मुख्य सामग्रीवर वगळा

इंद्रायणी काठी देवाची आळंदी...

उगवतीचे रंग

इंद्रायणी काठी देवाची आळंदी...

' इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची ' हे भीमसेन जोशींच्या आवाजातील भक्तीगीत कानावर पडले की मन नकळत आळंदीला जाऊन पोहोचते. ज्ञानियांचा राजा, योगियांचा राणा असलेली ज्ञानेश्वर माऊलींची शांत, चेहेऱ्यावर विलक्षण तेज असणारी मूर्ती डोळ्यांसमोर येते. ज्ञानदेव, तुकोबांनी ज्या नदीच्या काठी आपले पुण्यप्रद वास्तव्य केले ती इंद्रायणी डोळ्यांसमोर येते. ज्ञानदेवांच्या मंदिराचा कळस दृष्टीस पडतो. हात नकळत जोडले जातात.

पुण्यापासून २२ किमी अंतरावर असणारी ही  देवाची आळंदी. ज्ञानेश्वर माऊलींची जन्मभूमी जरी आपेगाव असली,  तरी कर्मभूमी आणि समाधिस्थान मात्र आळंदी हेच आहे. त्यामुळे त्यांच्या वास्तव्याने ही भूमी पावन झालेली आहे. वारकरी संप्रदायाचा पाया इथे घातला गेला. आज या गोष्टीला सातशेहून अधिक वर्षे झाली असली, तरी आळंदीचा तीर्थक्षेत्र म्हणून उल्लेख त्याही आधीपासूनचा आहे. या ठिकाणी पूर्वी भगवान शंकरांसह अनेक ऋषीमुनी, थोर साधक, योगी यांनी तप केले आहे. ही तपोभूमी आहे. पुण्यभूमी आहे. आळंदीला स्कंद पुराणात आनंदवन, वारुण, कपिल, अलका व सिद्धक्षेत्र अशा वेगवेगळ्या नावानी संबोधले गेले आहे. पण संत एकनाथ,संत  नामदेव, तुकाराम महाराज आदी संतांनी आळंदीचा उल्लेख अलकापुरी , अलंकापुरी, अलंकावती असा केला आहे. येथे सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. त्यामुळे आळंदीला सिद्धक्षेत्र असंही म्हटलं गेलं.

इंद्रायणी नदी आपल्याला ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यासारख्या संतांच्या पुनीत वास्तव्याने माहिती झाली असली, तरी तिचा इतिहास फार प्राचीन आहे. लोणावण्याजवळच्या कुरवंडे डोंगरात उगम पावणारी ही नदी कुरवंडे, कार्ले, कामशेत, मोशी, आळंदी, मरकळ इ मार्गाने जाऊन तुळापूर येथे भीमा नदीला मिळते. त्याआधी भीमा नदीला शेल पिंपळगाव येथे भामा नदी मिळते. म्हणून तुळापूरला इंद्रायणी, भीमा, भामा यांचा त्रिवेणी संगम आहे.

इंद्रायणी नदी ही पुर्वाश्रमाची कुबेरगंगा. ती इंद्रायणी कशी झाली यामागे एक कथा आहे. येथे भगवान शंकर आणि माता पार्वती क्रीडा करीत असताना, इंद्रही त्यांच्या मागोमाग गेला. पार्वतीच्या रुपाकडे पाहून तो मोहित झाला. आणि पार्वतीला त्याने विचारले, ' या अंगाला राख फासून फिरणाऱ्या शंकराची सेवा तू कशी करतेस ? त्याच्यात तुला कोणते सौख्य मिळते ? ' त्याच्या या प्रश्नांचा रोख जाणून पार्वती अतिशय क्रोधीत झाली. तिने इंद्राला शाप दिला. ' तू येथून पुढे सर्व काळ जलरूपातच राहशील. तुला स्त्रीत्व प्राप्त होईल आणि जगात कोणीही तुला पूज्य मानणार नाही. '

या शापाने इंद्र भानावर आला. त्याला स्वतःच्या वर्तनाची लाज वाटली. भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्याने घोर तप केले. तेव्हा शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला सांगितले, ' तुझ्यापासून उत्पन्न झालेल्या नदीला इंद्रायणी नाव लाभेल. ती मला प्रिय होईल आणि पवित्र होईल. ' या ठिकाणी इंद्रायणी नदी एकटीच नाही, तर इंद्रायणी, भागीरथी, आणि मनकर्णिका अशा तीन नद्यांचा संगम असल्याचे मानले जाते. अशा या इंद्रायणीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. तिच्यामध्ये अनेक तीर्थांचा वास असल्याचे मानले जाते. पण असा पावन गंगेसारखा वारसा असणारी ही इंद्रायणी नदी आज मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाली आहे. या देवाच्या आळंदीत आजमितीला वर्षभरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लग्न लागतात. देवाची आळंदी ही लग्नाची आळंदी म्हणून जणू काही प्रसिद्धीला येऊ लागली आहे.

असे असले तरी ज्ञानोबा माऊलींवरील असलेल्या श्रद्धेमुळे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. एकादशीला आळंदी हरिनामाने दुमदुमते.आळंदीला माऊलींचे जे मंदिर आहे, ते देऊळवाडा या नावाने ओळखले जाते. माउलींच्या मंदिराकडे जाताना गांधीवाडा लागतो. हा वाडा म्हणजे माऊलींचे आजोळ होते असे सांगितले जाते. माऊलींची समाधी अर्थात देऊळवाडा भव्य आणि प्रशस्त आहे. त्याच्या तीन दिशांना तीन दरवाजे आहेत. उत्तरेकडील महाद्वारातून आपण आत जातो. समोरच आपल्याला समाधीचे दर्शन होते. वारकरी भाविक सर्वप्रथम या आवारातच माउलींना साष्टांग नमस्कार घालतात. उत्तराभिमुख असलेल्या या महाद्वारातून प्रवेश करताना पहिलीच एक मोठी दगडी पायरी लागते. तिला हैबतबाबांची पायरी असे म्हटले जाते. पंढरपूरला जशी संत नामदेवांची पायरी आहे, तशीच पावन आणि पवित्र ही हैबतबाबांची पायरी. हैबतबाबा हे संत ज्ञानेश्वरांचे परम भक्त होते. त्यांच्याच इच्छेनुसार त्यांच्या निधनानंतर त्यांच्या देहाचे विसर्जन या पहिल्या पायरीच्या खाली करण्यात आले. भाविक या पायरीला वंदन करून पुढे जातात. तिच्यावर पाय ठेवत नाहीत.

गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर आपल्याला माऊलींची समाधी दिसते. एकावर एक चार लहान शिळा असून माऊलींची मध्यभागी समाधी आहे. या समाधीच्या खाली असणाऱ्या विवरामध्ये निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना समाधीस्थानी बसवले होते. तेथून बाहेर येताना निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांच्या हाती असणारा शुष्क अजानवृक्षाचा दंड घेतला आणि तो बाहेर समाधीस्थानावर रोवला. त्या दंडाला माऊलींच्या समाधीचे रक्षण करण्याची आज्ञा दिली. कालांतराने या शुष्क काष्ठाला पालवी फुटून त्याचे सुंदर अशा अजानवृक्षात रूपांतर झाले. हा अजानवृक्ष अतिशय पवित्र आणि आरोग्यदायी मानला जातो. त्याची पाने, फळे भक्षण करणे हे ज्ञानप्राप्ती करून देणारे, तसेच आरोग्यप्राप्ती करून देणारे मानले जाते.

पुढे ज्ञानेश्वरांनी संत एकनाथांना दृष्टांत देऊन माझ्या गळ्याशी याच अजानवृक्षाच्या मुळ्या आल्या आहेत. त्या दूर कर असा दृष्टांत दिला. त्यानुसार एकनाथ महाराज येथे आले आणि त्यांनी हा अडथळा दूर केला. खरे म्हणजे यात एक अध्यात्मिक रहस्य दडलेले आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून तीनचारशे वर्षे झाली होती. पूर्वी छपाईची कला अवगत नसल्याने ग्रंथ हाताने लिहिले जात. त्यामुळे या कालावधीत ज्ञानेश्वरी अशुद्ध झाली होती. ती शुद्ध करणे, तिच्यात दुरुस्ती किंवा संस्करण करणे आवश्यक झाले होते. तेच ज्ञानेश्वर महाराजांनी एकनाथांना सांगितले. एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी शुद्ध स्वरूपात पुन्हा आपल्यासमोर आणली. आज त्यांनी शुद्ध केलेली ज्ञानेश्वरी आपण वाचतो.

 थोडे पुढे आले की येथे सुवर्ण पिंपळ आपल्याला दिसतो. याच पिंपळाला ज्ञानेश्वरांच्या आईने म्हणजे रुख्मिणीबाईंनी प्रदक्षिणा घातल्या होत्या. येथेच त्यांची व रामानंद स्वामींची भेट घडली. रामानंद स्वामींनी तेव्हा पुत्रवती भव असा आशीर्वाद त्यांना दिला. पण या आशीर्वादानंतरही त्यांचा दुःखी चेहरा पाहून त्यांनी रुख्मिणीबाईंची हकीगत जाणून घेतली. आणि आपण काही दिवसांपूर्वी ज्यांना संन्यास दिला ते विठ्ठलपंत या बाईंचे यजमान आहेत हे कळल्यावर, त्यांनी विठ्ठलपंतांना परत पाठवले. आणि नंतर मग या जोडप्याला निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई अशी साऱ्या जगाला वंदनीय असलेली चार मुले झाली. रुख्मिणीबाई धन्य झाल्या. याच पिंपळाच्या खाली हे सारे घडले म्हणून हा सोन्याचा पिंपळ. या वृक्षाखाली जो बसतो, त्याचा संसार सुखाचा होतो, असे म्हटले जाते.

अशा या समाधिमंदिराच्या बाहेर दर्शनासाठी अनेक छोटीमोठी मंदिरे आहेत. सभामंडप आहेत. कारंजा मंडप, पंखा मंडप, शेजघर आहे. शिवाय गणेश मंदिर, मुक्ताई मंदिर, सिद्धेश्वर मंदिर आहे. प्रदक्षिणा मार्गावर महादेवबाबांच्या पादुका, गरुडपार, दीपमाळ, पुंडलिकाचे मंदिर, एकनाथांच्या पार अशी ठिकाणे आहेत. ज्यांचे भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतात. आळंदीला शंभर वर्षांची परंपरा असणारी वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेत शिक्षकांना पगार नाही आणि विद्यार्थ्यांना फी नाही. परंतु आता फी घेऊन शिक्षण देणाऱ्या अनेक संस्थाही येथे अस्तित्वात आल्या आहेत.

अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ! जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र !
तया आठविता महा पुण्यराशी ! नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वराशी  !!

अशी ही पवित्र अलंकापुरी उर्फ आळंदी. आपण येथे जेव्हा शक्य होईल तेव्हा जरूर जावे. माउलींच्या दर्शनाने मनाला शांती आणि प्रसन्नता लाभते.

( संदर्भ- चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू - संदीप भानुदास तापकीर )

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
       ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...