उगवतीचे रंग
कथा एका आधुनिक रामदासाची...
सकाळी नऊ वाजेची वेळ. ठिकाण कल्याणमधली हिराबाग चाळ . जुनं कौलारू घर. तीन खोल्यांचं. अगदी सरळ आगगाडीच्या डब्यासारख्या खोल्या. छोटंसं स्वयंपाकघर. त्याला लागून मधलं घर. त्यातच एका कोपऱ्यात देवघर. वरती माळोचा. भिंतीच्या एका बाजूला कोपऱ्यात एक जुना रेडिओ. आणि बाहेरची ओसरीची छोटी खोली. त्यात एक पलंग. एकदोन लोखंडी खुर्च्या. अशा या घरात नव्वदीच्या घरातला एक वृद्ध स्वयंपाकघरात उभं राहून पोळ्या लाटतो आहे. भाजी नुकतीच झालेली आहे. पोळ्या छान गोल गरगरीत लाटलेल्या, एखाद्या गृहिणीलाही लाजवतील अशा. स्वयंपाकघरात जास्त पसारा नाही. घर स्वच्छ आवरलेलं . तोंडानं मोठ्या आवाजात एखाद्या संताचा अभंग म्हणणे सुरु.
मी त्यांच्याकडे नुकताच गेलेलो असतो. पाहुण्यासारखा बाहेर बसलेला असतो. अर्थात त्यावेळी मी दुसरं काही करू शकतही नाही. त्यांचं काम सुरूच असतं . तेवढ्यात आतमधून खणखणीत आवाजात हाक येते. ' विश्वास, चल . आतमध्ये ये. ताट घे आणि जेवायला बस. मी गरमागरम पोळ्या वाढतो तुला. ' मला खूप संकोचल्यासारखं होत. त्यावेळी ते असतात एकोणनव्वद वर्षांचे आणि मी असतो पंचेचाळीस पन्नासचा . पण मला त्यांच्यासमोर जास्त काही बोलताच येत नाही. मुकाट्यानं मी ताट घेतो. ते मला गरमागरम पोळी आणि भाजी वाढतात. त्या हातांना पंचपक्वानांना लाजवील अशी चव असते. वाढताना हसत हसत म्हणतात, ' विश्वास, नव्वदीतला एखादा माणूस पोळ्या करताना पाहिला आहेस का कधी ? ' मी निःशब्द असतो. काय बोलणार. फक्त निघताना पायावर डोके ठेवतो.
ते गृहस्थ म्हणजे रामदासपंत सराफ. माझ्या आत्याचे यजमान. माझ्या आयुष्यात ज्यांच्या वागणुकीचा माझ्यावर प्रभाव पडला अशा माणसात त्यांचे स्थान फार वरचे आहे. आम्ही सगळे त्यांना दादा म्हणत असू. आत्या काही वर्षांपूर्वीच त्यांची साथ सोडून या जगातून निघून गेलेली असते. पण आत्या असताना आणि नसताना देखील दादांच्या वागण्याबोलण्यात, कष्ट करण्यात कोणताही फरक पडलेला नसतो. मग मला पूर्वीचे दिवस आठवतात. त्यावेळी दर सुटीत मी आत्याकडे येत असे. दादा तेव्हा तरुण होते. पण साधे राहणीमान. वर्ण सावळा. उंचपुरी आणि मजबूत शरीरयष्टी. स्वतः स्वच्छ धुतलेले पांढरेशुभ्र सुती धोतर आणि बंडी असा त्यांचा पोशाख. अगदी एखाद्या कार्यक्रमाला जायचे असले तर कोट घालायचे. मुंबईच्या एका पोस्ट ऑफिसमध्ये ते पोस्टमास्तर होते.
मी त्यांच्याकडे गेलो की ते मला मुंबई दाखविण्यासाठी कधी कधी बरोबर घेऊन जायचे. त्यांना असलेल्या कामांच्या भाऊगर्दीत मला मुंबई दाखवण्यासाठी वेळ काढायचे. कधी त्यांचे ऑफिस सुटल्यावर तर कधी आधी. दरम्यानच्या काळात मी एखाद्या नातेवाईकाकडे थांबायचो. ते त्यांच्या सवडीने येऊन मला फिरवण्यासाठी घेऊन जायचे. त्यांना तीन मुले होती. तिघेही वेगवेगळ्या क्षेत्रात. आत्या अतिशय उत्साही होती. ती घरात बसत नसे. महिला मंडळ, भजनी मंडळ असे काही ना काही तिचे चालूच असे. पण दादांनी तिला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्यासाठी प्रसंगी घरातील सर्व कामे करून घ्यायची त्यांची तयारी असायची.
दर शनिवारी किंवा रविवारी चाळीसाठी दादांचा एक विशेष कार्यक्रम असायचा. सकाळी चाळीतल्या तरुण मुलांना बोलावणे आणि त्यांच्याकडून चाळ स्वच्छ करून घेणे हा तो कार्यक्रम. त्यासाठी लागणारे झाडू, पावडी, पाटी इ साहित्य त्यांनी स्वखर्चाने आणलेले असे. एकदिड तास हा सफाईचा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्या सर्व मुलांसाठी नाश्त्याची ते व्यवस्था करीत. म. गांधी, विनोबा आदींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. चाळीतील मुलांना अशी स्वावलंबनाची, स्वच्छतेची आणि समाजसेवेची शिकवण त्यांनी लहानपणापासून दिली होती. त्यासाठी पदरमोड करायची त्यांची तयारी असायची. लहानपणापासून स्वावलंबनाची शिकवण मिळालेली ही मुले पुढे चाळीतील सणसमारंभ एकत्र येऊन साजरा करू लागली. गणेशोत्सवात सगळी एकत्र यायची. सगळे मिळून सजावट करायची. असे एक वेगळे वातावरण त्यांनी चाळीत निर्माण केलं होतं .
त्या काळात आम्ही एका छोट्याशा खेड्यात राहत असू. ते कधी कधी सुटी घेऊन आमच्याकडे आमच्या गावी येत. त्या वेळी मी चौथीपाचवीत असेल. येताना ते माझ्यासाठी खाऊ तर आणतच पण सोबतच मला वाचण्यासाठी एकदोन पुस्तके घेऊन येत. त्यांनी वाचनासाठी नेहमी प्रोत्साहन दिले. एकदा त्यांनी मला मनाचे श्लोक पाठ करायला सांगितले होते. त्यासाठी एक महिना दिला होता. त्या दरम्यान मी रोज सकाळ संध्याकाळ ते वाचून पाठ केले. त्या श्लोकांचा अर्थ कळण्याचे ते वय नव्हते. पण त्याचे महत्व कळले. एकदा त्यांनी एक इंग्रजीची ओळख करून देणारे पुस्तक माझ्यासाठी आणले. आणि त्यातील स्पेलिंग मला पाठ करायला लावले. ऊस खाण्याची त्यांना आवड. दातांनी तोडून ऊस खायचे. त्यांचे दात शेवटपर्यंत मजबूत होते.
अशा या दादांना देवपूजा करताना मी कधी पाहिले नाही. भोवतालचा समाज हाच त्यांच्यासाठी देव होता. समाजासाठी काम करायचे तीच त्यांची देवपूजा होती.हे कार्य करताना प्रसंगी नात्यातल्या लग्नसमारंभांना देखील उपस्थित राहत नसत. निवृत्त झाल्यानंतर पेन्शन घेत घरी बसणे त्यांना नामंजूर होते. मग कधी नेरळ येथील वृद्धाश्रमात वृद्धांची, कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी, तर केडगाव येथील वृद्धाश्रमात वृद्धांची सेवा करण्यासाठी ते राहिले. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर थोर समाजसेवक बाबा आमटेंची आठवण झाल्याशिवाय राहायची नाही.
वयाच्या ऐशीव्या वर्षांपर्यंत त्यांनी वृद्धांची सेवा केली. ज्या वयात दुसऱ्यांनी आपली सेवा करायची अशा वयात ते दुसऱ्यांची सेवा करत राहिले. पुढे पुढे त्यांच्याकडून अगदीच होईनासे झाल्यावर ते आपल्या घरी कल्याणला येऊन राहिले. मुलांनी त्यांना आपल्याकडे राहायला बोलावले. पण स्वावलंबन अंगात भिनलेल्या स्वाभिमानी दादांनी त्यांच्याकडे राहायला नकार दिला. आणि शेवटपर्यंत सगळे स्वतः करीत राहिले. आपल्या पेन्शनमधला सुद्धा आवश्यक तेवढाच पैसा स्वतःसाठी वापरला. बाकी त्यांचा पैसा समाजासाठी होता. त्यांचे जीवन समाजासाठीच होते. अशी निस्पृह, निरिच्छ आणि सेवाभावी माणसे आता समाजात दुर्मिळ होत चालली आहेत. लोकांची सेवा करणाऱ्या या आधुनिक रामदासाला परमेश्वराने शेवटपर्यंत उत्तम आरोग्याची देणगी दिली होती. मनाचे श्लोक मी पाठ केले होते. पण त्यातील
मना चंदनापरी त्वां झिजावे
परी अंतरी सज्जना नीववावे !
हा समर्थ रामदासांचा उपदेश या रामदासाने प्रत्यक्ष आचरणात आणला होता. त्यांच्या स्मृतीला प्रणाम.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा