उगवतीचे रंग
फक्त एक तास...
संध्याकाळची वेळ. एक बाबा कामावरून घरी येतो . बाबा दमलेला, थकलेला आहे. दिवसभरच्या श्रमाने थोडा चिडलाही आहे. घरी पाच वर्षांचं एक कोवळं पोर डोळ्यात प्राण आणून बाबाची वाट पाहतं आहे. बाबा दिसताच त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं .' बाबा आले, बाबा आले, ' असं म्हणत ते चिमुरडं टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त करतं . ' बाबा, मी एक विचारू ? ' ते मूल म्हणतं .
' हो, विचार . '
' बाबा, तुम्हाला एक तास काम करण्याचे किती पैसे मिळतात ? '
' मुर्खासारखे प्रश्न विचारू नकोस. त्याच्याशी तुला काय करायचं आहे ? ' चिडलेला बाबा.
' पण सांगा ना बाबा. '
' नाही. तू आपला खेळायला जा बरं . '
' प्लीज, प्लीज सांगा ना बाबा. '
चिमुरड्याचा हट्ट पाहून बाबा सांगतो. ' शंभर रुपये मिळतात एका तासाचे. '
' बाबा, मला पन्नास रुपये द्या ना. '
हे ऐकल्यावर बाबा चिडतो. ' यासाठी विचारत होतास का तू ? मुळीच मिळणार नाहीत. आता सरळ तुझ्या खोलीत जाऊन झोप. तुझ्या फालतू खेळण्यांसाठी माझ्याकडे पैसे नाहीत. आता नाही ऐकलेस तर मार देईन. '
चिमुरडा हिरमुसला होतो. मुकाट्यानं आपल्या खोलीत जातो. डोळ्यात अश्रू आलेले असतात. तसाच झोपून जातो. थोड्या वेळाने बाबाचा राग शांत होतो. त्याला वाटतं मुलाशी जरा कठोरच वागलो आपण. असं वागायला नको होत. कदाचित त्याला ते पैसे दुसऱ्या कशासाठी तरी हवे असतील. म्हणून तो जातो. खोलीचं दार ढकलतो. बाळ झोपलेला असतो. त्याच्या अंगावरून हात फिरवतो. गालावर ओघळलेले अश्रू गालावरच सुकून गेलेले असतात. बाबाच्या स्पर्शाने मुलगा जागा होतो.
' बेटा , कशाला हवे होते तुला पन्नास रुपये ? '
' बाबा, तुम्ही द्या तर खरे. '
बाबा खिशातून एक पन्नासची नोट काढून मुलाला देतो. मुलगा आनंदतो. उशीखाली हात घालतो. उशाच्या खाली त्याने काही दहा दहाच्या नोटा ठेवलेल्या असतात. ते पाहिल्यावर बाबा चिडतो.
' तुझ्याकडे पैसे असताना, तू का मागितलेस आणखी पैसे ? '
' बाबा, माझ्याकडे पन्नासच रुपये होते. तुम्ही पन्नास दिल्याने आता शंभर रुपये झाले आहेत. हे घ्या. '
' अरे, पण मला कशासाठी देतो आहेस ? '
' बाबा, तुम्हाला एक तास काम केल्याचे शंभर रुपये मिळतात ना. मग आज हे पैसे तुमच्याकडे राहू द्या. आणि उद्या मला तुमचा फक्त एक तास द्या. तुम्हाला माझ्यासाठी वेळच नसतो बाबा. उद्या एक तास थांबाल ना घरी, माझ्यासाठी ? '
आता पाणी बाबाच्या डोळ्यातून ओघळतं . त्याला पटकन जवळ घेऊन त्याचे मुके घेतो. तो म्हणतो, ' हो, बेटा . थांबेन बरं तुझ्यासाठी. '
चिमुरड्याच्या चेहऱ्यावर हास्य उमलतं. त्या कोमल , निरागस हास्याची किंमत जगातल्या कोणत्याही पैशाने होणार नसते.
आज आमची परिस्थिती या गोष्टीतल्या बाबासारखी झाली आहे. आम्ही मुलांना सगळं देतो. पण त्यांना देण्यासाठी आमच्याकडे वेळ मात्र नसतो.पूर्वी घरात माणसं असायची. आजीआजोबा असायचे. खेळण्यासाठी भावंडं असायची. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. बऱ्याच घरात आईवडील दोघे कामावर जातात. मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नसते. मुलं पाळणाघरात असतात. शाळेत असतात. पण अवतीभवती सगळे असूनही मनाने एकटे पडलेले असतात. मुलांना तुम्ही खेळणी, खाऊ, पैसे, शाळेची फी इ गोष्टी देतातच. त्या तर त्यांना दिल्याच पाहिजे. पण ते भुकेले असतात प्रेमाचे. तुमच्या प्रेमावर त्यांचा हक्क असतो. ते प्रेम त्यांना दिलं पाहिजे. त्यासाठीचा वेळ तुम्हाला काढावा लागेल.
आज करोनामुळे सगळ्यात जास्त कुचंबणा जर कोणाची झाली असेल तर ती या लहान मुलांची. आपल्या कर्माची फळं त्यांना आज भोगावी लागत आहेत. तुम्ही आम्ही बाहेर पडू शकत नाही. ठीक आहे. आपण स्वतःची समजूत घालू शकतो. त्यांना तुम्ही काय सांगणार ? आज अचानक त्यांना आपल्या शाळेपासून, मित्रांपासून, बाहेर जाण्यापासून आपण रोखले आहे. असे करण्याचा आपल्याला काय हक्क आहे? पण केवळ परिस्थितीच्या रेट्यामुळे ही वेळ आली आहे.
अशा वेळी गरज आहे ती आपली कामे थोडा वेळ बाजूला ठेवून एखादा तास त्यांच्याबरोबर खेळण्याची. त्यांना काही गोष्टी सांगता आल्या तर सांगा. काही शिकवता आले तर खेळता खेळता शिकवा. माझा पाच वर्षांचा नातू आता आईला पोळ्या करू लागतो. त्याला डोसा टाकता येतो. स्वतःचे दूध स्वतः गरम करतो. अर्थात आईच्या देखरेखीखाली. कधी आईला भांडी धुवायला मदत करतो, तर कधी फरशी पुसायला. या गोष्टी करण्यात त्याला आनंद वाटतो आहे. कृतीतून आपोआप शिक्षण होते आहे. आणि स्वावलंबनाचे धडे देखील आपोआप गिरवले जात आहेत.
मुलं ही आपल्याकडे भविष्यकाळाने ठेवलेली अनमोल ठेव आहे. ती नीट जपू या. वाढवू या. They are the unsung heroes of the time. एकदा का मुलं मोठी झाली की मग ही भरपाई कशानेही होऊ शकणार नाही. पैसा काय पुढेही मिळेल. तो मिळाला तेवढा कमीच असतो. पण मुलांचं बालपण परत नाही येणार.
त्यांच्या अंगावरून तुम्ही फिरवलेला मायेचा हात जणू जादू करतो. त्या चिमुरड्याची तुमच्या गळ्याभोवती पडलेली मिठी ही जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. ज्यांच्या गळ्याभोवती अशी चिमुकल्या हातांची मिठी पडते, ते आईबाबा खरेच भाग्यवान. जगात असे अनेक लोक आहेत की जे ह्या आनंदाला पारखे होतात. अन्नाने मुलाचे शारीरिक भरणपोषण होईल. पण तुमचे प्रेम, तुमचा त्यांच्यासाठीचा एखादा तास त्यांचं मानसिक भरणपोषण करेल. त्यांना जगण्याचं बळ देईल. त्यांच्या उद्याच्या भविष्यासाठी ही पायाभरणी आपल्याला करावीच लागेल.
तुझे सुरज कहू या चंदा, तुझे दीप कहू या तारा
मेरा नाम करेगा रोशन, जगमे मेरा राजदुलारा.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा