मुख्य सामग्रीवर वगळा

देवघरातील निरांजने ...

 उगवतीचे रंग

देवघरातील निरांजने ...

परवाच्या दिवशी सकाळी बागेमध्ये फिरत असताना मी आणि माझ्या मित्रांमध्ये पती पत्नी परस्परांना अनुकूल असले म्हणजे जीवनात ते किती प्रगती करू शकतात याची चर्चा सुरु होती . एकमेकांना समजून घेणे, साथ देणे आणि आपल्या पतीच्या किंवा पत्नीच्या कार्यात शक्य होईल तेवढे सहकार्य करणे ही खऱ्या अर्थाने दोघांची जबाबदारी असते. सगळ्यांनाच असा लाईफ पार्टनर मिळतो असं नाही. असा जोडीदार लाभणे ही खरं  म्हणजे भाग्याचीच गोष्ट. पण तरीही काही स्त्रिया किंवा काही पुरुष असे असतात, की जे आपला जोडीदार त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नसला, तरी त्याला सांभाळून घेतात. अशा समजदार जोडप्यांचा संसार सुखाचा होतो.

ज्या स्त्रियांनी आपल्या पतीला त्याच्या कार्यात पूर्णपणे साथ दिली, त्यांचे पती सामाजिक जीवनात खूप मोठे कार्य करू शकले. राजकारण आणि सामाजिक जीवनात ज्यांनी मोठे काम केले त्यांच्या मागे त्यांची पत्नी, सहधर्मचारिणी खंबीरपणे उभी होती. याउलट अशाही काही पतिपत्नींच्या जोड्या आहेत की ज्यात पतीने आपल्या पत्नीच्या कर्तृत्वाला वाव दिला, म्हणून त्या मोठे कार्य करू शकल्या. किरण बेदी, सुधा मूर्ती, मेरी कोम ही त्यापैकी काही उदाहरणे. आणि ज्यांनी समाजजीवनात एकमेकांच्या सहकार्याने अद्वितीय कार्य केले आहे अशा आदरणीय पतिपत्नींच्या जोड्या भरपूर आहेत. महात्मा गांधी आणि कस्तुरबा, ज्योतिबा आणि सावित्रीबाई, बाबा आमटे आणि साधनाताई. यांनी परस्परांना सांभाळून घेतले नसते तर सामाजिक जीवनात एवढे मोठे कार्य करणे या दोघांपैकी कोणालाही शक्य झाले नसते.

विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या थोर स्त्रियांची अनेक उदाहरणे या ठिकाणी देता येतील. पण आज मी ती टाळतो आहे. कारण
मला आजच्या या माझ्या लेखात रोज आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या आणि आपल्या कष्टाने, त्यागाने आपलं घर, संसार ऑफिस सांभाळणाऱ्या स्त्रियांची दखल घ्यावीशी वाटते. त्यांचा त्याग अक्षरशः प्रचंड असतो. ' दिव्यत्वाची प्रचिती '  त्यांच्या बाबतीतही आपल्याला येते. अशा कर्तृत्वान स्त्रियांची कितीतरी उदाहरणे आपल्या आजूबाजूला आपण डोळे उघडून पाहिले तर सहज दिसतील. कोणाच्या पतीचे दुकान किंवा काही व्यवसाय असतो. कोणाची दिवसभर बाहेर नोकरी असते. कोणी बाहेरगावी नोकरीस असतो. कोणी सैन्यात असतो. अशा वेळी त्याच्या अनुपस्थितीत घराची जबाबदारी समर्थपणे पेलते ती त्याची सहधर्मचारिणी. कधी कधी जोडीदाराचा व्यवसाय देखील घरासोबतच सांभाळून घेते ती सहधर्मचारिणी. कधी कधी दोघे मिळून एकाच ठिकाणी काम करतात आणि संसारही सांभाळतात. पण तरीही मुलांकडे विशेष लक्ष देते, घराकडे लक्ष देते ती सहधर्मचारिणी.

 सहधर्मचारिणी हा शब्द किती छान आहे ...! . बायको, पत्नी, सखी, मैत्रीण, प्रेयसी हे सगळे वेगवेगळे अर्थ आणि अर्थाचे वेगवेगळे पदर असणारे शब्द. पण लग्न झाल्यानंतर ज्या काही सगळ्या गोष्टी करायच्या, त्या सगळ्या गोष्टींचे धर्म हे अधिष्ठान असले पाहिजे. इथे धर्म हा शब्द रूढ अर्थाने मी वापरत नाही. धर्म म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात ज्या काही गोष्टी आपण करू, जी काही  जीवनपद्धती असेल त्याप्रमाणे वागू, रीतिरिवाज, संस्कार, नियम, परंपरा पाळू, त्या सगळ्या समाजमान्य असलेल्या गोष्टी. आणि या सगळी गोष्टीत जिची साथ असते ती सहधर्मचारिणी.

स्त्रीचा आपल्या घरासाठी, आपल्या मुलांसाठी त्यांचा त्याग मोठा असतो. आपल्या जोडीदाराच्या लहरी, त्याचे गुणदोष सांभाळून घ्यावे लागतात.. त्याशिवाय संसार यशस्वी होत नाही. यात स्त्रियांचे जसे योगदान असते, तसे पुरुष मंडळींचेही असते. असे ज्या घरात दोघे एकमेकांना सांभाळून घेतात, एकमेकांच्या आवडीनिवडी जपतात, ते घर हसते खेळते राहते. थोडीफार भांडणे, कुरबुर कुठे नसते ! त्याशिवाय संसाराला मजाही नाही. जेवणामध्ये चटणी, लोणचे तोंडी लावायला हवेच असते. त्याशिवाय थोडीच चव येते !

स्त्रीची अनेक रूपे आहेत. आई, बहीण, पत्नी, प्रेयसी, सखी, मैत्रीण. ती कधी कोणाची काकू, कोणाची मावशी, कोणाची मामी तर कोणाची आत्या असते. प्रत्येकवेळी भूमिका वेगवेगळी. पण या सगळ्या भूमिका ती मोठ्या कौशल्याने पार पाडते. यासाठी तिच्यामध्ये असलेल्या प्रेम, क्षमा, धैर्य, प्रसंगावधान इ गुणांचा मोठा उपयोग होतो. त्यासाठी बऱ्याच वेळा तिला स्वतःच्या आवडीनिवडीना मुरड घालावी लागते. तिच्या सहनशीलतेची जीवन जणू परीक्षा पाहत असते. तिच्या त्यागावर घर उभे असते. याचा अर्थ असा नाही की पुरुषाचा आपल्या घरासाठी त्याग नसतो. तोही शक्य तेवढे करतच असतो. पण स्त्रीचा घरासाठी असलेला त्याग त्याच्या एक पाऊल पुढे नक्कीच असतो.

बऱ्याच वेळा शक्य असेल तेव्हा बाबा मुलांना शाळेत सोडायला जातो. पण जेव्हा बाबाला हे शक्य नसेल, तेव्हा आजची आई राणी लक्ष्मीबाईसारखी मुलाला पाठीशी घेऊन शाळेत सोडायला जाते, घ्यायला जाते. तीही आपली कामे सांभाळून. कधी कधी शाळेत पालक सभा असते. अशा वेळी त्या सभेला आईच पालक म्हणून जाते कारण बाबांना वेळ नसतो. घरी मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना हवे नको ते पाहणे या गोष्टीदेखील जणू तिचीच जबाबदारी. या सगळ्या गोष्टी करता करता तिची प्रचंड दमणूक होत असते. ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही थकते . अशा वेळी तिला हवे असतात ते प्रेमाचे दोन शब्द. पतीचे आणि मुलांचे. ' तू किती करतेस आमच्यासाठी ..! ' या शब्दांसाठी जणू ती आसुसलेली असते. ते शब्द जणू तिच्यावर जादू करतात आणि ती नवीन उत्साहाने कामाला लागते. कधी कधी आपल्याला फिरायला घेऊन जावे अशीही तिची अपेक्षा असते. आणि या तिच्या अपेक्षा तिच्या जोडीदाराने पूर्ण करणे, तिला आनंदी ठेवणे ही त्याचीही जबाबदारी असते . कारण घर दोघांचे असते. संसार दोघांचा असतो.

 स्त्रीची आई, बहीण, प्रेयसी, सखी, मैत्रीण, गृहिणी ही सगळीच रूपे तशी विलोभनीय.पण मला सर्वात जास्त आवडणारे स्त्रीचे रूप म्हणजे आईचे. या नात्याची तुलनाच होऊ शकत नाही. मनुष्यच काय सृष्टीतील अवघ्या प्राणिमात्रांमध्ये आईचे हे वात्सल्य आपल्याला अनुभवास येते. या अर्थाने आईचे हे रूप वैश्विक आहे. म्हणूनच या विश्वमाता रुपाला मनःपूर्वक सलाम. स्त्री असते म्हणून घराचे घरपण टिकून असते. आई असते घरातील प्रकाश. घरातील चैतन्य. देवघर उजळणारी निरांजन .

पुरुषांच्या जोडीने खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणाऱ्या सगळ्या कर्तृत्वान महिलांना समर्पित.
                             
  ©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
                ९४०३७४९९३२


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...