उगवतीचे रंग
युगानुयुगांचा दीपस्तंभ : श्रीराम
आपल्या सर्वांचे भाग्य की आपण या भारत देशात जन्माला आलो. त्याचे कारण राम , कृष्ण, शिवाजी यांच्यासारखे लोकोत्तर राजे आपल्या देशात जन्माला आले. त्यांनी आपल्या वागणुकीने असा काही आदर्श घालून दिला की जो मानवजातीसाठी युगानुयुगे दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरावा. म्हणून भारत ही पुण्यभूमी आहे. पण या सगळ्यांनी जो आदर्श आपल्यापुढे ठेवला आहे, तो फक्त त्यांच्या जन्मदिनी त्यांचे गुणगान करण्यासाठी नाही. आणि आपण जर तसे करणार असू तर या थोर पुरुषांचे कार्य अक्षरशः कवडीमोलाचे ठरेल. ' सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख ' असे समर्थ रामदास म्हणतात. तसे मूर्ख आपण ठरू.
श्रीरामाचे चरित्र आणि त्याचे कार्य मला लहानपणापासूनच आकर्षित करीत आले आहे. माझे लहानपण एका अगदी छोट्याशा खेडेगावात गेले. साधारण पाचशे लोकवस्तीचे गाव असेल. पूर्वी कोणतीही करमणुकीची साधने तेव्हा उपलब्ध नव्हती. त्यावेळी वर्तमानपत्र सुद्धा गावात येत नसे. बसची सुद्धा सोय खूप नंतर झाली. तालुक्याच्या गावी येण्यासाठी दोनच पर्याय उपलब्ध होते. एक तर पायी चालणे किंवा बैलगाडीने जाणे. अशा त्या दिवसात गावात धार्मिक सलोखा मात्र चांगला होता. माझे वडील गावाचे पोलीस पाटील होते. ते दरवर्षी कुठली ना कुठली तरी पोथी गावकऱ्यांसाठी वाचत असत. मग कधी रामायण असे कधी पांडवप्रताप, कधी भागवत, कधी हरिविजय आणि इतरही ग्रंथ त्यांच्या वाचनात आळीपाळीने येत. हे ग्रंथवाचन बहुधा रात्रीच्या वेळी होई. गावकरी आपली कामे आणि जेवण वगैरे आटोपून पोथी ऐकण्यासाठी येत.
मी त्या वेळी खूप लहान होतो. पण मी आईसोबत त्या ठिकाणी जात असे. आणि त्यावेळी जरी फारसे कळत नसले तरी रामायण, महाभारतासारख्या ग्रंथातून अशा लोकोत्तर पुरुषांचे चरित्र अनायासे कानावर पडत असे. खरं तर यासारखे मूल्यशिक्षण नाही असे मला वाटते. मी थोडा मोठा झाल्यावर म्हणजे सहावी, सातवीत असताना वडील जर तालुक्याच्या गावी काही कामानिमित्त गेले आणि रात्री परत येऊ शकले नाही तर त्या दिवशीचे पोथी वाचन माझ्याकडे असायचे. मग मी दुपारी ती पोथी आणि तो विशिष्ट अध्याय घरी वाचून ठेवायचो आणि जसे जमेल तसे रात्री सांगायचो. माझे बोबडे बोल ती साधीभोळी माणसे गोड करून घेत असत. वडील पोलीस पाटील असल्याने गावातील लोक त्यांना आदराने पाटीलबुवा म्हणत. दुसऱ्या दिवशी लोक वडिलांना सांगत असत. ' पाटीलबुवा, लेकानं पोथी लई छान सांगितली बघा. ' गावकरी पोथीला येताना घरातील मूठभर धान्य किंवा अन्य काही वस्तू घेऊन येत. पण माझे वडील अत्यंत निस्पृह होते. ते त्यातील कशालाही हात लावत नसत. पोथीची समाप्ती झाली की ते एखाद्या ब्राह्मणाला बोलावून ते धान्य, पैसे इ गोष्टी देऊन टाकत असत.
खरे म्हणजे रामाबद्दल बोलता बोलता थोडं विषयांतर झालं. त्याबद्दल तुम्ही मला उदार अंतकरणाने क्षमा कराल. पण माझं रामाविषयीचं आकर्षण सुरु झालं ते तेव्हापासून. आठवीपासून तालुक्याच्या गावी शिक्षणासाठी आल्यावर पुढे मग वाचनात अनेक पुस्तके आली . अनेक उत्तम वक्त्यांची भाषणे ऐकायला मिळाली. चांगल्या कीर्तन प्रवचनांचा लाभ घेता आला. पुढे मग यथावकाश आपल्या सगळ्यांकडे टीव्ही आला. मला आठवतं आम्ही टीव्ही घेतला तेव्हा रामायण धारावाहिक सुरु होते. आणि आजही रामायण आपण दूरदर्शनवर पाहतो आहोत. पण जेव्हा पहिल्यांदा रामायण सुरु झालं तेव्हाचा मी आणि आजचा मी यात बराच फरक पडलेला आहे. आज मी जीवनाच्या अशा टप्प्यावर आहे की मला मागे वळून बघताना अनेक अनुभव गाठीशी आहेत. आणि त्याच अनुभवातून आलेली काहीशी परिपक्वतेची जाणीव आज जेव्हा मी रामायण बघतो आहे, तेव्हा मला अनेक गोष्टींचा अर्थ नव्याने आणि अधिक सखोलपणे जाणवून देते आहे. उलगडून सांगते आहे.
रामाला आपण देवस्तरावर नेऊन ठेवलं आहे. तो देव आहेच यात वाद नाही. पण या देवपणाला पोहचण्यापर्यंतचा त्याचा प्रवास एक माणूस असण्यापासूनच सुरु झाला आहे. राम हा आदर्श आहे असे जेव्हा आपण म्हणतो, तो आदर्श सर्व दृष्टीने असतो. तो आदर्श राजा असतो, आदर्श पती असतो, आदर्श पुत्र असतो, आदर्श बंधू असतो आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक आदर्श माणूस असतो. या सगळ्या भूमिका निभवताना तो कुठेही कमी पडत नाही. तसं तर रामायण आदर्शांची खाण आहे. सीतेसारखी पत्नी, भरत लक्ष्मणासारखे भाऊ, हनुमानासारखा स्वामिनिष्ठ सेवक अशी सगळीच पात्रे आपापल्या परीने आदर्श आहेत.
पण आज आपण बोलणार आहोत ते प्रामुख्याने रामाबद्दल. जेव्हा जेव्हा प्रसंग येतो, तेव्हा तेव्हा राम प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून द्यायला सुद्धा विसरत नाही. पण रामाचे सगळ्यांशी बोलणे मोठे मधुर आणि नम्रतेचे आहे. त्यामुळेच तो प्रत्येकाचे मन जिंकून घेतो. विश्वमित्र ऋषी जेव्हा त्याला त्यांच्यासोबत राक्षसांचा नाश करण्यासाठी नेतात, तेव्हा ते रामाची स्तुती करतात. त्राटिका वधाबद्दल, जंगलातील कंदमुळे खाल्ल्याबद्दल. पण तेव्हा राम नम्रपणे त्यांना म्हणतो की मुनीवर, हे माझे अहोभाग्य आहे की आपल्या सहवासात राहायला मिळाले. आपल्याकडून नवनवीन शिकायला मिळाले. आणि जंगलातील या कंदमुळांची चव राजमहालातल्या अन्नापेक्षा फार गोड आहे. त्याच्या या बोलण्यावर विश्वामित्र अतिशय प्रसन्न असतात. कसे बोलावे आणि बोलताना दुसऱ्याचा आदर कसा राखावा हे रामाकडून शिकण्यासारखे आहे. ' राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे '.
असा हा राम आपल्या बोलण्याने सगळ्यांचीच मने राखतो. आपल्या वनवासाचे कारण आपली सावत्र आई कैकयी आहे हे समजल्यावर सुद्धा तो तिच्याशी आदराने बोलतो. याउलट चिडलेला लक्षण जेव्हा कैकयीवर संतापून आपल्या धनुष्याला हात घालतो, तेव्हा त्याला तो क्षत्रिय धर्म समजावून देतो. तो म्हणतो शूरवीराचे लक्षण म्हणजे फक्त शस्त्र उचलणे नाही. प्रसंगी संयम राखणे आणि शस्त्र न उचलणे हे देखील शूरवीराचे लक्षण आहे. पुढील वाटचालीत लक्ष्मणाला ;लक्ष्मण जेव्हा जेव्हा चिडतो तेव्हा तेव्हा तो त्याला ही जाणीव करून देतो.
राम जेव्हा वनवासात जायला निघतो, तेव्हाचा प्रसंग खरोखरीच अतिशय करुण आणि डोळ्यात पाणी आणणारा आहे. त्यावेळी दशरथाची अवस्था मोठी कठीण झालेली असते. आपल्या प्राणांपेक्षाही प्रिय असलेल्या रामाला वनवासात जा हे सांगण्यासाठी त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडत नाहीत. तेव्हा रामच ते समजून घेऊन आपल्या वडिलांचे सांत्वन करतो. आणि पित्याचा शब्द पाळणे हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहे हे सांगतो. आई कौसल्या त्याच्याबरोबर वनात येण्याची इच्छा प्रकट करते, तेव्हा तिला तो पतिधर्म आणि स्त्रीचा धर्म समजावून सांगतो. लक्ष्मण आणि कौसल्येल्या तसेच त्याच्या वनवासाने दुःखी झालेल्या आणि दशरथावर संतापलेल्या प्रजननांना तो दशरथाची मानसिक अवस्था आणि हतबलता समजावून सांगतो, तेव्हा रामाची महानता आपल्याला कळते. ' बोले तैसा चाले ' हे तो आपल्या कृतीतून दाखवून देतो.
पुढे वनवासात निषादराज यासारखा परममित्र त्याला भेटतो. रामाचे मित्रही असे होते. जीवाला जीव देणारे. मित्रासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास तयार असणारे. पण त्याचे कारण म्हणजे रामजवळही कोणताच भेदभाव नव्हता. जातपात, स्त्रीपुरुष, उच्चनीच सगळेच त्यांच्यादृष्टीने सारखे होते. म्हणून तर राम भोळ्या शबरीचा भक्तिभाव जाणून तिची उष्टी बोरे खाऊ शकला.एकदा का रामाने एखाद्याला स्वीकारले किंवा हृदयाशी धरले की तो आयुष्यभर ते नाते जपत असे. त्याकाळात जसे अयोध्येचे राज्य होते, तसे लंकेचेही राज्य होते. लंकेचा राजा रावण हा अत्यंत सामर्थ्यशाली होता. आणि अनेक छोट्या छोट्या राज्यांवर अन्याय करत होता. त्याची दहशत होती. रामाने या सगळ्या छोट्या छोट्या राज्यातील लोकांना त्याच्या वनवासातील काळात अन्यायाशी लढण्याची प्रेरणा दिली. त्यांना लढायला शिकवले. त्यांना स्वबळावर उभे केले.
रामाची महानता दाखवणारी एकदोन उदाहरणे सांगतो. मित्र निषादराज त्याला आपले राज्य देण्यास तयार असतो. पण राम ते स्वीकारायला नकार देतो. पुढे रावणाचा वध केल्यानंतर बिभीषण सुद्धा लंकेचे राज्य त्याला अर्पण करण्यास तयार असतो. त्यालाही राम नाही म्हणतो. राम वनवासात जायला निघतो, तेव्हा अयोध्येची सगळी प्रजा त्याच्या बाजूने असते. त्याने ठरवले असते तर त्या प्रजेचे बंड घडवून आणून राजा होऊ शकला असता. पण तो ते करत नाही. उलट वनवासात असताना निषादराजाला भरताकडे आणि अयोध्येकडे लक्ष ठेवायला सांगतो. हे सगळे तीनही प्रसंग आपल्याला राम किती निस्पृह होता हे जाणवून देतात. महाभारतात तर पांडवांसारख्या भावांना राज्य मिळू नये म्हणून केवढी कपट कारस्थाने रचली जातात हे आपल्याला माहिती आहे. त्यातून तर पुढे महाभारताचे युद्ध होते. म्हणून या सगळ्यात रामाचे व्यक्तिमत्व आणि त्याचे कार्य झळाळून उठताना आपल्याला दिसते. त्यानंतरच्या इतिहासात राज्य आपल्यालाच मिळावे म्हणून महाभारतातला कंस आपल्या वडलांना तुरुंगात टाकतो. औरंगजेबासारखा क्रूरकर्मा तर आपल्या वडिलांना तुरुंगात टाकतो आणि आपल्या भावांना ठार मारायलाही मागेपुढे पाहत नाही.
बिभीषण जेव्हा त्याला लंकेचे राज्य देऊ करतो, तेव्हा तो लक्ष्मणाला म्हणतो
अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते ।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥
हा श्लोक आपल्याला सांगतो की जननी आणि जन्मभूमी या स्वर्गापेक्षाही महान असतात. म्हणून तो लक्ष्मणाला म्हणतो, ' लंका सोन्याची असली तरी मला नको. ' आपल्या आई आणि मातृभूमीचा आदर करणारे एवढे निस्पृह आणि आदर्श उदाहरण दुसरे नाही.
आज आपण बऱ्याच वेळेला रामराज्याबद्दल बोलतो. रामराज्य यावे असे सगळ्यांना वाटते. कारण रामाच्या राज्यात प्रजा सुखी होती. राम हा प्रजाहितदक्ष राजा होता. प्रजेच्या सुखासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा तो राजा होता. म्हणून रामराज्य आम्हाला हवेहवेसे वाटते. रामाबद्दल कितीही लिहिले तरी कमीच आहे.
रामनवमी निमित्त लोक रामाच्या मंदिरात गर्दी करतात. सध्या मात्र करोनासारख्या भयानक रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ते शक्य नाही. पण रामाला पाहण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही. आपण आपल्या हृदयमंदिरी त्याला विराजमान करू या. त्याने दाखवलेल्या प्रकाशात वाटचाल करू या. तो युगानुयुगांचा दीपस्तंभ आहे. जोपर्यंत सूर्य, चंद्र आहेत, तोपर्यंत त्याची कीर्ती अबाधित राहणार आहे. रामकथा ऐकू या. रामकथा पाहू या. पण त्याचबरोबर रामाला आपल्या जीवनात आदर्श मानून त्याचे अनुकरण करू या. जय श्रीराम.. !
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

Jai shriram
उत्तर द्याहटवा