मुख्य सामग्रीवर वगळा

नीरक्षीरविवेक...

उगवतीचे रंग

नीरक्षीरविवेक...

मध्यंतरी ' तान्हाजी ' चित्रपट पाहण्याचा योग्य आला. थिएटरमधे प्रवेश करतानाच डोअरकीपरने हातात एक चष्मा दिला. चित्रपट थ्री डी असल्याने तो चष्मा घालून पाहायचा होता. म्हणून चित्रपट सुरु झाल्यावर मी माझा नेहमीच चष्मा काढून ठेवला. आणि हा दुसरा चष्मा डोळ्यांवर चढवला. आणि मग पडद्यावरची दृश्यं वेगळीच दिसायला लागली. धनुष्यातून सोडलेले बाण, तोफगोळे, तलवारी इ थेट अंगावर यायला लागल्या. एकदोन वेळा तर चक्क दचकलोही. मग गंमत म्हणून तो चष्मा काढून ठेवला. आणि नेहमीच्या चष्म्याने पाहू लागलो, आता चित्रपट तर दिसत होता. पण ती मजा नव्हती. मग लक्षात आले, की त्या चष्म्याने ती जादू केली होती. पाहण्याचा नुसता चष्मा बदलला, आणि समोरचं दृश्य बदललं. कुणीतरी म्हटलं आहे ना, ' नजर बदलो , नजारा बदल जायेगा ' त्याचा प्रत्यय आला.

सिनेमा तोच होता. मीही तोच होतो. पण चष्म्यामुळे ही किमया घडली होती. एखाद्या गोष्टीकडे आपण जसे पाहू तशी ती आपल्याला दिसते. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची आपली दृष्टी पूर्वग्रहदूषित असेल, तर ती गोष्ट तशीच आपल्याला दिसते. वाचलेली एक गोष्ट मला आठवते. समर्थ रामदास स्वामी श्रोत्यांना रामायण सांगत असत तेव्हा त्या ठिकाणी प्रत्यक्ष श्री हनुमान सुद्धा ती कथा ऐकण्यासाठी उपस्थित राहायचे असे म्हटले जाते . एकदा समर्थांनी कथा सांगता सांगता हनुमंत अशोक वनात गेल्यानंतर त्यांनी पांढरे फुल पाहिले असे श्रोत्यांना सांगितले. यावर श्री हनुमानाने प्रकट होऊन रामदास स्वामींनी सांगितले की मी पांढरे फुल पाहिलेच नाही.तुम्ही श्रोत्यांना चुकीचे सांगता.  पण समर्थ आपल्या विधानावर ठाम होते . शेवटी या वादात प्रभू रामचंद्रांना मध्यस्थी करावी लागली. ते हनुमानाला म्हणाले, ' समर्थ म्हणतात ते बरोबर आहे. फुल पांढरेच होते. पण तू रावणाने सीतेला पळवून नेल्यामुळे रागात होतास. तुझे डोळे रागाने लाल झाले होते. म्हणून पांढरे फुल तुला लाल दिसले.'


आहे की नाही गंमत ! दृष्टी बदलल्याचा केवढा मोठा परिणाम होतो. काही लोकांना नेहमी दुसऱ्याचे दोष काढायची सवय असते. त्यामुळे त्यांची नजर नेहमी समोरच्या व्यक्तितील दुर्गुणांवर जाते. आणि ती व्यक्ती त्यांना वाईटच दिसते. तर काहींना वाईटातही चांगले शोधण्याची सवय असते. या ठिकाणी पुन्हा महाभारतातील एक कथा सांगण्याचा मोह आवरत नाही. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरु. दुर्योधन त्यांचा शिष्य आणि युधिष्ठिर सुद्धा शिष्यच. पण दोघांच्या दृष्टीत किती जमीन अस्मानाचा फरक होता, ते या गोष्टीवरून आपल्याला कळते.

एकदा द्रोणाचार्यांनी दुर्योधन आणि युधिष्ठीर या आपल्या दोन्ही शिष्यांची जरा वेगळ्या प्रकारे परीक्षा घेण्याचे ठरवले. ते दुर्योधनाला म्हणाले, ' नगरात जा आणि कोणाही सज्जन माणसाला माझ्याकडे घेऊन जा. ' दुर्योधन नगरातच काय पण पूर्ण पंचक्रोशीत फिरला, पण त्याला एकही सज्जन व्यक्ती आढळली नाही. तो द्रोणाचार्यांकडे आला आणि म्हणाला, ' गुरुदेव, मी सगळीकडे शोधले पण मला सज्जन माणूस कुठेही आढळला नाही. ' द्रोणाचार्यांनी दुर्योधनाकडे फक्त एक कटाक्ष टाकला. आणि ते युधिष्टिराकडे वळून म्हणाले, ' तू नगरात जा आणि कोणाही दुर्जन व्यक्तीला माझ्याकडे घेऊन ये. ' त्याप्रमाणे युधिष्ठीर सर्वत्र फिरला. पण त्याला कोणीही दुर्जन किंवा वाईट व्यक्ती आढळली नाही. तसे येऊन त्याने द्रोणाचार्यांना सांगितले.

हा प्रसंग पाहिल्यावर दरबारातील काही ज्येष्ठ व्यक्तींनी द्रोणाचार्यांना विचारले की आपण दुर्योधनाला सज्जन व्यक्ती शोधून आणायला सांगितले आणि युधिष्ठिराला दुर्जन व्यक्ती शोधायला सांगितले. दोघांनाही त्या त्या व्यक्ती मिळाल्या नाहीत. तेव्हा आपण असे का सांगितले ? तेव्हा द्रोणाचार्य हसले आणि म्हणाले, ' दुर्योधनाला दुसऱ्या व्यक्तीचे दोष किंवा दुर्गुणच पाहण्याची सवय झाली आहे. त्यामुळे दुर्योधनाच्या दृष्टीला सगळे वाईटच दिसते. म्हणून त्याला एकही व्यक्ती सज्जन आढळली नाही. पण युधिष्टिराची दृष्टी दुसऱ्यातील चांगले गुण शोधण्याची आहे. कोणतीही व्यक्ती पूर्णपणे वाईट नसते. म्हणून युधिष्ठिराला दुर्जन व्यक्ती एकही आढळली नाही. '

ही कथा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला देते. आपण जर दुसऱ्याचे दोषच पाहायचे ठरवले तर आपल्याला दोषच दिसतील. आणि जसे आपले विचार, तशीच आपली वृत्ती आणि कृती होईल. म्हणून आपल्या नजरेला जेव्हा चांगल्या गोष्टी पाहण्याची सवय लागेल, लोकांमधील दोष शोधण्यापेक्षा त्यांच्यातील गुण दिसतील, तेव्हा आपली नजर हळूहळू निकोप होऊन आपल्याला योग्य ते दिसायला लागेल. पर्वतशिखरावर गेले की मग भोवतालची सृष्टी अगदी स्पष्ट दिसू लागते. शिक्षणातून  आपल्याला अशी दृष्टी विकसित करता आली पाहिजे. एक संस्कृत सुभाषित प्रसिद्ध आहे.

हंस: श्वेतो बक: श्वेतो को भेदो बकहंसयो: | 
नीरक्षीरविवेके तु हंस: हंसो बको बक: ! 

हंस हाही पांढर्‍याशुभ्र रंगाचा आणि बगळाही शुभ्रच. मग त्यांच्यात फरक कोणता ? तर हंस हा दूध आणि पाणी वेगवेगळे करण्याची क्षमता ठेवतो. जे बगळ्याला शक्य नाही. तेव्हा नीरक्षीर विवेक करण्याची हंसाची दृष्टी विकसित करता येईल का आपल्याला ? 

  ©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 
          ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...