मुख्य सामग्रीवर वगळा

तुझे आहे तुजपाशी...

उगवतीचे रंग

तुझे आहे तुजपाशी...

माणसाचं जीवन कसं  ? जसं जगू तसं . म्हणजे मानलं तर समाधान. नाही मानलं तर एक ओढ, अतृप्ती, बेचैनी. जीवनभरची. ही ओढ, दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हव्यास संपूर्ण आयुष्य खाऊन टाकणारी आहे. भूक लागली. पोटभर जेवण केलं की माणूस तृप्त होतो. मग त्याला कोणी कितीही आग्रह केला तरी खायची इच्छा होत नाही. पाण्याची तहान लागली, हवं तेवढं पाणी प्यायलं की तहान भागते. पण एखाद्या गोष्टीचा हव्यास ही अशी तहान किंवा भूक आहे की ती कधी शमतच नाही.

माणसाला झोपडीतही झोप लागते आणि बंगल्यातही . गादीवरही झोपू शकतो आणि सतरंजीवरही. जेवण साधे असले तरी चालते आणि पंचपक्वानाचे सुद्धा. पण पंचपक्वानाचे जेवण दोनचार दिवस बरे वाटते. रोजचे साधे जेवण, त्याचा कंटाळा येत नाही. साधी गरम पिठलं भाकरी असो नाहीतरी पिठलं भात . आता बघा ना, या लॉक डाउन मुळे सगळी हॉटेल्स बंद आहेत. आपण सगळे घरचेच जेवण जेवतो आहोत. पण आपले फारसे काही बिघडले नाही. पण आपल्याला ती सवय लागली होती. शनिवार रविवार जेवणासाठी बाहेर जाण्याची. हॉटेलातलं चमचमीत चापून खाण्याची. पण आता हॉटेल्सही बंद आणि आपलं बाहेर जाणं आणि खाणंही बंद.

मनाला एकदा एखाद्या गोष्टीची सवय झाली की ती त्याला कोणत्याही परिस्थितीत हवी असते. ती नाही मिळाली की तो बेचैन असतो. हे आपणच केलेले आपल्या मनाचे एक प्रकारचे फॉरमॅटिंग असते. हे आपण बदलवू पण शकतो. हे आताच्या परिस्थितीमुळे आपल्या लक्षात यायला हरकत नाही. आपण एक उदाहरण पाहू.

समजा, मी एखाद्या अशा ऑफिसमध्ये कामाला जातो, की जे माझ्या घरापासून पंधरावीस किमी दूर आहे. माझ्याकडे सध्या एक टू व्हीलर आहे. मी तिच्यावर ऑफिसला जातो आहे. पण माझ्याबरोबरचे बरेचसे मित्र त्याच ऑफिसमध्ये रोज फोर व्हीलर घेऊन येतात. त्यांच्याकडे नवनव्या गाड्या आहेत. मी त्या पाहतो आणि मला त्यांचा हेवा वाटतो. गेटवरचा वॉचमन माझ्याकडे फारशा चांगल्या नजरेने पाहत नाही असे मला वाटते. पण मी आता तर वर्ष दोन वर्षे झाली लागलोय ना इथे. माझ्याकडे इतका पैसा नाही की मी लगेच गाडी घेऊ शकेन.

पण गाडी आता माझ्या डोक्यात शिरलीय. तिने माझ्या मनाचा ताबा घेतला. मला सारखं असं वाटू लागलं आहे की गाडी असल्याशिवाय ऑफिसला जाणं मला शोभणारं नाही. कमीपणा आणणारं आहे. मग मी सारखं रोज मनाशी कुढत राहतो. रोज कामावर जातो, माझी टू व्हीलर घेऊन पण मनाने अस्वस्थ आहे. मला सारखं असं वाटतंय की ती फोरव्हीलर आल्याशिवाय मी सुखी होणार नाही, मला चैन पडणार नाही. मग दिवसरात्र तोच विचार.

 एके  दिवशी वर्तमानपत्रात एका बँकेची कार लोनची जाहीरात मी पाहतो. आणि आता जणू माझे स्वप्न साकार झाल्यासारखे मला वाटू लागते. मी माझी कागदपत्रे घेऊन बँकेत जातो.

पण एकंदरीत माझ्या हातात येणारी पगाराची रक्कम, त्यातून जाणारा मोठा बँकेचा हप्ता आणि घरखर्चासाठी हातात उरणारी रक्कम यांचा ताळमेळ घालणे जरा कठीणच वाटते. पण गाडी माझ्या डोक्यात फिट्ट बसलेली असते. मग काय ? काहीही होवो मला गाडी घ्यायचीच असा विचार करून मी गाडी आणतो. इथे माझा हव्यास मी अट्टाहासाने पूर्ण केला. पण तो थांबणार आहे का ? वेगवेगळ्या रूपात तो मला त्रास देणार आहे. आणि त्याच्यासोबत तो मलाही फरफटत नेणार आहे. आणि आयुष्यभर मी माझ्या नशिबाला दोष देत, दुखी आणि असमाधानी राहणार आहे.

हे मला टाळता येईल का ? आहे का शाश्वत सौख्याचा काही मार्ग ? जगता येईल का सुखाने त्याशिवायही ? हो आहे मार्ग. त्यासाठी पुन्हा मनाचे फॉरमॅटिंग करावे लागेल.

इथे आपल्याला आपल्या मनाला सांगावे लागेल की एखादी गोष्ट मला हवीच असे नाही. ती मिळाली तर चांगलेच, पण ती नाही मिळाली तरी मी समाधानी राहीन. माझ्याकडे ऑफिसला जाण्याचे अन्य पर्याय उपलब्ध आहेत. मी टू व्हीलरने, बसने ऑफिसला जाऊ शकतो. मी कोणत्या वाहनाने ऑफिसला जातो हे फारसे महत्वाचे नाही. ऑफिसला पोहोचणे महत्वाचे आहे. शिवाय त्यावर माझी प्रतिष्ठा अवलंबून आहे असे जे मला वाटते, तेही चुकीचे आहे. मी माझ्या मनाची तशी समजूत करून घेतली आहे. माझा ऑफिसमधला परफॉर्मन्स हाच माझी प्रतिष्ठा वाढवणारा आहे.

एखादी गोष्ट हवीच यातला जो ' च ' आहे तो घातक ठरतो. तोच आपल्याला आयुष्यभर पळवतो. कार नको असं नाही. जेव्हा तुमची परिस्थिती कार घेण्यासारखी होईल, तेव्हा नक्की कार घ्या. पण आपल्या मनाला हे जेव्हा आपण समजावू की ती नाही मिळाली तरी माझे काही अडत नाही, तेव्हा आपले समाधान टिकून राहील. म्हणजेच जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा आग्रह सोडून देऊ आणि तिची अपेक्षा ठेवू, तेव्हा आपले रोजचे जीवन आनंददायी होईल. या ठिकाणी कारचे उदाहरण एक प्रातिनिधिक स्वरूपात घेतले आहे. अशीच आपली इच्छा किंवा आग्रह अन्य गोष्टींबद्दल सुद्धा असू शकेल.

 अर्थात जी गोष्ट आपल्याला हवी आहे, ती गोष्ट मिळवण्याचे ध्येय जरूर ठेवा. त्यासाठी कसून प्रयत्न करा. पण ती नाही मिळाली तरी माझे चालू शकते अशी जेव्हा आपल्या मनाची ठेवण होईल, तेव्हा आपले समाधान आणि आनंद कोणतीही गोष्ट हिरावून घेऊ शकणार नाही.

ही मनाची ठेवण आपली फार शक्ती वाढवणारी आहे. समजा मला एखादा आजार, एखादे दुखणे बऱ्याच वर्षांपासून आहे. त्यासाठी मी डॉ चे औषधही घेतो आहे. पण तरी सारखे मला माझ्या आजाराची काळजी वाटते आहे. तो मला अस्वस्थ करतो आहे. मग आपल्या मनाची ठेवण जर वर सांगितल्याप्रमाणे असली, तर आपले रोजचे जीवन सुसह्य होईल. काही आजार असे असतात की जे पूर्णपणे बरे होत नाहीत. किंवा आयुष्यभर त्यावर औषध घ्यावे लागते. तेव्हा आपल्या मनाला जर आपण सांगू शकलो की हा माझा आजार आहे हे मला मान्य आहे. पण तो असतानाही मी माझे काम रोज करू शकतो. त्यामुळे मला थोडाफार त्रास निश्चित होतो आहे. पण मी ठरवले तर माझे काम तो असूनही करू शकतो. आपल्यापैकी बहुतेक लोक असे करतातही. पण जेव्हा आपल्या मनाची तयारी त्यासाठी होते, तेव्हा आपल्याला त्याचा फार त्रास होत नाही.

शिवाय यातही दोन प्रकार आहेत. आपल्या समस्या या दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे खरीखुरी असणारी समस्या. आणि दुसरी म्हणजे समस्या आहे असे वाटणे. त्रास खऱ्याखुऱ्या समस्येमुळे होतो. भासमान वाटणाऱ्या समस्येमुळे त्रास होत नाही. पण जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे समस्या आहे, असे आपले मन ठरवते, तेव्हा त्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होऊ लागतो. म्हणून एखादी समस्या ही खरी समस्या आहे की नाही हे पण ओळखायला आपण शिकले पाहिजे. नाहीतर आपण स्वतःच ती समस्या आहे असं मानलं की ती गोष्ट आपल्याला त्रास देणारच हे नक्की. मला हवी असणारी एखादी गोष्ट मला मिळाली तर ठीकच आहे, पण ती नाही मिळाली तरी मी आनंदी राहू शकतो अशी जेव्हा आपल्या मनाची ठेवण होईल, तेव्हा आपल्यासारखे सुखी आणि समाधानी आपणच असू...

आणि सगळ्यात शेवटी असा विचार करा की समस्या कोणाला नाही ? माणूस आहे तिथे समस्या आहे. जीवन आहे, तेव्हा जीवनात खाच खळगे, आव्हाने तर असणारच. ती स्वीकारून जगण्यात तर खरा पुरुषार्थ आहे.

 हिरवा निसर्ग हा भवतीने

जीवन सफर करा मस्तीने

मन सरगम छेडा रे

जीवनाचे गीत गा रे, गीत गा रे धूंद व्हा रे

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

          ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...