn post. Aabhar🙏
उत्तर द्याहटवा