उगवतीचे रंग
सिद्धी आणि प्रसिद्धी ...
स्वामी परमहंस योगानंद यांच्या ' ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी ' पुस्तकातील ही गोष्ट आहे. त्यांचे गुरु श्री युक्तेश्वर यांनी सांगितलेली ही कथा आहे. ही गोष्ट आहे एका मुसलमान फकीराची. त्याचं नाव अफझल खान. प. बंगालमध्ये कोलकाता आणि सेरामपूर या परिसरातली ही कथा. हा अफझल खान लहान असताना एक भ्रमण करणारा संन्यासी त्याच्या गावात येतो. तो उन्हात चालून थकलेला असतो. आणि त्याला तहान लागलेली असते. तेव्हा तो या छोट्या अफझलकडे प्यायला पाणी मागतो. लहानगा अफझल जरा गोंधळतो. एका हिंदू संन्याशाने आपल्याकडे पाणी मागावं आणि आपण ते कसं द्यावं हा प्रश्न त्याच्या मनात येतो. तो तसं त्या संन्याशाला विचारतो. संन्याशी म्हणतो, ' मी जातपात, धर्म, स्पृश्यास्पृश्य इ काहीच मानत नाही. तेव्हा तू मला पाणी दे.' अफझल त्याला पाणी आणून देतो. त्या संन्याशाची तहान भागलेली असते. तो तृप्त होतो. आणि तो संन्याशी अध्यात्मिक दृष्ट्या खूप प्रगत असल्याने त्या मुलाचा पूर्वजन्म इ गोष्टी जाणून घेतो. तो त्या मुलाला म्हणतो, ' मी तुला एक सिद्धी शिकवणार आहे. त्या सिद्धीच्या जोरावर तू अदृश्य व्यक्ती आणि अदृश्य वस्तूंवर अधिकार चालवू शकशील. परंतु या सिद्धीचा उपयोग चांगल्या कामासाठी कर. ' असे सांगून तो संन्याशी निघून जातो.
इकडे अफझल त्या गुरूने दिलेल्या सिद्धीप्राप्तीसाठी वीस वर्षे साधना करतो. सर्वसामान्य माणसाला अशक्य अशी ती सिद्धी त्याला अवगत होते. अंतराळातील एक आत्मा आता त्याच्या दिमतीला असतो. अफझल सांगेल ती गोष्ट तो तत्क्षणी पूर्ण करतो. अफझल त्याला ' हजरत ' म्हणून संबोधतो. आता अफझलची सर्वत्र प्रसिद्धी होऊ लागते. चमत्कार तिथे नमस्कार अशी सर्वसामान्यांची स्थिती असते. अफझल भोवती शिष्यांचा एक मोठा घोळका जमतो. पण अफझल आपल्या गुरूने सांगितलेली शिकवण विसरतो आणि त्या मिळालेल्या सिद्धीचा उपयोग लोककल्याणासाठी न करता आपली क्षुद्र हाव आणि भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरतो. एकदा ज्या गोष्टीला त्याचा हात लागला, ती गोष्ट गायब करण्याचे सामर्थ्य त्याला प्राप्त झालेले असते. कोलकात्यातील सराफी दुकानांवर तो जातो. एखादा दागिना हाताळतो. आणि न घेताच दुकानातून बाहेर पडतो. बाहेर पडल्यावर काही वेळातच तो दागिना त्या दुकानातून गायब होऊन अफझलकडे येतो. तो कधी कधी आपल्या शिष्याना घेऊन प्रवासाला जात असे. त्यावेळी रेल्वेच्या तिकीट ऑफिसमध्ये फक्त तिकिटांच्या गड्डीला हात लावत असे आणि तिकीट न घेता बाहेर पडत असे. तो आणि त्याचे शिष्य रेल्वेत बसले की ती तिकिटे आपोआप त्याच्याकडे येत असत. या सगळ्या प्रकारामुळे अफझल आता कुप्रसिद्ध झाला होता. त्याला कोणीही बोलावत नसे.
योगानंदांचे गुरु श्री युक्तेश्वर लहान असताना त्याचा चमत्कार पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी अफझलने त्यांना एका दगडावर त्यांचे नाव लिहायला सांगून तो दगड समोर असलेल्या गंगेत लांब फेकायला सांगितला . आणि त्यांनी तसे केल्यावर मग एका तांब्यात त्यांना गंगेचे पाणी भरून आणण्यास सांगितले. त्यांनी ते आणल्यावर त्यांनी ' हजरत 'ला सांगितले की तो दगड आण . आणि काय आश्चर्य ! त्या तांब्याच्या तळाशी तो दगड त्यांना तसाच्या तसा आढळला. मग त्यांनी तिथे जमलेल्या लोकांसाठी त्यांना आवडणारे पेय आणण्यासाठी हजरतला सांगितले. कोणी दूध, कोणी फळांचा रस, तर कोणी काही सांगितले. एकाने तर चक्क व्हिस्कीची मागणी केली. पण हज़रतने त्या सगळ्या बाटल्या हजर केल्या. नंतर सगळ्यांसाठी खाणे मागवले. प्रत्येकाने वेगवेगळ्या पदार्थांची मागणी केली. तर सगळ्यांनी सोन्याच्या ताटात जेवण्याची इच्छा केली. प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी हजर झाल्या. पण सगळ्यांची जेवणं झाल्यावर तिथे ना एखादं ताट शिल्लक राहिलं ना एखादा अन्नाचा कण. योगानंदांनी आपल्या गुरूंना विचारले की असे का झाले ? तेव्हा ते म्हणाले, ' या सिद्धीद्वारा पूर्ण केलेल्या गोष्टी तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. कारण त्यामध्ये लोककल्याणाची कामना नसते. त्या कायम स्वरूपी टिकत नाहीत.
पुढे या अफझलच्या गुरूने एकदा स्वतः येऊन त्याची सिद्धी काढून घेतली. आणि त्याला सांगितले की तू लोकांच्या फायद्यासाठी या सिद्धीचा उपयोग केला नाहीस. तर स्वार्थासाठी दुरुपयोग केला आहेस. म्हणून मी तुझी ही सिद्धी काढून घेत आहे. त्यावेळी अफझलला खूप पश्चाताप झाला आणि तो तपश्चर्या करण्यासाठी जंगलात निघून गेला. या गोष्टीचे तात्पर्य असे की सर्वसामान्य लोकांना ज्या सिद्धीचे आणि प्रसिद्धीचेआकर्षण वाटते, त्या खरे म्हणजे त्यांच्या हिताच्या नसतात. एखाद्या साधनामार्गावर चालणाऱ्या साधकाला या गोष्टी आपल्या मार्गापासून पथभ्रष्ट करतात. आपल्याकडे संतांची थोर परंपरा आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांपासून. ही मंडळी अध्यात्मिक दृष्ट्या फार उच्च पदाला पोहोचलेली होती. पण त्यांच्यासारखे अनेक साधू संत सिद्धीच्या मागे कधीच लागत नाहीत.
शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा यांनी आपल्या अवतारकाळात अनेक चमत्कार केल्याचे दाखले त्यांच्या चरित्रात आहेत. पण त्यांचे चमत्कार हे चमत्कारासाठी कधीच नव्हते. लोकांना भक्तिमार्गाला लावण्यासाठीच त्यांची सारी धडपड होती. त्यातही अंधश्रद्धेला त्यांनी थारा दिला नाही. त्यांचे काही चमत्कार झाले असतील, तर ते फक्त लोककल्याणासाठीच होते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आजही काही अघोरी मंत्र तंत्र साधना करणारे लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन त्यांना ठकवत आहेत. राम , कृष्ण एवढे परमेश्वराचे अवतार झालेत. कृष्णाने एवढी सुंदर गीता आपल्याला सांगितली. पण चमत्काराला तिथे थारा नाही. ' सगळं सोडून मला शरण या. माझ्यावर श्रद्धा ठेवा. ' हाच भगवान श्रीकृष्णाचा संदेश आहे. हे सांगतानाच श्रीकृष्ण आपले निहित कर्म आपल्याला करायला सांगत आहेत. आपल्याकडे भागवत धर्मात ज्ञानेश्वर माउलींपासून थोर थोर संतांची एवढी मोठी मांदियाळी झाली. पण चमत्कार आणि सिद्दीची भलावण कोणीही केली नाही. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी असल्या सिद्धीच्या नादी न लागता , आणि आजच्या काळात कोणी असले चमत्कार करून दाखवत असेल तर त्यांच्या आहारी न जाता, फक्त नामस्मरणावर भर दिला तरी परमेश्वराची कृपा आपल्यावर नक्कीच होईल.
विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१३/०५/२०२०
भ्रमणध्वनी ९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा