मुख्य सामग्रीवर वगळा

एक जगावेगळा वनस्पतिशात्रज्ञ

उगवतीचे रंग

एक जगावेगळा वनस्पतिशात्रज्ञ

आज मी  तुम्हाला एका जगावेगळ्या माणसाची ओळख करून देणार आहे. त्याचं नाव आहे ल्युथर बरबँक. हा अमेरिकन वनस्पती शास्त्रज्ञ. गेल्या शतकात होऊन गेला. १८४९ ते १९२६ हा त्याचा जीवनकाल. त्यांचा जन्म अमेरिकेतील मॅसॅचूसेट्स प्रांतातला. पण आपल्या प्रयोगांना अनुकूल असलेल्या कॅलिफोर्नियातील सांता रोझा येथे त्यांनी आपल्या वनस्पतींवरील संशोधन  कार्याला सुरुवात केली. त्या काळात या माणसाने वनस्पतींवर जे प्रयोग केले आणि त्याचे असे आश्चर्यकारक परिणाम मिळवले की आजही त्याच्यावर आपला विश्वास बसणे कठीण जाते.

त्याला वनस्पतींचा जादूगारच म्हटले पाहिजे. आपल्या अनेक वर्षांच्या परिश्रमाने त्यांनी वनस्पती, फळझाडे, फुलझाडे आदींवर प्रयोग करून त्यांच्या जवळपास आठशे नवीन जाती निर्माण केल्या. त्यांच्या नावावर पंधरा पेटंट्स जमा  आहेत. खरे म्हणजे त्यांचे कार्य त्याहूनही कितीतरी मोठे आणि विस्तृत आहे. त्यांनी जी पेटंटस मिळवली, त्यात केवळ प्लम फळांच्या १३३ जातींचा तर लिलीच्या ५० प्रकारच्या जातींचा समावेश आहे. प्लमचा नवा संकरित प्रकार साध्य करण्यासाठी बरबँक यांनी प्लमचे तब्बल ३०,००० प्रकार अभ्यासले. देशी आणि परदेशी वनस्पतींच्या संकरातून नवे, उपयुक्त वनस्पतींचे प्रकार विकसित करणे ही त्यांची खासियत होती.

काटे नसलेले गुलाब, काटे विरहित निवडुंग एकाच झाडावर अनेक प्रकारची फळे आणि फुले ही तुम्हाला त्यांनी जेथे प्रयोग केले त्या सांता रोझामध्ये आजही पहायला मिळतील. त्यांनी अनेक नवीन प्रकारच्या भाज्या, फुले त्यांनी विकसित केली. जी आज अमेरिकेत त्यांच्या नावाने ओळखली जातात. पण मला तुम्हाला या माणसाचे एक आगळेवेगळे वैशिट्य सांगायचे आहे. हा माणूस म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञाच्या रूपात असलेला संतच. याने केवळ माणसांवरच प्रेम केले नाही, तर पाळीव प्राणी,  पक्षी आणि वनस्पती यांच्यावर भरभरून प्रेम केले. इतके की जणू त्यांची भाषा त्यांना समजत होती.

त्यांनी आपल्या बागेत एक गुलाबाचे रोप लावले होते. त्या गुलाबाशी ते रोज बोलत. त्याच्या जवळ बसायचे. म्हणायचे, ' अरे, आपण दोघे जरी वेगवेगळ्या रूपात असलो तरी आपला आत्मा एकच आहे. तुला काट्यांची  जरुरी नाही. तू आपला हा स्वभाव सोडून दे. जगाला सुगंध आणि सौंदर्य देण्यासाठीच तर तुझा जन्म झालाय ना. मग काट्यांची आवश्यकता नाही. ' हळूहळू या गुलाबाला फांद्या फुटू लागल्या. कळ्या आल्या. आणि त्यांची मोठमोठी गेंदेदार फुले झाली. पण आश्चर्य म्हणजे या झाडावर एकही काटा आला नाही. आपण जसे प्रेमाचे भुकेले असतो, तशीच झाडेही असतात. त्यांच्याशी आपण संवाद साधत गेलो तर आपल्याला हवे तसे परिणाम आपण त्यांच्याकडून मिळवू
शकतो.

एकदा त्यांनी आपल्या बागेत एक अक्रोडाचे झाड लावले. अक्रोडाच्या झाडाला फळे येण्यासाठी किमान ३२ वर्षे लागतात. ते रोज त्या अक्रोडाच्या झाडाशी बोलत असत. ते त्याला म्हणायचे, ' अरे, तुला फळ येण्यामध्ये अडचण काय आहे ? मी तुला सगळ्या गोष्टी देतो आहे. तसे आपण दोघे एकच आहोत. आणि मला तुझी फळं चाखायची आहेत. पण ३०-३२ वर्षे थांबण्याइतका वेळ माझ्याकडे नाही रे. ' आणि त्यांच्या त्या संवादाचा त्या झाडावर अक्षरशः जादूसारखा परिणाम झाला. ते भराभर वाढू लागले. आणि सोळाव्या वर्षीच ते फळांनी  बहरले. ती फळेही खूप गोड होती. आणि आता त्याला दरवर्षी फळे येऊ लागली.

निवडुंगाला काटे असतात हे आपल्याला माहिती आहे. पण त्यांच्या बागेत त्यांनी काटेविरहित निवडुंग विकसित केला. आता त्याचा वापर जनावरांसाठी खाद्य म्हणून होऊ शकणार होता. त्या निवडुंगाशी देखील ते रोज संवाद साधत असत. ' अरे, आता तुला काट्यांची जरुरी नाही. हा आपला स्वभाव सोडून दे. कुठलीही भीती बाळगू नकोस. मी तुझा मित्रच आहे. ' आणि खरोखरच निवडुंग काटेविरहित झाला. ज्या झाडांना फळे येण्यासाठी अनेक वर्षे लागतात, त्या झाडांवर कलम करून त्यांनी खूप लवकर फळे प्राप्त केली. शिवाय त्यांच्यातील चांगले गुणधर्म असणारी  झाडे विकसित केली. त्यांच्यातील नको असणारे गुणधर्म टाळले.

भारतातील थोर महर्षी स्वामी योगानंद हे बरबँक यांच्या सांता रोझा मध्ये त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. ते पुढे या थोर अमेरिकन शास्त्रज्ञाकडे आकर्षित झाले. बरबँक सुद्धा स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले. त्यांनी स्वामींकडून क्रियायोगाची दीक्षा घेतली. आणि पुढे आयुष्यभर त्या प्रमाणे आचरण केले. बरबँक ही निसर्गाशी अतिशय एकरूप झालेली व्यक्ती होती. त्यामुळे निसर्गाने आपली काही रहस्ये आणि गूढ शक्ती त्यांना आधीच प्रदान केली होती. त्यांची आई अतिशय श्रद्धाळू ख्रिश्चन स्त्री होती. पण तिच्या निधनानंतर तिच्या अस्तित्वाचा आभास त्यांना आपल्या या दिव्य शक्तीद्वारे होत असे. किंवा त्यांच्यात बोलणेही होत असे.

स्वामी योगानंदांना त्यांच्या बागेतील निवडुंगाचे एक रोप हवे होते. तेव्हा बरबँक यांच्या बागेतील एक कामगार ते तोडू लागला. लगेच बरबँक यांनी त्याला थांबविले. ते स्वतः त्या झाडाजवळ गेले. त्याच्या काही फांद्या त्यांनी त्या झाडाशी बोलत हळुवारपणे तोडल्या. ते त्या झाडाला म्हणत होते, ' अरे, मी तुला तोडतो आहे असे समजू नकोस. तर तुझा आणखी विकास आणि विस्तार होण्यासाठी मी तुला दुसरीकडे पाठवतो आहे. तेव्हा तू आनंदाने जा. आपला संबंध इथे संपणार आहे असे समजू नकोस. तुझे आणि माझे नाते कायम राहील. ' मग त्यांनी त्या निवडुंगाच्या काही फांद्या स्वामीजींजवळ दिल्या. आणि नंतर त्या उत्तम प्रकारे लागल्या.

आपल्या ' द ट्रेनिंग ऑफ द ह्युमन प्लॅन्ट ' या पुस्तकात ते म्हणतात, ' आपल्या शिक्षण पद्धतीत नवीन प्रकारच्या बदलांची जरुरी आहे. माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर मी जसे फळे आणि फुले यांच्यात उच्च प्रतीचे गुणधर्म आणण्याकरिता काही धोक्याचे आणि धाडसाचे प्रयोग केले. पण त्यात मला यशही आले. शिक्षण पद्धतीत अशाच नवनवीन आणि धाडसाच्या सुधारणा कराव्या लागतील. ' आज आपण, आपली मुले आणि आपली शिक्षणपद्धती निसर्गापासून दूर जाते आहे या गोष्टीची त्यांना खंत वाटत होती.

थोडक्यात सांगायचे तर बरबँक यांनी निसर्गावर प्रेम केले, संवाद साधला. कबीरांच्या भाषेत सांगायचे तर ' ढाई अक्षर प्रेमका ' हाच त्यांचा मंत्र होता. या मंत्रामुळे आपण फक्त माणसाशीच नव्हे तर निसर्गाशी सुद्धा संवाद साधू शकतो. त्याच्यात हवा तसा बदल घडवून आणू शकतो. आपणही प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे ?

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
      ९४०३७४९९३२

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...