मुख्य सामग्रीवर वगळा

महाभारतातील युद्ध : केवळ रणांगणावरचे ... ?

उगवतीचे रंग

 महाभारतातील युद्ध : केवळ रणांगणावरचे ... ?

महाभारत हा ग्रंथ महर्षी व्यासांच्या अलौकिक प्रतिभेचा अविष्कार आहे, हे जेव्हा महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपण पाहतो, तेव्हा लक्षात येते. महाभारतातील युद्ध केवळ रणांगणावर झालेले नाही. ते मनामनातले पण युद्ध आहे. एक कृष्णाची व्यक्तिरेखा जर सोडली, तर बाकी सर्वांच्या व्यक्तिमत्वाला हे दुभंगलेपण व्यापून राहिले आहे. पितामह भीष्मांपासून आपण सुरुवात करू.

भीष्म हे आपल्याच हस्तिनापूरच्या असलेल्या निष्ठेप्रती असलेल्या प्रतिज्ञेने बांधले गेले आहेत. धृतराष्ट्राचे अनेक निर्णय पितामहांना आवडत नाही. दुर्योधनाचे वागणे त्यांना पसंत नाही. शकुनीची कपटनीती ते ओळखून आहेत. पण आपल्या प्रतिज्ञेशी बांधले गेले असल्याने, ते काही करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या मनात कायम द्वंद्व सुरु आहे. आणि ज्याच्या मनात आयुष्यभर असं द्वंद्व सुरु राहतं, त्याच्यावर केवढा मानसिक ताण येत असेल याची कल्पना आपण करू शकतो. म्हणून पितामह भीष्म की जे एक शूर योद्धा आहेत, सगळं तत्वज्ञान आणि नीतीचे गाढे विद्वान आहेत, ते केवळ असहाय झालेले आपण पाहतो.

जी गोष्ट भीष्मांची, तीच कृपाचार्य आणि द्रोणाचार्यांची . फरक एवढाच की भीष्म जसे आपल्या प्रतिज्ञेने बांधले गेले आहेत, तसे हे दोघे प्रतिज्ञेने बांधले गेले नाहीत. पण ते निष्ठेने बांधले गेले आहेत. शिवाय कुरु राजाश्रित आहेत. त्यांच्याही मनात या सगळ्या अप्रिय गोष्टींबद्दल द्वंद्व सुरु आहे आणि तेही अस्वस्थ आहेत. कृष्णाने महाभारतात धर्माच्या रक्षणासाठी भूमिका घेण्यात वेळोवेळी जो लवचिकपणा दाखवला, त्यातल्या लवचिकपणाचा थोडा जरी अंश या तिघांनी दाखवला असता तरी  तरी ते स्वतःच्या अस्वस्थतेला आणि या मानसिक द्वंद्वाला मोकळी वाट करून देऊ शकले असते.

पण त्याबद्दल त्यांना आपल्याला दोष देता येणार नाही. कारण त्यांची झालेली मनाची घडण त्यांना तसे करण्यापासून प्रवृत्त करीत होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो काळ जर आपण विचारात घेतला, तर त्या काळाला सुसंगत अशी त्यांची मनोभूमिका आपण समजू शकतो. कृष्णाप्रमाणे परिस्थितीशी मिळतेजुळते घेणे, किंवा धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी साम दाम दंड भेद या सारख्या अस्त्रांचा उपयोग करणे सर्वांनाच शक्य होते असे नाही. म्हणूनच ते विपरीत परिस्थितीत राहिले. सहन करीत राहिले. कृष्ण, चाणक्य आणि शिवाजी महाराज या सारखी व्यक्तिमत्वे ही या लवचिकपणाची आदर्श उदाहरणे होत. म्हणूनच ते युगपुरुष ठरले.

पितामह भीष्म, द्रोणाचार्य,  यांच्याप्रमाणेच धृतराष्ट्र, गांधारी यांच्याही मनात कायम संघर्ष सुरु आहे. धृतराष्ट्राने आपल्या पुत्रमोहाने तो ओढवून घेतलेला आहे असे म्हणता येईल. एका बाजूला दुर्योधनाला न्याय देताना आपण पांडवांवर अन्याय करतो आहोत ही बोच त्याच्या मनाला आहेच. शिवाय राजा म्हणून हस्तिनापूरची जबाबदारी त्याच्यावर असताना, त्याने तिला न्याय दिला नाही म्हणून अपराधीपणाची भावना सुद्धा त्याच्या मनात आहे. त्याला ती जाणीव भीष्म, विदुर आदी करून देतातही . पण कळूनही न वळल्यासारखे तो करत नाही.  म्हणून दुर्योधनापेक्षा तो जास्त दोषी ठरतो. गांधारी तशी मनाने अतिशय निर्मळ आहे. पतिव्रता स्त्री आहे. पण आपल्या पती आणि पुत्रापुढे तिचे काही चालत नाही. त्यामुळे तिच्याही मनात सारखे द्वंद्व सुरु आहे. विदुरासारख्या चतुर आणि विद्वान राजनीती तज्ज्ञ असलेल्या व्यक्तीची देखील काही काळ प्रचंड कुचंबणा होते. पण तो आपल्या स्पष्ट भूमिकेमुळे त्यातून बाहेर पडण्याचा यशस्वी प्रयत्न करतो. जे मनात आहे ते बोलून मोकळा होता. त्यामुळे त्याला फार मानसिक ताण राहत नाही.

कुंतीची अवस्था सुद्धा अशीच आहे. एका बाजूला तिचे मन कर्णासाठी तळमळत असते, तर दुसऱ्या बाजूला तिला कर्णासमोर आपल्या मुलांचे काय होईल या चिंतेने अस्वस्थ केलेले असते. म्हणून जसं महाभारतातलं युद्ध रणांगणावर खेळलं गेलं, तसंच ते प्रत्येकाच्या मनाचाही एक भाग बनलं. त्यातून कोणी सुटला नाही. युधिष्ठीर, भीम, अर्जुन, द्रौपदी, नकुल, सहदेव या सगळ्यांची वेगवेगळ्या कारणाने का होईना, पण तीच परिस्थिती आहे. त्यांचा मार्ग सत्याचा, धर्माचा आहे म्हणून त्यांची काही या सगळ्या हालअपेष्टातून सुटका झालेली नाही. उलट त्यांच्या वाट्याला जास्तच कष्ट आले.

महाभारतात महर्षी व्यासांनी ज्या काही व्यक्तिरेखा निर्माण केलेल्या आहेत, त्यात कर्णाची व्यक्तिरेखा अतिशय आकर्षक आहे. शौर्य, देखणेपणा, मनाची उदारता, दानशूरपणा, कोणत्याही परिस्थितीत मित्राला दिलेला आपला शब्द पाळण्याची वृत्ती, युद्धातले कौशल्य या कर्णाच्या जमेच्या बाजू आहेत. कर्णावर मृत्युंजय सारख्या ज्या काही कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, त्यामुळे कर्णाचे व्यक्तिमत्व जरा अधिकच झळाळून दिसते. थोडक्यात म्हणजे तो त्या कादंबऱ्यांचा नायक आहे, पण त्याचवेळी त्याच्यात असणारे काही दुर्गुण हे त्याच्या व्यक्तिमत्वाची झळाळी कमी करताना दिसतात. तो तसा अहंकारी आहे. आपल्या पराक्रमाबद्दल तो वेळोवेळी प्रौढी मिरवत असतो.

तो पराक्रमी असतोच यात वाद नाही, तरी अर्जुनाबरोबर झालेल्या प्रत्येक लढाईत त्याचा पराजय होतो. कोणत्याही युद्धात तो अर्जुनाला हरवू शकलेला नाही. त्याचा दुसरा दुर्गुण म्हणजे तो काही वेळा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधाने करतो. द्यूतक्रीडेच्या वेळी त्याने द्रौपदीबद्दल काढलेले उद्गार हे त्याच्या या मनोवृत्तीचे निदर्शक आहेत. त्याच्या या उद्गारांमुळे पुढे युद्धात कौरवांना त्याची जबर किंमत मोजावी लागलेली आहे. तसेच परशुरामांकडून अस्त्रविद्या शिकताना तो त्यांच्याशी खोटं बोलला आहे, त्यामुळे त्याने त्यांच्याकडून जे ब्रह्मास्त्र मिळवले, ते शेवटच्या क्षणी त्याला उपयोगी ठरत नाही.

पण तरीसुद्धा एकंदरीत कर्णाची व्यक्तिरेखा अशी आहे की एकाच वेळी त्याच्याबद्दल आदरही वाटतो आणि सहानुभूती सुद्धा वाटते. शिवाजी सावंतानी म्हटल्याप्रमाणे कर्णाचे आयुष्य हे एक जरतारी वस्त्र होते. पण त्याचे दुर्दैव इतके,की परिस्थितीच्या अनेक काट्यात अडकून हे वस्त्र ठिकठिकाणी फाटले आहे. नियती एखाद्यावर कसा अन्याय करू शकते, त्याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे कर्णाचे जीवन. जेव्हा त्याला युद्धात आपले कौशल्य दाखवायची वेळ येते, नेमके तेव्हाच श्रीकृष्ण आणि कुंती त्याला तो कुंतीपुत्र आहे, पांडवांचा ज्येष्ठ बंधू आहे असे सांगून त्याची मानसिक शक्ती खच्ची करतात. इंद्रही त्याच्या दानशूर वृत्तीचा फायदा घेऊन त्याची कवचकुंडले मागून घेतो. हे सगळे पाहिल्यावर अर्थातच त्याच्याबद्दल वाईट वाटते.  वास्तविक कुंतीचा तो पुत्र. सूर्यासारखा तेजस्वी असणारा, पांडवांचा ज्येष्ठ भ्राता. जन्मतःच कवचकुंडले घेऊन आलेला,पण त्याला या सगळ्या दुर्दैवी गोष्टी नशिबात येतात. सुतपुत्र म्हणून हिणवले जाते.

पण कर्णाने आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर प्राप्त केल्या. ' दैवायत्तम कुले जन्म, मदायत्तम तू पौरुषम ', म्हणजे कोणत्या कुळात, कोणत्या जातीत जन्म घ्यायचा, हे आपल्या हातात नसते. पण जिथे कुठे आपल्याला जन्म मिळाला, तिथे कर्तृत्व गाजवणे हे आपल्या हातात असते. असे कर्तृत्व तो गाजवतो. पण त्याच्याही मनात कायम द्वंद्व कायम आहे. तो विधात्याला म्हणतो की या सगळ्यात माझा काय दोष आहे ? पण शेवटी विधिलिखित किंवा नशीब यांच्यापुढे कोणाचेही चालत नाही. रामालाही वनवासात जावे लागते. पांडवांनाही अशाच अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागते. ग दि माडगूळकरांनी गीत रामायणात म्हटल्याप्रमाणे ' पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा..' हेच खरे. पण याचा अर्थ असा नाही की आपण निमूटपणे सगळे दैवावर सोपवून निर्धास्त राहायचे. राम  आणि कृष्ण मानव अवतारात आले. त्यांनाही हे ' पराधीनपण ' चुकले नाही. पण आपल्या कर्तृत्वाने ते युगपुरुष ठरले. तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसे सुद्धा दैंनदिन जीवनात अनेक द्वंद्वाना सामोरे जात असतो. आपलेही मन एक रणभूमी असते. म्हणून तर संत तुकाराम म्हणतात, ' रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. ' आणि हे युद्ध जिंकायचे असेल तर पुन्हा कृष्णाचा उपदेशच आपल्या कामी येतो. आपले निहित कर्म करणे हेच आपल्या हातात आहे. ते जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करू या.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥

जय श्रीकृष्ण...

©️ *विश्वास देशपांडे,* *चाळीसगाव.*

      *९४०३७४९९३२*

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...