मुख्य सामग्रीवर वगळा

मराठी साहित्यातील अजरामर पत्रे

उगवतीचे रंग

मराठी साहित्यातील अजरामर पत्रे

माझीा मुलगी पुण्यात शिक्षणासाठी राहायची, तेव्हा दर आठवड्याला तिचे मला एक पत्र यायचे.मुलगा शिकायला होता, तेव्हा तोही पत्र पाठवायचा. त्यांच्या पत्रांची आम्ही आतुरतेने वाट पाहत असू. त्यातील काही सुंदर पत्रे आजही आम्ही जपून ठेवली आहेत. पत्राच्या सुरुवातीला लिहिलेले ' प्रिय दादा, किंवा प्रिय आई ' हे शब्द अंगावर मोरपीस फिरल्यासारखे जादू करायचे. आणि शेवट ' तुमची लाडकी, तुमचा लाडका ' यासारख्या हृदयस्पर्शी शब्दांचा असायचा. दुसरे नवीन पत्र येईपर्यंत आधीचे पत्र दोनतीन वेळा तरी वाचून झालेले असायचे. आताशा  पत्र लिहिणे हा भाग कालबाह्य होत चालला असला तरी एक काळ असा होता, की ज्यावेळी पत्रांच्या माध्यमातूनच एकमेकांशी संवाद साधला जायचा. दूर अंतरावर असणाऱ्या आपल्या प्रिय जनांशी संवाद साधण्याचे ते एक प्रभावी माध्यम होते.

आजही आपल्यापैकी काहींनी आपल्या वडिलांनी आपल्याला लिहिलेलं पत्र , भावाने लिहिलेलं पत्र वा अन्य कोणी लिहिलेलं पत्र आठवण म्हणून जपून ठेवलं असेल. ही पत्रं म्हणजे एक अनमोल ठेवा असतो. कधी त्या माणसांची आठवण आली, तर ती पत्रं पुन्हा वाचावी. त्यासारखा दुसरा आनंद नाही.

जी ए कुलकर्णी या प्रख्यात कथालेखकाने आपल्या प्रिय वाचकांना लिहिलेली पत्रे काही वाचकांनी तर प्राणापलीकडे जपून ठेवली. त्याही पुढे जाऊन काहींनी ती पत्रं चंदनाच्या पेटीत ठेवली. त्या पत्रांना जीएंच्या आठवणींचा मधुर सुगंध आहे.

जीएंची पत्रे प्रदीर्घ असत. जीएंनी त्या काळात अनेक प्रसिद्ध साहित्यिकांना सुद्धा पत्रे लिहिली. जीएंनी श्री. पु. भागवत, सुनीता देशपांडे इ ना लिहिलेली पत्रे पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली आहेत. तो आपल्यासारख्या वाचकांसाठी एक अनमोल ठेवाच आहे. अशाच महान साहित्यिक, विचारवंतांच्या पत्रांचा संग्रह ह वि मोटे यांनी करून तो पुस्तक रूपाने प्रसिद्ध केला. व. पु. काळे यांची पत्रे सुद्धा त्यांच्या चाहत्यांनी जपून ठेवली आहेत. वपुंची आगळीवेगळी भाषाशैली, आपले विचार मांडण्याची पद्धत यामुळे त्यांची पत्रे कधीही वाचली तर नुकतीच लिहिल्यासारखी ताजी वाटतात.

पत्रलेखनाच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या मुलांना काही गोष्टी सांगितल्या,  हितगुज केले. पं नेहरूंनी तुरुंगात असताना इंदिरा गांधींना पत्रे लिहून भवतालच्या जगाची माहिती दिली. सुधारणा, राजकारण, इतिहास, धर्म इ बद्दल माहिती दिली. साने गुरुजींनी सुद्धा आपल्या छोट्या पुतणीला म्हणजे सुधाला पत्रे लिहून खूप गोष्टी समजावल्या आहेत. ती पत्रे ' साने गुरुजींची सुंदर पत्रे ' म्हणून प्रसिद्ध आहेत.

तर लोकहितवादी अर्थात गोपाळ हरी देशमुख यांच्यासारख्या समाजसुधारकाने पत्रासारख्या प्रभावी माध्यमाचा उपयोग समाजसुधारणेसाठी केला. ' प्रभाकर ' या साप्ताहिकातून त्यांची ही पत्रे प्रसिद्ध झाली. इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र, परंपरा, धर्म जातीभेद, स्त्रीजीवन इ विषयांवर त्यांनी तब्बल १०८ पत्रे लिहिलीत. ही पत्रे ' शतपत्रे ' म्हणून प्रसिद्ध आहेत.

आज ही सगळी माहिती एवढ्याकरिता सांगितली की या पत्रांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले आहे. ज्यांना अभिजात मराठी वाचायचे आहे, मराठीचा अभ्यास करायचा आहे, मराठीवर प्रभुत्व मिळवायचे आहे अशांनी जरूर ही पत्रे वाचावी. किमान ही पुस्तके चाळावी .

 वर उल्लेखिलेली प्रसिद्ध पत्रे आहेत तसेच चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना लिहिलेले पत्रसुद्धा प्रसिद्ध आहे. पण ते वेगळ्या कारणासाठी. योगी चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराजांची योग्यता कळल्यावर एकदा त्यांच्या  मनात आले की आपण ज्ञानेश्वरांना पत्र लिहावे. पण सुरुवात कशी करावी हेच त्यांना उमजेना. ज्ञानेश्वरांना आशीर्वाद लिहावा, तर ते आपल्यापेक्षा ज्ञानाने मोठे. आणि नमस्कार लिहावा तर ते आपल्यापेक्षा वयाने लहान. म्हणून काहीच न लिहिता त्यांनी ज्ञानदेवांना कोरेच पत्र पाठवले.

खरं तर चांगदेव मोठे योगी, ज्ञानी आणि चौदाशे वर्षे वय असलेले. पण अध्यात्ममार्गात अहंकार सर्वात मोठा शत्रू असतो. सिद्धीच्या मागे लागल्यामुळे चांगदेवांमध्ये अहंकार शिरला. आणि ब्रह्मज्ञानापासून ते वंचित राहिले. म्हणून छोटी मुक्ताई म्हणाली, ' चांगदेव अजून पत्रासारखे कोरेच राहिले.' आपणही हे सगळे समजून घेणार नसू तर आपणही तसेच कोरे राहू. ' मेरा जीवन कोरा कागज कोराही रह गया. ' अशी आपली गत नको व्हायला.

विश्वास  देशपांडे, चाळीसगाव.
 ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...