मुख्य सामग्रीवर वगळा

सुरुवात मुळापासून करावी लागेल...

उगवतीचे रंग

सुरुवात मुळापासून करावी लागेल...

एका मोठ्या शहरातील एक प्रसिद्ध शाळा. शाळेत सगळी गर्भश्रीमंतांची मुले. प्रत्येकजण आपापल्या गाडीतून येणार. या शाळेत शिक्षण किती मिळते हा भाग वेगळा. पण श्रीमंतीची आणि वैभवाची चिन्हे  अंगाखांद्यावर मिरवणारी शाळा आणि विद्यार्थी सुद्धा. अशा या शाळेत एकदा एक पाहुणे गेले. त्यांनी आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना त्या मुलांनी जी उत्तरे दिली, ती ऐकून ते पाहुणे अक्षरशः अंतर्मुख झाले. त्यांनी मुलांना पहिला प्रश्न विचारला, ' तुम्हाला मोठे होऊन काय बनावेसे वाटते ? '

एक मुलगा म्हणाला, ' आम्हाला खूप मोठे व्हायचे आहे. '

' हो, पण मोठे म्हणजे काय ? '

' मोठे म्हणजे श्रीमंत. खूप पैसा कमवायचा आणि जीवनातील आनंदाचा उपभोग घ्यायचा. '

' तुम्हाला पुढे आपल्या आईवडिलांसाठी काय करावेसे वाटते ? '

' त्यांच्यासाठी काय करणार ? आणखी पैसा कमावणार. आम्ही शाळेत येतो, तेव्हा ते उठलेले नसतात. घरातील नोकर येऊन आम्हाला उठवतो. घरातील बाई आम्हाला नाश्ता, जेवण देते. आम्ही शाळेतून घरी जातो तेव्हा ते घरी नसतात. रात्री उशिरा घरी येतात. त्यामुळे मोठेपणी आमच्याकडे भरपूर पैसा आला की आम्ही आईवडिलांची सेवा करण्यासाठी चार नोकर ठेवू. शकू.'

पाहुणे पुढे विचारतात. '  तुम्हाला तुमच्या शिक्षकांसाठी काही करावेसे वाटते का ? '

मुलगा म्हणतो, ' त्यांच्यासाठी काय करणार ? आमचे शिक्षक गाडीतून येतात. पुस्तकातून शिकवतात. प्रश्न विचारू देत नाहीत. त्यांनी शिकवलेलेच आम्ही पाठ करायचे आणि परीक्षेत लिहायचे. '

ही घटना सत्य आहे आणि पाहुण्यांनी विचारलेले वरील प्रश्न साधेच आहेत. पण त्या प्रश्नांची जी उत्तरे मुलांनी दिली, ती तुम्हा आम्हा सर्वांना  अंतर्मुख करणारी  आहेत. आजची शिक्षणपद्धती, शाळा, समाज आणि आजूबाजूचे वातावरण आम्हाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहे याची चुणूक या उत्तरातून दिसते. सगळ्या शाळा आणि सगळी मुले अशी नसली तरी, आज त्यांच्या विचारांचा ओघ ज्या दिशेने वाहतो आहे तो चिंताजनक आहे. आज विज्ञानाच्या प्रगतीमुळे भौतिक समृद्धी आली आहे. पण मानवतेच्या शाश्वत मूल्यांची पीछेहाट झाली आहे.

एखाद इमारत बांधताना आपण आधी इमारतीची भक्कम पायाभरणी करतो. मुले ही राष्ट्राची भावी नागरिक आहेत. ती चांगली नागरिक व्हावीत, चांगली माणसे त्यांच्यातून घडवीत, यासाठी त्यांची पायाभरणी उत्तम व्हायला हवी.या शाळेबद्दल विचार करत असताना नकळत रवींद्रनाथ टागोरांची निसर्गाच्या सान्निध्यात भरणारी शांतिनिकेतन शाळा डोळ्यांसमोर आली.

पण याबाबत त्या मुलांना दोष देऊन आपल्याला मोकळे होता येणार नाही. दोष आपलाच आहे. आपण त्या मुलांना अनुकूल वातावरण देऊ शकलो नाही. ज्या जमिनीत आपण बी पेरतो, ती जमीन शेतकरी आधी अनुकूल करून घेतो. शेतीची मशागत करतो. त्यातील काडीकचरा, तण काढून टाकतो. आणि मगच पेरणी करतो. पीक वाढत असताना तो त्याच्याकडे लक्ष ठेवून असतो. त्या पिकाला नीट खत , पाणी मिळेल याची व्यवस्था करतो. रोग पडू नये म्हणून जंतुनाशक औषधांची फवारणी करतो. एवढी सगळी काळजी घेतो त्या पिकाची. पोटाच्या पोरासारखी. तेव्हा कुठे हंगाम चांगला जातो. इंग्रजीत एक म्हण आहे, Reap as you sow . '

आम्हालाही त्या शेतकऱ्याचा आदर्श समोर ठेवावा लागेल. तो पिकासाठी जसे योग्य वातावरण निर्माण करतो, तसेच आम्हाला आमच्या मुलांसाठी करावे लागेल. अनुकूल विचारांचे खत , पाणी देऊन त्यांना वाढवावे लागेल. वाईट विचारांचे तण वाढणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. वाईट संगत , वाईट विचार यांचा रोग पडू नये म्हणून चांगल्या संस्कारांची वेळोवेळी फवारणी करावी लागेल.

आज रामायण, महाभारतासारख्या मालिका आम्ही पाहत आहोत. त्यात आईवडील, गुरूंची आज्ञा पाळणे, त्यांचा मान ठेवणे, त्यांची सेवा करणे या गोष्टी वेळोवेळी दाखवल्या जातात. या मालिका मूल्यशिक्षणाचा वस्तुपाठ आहेत. त्या फक्त बघायच्या नसतात. त्यातील जीवनमूल्ये आजही आचरणात आणण्याजोगी आहेत. या मालिका पाहताना आपल्या मुलांसोबत बसावे. त्यांना त्या काळजीपूर्वक बघायला सांगावे. मालिका संपल्यानंतर आजच्या भागात तुम्ही काय पाहिले ? त्यातून तुम्ही काय शिकलात ? असं सहज गप्पा मारता मारता विचारावे. प्रसंगी त्यांना आपल्याला आवडलेले विचार लिहिण्यास सांगावे. आज दिशाहीन आणि मूल्य हरवत चाललेल्या उगवत्या पिढीला मार्गावर आणण्यासाठी आम्हाला पुन्हा आमच्या भारतीय संस्कृती आणि परंपरांकडे वळावे लागेल. कधीतरी मुलांसोबत आपली आवडती प्रार्थना किंवा स्तोत्र म्हणायला एकत्र बसावे. त्याचा अर्थ त्यांना सांगावं. पसायदान ही तर एक सुंदर वैश्विक प्रार्थना आहे. रॅम शेवळकरांनी त्याच्यावर फार सुंदर निरूपण केले आहे. तेही उपलब्ध आहे. ते कधीतरी आपण ऐका आणि मुलांनाही ऐकवा.

मुले हुशार असतात. फक्त आपण त्यांना बोलके केले पाहिजे. त्यांना व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे. मुलांशी संवाद साधल्याने तुम्ही मुलांच्या अधिक जवळ जाऊ शकाल. आईवडील हे आपले मित्र आहेत. त्यांच्याजवळ आपण आपले विचार, भावना व्यक्त करू शकतो असा विश्वास मुलांमध्ये या निमित्ताने आपण निर्माण करू शकलो तर त्यासारखी दुसरी गोष्ट नाही. आईवडील होणे सोपे आहे. सुजाण पालक होणं कठीण आहे. मुलं आपल्या वागण्याचं पण निरीक्षण करीत असतात. आणि निरीक्षणातून अनुकरण करीत असतात.
नुसता कोरडा उपदेश करून मुलं ऐकतील असं जर आपल्याला वाटत असेल, तर ते चुकीचं आहे. आपल्याला सुरुवात मुळापासून करावी लागेल. आपल्यापासून करावी लागेल. मग आपण पालक असू नाहीतर शिक्षक असू.

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
          ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...