उगवतीचे रंग
बुद्धिमतां वरिष्ठं ....
रामायणात किष्किंधाकांडापासून सुरु झालेल्या हनुमान चरित्राला एक आगळेवेगळे महत्व आहे. इथून रामाच्या सीतेचा शोध घेण्याला सुरुवात होते. आणि या सीता शोधात जर सगळ्यात महत्वाची भूमिका कोण बजावत असेल, तर तो आहे फक्त हनुमान. अंजनी आणि केसरी यांच्या पोटी जन्मलेला हा वायुपुत्र सगळ्या दृष्टीने अलौकिक आहे. तो ज्ञानी आहे, प्रचंड बुद्धिमान आहे. ' अतुलनीय बलधामा ' आहे. उज्ज्वल चारित्र्य आणि दास्यभक्ती यांचा आदर्श आहे. त्याला फक्त एकच गोष्ट प्रिय आहे आणि ती म्हणजे रामनाम. जिथे कुठे रामकथा सुरु असेल, तिथे हनुमान उपस्थित असतोच असे म्हटले जाते. रामभक्तांना हनुमान हा सदैव प्रिय आणि आदरणीय असा आहे. रामायणातून हनुमानाला वगळण्याची कल्पना करून पहा. रामायणातला रस निघून जातो.
रामाच्या परिवारातील राम आणि हनुमान वगळता इतर कोणाचेही स्वतंत्र मंदिर नाही. रामाची आणि हनुमानाची स्वतंत्र मंदिरे आहेत. एवढेच नाही तर ज्या ज्या ठिकाणी रामाची मंदिरे आहेत, त्या त्या ठिकाणी हनुमानाची सुद्धा मूर्ती विराजमान आहेच. जशी रामलक्ष्मण ही अविभाज्य जोडी, तशीच राम आणि हनुमान ही देखील अविभाज्य जोडी. ही रामभक्त असण्याची जी सर्वोच्च अवस्था हनुमानाने प्राप्त केली ती उगीच नाही. त्या मागे त्याचा सेवाभाव, भक्तीची पराकाष्ठा हे गुण आहेत. रामाच्या दृष्टीने कुठलेही महत्वाचे कार्य कोणावर सोपवून निर्धास्त राहावे अशी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे हनुमान. नाजूकातले नाजूक काम आणि कठीणातले कठीण काम आपल्या बुद्धिकौशल्याच्या बळावर पार पाडणारा विश्वासू दूत म्हणजे हनुमान.
सुग्रीव जेव्हा रामलक्ष्मणाचा हेतू जाणून घेण्यासाठी हनुमानाला ऋष्यमूक पर्वतावर पाठवतो, तेव्हा हनुमान ज्या पद्धतीने रामाशी बोलतो ते पाहून प्रत्यक्ष राम त्याला ज्ञानी आणि वेदउपनिषदांचा जाणकार असल्याचे जाहीर करतो. . ही सोपी गोष्ट नाही. वाली वधानंतर वालीच्या पत्नीचा शोक अनावर होतो. तिचे सांत्वन करण्याचे काम हनुमान मोठ्या बुद्धिपूर्वक करतो. अंगद जेव्हा सुग्रीवाच्या विरोधात जाऊन राज्याचे दोन तुकडे करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचतो तेव्हा अंगदाला समजाविण्यासाठी हनुमान जातो. अंगद हा वालीप्रमाणेच शक्तिशाली होता आणि कोणाचेही सहजासहजी ऐकणारा नव्हता. त्या अंगदाला हनुमान अशा पद्धतीने समजावतो की त्यामुळे राज्याचे दोन तुकडे तर होत नाहीतच पण अंगद हा राज्याचा एकनिष्ठ सेवक बनतो.
म्हणून समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांबद्दल जे म्हटले आहे
शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे , शिवरायाचे सलगी देणे कैसे असे !
तेच हनुमानाला सुद्धा तंतोतंत लागू होते.
हनुमंताचे आठवावे रूप
हनुमंताचा आठवावा प्रताप
हनुमंताचा आठवावा साक्षेप, भूमंडळी.
हनुमंताचे कैसे बोलणे, हनुमंताचे कैसे चालणे, हनुमंताचे सलगी देणे कैसे असे.
पुढे तो लंकेत सीतेच्या शोधासाठी जातो. सीतेचा सर्वत्र शोध घेतो. रावणाच्या स्त्रिया असतात, तेथे अंतःपुरात जातो. त्या ठिकाणी काही स्त्रियांना तो नको त्या अवस्थेत पाहतो. पण त्याच्या मनाची जराही चलबिचल होत नाही. कारण ध्येय एकच डोळ्यापुढे. ' रामकाज करने को आतुर '. फक्त सीतेचा शोध घेणे. म्हणून तो जसा ' बुद्धिमतां वरिष्ठम ' आहे तसाच तो ' जितेंद्रिय ' देखील आहे. सीतेला पाहिल्यावर एकदम तो आपली ओळख देत नाही. तर आधी रघुकुल, त्याची परंपरा इ बद्दल बोलतो. सीतेचा विश्वास संपादन करतो. मगच आपण रामाचा दूत म्हणून आलो आहोत हे तिला सांगतो.
त्याने केलेलं जे लंकादहन आहे, त्यातही त्याची बुद्धिमत्ता दिसते. कुशल राजनीतीची जाण दिसते. पुढे चालून जे रामरावण युद्ध होणार आहे, त्यातले अर्धे काम तो लंकादहनाने करून टाकतो. लंकावासीयांचे मनोधैर्य त्यामुळे खच्ची होते. आणि पुढे चालून काय होऊ शकेल त्याची चुणूक त्यातून त्यांना दिसते. त्याचप्रमाणे अजेय,अभेद्य अशी जी रावणाच्या लंकेची ख्याती होती, ती तो धुळीस मिळवतो. त्याच्या चातुर्याचे आणि बुद्धिमत्तेचे अनेक दाखले आपल्याला रामायणात बघायला मिळतात. त्याने आपण स्तिमित होतो. त्याचा भक्तिभाव पाहून आपण नम्र होतो. मारुती हा भलेही वानरकुलातला असेल, पण त्याचा पुरुषोत्तम असण्याचा प्रवास एक व्यक्ती , एक माणूस म्हणून सुरु झाला. जसा रामाचा देवपदापर्यंतचा प्रवास हा एक माणूस म्हणूनच सुरु होतो, तसाच अगदी हनुमानाचा. हे त्यांच्यातील साम्य आहे. तो नर होता की वानर हे घडीभर बाजूला ठेवू. पण तो पुरुषोत्तम मात्र होता. आणि राम जसा पुरुषोत्तम आहे तसाच पुरुषोत्तम हनुमानही आहे. रामायणाच्या उत्तरकांडात स्वतः रामाने हनुमानाला पुरुषोत्तम म्हटले आहे.
हनुमान सीतेचा शोध करून जेव्हा परत येतो, तेव्हा त्याच्या कामगिरीसाठी रामाजवळ शब्द नाहीत. राम म्हणतो, ' हे हनुमंता , तुझे माझ्यावर अगणित उपकार झालेले आहेत. मी तुला काय देऊ ? तुला देण्यासारखे असे काय आहे ? तुझ्या प्रेमाची, सेवेची आणि त्यागाची किंमत कशानेही होणार नाही. आणि म्हणून मी तुला माझे प्रेमरूपी केवळ आलिंगन देतो. यावरून रामाच्या हृदयात हनुमंताला केवढे श्रेष्ठ स्थान होते ते आपल्याला लक्षात येते. खरं तर हनुमानालाही दुसरे काही नकोच होते. तो म्हणतो, ' प्रभू, मला माझी तुमच्यावर असलेली जी प्रेमभक्ती आहे ती कमी होऊ नये आणि रामाशिवाय मनात कोणताही अन्य भाव निर्माण होऊ नये, एवढेच वरदान द्या. '
या हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपल्यालाही ही हनुमंताची भक्ती काही अंशी का होईना , पण घेता आली तर घेऊ या. आणि रामकृपेस पात्र व्हायचे असेल तर आधी हनुमान कृपेस पात्र होऊ या. ' श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. '
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा