उगवतीचे रंग
मनापासून हाक तर मारा...
एक ग्राहक एकदा आपले केस कापून घेण्यासाठी केशकर्तनालयात जातो. त्याची दाढी कटिंग सुरु असताना त्या न्हाव्याच्या आणि त्याच्या विविध विषयांवर गप्पा होतात. गप्पांच्या दरम्यान देव आहे की नाही या विषयावर ते येतात. तो न्हावी म्हणतो की या जगात देव नाही. मी देव आहे असे मानत नाही. तो ग्राहक विचारतो की असं तू का म्हणतोस ? तेव्हा तो न्हावी सांगतो, ' जरा बाहेर डोकावून पहा. काय चालले आहे जगात ! महिलांवर अन्याय, अत्याचार. बेकारी, गरिबी, भूक. कुठे महामारी. कुठे प्रचंड दुःख तर कुठे प्रचंड आनंद. ' हे त्या न्हाव्याचे उद्गार ऐकल्यानंतर तो ग्राहक वाद नको म्हणून त्याचे पैसे देऊन बाहेर पडतो.
काही अंतर गेल्यानंतर त्याला एक माणूस दिसतो. त्या माणसाचे केस प्रचंड वाढलेले असतात. त्याने बऱ्याच दिवसात दाढी, कटिंग केलेली नाही असे दिसते. त्या माणसाला पाहिल्यानंतर हा पहिला माणूस त्याला त्या न्हाव्याकडे घेऊन येतो. त्या न्हाव्याला तो म्हणतो, ' या माणसाकडे बघ. जगात न्हावी अस्तित्वात आहे असे तुला याच्याकडे पाहून वाटते का ? नाहीतर त्याचे केस एवढे वाढले असते का ? '
तो न्हावी म्हणतो, ' अलबत ! न्हावी आहे तर ! मी आहे. तो माझ्याकडे आला तर पाहिजे. '
तो माणूस म्हणाला, ' अगदी बरोबर बोललास. तसाच परमेश्वर देखील या जगात अस्तित्वात आहे. पण आपण त्याच्याकडे जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत त्याचे अस्तित्व आपल्याला कसे कळणार ? तू त्याचे अस्तित्व कसे नाकारू शकतोस ? '
एखादी गोष्ट नाकारणे सोपे आहे. पण आपण जोपर्यंत त्याचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत ती नाही असे विधान करणे धाडसाचेच ठरेल. आणि तो अनुभव घेण्यासाठी जी तपश्चर्या किंवा साधना करावी लागते ती करण्याची आमची तयारी नाही.
द्रौपदी वस्रहरणाचा प्रसंग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. द्रौपदी ही शक्तिशाली अशा पाच पांडवांची पत्नी असताना, ते त्या दरबारात तिचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतात. द्रोणाचार्य, कृपाचार्य, पितामह भीष्म आदी दिग्गज ज्येष्ठ मंडळी तेथे उपस्थित असताना, हे दुष्कृत्य कौरवांकडून घडते. आणि सगळे केवळ असहायपणे पाहत राहतात. दुःशासन द्रौपदीला केसांना धरून फरफटत आणतो. आणि तिच्या वस्त्रांना निर्लज्जपणे हात घालतो. आपल्या मदतीला जेव्हा कोणीही धावून येत नाही, हे तिच्या लक्षात येते, तेव्हा ती श्रीकृष्णाचा धावा करते. ' कृष्णा , त्राही माम. ' असा आर्ततेने धावा करते, तेव्हा श्रीकृष्ण तिचे लज्जारक्षण करतो.
श्रीकृष्ण हा द्रौपदीचा सखा, बंधू आणि तिचे दैवतही होता. असे असताना तिच्या लज्जारक्षणासाठी तो स्वतः धावून का येत नाही किंवा येण्यासाठी एवढा उशीर का लावतो ? द्रौपदी त्याला तसे विचारते. तेव्हा त्याने दिलेले उत्तर फार सुंदर आहे. तो म्हणतो, ' पांचाली, जेव्हा तुझे वस्त्रहरण होत होते तेव्हा तू आपल्या पतींकडे ते आपलं रक्षण करतील म्हणून आशेने पाहत होतीस. जेव्हा तुला आढळलं की त्यांच्यापैकी कोणीही आपलं रक्षण करू शकत नाही, तेव्हा तू माझा धावा केलास. तू जोपर्यंत मला हाक मारत नाहीस, तोपर्यंत मी कसा येणार ? तू जेव्हा मनापासून हाक मारलीस, तेव्हा मला येणे भागच होते. '
पण कुठे जायचं त्याला हाक मारायला ? मंदिरात ? मशिदीत ? आवश्यकता नाही. तो कुठे नाही ? मनापासून मारलेली हाक त्याच्यापर्यंत पोहोचते. आणि खरं म्हणजे तो बाहेर कुठेही नसतो. तो आपल्या सगळ्यांच्या अंतर्यामी आहे. तो वेगवेगळ्या रूपातही कार्यरत असतो. कधी तो आईच्या रुपात असतो, तर कधी संतांच्या रुपात. आज तो आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कामगार यांच्या रुपानेही काम करतो आहे. आणि आपल्याच घरी सुरक्षित राहून त्यांना त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या तुम्हा आम्हा सर्वांमध्येही तो विद्यमान आहे.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा