मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग एक अलौकिक प्रेमकथा : राम आणि सीतेची

उगवतीचे रंग

एक अलौकिक प्रेमकथा : राम आणि सीतेची

परवाच्या दिवशी आपण रामनवमी साजरी केली. त्या दिवशी मी रामावर ' युगानुयुगांचा दीपस्तंभ : श्रीराम ' असा लेख लिहिला होता. त्यात राम हा आदर्श राजा, आदर्श पती, आदर्श बंधू आदर्श पिता असे म्हटले होते. आणि ते खरेच आहे. रामाचे गुण आणि चारित्र्य एवढ्या उच्च दर्जाचे होते की तो सगळ्या बाबतीत आदर्शच होता. गुण आणि चारित्र्याची परिसीमा म्हणजे राम . त्याचप्रमाणे रामाने मर्यादा कधीही आणि कुठेही ओलांडली नाही. अवघ्या मानवजातीसमोर त्याने आपल्या वागणुकीने आदर्श घालून दिला. म्हणून तो मर्यादापुरुषोत्तम ही आहे. पण एवढे सगळे असताना , एकदोन वाचकांच्या मनात काही शंका आली . त्यांनी ती माझ्याजवळ बोलून दाखवली. मी माझ्या परीने, माझ्या बुद्धी आणि अल्प ज्ञानाच्या आधारे त्याबाबत काही बोलण्याचे धाडस करतो आहे. शंका अशी होती की , राम हा आदर्श पुरुष आहे हे आम्हाला मान्य आहे. तो पुरुषोत्तम होता हेही मान्य आहे. त्याच्या आदर्श राजा वगैरे भूमिका सुद्धा आम्हाला मान्य आहेत. पण सीतेचा काही एक दोष नसताना त्याने सीतेचा त्याग का केला ? आणि जर असे असेल तर *त्याला आदर्श पती कसे म्हणावे ?*

मित्रहो, वरवर पाहता ही शंका बरोबर वाटते. पण जेव्हा रामायणाचा आणि रामाच्या स्वभावाचा आपण थोड्या खोलात जाऊन अभ्यास करू, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की राम हा आदर्श पती सुद्धा होता. एवढेच नव्हे तर राम आणि सीता हे एकमेकांवर निस्सीम प्रेम असणारे एक असे अलौकिक जोडपे आहे की ज्यांची कीर्ती युगानुयुगे अमर राहील. राम आणि सीता यांना नियतीने एकत्र आणले होते. त्यांनी कधी एकमेकांना पाहिले नव्हते किंवा एकमेकांबद्दल ऐकले देखील नव्हते. विश्वामित्र ऋषी यज्ञाच्या रक्षणासाठी राम लक्ष्मणाला घेऊन जातात. रामलक्ष्मण  राक्षसांचा नायनाट करतात. अशा वेळी जनक राजाकडून सीतेच्या स्वयंवरासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण जनकाकडून विश्वामित्रांना येते आणि ते आपल्यासोबत राम लक्ष्मणाला घेऊन जातात. जनकाने त्या विवाहासाठी एक पण ठेवलेला असतो, तो म्हणजे शिवधनुष्य उचलण्याचा. जेव्हा तेथे उपस्थित सगळे राजे ते उचलण्यात अयशस्वी होतात, तेव्हा विश्वामित्राच्या आदेशानुसार राम ते शिवधनुष्य उचलतो. ते त्याच्या हातून भंग होते. आणि मग सीता रामाला वरमाला घालते. मात्र विवाहापूर्वी सीता रामलक्ष्मणाला पुष्पवाटिकेत पाहते ,त्याचवेळा हा लावण्यमूर्ती असलेला राम तिच्या मनात भरतो. आणि त्याच्याशीच आपला विवाह व्हावा ही इच्छा तिच्या मनात निर्माण होते. सीता ही भूमीकन्या तर राम हा विष्णूचा अंश. त्यांच्या विवाहाने जणू भूमी आणि आकाश एकत्र येतात.

आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे,
स्वयंवर झाले सीतेचे.

लग्नानंतर जेव्हा राम पित्याला दिलेल्या वचनानुसार वनवासाला निघतो, तेव्हा तो सीतेचा निरोप घ्यायला येतो. रामाशिवाय राहायचे ही कल्पना देखील सीता सहन करू शकत नाही. म्हणून राम जेव्हा तिला समजावतो की वनवासातले जीवन अत्यंत कठीण आणि दुःखदायक आहे. तेव्हा तू अयोध्येतच राहा. त्या प्रसंगी क्षणाचाही विचार न करता सीता म्हणते

निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता.

इतकी ती राममय झाली आहे. राम आणि सीता यांची शरीरे फक्त वेगळी आहेत. आत्मा एकच आहे. ते एकजीव झालेले आहेत. एवढेच नाही तर सीता ही रामाची शक्ती देखील आहे. सीतेशिवाय राम अपूर्ण आहे. म्हणून तो सीताराम आहे. त्यामुळे तो आपल्यासोबत वनवासात सीतेला घेऊन जातो. जसा राम हा सर्व बाबतीत आदर्श आहे तशीच सीता सुद्धा. ती आदर्श पत्नी, आदर्श माता, आदर्श सून, आणि आपल्या दिरांवर पुत्रवत प्रेम करणारी वहिनी आहे.

सीतेला रामाच्या पराक्रमावर कधीही न ढळणारा विश्वास आहे. म्हणून वनवासात जेथे हिंस्त्र प्राणी आहेत, राक्षसांची भीती आहे अशा ठिकाणी सुद्धा रामाच्या पराक्रमावर श्रद्धा असणारी सीता त्याच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवून निर्धास्त आहे. निर्भय आहे. एवढेच नाही तर वनवासातील हा रामासोबतचा काल तिच्या जीवनातला आनंददायक आणि सुखकारक असा काल आहे कारण या काळात आपल्या प्रिय राघवाबरोबर तिला राहायला मिळते.  त्यापुढे राजप्रासादातील आणि स्वर्गातील सुखे देखील तिला तुच्छ आहेत.

रामाच्या पराक्रमावर तिचा किती विश्वास असावा, आणि रामावर तिचे किती प्रेम असावे याची साक्ष देणारा एक प्रसंग रामायणात आहे. रावण तिला पळवून घेऊन जाताना आपल्या शौर्याचे वर्णन तिच्यापुढे करतो. तो म्हणतो की मी देवांना सुद्धा बंदी बनवले आहे. तेव्हा सीतेने त्याला दिलेले उत्तर अतिशय सुंदर आहे. ती म्हणते, ' तू कसला शूर आणि पराक्रमी ? तू तर सिंहीणीचे हरण केले आहेस. एखाद्या कोल्ह्याप्रमाणे . माझे पती राम म्हणजे नरसिंह आहेत. आणि कोल्हा कधीही सिंहाची बरोबरी करू शकत नाही. ' किती सुंदर आणि बाणेदार उत्तर आहे. तेही रावणासारख्या महापराक्रमी पुरुषाला न घाबरता धिटाईने दिलेले.

आता तिला रावणाने पळवून नेल्यानंतर रामाची काय अवस्था होते ? तर तो प्रचंड शोकविव्हल होतो. सीतेचा विरह त्याला सहन होत नाही. जणू रामाची शक्तीच हरवते. असे त्या दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम असते.  रावणाच्या लंकेत काही काळ काढला म्हणून ती अपवित्र झाली असे लोकांनी म्हणू नये म्हणून सीता अग्निपरीक्षा देते. तिच्या मनात एका रामाशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार नसतो. म्हणून तर अमर अशा पाच पतिव्रतांमध्ये सीतेचे नाव घेतले जाते. अर्थात रामाच्या मनात तिच्याबद्दल कोणतीही शंका नसते. ती पवित्र आहे हे राम जाणून होता. लोकांना असे वाटते की राम जर आदर्श पती असेल तर त्याने सीतेचा त्याग का केला ?

त्याचे उत्तर असे देता येईल की रामायण काळात राजघराण्यातील व्यक्तींबद्दल, त्यांच्या चारित्र्याबद्दल आपली मते व्यक्त करण्याची लोकांना मुभा होती. आताही आपण जी रामायण मालिका पाहतो आहोत, त्यातही दशरथ, कैकयी, भरत इ बद्दल चर्चा करताना लोकांना वेळोवेळी दाखवले आहे. अशाच पद्धतीने सीता परत आल्यानंतर नगरवासी तिच्याबद्दल चर्चा करत होते. रामाच्या कानावर ही वार्ता येते. कोणा एका व्यक्तीच्या सांगण्यावरून रामाने सीतेचा त्याग केलेला नाही तर अयोध्यानगरीतील अनेक पौरजनांच्या मनात ही शंका होती.

या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की त्यावेळी राम हा केवळ पती नव्हता. तो राजा देखील होता. या प्रसंगाच्या निमित्ताने त्याचा पतिधर्म आणि राजधर्म यात संघर्ष निर्माण झाला आहे. आणि आपल्याला हे माहिती आहे की राम कधीही भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेत नाही. रामायणातले अनेक प्रसंग त्याची साक्ष देतात. तो आधी प्रजाहितदक्ष आणि कर्तव्यकठोर राजा आहे आणि बाकीच्या सगळ्या भूमिका नंतर. जेव्हा कुटुंब आणि राष्ट्र यांच्यात निर्णय घेण्याचा प्रश्न येतो, तेव्हा कुटुंबाच्या स्वार्थाचा त्याग करून राष्ट्रभावनेला परमोच्च महत्व दिले पाहिजे. ' ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत ' रामाने तेच केले. आपल्या राज्यासाठी त्याने हा सर्वोच्च त्याग केला. रामाने पत्नीचा नव्हे तर राजाने राणीचा त्याग केला आहे. रामाच्या मनात पत्नी म्हणून सीतेचे स्थान कायमच आहे. रामाच्या या स्वभावाची सीतेला देखील कल्पना होती. म्हणून तिला आपल्यावर हा झालेला अन्याय आहे अशी तिची तक्रार नव्हती.

रामाने तिचा त्याग केला असता तर त्याला दुसरे लग्न करता आले असते. यज्ञाच्या वेळी दुसरी पत्नी करता येते असे रामाला सांगितले गेल्यावर सुद्धा राम त्या गोष्टीला स्पष्टपणे नकार देतो. तो म्हणतो की रामाच्या हृदयसिंहासनावर एकाच व्यक्ती पत्नी म्हणून विराजमान आहे. आणि ती म्हणजे फक्त सीता. म्हणून दुसरे लग्न न करता सीतेची सोन्याची मूर्ती तयार करून यज्ञाला बसतो. इतके प्रेम रामाचे सीतेवर आहे. त्यामुळे तो जेव्हा राजाच्या भूमिकेत होता, तेव्हा राजाचे कर्तव्य त्याने पार पडले. आणि पतीच्या भूमिकेत होता, तेव्हा एका सीतेशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार त्याच्या मनात नव्हता. म्हणून तो आदर्श पती सुद्धा आहेच. आणि राम सीता ही  एक अलौकिक प्रेमकथा सुद्धा.

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
       ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...