उगवतीचे रंग
जणू सगळे जीवनचक्र थांबले आहे, असा भास होत असतानाच, निसर्ग हा संदेश देतो आहे की हे मानवा , तू कार्यरत राहा अगर नको राहूस, मी माझे काम करणार आहे. खरं म्हणजे आपण केवढी प्रगती केली नाही ? चंद्रावर पोहोचलो, मंगळावर पोहोचलो. नवनवीन शोधांनी निसर्गावर मात केली. आम्हाला स्वर्ग दोन बोटं उरला. आमच्या या प्रगतीचा आम्ही टेंभा मिरवू लागलो. निसर्गानेही काही दिवस आम्हाला हा टेंभा विनातक्रार मिरवू दिला. पण ( कदाचित ) आमच्याच कार्यकर्तृत्वातून निर्माण झालेल्या कोविड -१९ नामक क्षुद्र विषाणूजन्य आजाराने हा प्रगतीचा फुगा टाचणी लावावी तसा फोडून टाकला. आणि आमचे पाय जमिनीवर आले.
रहे ना रहे हम ...
सकाळी उठलो आणि घराबाहेर आलो. म्हणजे घराच्या पोर्चमध्ये. कुठे बाहेर नाही गेलो. घरापुढे छोटीशी बाग आहे. बागेत काही गुलाबाची झाडे आहेत. काही इतर फुलांची. काही गुलाब कुंड्यातूनही लावलेले आहेत. दोन कुंड्यांमधील गुलाबाला फार सुंदर कळ्या आल्या होत्या. एका कुंडीतील गुलाबाला पिवळ्या रंगाच्या तर दुसऱ्या कुंडीतील गुलाबाला लालभडक. कळ्या पाहूनच मन भरून गेले. थोड्या वेळाने त्या मस्तपैकी उमलल्या. आणि त्या फुलांनी आपले सौंदर्य अतिशय नाजूकपणे, तरलपणे जणू काही पेश केले. तो हळदीसारखा पिवळाधमक रंग आणि कुंकवासारखा लाल रंग. खरं तर दोन्ही भडकच..! पण निसर्गाची किमया अशी की फुलांच्या रूपात ते रंग पाहताना अजिबात भडक वाटत नाहीत. उलट मन प्रसन्न करतात. रात्र झाली की बागेत असणारी रातराणी फुलते. आणि आपल्या धुंद सुवासाने वातावरण भारून टाकते. निसर्ग त्याचे काम करीत असतो.
जणू सगळे जीवनचक्र थांबले आहे, असा भास होत असतानाच, निसर्ग हा संदेश देतो आहे की हे मानवा , तू कार्यरत राहा अगर नको राहूस, मी माझे काम करणार आहे. खरं म्हणजे आपण केवढी प्रगती केली नाही ? चंद्रावर पोहोचलो, मंगळावर पोहोचलो. नवनवीन शोधांनी निसर्गावर मात केली. आम्हाला स्वर्ग दोन बोटं उरला. आमच्या या प्रगतीचा आम्ही टेंभा मिरवू लागलो. निसर्गानेही काही दिवस आम्हाला हा टेंभा विनातक्रार मिरवू दिला. पण ( कदाचित ) आमच्याच कार्यकर्तृत्वातून निर्माण झालेल्या कोविड -१९ नामक क्षुद्र विषाणूजन्य आजाराने हा प्रगतीचा फुगा टाचणी लावावी तसा फोडून टाकला. आणि आमचे पाय जमिनीवर आले.
जगातील काही देशांनी आपल्या प्रगतीचे ध्वज लावून ठेवले होते. अमेरिका, इंग्लंड, स्पेन, इटली, चीन यासारखे देश प्रगत असल्याचा दावा करत होते. असतीलही ते देश प्रगत. पण करोनमुळे हे प्रगतीचे ध्वज धडाधड खाली कोसळले. या नैसर्गिक ( की मानवनिर्मित ? ) संकटाशी लढताना त्यांच्या नाकीनऊ आले. या युद्धात अनेकांना शहीद व्हावे लागले. अर्थव्यवस्था डबघाईला आली . आणि आपण सगळे या करोनपर्वातून बाहेर पडल्यावर सुद्धा अर्थव्यवस्थेची ही गाडी रुळावर यायला काही वर्षे जावी लागतील. या कालावधीत केवळ अर्थव्यवस्थेचेच नव्हे तर माणसाचे सुद्धा पुनरुज्जीवन आम्हाला करावे लागणार आहे. मने सांधावी लागणार आहेत. धीर द्यावा लागणार आहे. मानसिक बळ द्यावे लागणार आहे.
पण या वाईटातून सुद्धा काही चांगले होणार आहे. त्यातून काही धडा आम्हाला मिळाला आहे. पुढील काळात आम्ही तो गिरवणार असू तर चांगलेच होईल. अन्यथा ' इतिहासाची पुनरावृत्ती होत असते ' या न्यायानुसार पुन्हा काळ आम्हाला कधी तरी असा जबर तडाखा दिल्याशिवाय राहणार नाही. या काळात आम्ही घरी एकत्र राहायला शिकलो. घरचे अन्न खायला शिकलो. आपत्तीत सापडलेल्याना मदत करायला शिकलो. आणखीन एक महत्वाची गोष्ट शिकलो. सण, उत्सव, वाढदिवस यासारख्या गोष्टी घरी राहून पण साजऱ्या करता येतात हेही आमच्या लक्षात आले. अर्थात अशी परिस्थिती येणे वाईटच. पण जशी प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी किनार असते, तसा प्रत्येक अनुभव किंवा परिस्थिती आपल्याला काहीतरी शिकवून जाते.
या कालावधीत वाहने बंद असल्यामुळे प्रदूषणात कमालीची घट झाली. नासाने या कालावधीत भारतात कमी झालेल्या प्रदूषणाचा, किंवा प्रदूषणमुक्त भारताचा नकाशा जारी केलेला आपण बातम्यांमध्ये पाहिला असेल. तसेच या कालावधीत काही व्हिडीओ माझ्या पाहण्यात आले. तुमच्याही आले असतील. रस्त्यावरची माणसाची वर्दळ बंद झाल्याने पशुपक्षी मुक्तपणे बागडू लागले आहेत. मोर रस्त्यांवर येऊन आपला पिसारा उभवून नाचत आहेत. मानवाने जर निसर्गाच्या कार्यात ढवळाढवळ करण्याचे बंद केले तर काय चमत्कार घडू शकतो, याची ही गोष्ट निदर्शक आहे.
काही दिवसांपूर्वी मी अमरावतीच्या ' शाश्वत स्कुल ' ला भेट द्यायला गेलो होतो. त्या शाळेत सेंद्रिय शेतीची कल्पना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात आणली आहे. तेथील संचालक अतुल गायगोले यांनी सुभाष पाळेकर यांची माहिती मला सांगितली. सुभाष पाळेकर हे कृषितज्ज्ञ. त्यांचे ' नॅचरल फार्मिंग ' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. शाश्वत स्कुलमध्ये पाळेकरांनी सांगितलेल्या पद्धतीने शेतीची कल्पना राबवली जाते. एकदा पाळेकरांना कोणीतरी विचारले की निसर्ग पुन्हा पूर्वीसारखा होण्यासाठी काय करावे लागेल ? पाळेकरांनी फार सुंदर उत्तर दिले. ते म्हणाले, ' मानवाने काही करायचे नाही. निसर्गाच्या कार्यात ढवळाढवळ करायची नाही. निसर्ग आपले काम बरोबर करतो. ' आणि त्याचेच प्रत्यंतर या निमित्ताने आपल्याला येते आहे. कवीवर्य भा रा तांब्यांची एक सुंदर कविता आहे ' जण पळभर म्हणतील हाय हाय. ' या कवितेत ते म्हणतात, ' मी जाता राहील कार्य काय ?' खरंच आहे. मानवावाचून निसर्गाचे काही अडत नाही. अडते ते माणसाचे. म्हणून निसर्ग जपू या.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा